भेदाभेद भ्रम अमंगळ

विवेक मराठी    20-Mar-2018
Total Views |

एकदा आपल्याला जीव आणि शिव यांच्यातला बंध लक्षात आला की आपोआप आपले विचार नश्वर सुखाच्या मागे धावणं बंद करतात. यासाठी आवश्यकता आहे ती निर्मळ मनाची. चांगल्या विचारांची. हे चांगले विचार येण्यासाठी, निर्माण होण्यासाठी - अर्थात फळ चांगलं हवं असेल, तर त्याचं मूळ, म्हणजे बीज चांगलं हवं. 

तुकारामांनी कोणताच विषय आपल्या अभंगासाठी वर्ज्य मानला नव्हता. घर, संसार, बाजारहाट, नातीगोती सगळ्यांचा वापर करत त्यातून सोप्या दाखल्यांमधून परमार्थाची मोठी शिकवण दिली. परमात्मा एकच आहे. आपण त्याला वेगवेगळ्या स्वरूपात पाहतो. आपल्या कुवतीनुसार आपण त्याला रंग, रूप देतो. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म| हा वैष्णव धर्म आहे तरी काय? इथे भेदाला वाव नाही. इथे भेदाभेद हा भ्रम मानला आहे. भ्रम म्हणजे आभास - जो प्रत्यक्षात नसतो, आपण आपल्या मनाने हा खेळ खेळत असतो. तेव्हा असा जातीपातीचा, भेदाचा भ्रम इथे नाही. इथे ह्या भेदाभेदांना ‘अमंगळ’, वाईट, त्याज्य मानलं आहे.

हे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणाऱ्या भक्तांनो, तुम्ही भागवत ऐका. इथे ऐकणं म्हणजे कानाने ऐकणं अभिप्रेत नसून, एखादी आज्ञा किंवा वचन ऐकतो तसं ऐकणं अपेक्षित आहे. भागवतात काय आहे? 

भगवत: इदं भागवतम - भगवंताचं स्वरूप दाखवणारं शास्त्र. भगवत तत्त्वाचा निर्देश करणारं शास्त्र. हे समजलं की जे आपल्या हातून घडेल ते सत्याचं, हिताचं असेल. एकदा प्रेयस आणि श्रेयस यातला फरक नष्ट झाला की जगणं मोक्ष होऊन जातं.

भागवताचा जन्मच मुळात सर्वसामान्यांपर्यंत ज्ञान पोहोचावं म्हणून झाला. ज्याप्रमाणे अर्जुनाला श्रीकृष्णाने गीता सांगितली, तसं इथे परीक्षित राजा आणि श्रीशुकदेव आहेत. प्रचंड शास्त्रनिर्मिती करूनही लोककल्याणाची अपेक्षित सिद्धी न झाल्याने व्यासांना ग्लानी आली. पुढे नारद-व्यास संवादात आणखी विवेचनात्मक लेखन करून व्यासांनी लोकोपदेश केला. परंतु, इथे शुकदेव निर्गुण आहेच, परीक्षितही वैराग्यदीक्षित आहे. दोघांनाही परमेश्वर निखळपणे जाणून द्यायचा-घ्यायचा आहे. 

पुढे तुकारामांनी म्हटलं आहे - कोणाही जिवाचा न घडो मत्सर.....

अहंकाराइतकाच वाईट रोग कोणता? तर मत्सर. तुकारामांना इथे वैयक्तिक पातळीवरचा मत्सर म्हणायचं नाही. कारण पुढे ते म्हणतात, ‘वर्म सर्वेश्वर पूजनाचे.’ सर्व देव एकच आहेत. त्यामुळे दुसऱ्या कोणा धर्माचा, देवाचा मत्सर हा वैष्णवांना शोभा देत नाही.

जीव आणि शिव एकच आहेत. पण जीव आणि शरीर मात्र वेगळे आहेत. अवयव नश्वर आहेत. त्यांच्या इच्छेपोटी, लालसेपोटी आपण जे कर्म करतो, त्याचा खरा भोग, सुख अथवा दु:ख जिवाला भोगावं लागतं.

तेव्हा आपलं जगणं जिवाला सुख देणारं असेल, तर तोच मार्ग पुढे शिवाकडे जातो.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।

भेदाभेद भ्रम अमंगळ ।।१।।

अइका जी तुझी भक्त भागवत ।

कराल तें हित सत्य करा ।।ध्रु.।।

कोणा ही जिवाचा न घडो मत्सर ।

वर्म सर्वेश्र्वरपूजनाचें ।।२।।

तुका म्हणे देहाचे अवयव ।

सुख दु:ख जीव भोग पावे ।।३।।

एकदा आपल्याला जीव आणि शिव यांच्यातला बंध लक्षात आला की आपोआप आपले विचार नश्वर सुखाच्या मागे धावणं बंद करतात. यासाठी आवश्यकता आहे ती निर्मळ मनाची. चांगल्या विचारांची. हे चांगले विचार येण्यासाठी, निर्माण होण्यासाठी - अर्थात फळ चांगलं हवं असेल, तर त्याचं मूळ, म्हणजे बीज चांगलं हवं. 

तुकाराम म्हणतात, 

शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।

मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी ।।

या कलियुगात कर्मकांड किंवा इतर आन्हिकापेक्षा नामस्मरणाला, शुद्ध अंत:करणाला विशेष महत्त्व दिलं आहे. मोक्ष कुणा एकाची मक्तेदारी नाही. आपलं काम करताना घेतलेलं देवाचं नाव त्याच्यापर्यंत पोहोचतं.

भागवत धर्माचं हेच वैशिष्ट्य आहे, इथे जातपात, गरीब-श्रीमंत कोणताच भेदभाव नाही.

 सर्वांग निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ।।

तुका म्हणे जाती । ताप दर्शने विश्रांती ।। 

तुकाराम म्हणतात, ‘ज्याचं मन निर्मळ, तो स्वत:च देवस्वरूप होऊन जातो, त्याला बघून इतरेजनांचे क्लेश हरतात.’

मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण 

हेसुद्धा याचंच मूळ आहे. मनाची ताकद इतर कोणाहीपेक्षा अधिक आहे. शुद्ध मन, कोणत्याही काम-क्रोध-मद-मोह-मत्सराशिवाय असणारं मन परमेश्वराचं निवासस्थान असतं. अर्थात काम, क्रोध संपूर्ण नष्ट होतो का? असा इथे प्रश्न पडणं साहजिक आहे. 

अर्थात ‘नाही’ असंच त्याचं उत्तर आहे. पण मुळामध्ये कोणतीही गोष्ट नसणं म्हणजे काय? तिच्या अस्तित्वाची दाखल न घेणं. संसार करताना हे गुण काही ठिकाणी योग्य प्रमाणात आवश्यक आहेतच. म्हणून ते समूळ नष्ट होणं शक्य नसतं. पण परमार्थाचा विचार करताना हे दुर्गुण ठरणारे घटक आपण लांब ठेवू शकलो, तर ते खरं हित. यासाठी बीज - आपला विचार चांगला हवा, फळं आपोआप गोमटी निपजतात.