मिडास राजाची हाव काय कामाची?

विवेक मराठी    13-Mar-2018
Total Views |

श्रीमंत बनण्याची आकांक्षा बाळगणे चुकीचे नाही, पण ही श्रीमंती केवळ धनाची नको तर तनाची आणि मनाचीही असली पाहिजे. सोप्या शब्दांत सांगायचे, तर केवळ संपत्तीचे ढीग साचवण्याला काही अर्थ नसून ती उपभोगण्यासाठी तुमचे शरीर निरोगी हवे आणि आपल्या संपत्तीचा विनियोग गरजवंतांसाठी करण्याइतके तुमचे मन विशाल हवे. संपत्तीच्या बाबत आपली अवस्था एका इंग्लिश म्हणीप्रमाणे 'वॉटर वॉटर एव्हरीव्हेअर, नॉट ए ड्रॉप टु ड्रिंक' अशी झाली, तर त्याचा उपयोग काय?

मी माझ्या वाटचालीत गरिबी आणि श्रीमंती या दोन्ही अवस्था त्यांच्या सुख-दु:खाच्या पैलूंसहित अनुभवल्या आहेत आणि त्यावरून एका निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे, तो म्हणजे संसारी माणसाने जीवनात अतिविरक्ती व अतिहावरटपणा ही दोन्ही टोके गाठू नयेत. पैसा ही मोठी विचित्र गोष्ट आहे. ती ज्यांच्याकडे नसते ते दु:खी असतात. पैसा मिळत नाही म्हटल्यावर ते नशिबाला, पूर्वजन्माला बोल लावतात. परिस्थितीशी तडजोड करतात. कुटुंबाला सुखी आयुष्य मिळवून देता येत नसल्याबद्दल स्वत:ला अपराधी मानतात आणि यातूनच त्यांची मानसिकता विरक्तीकडे किंवा उदासीनतेकडे वळते. 'अमुचा प्याला दु:खाचा' असे मनाला बजावत ते कुढत राहतात.

दुसरीकडे ज्यांच्याकडे प्रचंड पैसा असतो, तेही सुखी दिसत नाहीत. पैशाच्या जोरावर ते भौतिक सुखोपभोग खरेदी करू शकत असले, तरी आयुष्याला काहीतरी दु:खाची किनार असतेच. असे लोक एकाकी असतात, काहींना गृहसौख्य नसते, तर काहींना मुलाबाळांच्या भवितव्याची काळजी लागून राहिलेली असते. काहींना व्याधी पाठीमागे लागल्याने पैशाचा पुरेपूर आनंद घेता येत नसतो. त्यातून पैसा पापमार्गाने मिळवला असेल, तर त्याचीही भीती मनाला खात असते. कायद्याची भीती, गुन्हेगारी धमक्यांची भीती, देवापुढे ताठ मानेने उभे राहण्याची भीती. विवंचनेला अंत नसतो. या चिंता विसरण्यासाठी कुणी व्यसनाचा आधार घेतात. ही दु:खाची किनार श्रीमंतांचे आयुष्य बाहेरून बघणाऱ्याला सहजासहजी दिसून येत नाही. म्हणूनच कदाचित समर्थ रामदासांनी आपल्या मनाच्या श्लोकांत विचारले असावे.

जगी सर्व सुखी असा कोण आहे,

विचारी मना तूच शोधुनी पाहे॥

मी लहानपणी गोष्टीच्या पुस्तकात मिडास राजाची गोष्ट वाचली होती - फ्रिजिया देशाचा राजा मिडास आपल्या मुलीबरोबर प्रचंड वैभवात राहत होता. ऐश्वर्य पायाशी लोळण घेत असूनही मिडास राजाला आणखी श्रीमंतीचे - विशेषत: सोन्याचे आकर्षण होते. एकदा त्याने डायोनिसस देवाच्या सहकाऱ्याला मदत केली. त्यामुळे संतुष्ट होऊन डायोनिससने मिडासला वरदान देऊ केले. ही संधी चांगली आहे असे बघून मिडासने त्याच्याकडे 'मी हात लावेन त्याचे सोने व्हावे' असे वरदान मागितले. डायोनिससने मिडास राजाला सावध केले व मागणीवर पुन्हा विचार कर, असे बजावले, परंतु लोभाने आंधळे झालेल्या मिडासला तो इशारा उमगला नाही. अखेर नाइलाजाने देवाने राजाची इच्छा पूर्ण केली.

दुसऱ्या दिवशी मिडास जागा झाल्यापासून तो हात लावेल ती वस्तू सोन्याची व्हायला सुरुवात झाली. मिडास मनातून प्रचंड हरखला, पण लवकरच त्याला पश्चात्ताप झाला. तो जेवायला बसल्यावर ताटातील खाद्यपदार्थही सोन्याचे व्हायला लागले. मिडासला स्वत:च्या हाताने खाता आले नाही. ते भरवायलाही कुणीतरी सेवकांची गरज भासू लागली. एक दिवस त्याची लाडकी मुलगी धावत येऊन गळयात पडली. भान विसरून मिडासने तिला जवळ घेतले, तर हात लागताच मुलीचे रूपांतर सोन्याच्या पुतळयात झाले. मिडासच्या आयुष्यात अंधार पसरला. त्याची ही स्थिती डायोनिसस देवाला समजली. त्याने मिडासला पॅक्टोलस नदीमध्ये हात स्वच्छ धुण्यास सांगितले. मिडासने तसे करताच त्याच्या हातातून सगळे सोने नदीच्या काठावर सांडले आणि स्वच्छ हातांनी राजवाडयात परतल्यावर त्याला त्याची मुलगीही पूर्वीसारखी लाभली. मानवी आयुष्यातील सर्व सुखे लाभल्याने मिडासच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलला. यातून धडा घेऊन हा राजा पूर्ण बदलला. आपल्या संपत्तीचा विनियोग प्रजेच्या कल्याणासाठी केला आणि त्याला थोरवी प्राप्त झाली.

मी ही कहाणी एवढयासाठीच सविस्तर सांगितली, कारण ती थोडयाफार फरकाने माझ्या आयुष्यातही घडली. व्यवसाय वाढवताना सुरुवातीला मी झटपट यश-वैभव मिळवण्यासाठी असाच ध्यास घेतला होता. वेडयासारखे काम करत होतो. कुटुंबाकडे, आरोग्याकडे, दैनंदिन वेळापत्रकाकडे दुर्लक्ष केले होते. बघावे तेव्हा माझ्या मनात व्यवसाय वाढवण्याचा आणि नफा कमवण्याचा विचार असे. त्यातून मला पैसा तर मिळाला, पण माझे आरोग्य मात्र हरपले. माझ्या भोजनाची स्थिती थोडीफार मिडास राजासारखीच झाली. पथ्यामुळे मी पाच वर्षे रोजच्या जेवणात कोंडयाची चपाती, हळद-मीठ घालून उकडलेल्या भाज्या आणि काही फळांचे तुकडे इतकेच पदार्थ खाऊ शकत होतो. अनारोग्यामुळे माझे आयुष्य दु:खमय झाले होते. वेदना, चिंता, नैराश्य, घृणा अशा भावनांनी मला घेरले होते आणि जगावेसे वाटत नसल्याने मी आपणहोऊन मृत्यूच्या दारात चालत जात होतो. मात्र या टप्प्यावर मला परमेश्वराने आणखी एक संधी दिली. मी पैशाचा पाठलाग करण्याचे थांबवले, व्यवसायाला आणि आयुष्याला एक शिस्त आखून दिली. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करायचे नाही, असे पक्के ठरवले. त्याचबरोबर मी समाजाभिमुख झालो. सामाजिक कार्यक्रमांत मिसळू लागलो, मी कष्टाने व प्रामाणिकपणे मिळवलेल्या पैशांतून गरजूंना मदत करू लागलो. कुटुंबाला वेळ देऊ लागलो. या बदलाचा परिणाम म्हणून माझे आरोग्य मला परत मिळाले आणि मानवी जीवनातील सर्व सुखेही परत आली.

मी वर म्हटल्याप्रमाणे, बाहेरून बघणाऱ्याला श्रीमंतांच्या आयुष्याची दु:खी किनार जाणवत नाही. माझ्याच घरात एकदा एक प्रसंग घडला. आमच्या परिचितांपैकी एक महिला आमच्या घरी आली होती. ती माझ्या भोजनाची वेळ होती. माझ्या जेवणातील अगदी साधे व मसालारहित पदार्थ बघून त्या बाईंना खूप आश्चर्य वाटले. त्या म्हणाल्या, ''दातार, तुमच्यासारखा श्रीमंत माणूस हे असले साधे जेवण जेवतो, यावर विश्वास बसत नाही.'' मी त्यावर गंमतीने त्या बाईंना म्हणालो, ''ताई, श्रीमंत झालो म्हणून काय सोने खाऊ का? अहो यात गरीब-श्रीमंत असा फरक नसतो. प्रत्येकाच्या पोटाची भूक अखेर साध्या अन्नानेच भागते.''

पुष्कळ लोक श्रीमंती आल्यानंतर प्रचंड माज करतात. सुदैवाने मला तशी दुर्बुध्दी कधी झाली नाही, कारण गरिबीने मला कष्टाच्या भाकरीची किंमत शिकवली आणि माझ्या आई-वडिलांच्या संस्कारामुळे मी कधीही बेगुमान झालो नाही. समाजाला अज्ञात असलेली श्रीमंतांची दु:खे जवळून बघितल्यावर मी वेळीच शहाणा झालो. मला आठवते, की एका राजघराण्यातील व्यक्तीशी आमचा परिचय होता. त्यांच्याकडे आम्ही गप्पा मारायला जात असू, तेव्हा दर खेपेस त्यांची पत्नीही तेथे असे. तिला घरात सगळे रानीमाँ म्हणत. या राणीसाहेबांचा एवढा दरारा होता की सगळेच त्यांना वचकून असत. रानीमाँ तरुण असताना त्यांना आपल्या वैभवाचा इतका अहंकार होता, की मनासारखे पदार्थ ताटात नसले तर त्या सुग्रास भोजनाच्या ताटाला लाथ मारायलाही कमी करत नसत. पुढे दैवाचे फासे फिरले. ते राजघराण्यातील गृहस्थ वारले आणि कालौघात रानीमाँही वृध्द झाल्या. मालमत्ता वारसांच्या ताब्यात गेल्यावर उतारवयात त्यांचे हाल सुरू झाले. कुणी खाण्या-पिण्याची किंवा प्रकृतीची चौकशीही करेनात. एकाकी अवस्थेत त्या दाण्या-दाण्याला मोहताज होऊन वारल्या. उपासमारीने अशक्तपणा येऊन मृत्यू ओढवल्याचे निदान झाले. ते समजताच मला वाईट वाटले. एकेकाळी जी राणी जेवणाच्या ताटाला लाथ मारत असे, तिचा मृत्यूसुध्दा अखेर अन्नाचा कणही पोटात न गेल्यामुळे व्हावा.... मला येथे 'खेळ कुणाला दैवाचा कळला' हे एका गाण्यातील शब्द प्रकर्षाने आठवले.

मित्रांनो! जगात सर्वसुखी कुणी नसला, तरी निश्चय केल्यास आपण नेहमी आनंदी आणि समाधानी राहू शकतो. मला तर संत तुकाराम महाराजांच्या 'जोडोनिया धन, उत्तम वेव्हारे, उदास विचारे, वेच करी॥' या उपदेशाच्या दोन ओळींतच हे आनंदाचे झाड गवसले आहे. पैशाचा हव्यास धरून वाईट मार्ग पत्करायचा नाही. कष्टाने आणि प्रामाणिकपणे मिळेल त्यात स्वत: आनंदी राहायचे आणि दुसऱ्यालाही आनंद द्यायचा, इतकीच माझी सुखाची कल्पना आहे. पण हा सुखाचा झरा झुळझुळ वाहता ठेवायचा असेल, तर हावरटपणा दूर ठेवायला हवा. मिडास राजासारखी हाव काही उपयोगाची नाही. एक संस्कृत सुभाषित आहे -

लोभ मूलानि पापानि संकटानि तथैव च।

लोभात्वप्रवर्तते वैरं अतिलोभात्विनश्यती॥

(लोभ हे पापाचे आणि संकटाचे मूळ आहे. लोभामुळे वैर निर्माण होते तर अतिलोभामुळे नाश होतो.)

***

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा nand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 00971505757887 या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवू शकतात.)