पोटनिवडणुकीचा इशारा

विवेक मराठी    16-Mar-2018
Total Views |

आधी राजस्थान आणि नंतर उत्तर प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांतील लोकसभा पोटनिवडणुकीचे जे निकाल लागले, त्या निकालांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे. अनेक वेळा पोटनिवडणुकांच्या निकालात सत्ताधारी पक्षाचा पराभव होत असतो, त्याची अनेक कारणे असतात. विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका होत असताना नेतृत्वाच्या प्रश्नावर मतदान होत असते. परंतु पोटनिवडणुकीमध्ये अनेक वेळा स्थानिक प्रश्न, उमेदवार आणि लोकांची त्या वेळची मानसिकता यांना महत्त्व मिळते. असे असले, तरी गोरखपूरच्या भाजपा उमेदवारांचा झालेला पराभव हा त्या पक्षाला जिव्हारी लागणारा असेल. उत्तर प्रदेशातील गोरखपूर पीठाधीशांच्या दृष्टीने आणि भाजपाच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित असणारा हा मतदारसंघ आहे. असे असतानाही योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असताना त्या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार पराभूत होतो, याचा अर्थ आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने नीट कंबर कसली नाही, तर उत्तर प्रदेशातील प्रत्येक मतदारसंघ धोक्यात आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचे जनता दल आणि भाजपा यांची युती होऊनही आणि लालूप्रसाद यादव तुरुंगात असतानाही त्यांच्या पक्षाच्या लोकप्रियतेवर यत्किंचीतही परिणाम झाला नाही. हे सर्व घडत असताना चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा आणि सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करण्याचा संकल्प करणे या बाबी भाजपाच्या दृष्टीने चिंतेत भर घालणाऱ्या आहेत. एकदा विजयाची मानसिकता तयार झाली की सोबत नसलेही मैत्रीचा हात पुढे करतात आणि एकदा पराभवाची मानसिकता तयार झाली की बरोबर असलेल्यांची खात्री राहत नाही, अशी स्थिती निर्माण होते.2014च्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले असले, तरी 31 टक्केच मते मिळाली होती. यापैकी सुमारे 20% मते हिंदुत्वाच्या आधारे मिळाली असावीत आणि उर्वरित 11 टक्के मते विकासाकरिता, चांगल्या प्रशासनाकरिता आणि मनमोहन सिंग सरकारला कंटाळून भाजपाला मिळाली असावीत, असे विश्लेषणावरून दिसते. सुमारे चार वर्षांच्या काळात केंद्र सरकारने राजकीय स्तरावर स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न केला आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात एकामागून एक मंत्रालये भ्रष्टाचारामध्ये आकंठ रुतलेली होती. परंतु सध्याच्या प्रशासनाबद्दल हेच विधान ठामपणाने म्हणता येत नाही. स्वच्छ भारताच्या, स्वच्छ गंगा, स्मार्ट सिटी, काळया पैशाविरुध्द युध्द, GST अशा अनेक चांगल्या योजना असल्या, तरी त्या पूर्ण करण्यासाठी जी प्रशासकीय सचोटी आणि कार्यप्रणाली लागते, त्यांचा पूर्ण अभाव या काळात दिसला. त्यामुळे भाजपाच्या समर्थक 31 टक्क्यांच्या मतदारवर्गात जी वाढ व्हायला पाहिजे होती, ती न होता 2014ला पाठिंबा दिलेल्या अनेक मतदारांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या अस्वस्थतेचे प्रतिबिंब या निकालामध्ये दिसले. गैरव्यवहार टाळण्यासाठी जे कठोर निर्णय घेतले गेले, त्याचा परिणाम भ्रष्ट प्रशासनामधील भ्रष्ट आणि अप्रामाणिक लोकांवर न होता सर्वसामान्य लोकांना मात्र हाल भोगावे लागत आहेत.     

राजकीय यशासाठी प्रशासन आणि पक्ष, संघटना यांच्यात समंजस्य आणि सुसंवाद आवश्यक असतो. सुदैवाने उच्चपातळीवर तसा तो आहे. तसा तो असल्यामुळेच भाजपाला एकामागून एक राज्ये जिंकता आली. परंतु ते सामंजस्य खालपर्यंत झिरपलेले नाही, तर कार्यकर्ता अस्वस्थ आहे. त्याचबरोबर भाजपाच्या वाढत्या बळाबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रादेशिक पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांच्या मनात पुरेसा विश्वास निर्माण करण्यात भाजपाला यश आलेले नाही. भाजपाचा प्रभाव हा सर्व विरोधी पक्षांना त्यांच्या अस्तित्वावरचे संकट वाटू लागले आहे. वास्तविक समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांच्यामधून विस्तव जात नव्हता. परंतु या दोन्ही पक्षसमोर अस्तित्वाचे संकट निर्माण झाल्यामुळे शेवटचा उपाय म्हणून हे दोन्ही पक्ष एकत्र आले. या एकत्रित येण्यातून जे यश मिळाले, त्यामुळे विरोधी पक्षाच्या एकत्रीकरणाला गती मिळेल यात शंका नाही.

असे असले, तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी वेगळया प्रकारची असते. त्या वेळी लोकांसमोर देशाचे किंवा राज्याचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न असतो. विरोधी पक्षाची आघाडी एकत्र झाली, तरी त्यामधून सर्वांना मान्य होईल असे नेतृत्व निर्माण होणे आणि सर्वांच्या सामूहिक निर्णयप्रक्रियेतून सरकार चालणे शक्य नाही, हे आजवरच्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 2019च्या निवडणुकीतील प्रमुख प्रश्न स्थिर सरकार की अराजक असा राहील. ज्या काँग्रेसने आजवर केंद्र सरकारचे नेतृत्व केले, त्या पक्षाला उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांत काहीही स्थान नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी वर्षं-सव्वा वर्षात विद्यमान परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने आपल्या समर्थकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन राज्यकारभार केला, आपल्या सहकारी पक्षाच्या मनातील अनिश्चितता कमी केली आणि परिवर्तनासाठी थोडी अधिक वाट पाहण्याचा विश्वास लोकांना दिला, तर 2019च्या निवडणुकीचे चित्र बदलू शकते. तसेही प्रत्येक निवडणुकीनंतर नवी राजकीय हवा निर्माण होत असते. कर्नाटकाचे निकाल यापेक्षा अगदी वेगळे लागू शकतील. असे असले, तरी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात या राज्यात मागच्या निवडणुकीत जे यश मिळाले, त्यापेक्षा अधित मोठे यश मिळू शकत नाही. त्यामुळे यातील कुठल्याही राज्यात कमी कामगिरी होणे भाजपाला परवडणार नाही.

 

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.