युगद्रष्टयास प्रणाम!

विवेक मराठी    17-Mar-2018
Total Views |

''भूतकाळात रमायचे नाही. वर्तमानकाळात कष्ट करायचे, परंतु वर्तमानात अडकायचे नाही. भविष्याची स्वप्ने बघायची, पण स्वप्नरंजन करत बसायचे नाही.'' हा डॉक्टरांचा विचार स्वयंसेवक करताना दिसतात. म्हणूनच स्वप्न साकार करणारे कर्मयोगी संघात पाहायला मिळतात.  डॉक्टरांच्या संकल्पनेतील असे लक्षावधी कर्मयोगी देशभर कर्ममार्गावर चालताना दिसतात आणि ते देशात डॉक्टरांच्या विचाराकडे घेऊन जाणारे अनुकूल परिवर्तन घडवून आणतात.

आद्य सरसंघचालक पूजनीय
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या 130व्या जयंतीनिमित्त सर्व वाचकांस मनःपूर्वक शुभेच्छा! ज्या महापुरुषांच्या योग्यतेचे यथार्थ आकलन भारतातील जवळजवळ सगळया विद्वानांना झालेले नाही, त्या महापुरुषांच्या श्रेणीत डॉ. हेडगेवार येतात.

त्यांची कोणतीही पुस्तके नाहीत, सिध्दान्त सांगणारे ग्रंथ नाहीत, तात्त्वि भाषणांचे खंड नाहीत, आणि विद्वानांना माणूस समजून घेण्यासाठी हे सगळे लागते. परंतु याच्याही पलीकडे माणूस असतो आणि त्याचे युगप्रवर्तक कार्य असते. ते केवळ छापील शब्दांतून समजून घेता येत नाही.

डॉ. हेडगेवारांना समजून घेण्यासाठी संघाच्या शाखेत जावे लागते. तेही एक-दोन दिवस जाऊन चालत नाही, किमान एक-दोन वर्षे जावे लागते. संघाच्या शाखेत डॉ. हेडगेवार रोज भेटतात आणि आपल्याशी संवाद करतात.

मी गेल्यानंतर कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करायचे? भगवान गौतम बुध्दांनी उत्तर दिले - अथ्थ दीपो भव्. गुरू गोविंदसिंगानी उत्तर दिले - गुरू ग्रंथसाहेब. महात्मा गांधीजींनी उत्तर दिले - माझे जीवन. डॉक्टरांनी असे कोणतेही उत्तर दिले नाही.

आपले कार्य त्याच्या मूलभूत विचारांसहित, संकेतासहित, नियमांसहित जसेच्या तसे पुढे चालू राहील, यासाठी त्यांनी संघशाखेची देणगी दिली. आपला गुरू कोणतीही व्यक्ती नाही, आपला गुरू भगवा ध्वज आणि आपण सर्वांनी संघभावनेने काम करायचे आहे, व्यक्तिगत भावनेने नाही.

त्यांनी एक भाषा तयार केली - 'मी संघाचा स्वयंसेवक, माझा गणवेश संघाचा गणवेश, माझे घर संघाचे घर, संघ माझ्या जीवनाचा श्वास आणि विश्वास.' ही भाषा संघशाखेतून स्वयंसेवक आत्मसात करतो.

व्यक्ती येते आणि जाते, कार्य थांबत नाही. कार्य व्यक्तीसाठी करायचे नसून समाजासाठी करायचे आहे. समाज हा अमर आणि चिरंजीव आहे, त्याला मरण नाही. व्यक्तीचा जयजयकार करायचा नाही आणि व्यक्तीला आपल्या निष्ठा व्हायच्या नाहीत. संघात अधिकारश्रेणी असते, नेतृत्वश्रेणी नसते. नंबर एक, दोन, तीन असे प्रकार संघात नसतात. स्वयंसेवकाच्या पातळीवर मुख्य शिक्षक आणि सरसंघचालक समपातळीवर असतात.

डॉक्टरांनी समता, स्वातंत्र्य यावर प्रवचने दिली नाहीत. एक आई आपल्या मुलांशी ज्या प्रकारे व्यवहार करते, तो समतेचा आणि समरसतेचा आदर्श असतो. डॉक्टर आई बनून संघात वावरले. म्हणून त्यांच्या व्यवहारातून समता म्हणजे काय, हे सामान्य स्वयंसेवकालादेखील समजले. डॉक्टरांनी कोणताही निर्णय, संघाचे नाव असो की संघाची प्रार्थना, स्वतःहून कधी केला नाही; त्यावर चर्चा केली, सभा बोलावली, आजच्या भाषेत 'संवैधानिक सभा' बोलाविली. सर्वानुमते जे ठरले, ते संघाचे झाले.

डॉक्टरांनी आपल्या जगण्यातून शिकवण दिली की, समाज एकसंघ राहिला पाहिजे, बलवान झाला पाहिजे, आपले प्रश्न त्यानेच सोडविले पाहिजेत, भिकेची कटोरी हातात घेता कामा नये. स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या सर्व संस्था स्वबळावर उभ्या राहिल्या आहेत. त्या कुणाच्या कुठल्याही प्रकारे मिंध्या नाहीत. स्वायत्त समाजाचे छोटे रूप म्हणजे संघ आणि संघसंबंधित संस्था आहेत.

डॉक्टरांनी संघशाखेच्या माध्यमातून क्रमाक्रमाने कुटुंब, मित्रपरिवार, सभोवतालचा समाज, व्यापक समाज आणि मानवता यांचा विचार क़रायला शिकविले. समष्टीची पूजा करायला शिकविले. जो राष्ट्रीय विचार करतो, तो माणूस आपला. तो आपल्याला शिव्या देत असला तरी तो आपला. म्हणून संघाचे सर्व विरोधक संघाला परके वाटत नाहीत. ते आपलेच लोक आहेत, हीच संघस्वयंसेवकाची भावना राहते. याला काही जण सहिष्णुता म्हणतात, परंतु सहिष्णुतेच्या शंभर पटीने पुढे जाणारी ही संकल्पना आहे.

डॉक्टरांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली, ती म्हणजे भूतकाळातून प्रेरणा घ्यायची, पण भूतकाळात रमायचे नाही. वर्तमानकाळात कष्ट करायचे, परंतु वर्तमानात अडकायचे नाही. भविष्याची स्वप्ने बघायची, पण स्वप्नरंजन करत बसायचे नाही. स्वप्न साकार करणारे कर्मयोगी बनायचे आहे. डॉक्टरांच्या संकल्पनेतील असे लक्षावधी कर्मयोगी देशभर कर्ममार्गावर चालताना दिसतात आणि ते देशात डॉक्टरांच्या विचाराकडे घेऊन जाणारे अनुकूल परिवर्तन घडवून आणतात.

डॉक्टर हेडगेवार न समजलेले म्हणतात, ''हे कसे झाले? का झाले?'' आणि अज्ञानाने ते म्हणू लागतात, ''सांप्रदायिकता वाढत आहे, असहिष्णुता वाढत आहे...'' इत्यादी. त्याच वेळी डॉक्टरांनी घडविलेला स्वयंसेवक म्हणतो, ''मला विश्वमानव व्हायचे आहे. मानवी भ्रातृभावाने विश्व भरून टाकायचे आहे.''

vivekedit@gmail.com

 

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/