लोनाड - जातकाचे लेणे..!

विवेक मराठी    20-Mar-2018
Total Views |

मुंबईच्या सीमेवर असलेलं, ठाण्याच्या सोबतीने नांदत असलेलं कल्याण शहर. प्राचीन वाङ्मयात ‘कलियान’ असा याचा उल्लेख आलेला आढळतो. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या प्रारंभीच्या काळात हे शहर विख्यात बंदर म्हणून नावाजलेलं होतं. परदेशातून आलेली, मालाने शिगोशीग भरलेली देशी-विदेशी गलबतं या बंदरात वावरत होती. सह्याद्रीच्या अवघड घाटवाटा चढून ही सारी संपत्ती देशभर पसरत होती. कुण्या काळी दुर्गाडीच्या दुर्गाच्या पायथ्याशी असलेल्या खाडीकिनारी मराठ्यांच्या नवजात आरमाराची गोदी होती. तरांडी, महांगिरी, बतेले आदी नाना आकारांची, नाना नावांची जहाजं इथे तयार होत होती. दर्यावर उतरलेल्या मराठ्यांच्या या टीचभर गलबतांनी फिरंगी, पोर्तुगीजांसारख्या प्रबळ आरमारी सत्तांनाही आपला धाक घातला होता.

या खाडीकिनाऱ्याच्या मैलभर अंतरावर आधारवाडी. तेथून उत्तरेकडे निघालं की, रुंदावलेला रस्ता काहीसा निमुळतो. लांब भासणारा निसर्ग जवळ येऊन सोबत करत राहतो. दुहेरी वाहतुकीची डांबरी वाट, कडेच्या झाडांची सावली माथ्यावर धरून सोबत करत राहते. वळणंवाकणं मागे पडत राहतात अन ऊनसावलीशी लपंडाव खेळत रस्ता मागे पडत राहतो. मध्येच उल्हासच्या विशाल पात्रावरचा पूल लागतो. राजमाचीच्या प्राचीन दुर्गाच्या कुशीत जन्मलेली करंगळीएवढी उल्हास, इथे विशाल रूप घेऊन आपल्या समोर येते. पन्नासेक मैलांच्या हिच्या प्रवासात हिने प्राचीन भारताचा इतिहास उलगडताना पाहिला आहे. या लहानुल्या प्रवासात हिने कोंडाण्याच्या लेण्यातल्या बौद्ध भिख्खूंचा ‘सरणं गच्छामि’चा नादगंभीर जागर ऐकला आहे. कल्याण-सोपाऱ्याच्या प्राचीन बंदरातून बैलांपाठीवर माल लादून पुण्या-कोल्हापूरच्या बाजूला निघालेल्या सार्थवाहांच्या तांड्यांनी बोरघाटाच्या चढणीवर पाय घालण्यापूर्वी हिचंच जळ मुखी घातलं आहे अन मगच पुढली वाट आपलीशी केली आहे. हिच्या तिरावरच्या अनेकानेक दुर्गांनी सातवाहन, आभीर, त्रैकूटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव अशा विख्यात राजकुळांच्या राजवटी पहिल्या. दंडकारण्याच्या कुशीत संस्कृती रुजताना, वाढताना, तीस फळंफुलं धरताना हिने अगदी जवळून न्याहाळली आहे. या साऱ्या राजवटी काळाच्या ओघात लोपल्या अन दाटलेल्या अंधारात मुसलमानी तडाख्यांनी विधुळवाट झालेली महाराष्ट्रभूमी हिने खिन्न मनाने न्याहाळली आहे. त्यानंतर शे-चारशे वर्षं काळोखदाटलीच होती. मात्र ‘मावळतीनंतर उगवतं’ या न्यायाने मराठी घोड्यांच्या टापा या देशी वाजू लागल्या अन सुखावलेली उल्हास मुक्तपणाने पुन्हा वाहू लागली. आजही ती बहुधा त्याच स्मृतींना सवे घेऊन वाहते आहे..!

याच मार्गाने पुढे जाऊन सावडनाक्यावरून डाव्या हाताला वळलं की रस्ता थेट भिवंडी बायपासला मिळतो. या मार्गाच्या निम्म्या अंतरावर, उत्तरेच्या दिशेच्या एका लहानशा टेकडीवर एक एकुलतं बौद्ध लेणं आहे. अर्ध्या किलोमीटरच्या चढात आपण लेण्याच्या दारात पावते होतो. चार पूर्णस्तंभ अन दोन अर्धस्तंभ अशा सहांनी हे प्रवेशद्वार नटलेलं आहे. एक स्तंभ पूर्णपणे मोडून गेलेला आहे. या द्वाराच्या डाव्या अन उजव्या हाती दोन कोनाडे आहेत. एकात पाणपोढी आहे, तर दुसऱ्याच्या भिंतीवर बौद्ध जातकातली एक कहाणी शिल्पांकित केलेली आहे.

हे लेणं अपूर्ण आहे. द्वारातून ओवरीत शिरलं की, तीन दारं समोर दिसतात. मधलं दार मुख्य. याच्या समोरच चंद्रशिला आहे. पायऱ्या चढून आत शिरलं की, समोरच्या अर्धवट कोरलेल्या लेण्यात आज खांडेश्वरी नामक देवीचा तांदळा विराजमान आहे. या अर्धवट लेण्याच्या डाव्या-उजव्या बाजूंस दोन कोनाडे आहेत. पैकी उजव्यात शेंदुराने लिंपलेली श्री गजाननाची मूर्त विराजमान आहे. त्यासोबत मूषकवाहनही हजर आहे. दोन्ही मूर्ती बहुधा पेशवाईच्या काळातल्या असाव्यात. दुसरा कोनाडा मात्र मोकळाच आहे.

बाहेर येऊन ओवरीत उभं राहिलं की, दूर क्षितिजावर मलंगगड, तावली अन नाखिंडचे धूसर आकार जाणवतात. पावसाळा संपत असेल तर लोनाड गावाच्या परिसराला पाचूचा स्पर्श झाल्याचा भास होतो. हिरव्या रंगाची कोवळीक नजर सुखावत असते. मात्र एरवीच्या काळात कडकडत्या सूर्याच्या तालावर नाचणारं मृगजळ नजरभुली करत राहतं.

लोनाडचं हे एकुलतं लेणं दुसऱ्या एका दृष्टीने विशेष आहे. साधारण पंधरा मीटर्स रुंद असलेल्या या प्रवेशद्वाराच्या माथेपट्टीवर एका रांगेत तीन बौद्ध जातक कथा चौरस फलकांवर कोरलेल्या आहेत. वेस्संतर नावाच्या एका राजपुत्राची ही कथा आहे. या राजपुत्राने बहुधा शेजारच्या राज्यातील एका ब्राह्मणास ऐरावत हत्तीचं दान दिलं आणि त्यावर जो गदारोळ उडाला त्याची कथा पहिल्या काही शिल्पपट्टामध्ये शिल्पांकित केलेली आहे. मधले काही पट्ट नष्ट झाले आहेत. वेस्संतर जातक ही कथा बौद्ध जातक कथांमध्ये विशेष स्थान राखून आहे.

यानंतरचे तीन शिल्पपट्ट बहुधा बुद्धजन्माची कथा सांगतात. यातील एका शिल्पपट्टामध्ये एका मंचकावर पहुडलेली स्त्री ही गौतम बुद्धांची माता मायादेवी आहे, असं कलेतिहासकारांचं मत आहे. शेवटचे दोन शिल्पपट्ट हे जातकातील हारिती या लावेचं - मुलं खाणाऱ्या दुष्ट स्त्रीचं - बुद्धाने कोणत्या प्रकारे परिवर्तन केलं, ती कथा सांगतात.

हे शिल्पपट्ट जिथे संपतात, नेमकं तिथे असलेल्या कोनाड्यात असलेलं एक भलंमोठं भित्तिशिल्प वेस्संतर जातकातील दरबारातील प्रसंग सांगतं. विमनस्क होऊन बसलेला राजा, भोवताली बसलेल्या राजस्त्रिया, विस्मयचकित मुद्रेने सभोवार उभ्या असलेल्या दासी व राजाचे सुहृदगण असं अतिशय जिवंत शिल्पांकन त्या अनाम शिल्पकाराने या भिंतीवर उभं केलं आहे. राजाने राजपुत्राला हाकून देण्याच्या निर्णयाने स्तंभित झालेलं वातावरण या शिल्पात हुबेहूब उतरलं आहे.

बहुधा पाचव्या शतकाच्या शेवटी निर्माण झालेल्या या लेण्याने किती मुमुक्षूंना आपल्या कुशीत आसरा दिला असेल, हा विचार मनी उमटत राहतो. मुख्य व्यापारी मार्गशी काहीसं फटकून असलेलं हे लेणं मोक्षमार्गाच्या वाटेवर चालणाऱ्या कुण्या एकांड्या साधकासाठी जणू स्वप्नवत आहे. क्षणभरात स्वैर झालेलं मन एकंकारावं असं आहे. सश्रद्ध मनाला ती स्पंदनं आजही जाणवतात. काळ थांबल्यागत गतिशील मन ठायीच थांबतं. बंद पापण्यांआड स्थिरावून जातं. जाणवत राहतं काही अंतरावरून संथपणे वाहत असलेल्या उल्हासचं पाणी. संस्कृतीचं लालनपालन करीत सहस्रकांमागून सहस्रकं ते वाहतंच आहे.

हे असं काही जाणवलं की, अशा स्थळांची यात्रा अगदी भरून पावते. काही क्षणांसाठी वर्तमानाशी तुटलेली नाळ पुन्हा सांधली जाते. जीव पुनश्च मार्गस्थ होतो..!

इति...

डॉ. मिलिंद पराडकर