नाकाचे आजार

विवेक मराठी    17-Mar-2018
Total Views |

   

काल एक तरुण माझ्या दवाखान्यात आला. माझ्यासमोर बसताच, “माझं नाकाचं हाड वाढलं आहे. यापूर्वी चार वेळा मी त्यावर ऑपरेशन करून घेतलं आहे. पण ते परत परत वाढतं. आता मला ऑपरेशन करायचा कंटाळा आला आहे. तुम्ही काही करू शकता का? आणि गॅरंटी असेल तरच ट्रिटमेंट चालू करा. उगा पैशाचा आणि वेळेचा अपव्यय नको.” असं तो अत्यंत शौर्यानं म्हणाला. (चला. म्हणजे चार ऑपरेशन्सचा बाकी काही फायदा झाला असो अथवा नसो, त्या चारही वेळा जी गॅरंटी मागितली नव्हती, ती यावेळी इथे पहिल्यांदाच मागण्याइतकं धैर्य तर वाढलं!)

“गॅरंटी तर मी उद्या या खुर्चीवर असेन याची पण नाही. जोपर्यंत असेन तोपर्यंत प्रयत्न करु.” मी म्हटलं.

“ते प्रयत्न वगैरे नको, खात्रीनं बरं होणार आहे का?” तो तरुण अन्य कोणावर तरी असलेली नाराजी माझ्यावर काढत होता.

“आधी मला तुम्हाला तपासून, तुमचा आजार औषधानं बरा होणारा आहे की नाही ते ठरवू दे. बाकी पुढचं सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. कारण आम्ही ग्रंथात सांगितलेले उपचारच प्रत्येक रुग्णाला सांगतो. ते उपचार आणि पथ्यपालन यांचं रुग्ण किती प्रामाणिकपणे करतो यावर उपचारांचं यशापयश अवलंबून असतं.” अशा रीतीनं त्याच्या कोर्टात चेंडू गेल्यावर तो जरा थंड झाला आणि तपासून झाल्यावर त्याला मी योग्य उपचार सांगितले.

   नाकाचं हाड वाढणं (यात दोन नाकपुड्यांच्या मध्ये असलेला हाडाचा नरम पडदा एका बाजूला सुजतो- स्पीड ब्रेकर सारखा), सायनसायटीस (मानवी कवटीत दोन्ही भुवयांच्या वर आणि दोन्ही गालाच्या हाडावर अशा चार पोकळ्या असतात. यांना सायनस म्हणतात. सायनसायटीस आजारात या पोकळ्यांमधे कफ/ पू असे स्त्राव किंवा बुरशीसारखे घटक जमा होऊन राहतात.)  आणि नेजल पॉलीप (नाकाच्या पोकळीत वाढणारा मांसाचा अंकुर) हे आजार आजकाल मोठ्या प्रमाणावर आढळतात. ‘शस्त्रक्रिया’ हा त्या तिन्हीवरील हमखास उपयोगी म्हणून सांगितला जाणार उपाय आहे. लोक तो करून देखील घेतात. परंतु आजार पुन्हा पुन्हा होत राहतो. हे म्हणजे नाक कापून अवलक्षण केल्यासारखं होतं. याचं कारण नाकाच्या रचनेमध्ये विकृती निर्माण करणाऱ्या सर्दीच्या मुळावर घाव घातला जात नाही.

     प्रदूषण हे आजच्या शहरांमधील सर्दीचं मुख्य कारण आहे. ते टाळता येणं शक्य नसलं तरी त्याचा काहीतरी प्रतिकार करायला हवा ना? तो करता येतो.

     सर्दी होण्याची आणि ती टिकण्याची अनेक कारणं आहेत. शहरामध्ये लहानपणापासून वातानुकूलीत खोली आणि बाहेरील हवामान यात आलटूनपालटून जात राहिल्यानं घसा आणि नाक यातील आतल्या त्वचेला कसं वागावं हे कळत नाही. त्यातून सतत स्त्राव होत राहतात.

   दिवसभरात अति प्रमाणात किंवा अति थंड पाणी, सरबतं प्यायल्यानं अग्नीवर ताण पडतो. त्या पेयांचं योग्य पचन होत नाही. त्यामुळे विकृत आणि द्रव कफाचं शरीरातील प्रमाण वाढतं.

   रात्री झोपताना गार पाणी पिण्याची सवय असल्यास सर्दी, कफ आणि त्यातून होणारे पुढील आजार बळावतात.

  कलिंगड, खरबूज, अननस, केळी अशी फळं किंवा फळांचे रस भरपूर प्रमाणात घेत राहिल्यानं शरीरात कफाचे आजार मूळ धरून राहतात.

   दूध, दही, ताक, मिल्कशेक हे पदार्थ देखील कफाचे स्त्राव वाढवणारे आहेत.

   आईस्क्रीम, चॉकलेटस्, केक, पेस्टरी, कॅडबरी असे गोड पदार्थ शरीरात विकृत कफाच्या निर्मितीला कारणीभूत ठरतात.

   दुपारी जेवण झाल्यावर झोप घेतल्यानं कफाची वाढ होते.

   डोसे, इडली, उत्तपा हे आंबवलेले पदार्थ वारंवार आणि भरपूर प्रमाणात खात राहिलं तरी सर्दी घर करून राहते. दाक्षिणात्य हवामानात हे पदार्थ चालत असले तरी मुंबई आणि कोकण या पट्ट्यात ते त्रासदायक ठरतात.

  नवीन धान्य, कुकरमध्ये शिजवलेला भात यांचा देखील कफाच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा असतो.

  सर्दीची ही कारणं जोपर्यंत दूर केली जात नाहीत तोपर्यंत ती कमी न होता, नाकाच्या गंभीर आजारांचा पाया शरीरात रचत राहते.

9322790044