चित्र'कळा'

विवेक मराठी    12-Mar-2018
Total Views |

कला मुळात उपजत असावी लागते. मारून मुटकून झालेला कलाकार कळतो. काही गोष्टी आपल्याला चांगल्या येतात आणि काही अजिबात येत नाहीत. आपल्याला यातलं काहीच येत नाही, पण मग लक्षात येतं - देवाने हात दिलेत ते टाळया वाजवण्यासाठीसुध्दा उपयोगी येतात. ऑॅप्शनला टाकण्यापेक्षा हे ऑॅप्शन बरे आहेत.

देव कुणाच्या हातात काय कला देईल सांगता येत नाही. कला मुळात उपजत असावी लागते. समज आली की तिला फाईन करायचं काम करता येतं फक्त. मारून मुटकून झालेला कलाकार कळतो. काही गोष्टी आपल्याला चांगल्या येतात आणि काही अजिबात येत नाहीत. मला भौतिकशास्त्र, चित्रकला ही कामं कायम डोक्यावरून गेली आहेत. शाळेत मोजक्या मुलांच्या वह्या कायम सुरेख असायच्या. सुंदर अक्षर असायचं. साच्यातून काढलेले काजू मोदक जसे रांगेत मांडल्यावर देखणे दिसतात, तशा त्यांच्या ओळी दिसायच्या. जीवशास्त्राच्या वह्यातली चित्रं अगदी प्रिंट केल्यासारखी दिसायची. चित्रं काढल्यावर त्यातल्या भागांना रेषा काढून नावं देण्याची कल्पना माझ्यासारख्या दिव्य चित्रकारांमुळे जन्माला आली असावी. मी काढलेलं जास्वंदाचं अर्ध कापलेलं फूल खाली 'जास्वंद' असं लिहिल्यामुळे ओळखू यायचं. अमिबा ही जगातली सगळयात सोपी आकृती आहे काढायला, कारण त्याला ठरावीक आकार नसतो. तुम्ही जो काढाल किंवा काढल्यावर जो दिसेल तो अमिबा.

आम्हांला धाडणेकर नावाचे थोर चित्रकार ड्रॉईंगला होते. मागच्या जन्मीचं पाप असणार त्यांचं काहीतरी, कुठे कुणाला ते फेडावं लागेल कळणार नाही. फळयावर मोठ्ठा चौकोन काढून त्यात प्रत्येकाला मनाला वाटेल तशी रेषा काढायला ते सांगायचे आणि सगळया वर्गाने त्यात घाण करून झाली की डस्टरने नेमक्या रेषा पुसून ते त्यातून गणपती, देवी वगैरे काढायचे, खडू न वापरता. एवढा थोर माणूस आम्हाला शिकवायला होता. ग्लायकोडीनच्या एका जुन्या जाहिरातीत लता मंगेशकर म्हणायची, 'जो खरा है वो कभी नही बदलता.' मी तेच केलं. माझ्या चित्रकलेत कुठलीही वाढ, घट झाली नाही. काय एकेक ताप असायचे. ते वॉटर कलरने वॉश द्यायचा असतो पेपरला. आम्हाला एकदा स्काय ब्ल्यू कलरचा वॉश द्यायला सांगितलेला, माझा कागद नीळ घातल्यासारखा झाला होता. बरं, तो पांढरा वाढवून पातळ करायला गेलो, तर आकाशाला कोड आल्यासारखं दिसायला लागलं. शेवटी दुसऱ्या पानावर आकाश रंगवेपर्यंत तास संपला. सर म्हणाले, ''मोराच्या अंगावर कागद घासून आणला असतास तरी एवढा निळा झाला नसता.''

ती वर्तुळं काढून त्यात त्या वर्तुळपाकळया काढायच्या आणि कुणाच्या संकरातून कुठला रंग तयार होतो ते त्या पाकळीत काढायचं असायचं. कडेला त्यांचे आई-बाप रंग असायचे. माझ्या तिन्ही पाकळयात एकाच बापाची मुलं असल्यासारखा एकच रंग दिसायचा. ब्रश धुवावा लागतो वगैरे धुवट कल्पना मला तेव्हा माहीतच नव्हत्या. फ्री हँड जरा सोपं वाटायचं. पेपरला मध्ये फोल्ड करायचं, एका बाजूचं हवं तसं चित्रं काढायचं, मग ट्रेस करून तेच दुसऱ्या बाजूला. बादली, जग, प्लास्टिकचा मग आणि ती फळं यांनी मला कायम वात आणला होता. एक तर ती बादली चार माणसांची अंघोळ होईल इतकी असायची किंवा अगदी टमरेलाइतकी लहान. बादलीची कडी स्टीलची असली, तरी माझ्या चित्रात ती पायजम्याच्या नाडीसारखी मऊ  पडलेली असायची. हा सगळा ऐवज ज्या स्टुलावर ठेवून त्यावरचं जे कापड काढतात, ते इतर मुलांच्या चित्रात मखमली दिसायचं. माझं सगळया वस्तू पायपुसण्यावर ठेवल्यासारख्या.

त्यात ती परडीत आणि विखुरलेली फळं काढायची असायची. माझा आंबा नारळासारखा यायचा आणि नारळ पपईसारखा, द्राक्षाचा घड मधाच्या पोळयासारखा भरभक्कम. फणस सोपा पडायचा, पण ते काटे काढताना ठिपके काढायला कंटाळा यायचा आणि तो गरम पाणी पडून फोड आल्यासारखा दिसायचा. स्ट्रॉबेरी, सीताफळ वगैरे मी विचारही करायचो नाही. केळी किती काढणार? त्याची चांगली फणी काढली होती चार ठिकाणी दुकान लावल्यासारखी, तर मला धुतलेला त्यांनी. ''प्रत्येक फळ एकदाच हे कळत नाही का?'' म्हणाले. बरं, हे सगळं परत रंगवायचं. माझा आंबा केशरी पिवळसर वगैरे माझ्या मनात असायचा, पण कागदावर तो नासल्यासारखा दिसायचा. नारळ चॉकलेटमधून बुडवून काढल्यासारखा यायचा. एकाच घडातली द्राक्षं विविध रंगात यायची. केळी सल्फरने अकाली पिकवल्यासारखी दिसायची. अभ्यास करून अवघड विषय समजेल, कारण ती विद्या आहे. कला कशी येईल?

एकदा 'आठवडयाचा बाजार' असं चित्रं काढायला सांगितलेलं. भाजी विक्रेता, घेणारी बाई आणि लहान मूल, देऊळ, रस्ता, बस, सायकलवाला, हातगाडीवाला वगैरे माणसं फळयावर त्यांनी पाच मिनिटात काढली. भाजी विक्रेता माझ्या कागदावर निघेपर्यंत तास संपला. पण पुढचे अनेक तास तेच चित्र बोर्डावर राहाणार होतं. निवांत कम्प्लीट करायचं होतं. बाई आणि मुलाचे हात गजानन महाराजांसारखे अजानुबाहू, मुलाच्या हातातली पिशवी एवढी मोठी की त्याची चड्डी काढावीच - आय मीन दाखवावीच लागली नाही. माझी भाजीची गाडी तिरकी झालेली, तिला चाकं दाखवताना मागची दिसत नाहीत म्हणून दोनच काढली होती. भाजीवाला फक्त कमरेच्या वर दिसत होता, खालचा भाग अदृश्य आणि गाडीवर मी म्हणतोय म्हणून भाज्या. ''काय रे, कुठल्या भाज्या आहेत या अशा लांबसडक?'' ''सर, पालेभाज्या आहेत.'' त्या दिवसापासून त्यांनी मला ड्रॉईंगच्या पिरीअडला ऑॅप्शनला टाकला.

माझ्यासारखे विद्यार्थी असण्याचे फायदेही आहेत. कुणाकडे लक्ष द्यायचं ते त्यांना कसं कळेल नाहीतर? नुसते फराटे मारून काही जण क्षणार्धात माणूस उभा करतात, काही जण फोटो काढल्यासारखी चित्रं, रांगोळी काढतात. काही जण वाद्यं वाजवतात, मूर्ती तयार करतात, कोरतात. प्रत्येकाला ती येणार नाहीच. आली, तर मग एकमेकांना त्याची किंमत राहणार नाही. कधीकधी वैषम्यं वाटतं, आपल्याला यातलं काहीच येत नाही. पण मग लक्षात येतं, देवाने हात दिलेत ते टाळया वाजवण्यासाठीसुध्दा उपयोगी येतात. आपल्यासाठी वाजली नाही एखादी तरी चालेल, पण काही चागलं दिसलं तर आपण जरूर वाजवावी, त्यांचे हात हातात घ्यावेत. ऑॅप्शनला टाकण्यापेक्षा हे ऑॅप्शन बरे आहेत.

9823318980