पैशांची ‘शिल्लक’ - का आणि कशी?

विवेक मराठी    15-Mar-2018
Total Views |

‘आमचं उत्पन्न मर्यादित आहे, पण खर्चांचे मात्र डोंगर आहेत म्हणून काही शिल्लक राहत नाही’ अशी बहुसंख्य मध्यमवर्गाची तक्रार असते. तसं होत असेल, तर पुन्हा पुन्हा आपले खर्च तपासून पाहावेत, जमेल तेवढी काटछाट करावी, पण काहीतरी शिल्लक राहीलच हे नक्की बघावं. कारण नियमितपणे शिल्लक ठेवलेला पै अन पै भविष्यात कामाला येतो.

आपल्याकडे येणाऱ्या आणि आपल्याकडून जाणाऱ्या पैशांचं विश्लेषण कसं करायचं, हे गेल्या दोन लेखांमध्ये आपण पाहिलं.

 पैशांच्या व्यवस्थापनाचं सगळ्यांत पहिलं, महत्त्वाचं आणि ‘कॉमन सेन्स’ सूत्र म्हणजे, ‘आवकीपेक्षा जावक कमी असायला हवी आणि काहीतरी शिल्लक उरायला हवी’. दर महिन्यातल्या, तिमाहीतल्या, सहामाहीतल्या आणि वर्षातल्या पैशांच्या आवक-जावकीची व्यवस्थित नोंद करून, मुळात पहिलं सूत्र आपण पाळतो आहोत का हे नियमित तपासून पाहायला हवं. आलेले सर्वच पैसे जात असतील, तर शिल्लक काही उरत नसेल आणि आवकीपेक्षा जावक जास्त असेल, तर ही तूट भरून काढण्यासाठी हळूहळू आपण आवश्यक-अनावश्यक कर्जांचा डोंगर आपल्या आयुष्यात उभा करत असू. ह्यापैकी आपल्या आयुष्यात काय होत आहे, हे आपण नियमित तपासून पाहायला हवं.

 जर शिल्लक काहीच उरत नसेल, तर आपल्या खर्चांचं काटेकोरपणे विश्लेषण करायला घ्यावं. आपण करत असलेल्या खर्चामधले जीवनावश्यक खर्च कोणते आहेत आणि जीवनशैलीविषयीचे खर्च कोणते आहेत, हे पुन्हा पुन्हा तपासून पाहावं. जीवनावश्यक खर्चांमध्ये काही तडजोड करता येत नाही, पण जीवनशैलीसंबंधी खर्चांमध्ये काटछाट करता येते. आपल्या जीवनशैलीविषयक खर्चामुळे आपली काही शिल्लक राहत नसेल (किंवा जावक जास्त होऊन आपल्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढवून घेत असू), तर वेळीच आत्मपरीक्षण करून जीवनशैली बदलायला हवी.

 मुळात आपल्या नियमित उत्पन्नामधून होऊ शकतील तेवढे खर्च आणि नियमितपणे फेडू शकू तेवढ्याच EMI लावून घ्याव्यात. नियमित उत्पन्नामध्ये साधता येईल तीच जीवनशैली जगायची मनाची पूर्ण तयारी असावी. हा अगदी ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ असा मध्यमवर्गीय मराठी विचार आहे, पण तो खरोखर शहाणपणाचा आहे. कारण सहजसाध्य कर्ज आणि क्रेडिट कार्डं यामुळे खिशात खरे पैसे नसले, तरी ‘पैशांचं सोंग’ आणणं सध्या एकदम सोपं झालं आहे. हे सोंग धारण करून चकचकीत जीवनशैलीच्या भूलभुलैयामध्ये आपण कधी शिरतो, हे आपल्या लक्षातही येत नाही. अन एकदा शिरलो की आपणच निर्माण केलेल्या खर्च आणि हप्त्यांच्या विळख्यात आपण कधी सापडू हे सांगता येत नाही. एकदा ह्या भूलभुलैयात अडकलं किंवा विळख्यात सापडलं की यातून बाहेर पडण्यासाठी (किंवा पैशाचं घेतलेलं सोंग निभावून नेण्यासाठी) आपली सर्व शक्ती (आणि आयुष्याची अनेक वर्षं) खर्च पडतात. आणि ज्या ‘जीवनशैली’साठी म्हणून हे सारं केलं, तिचा फक्त पोकळ आणि जीवघेणा देखावा उभा राहतो.

 हे आपल्या आयुष्यात होऊ नये, यासाठी सातत्याने पैशांच्या आवक-जावकीचा काटेकोर हिशोब ठेवणं आणि त्यांचं विश्लेषण करत राहणं हे महत्त्वाचं असतं. नुसता हिशोब न ठेवता आवकीपेक्षा जावक कमी ठेवून आपल्याकडे सतत काहीतरी शिल्लक उरत राहील असाही प्रयत्न करणं गरजेचं असतं.

 पैशाच्या संपूर्ण कारभारामध्ये आपल्या जवळची ‘शिल्लक’ ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आयुष्य अत्यंत बेभरवशाचं असतं. आयुष्यात, करियरमध्ये आणि पैशांच्या आवक-जावकीमध्येही चढउतार असतात. आजार, अपघातांपासून ते अचानक नोकरी जाणं, व्यवसायात फटका बसणं असे कोणतेही दुर्धर प्रसंग कोणाच्याही आयुष्यात, कोणतीही पूर्वसूचना न देता, कधीही येऊ शकतात. अशा अडचणीच्या प्रसंगांमध्येही आपल्याला जीवनावश्यक खर्च करावेच लागतात. ते करण्यासाठी आपल्यापाशी पैसे ‘शिल्लक’ असणं गरजेचं असतं.

 ‘आमचं उत्पन्न मर्यादित आहे, पण खर्चांचे मात्र डोंगर आहेत म्हणून काही शिल्लक राहत नाही’ अशी बहुसंख्य मध्यमवर्गाची तक्रार असते. तसं होत असेल, तर पुन्हा पुन्हा आपले खर्च तपासून पाहावेत, जमेल तेवढी काटछाट करावी, पण काहीतरी शिल्लक राहीलच हे नक्की बघावं. कारण नियमितपणे शिल्लक ठेवलेला पै अन पै भविष्यात कामाला येतो.

 अर्थात, शिल्लक ठेवलेला पै अन पै योग्य वेळ आल्यावर उपयोगी पडला पाहिजे, यासाठी त्याची योग्य पद्धतीने बचत किंवा गुंतवणूक करावी लागते. बचत किंवा गुंतवणूक याविषयी पुढच्या लेखामध्ये.

  प्रसाद शिरगावकर