देवराईमधील नैसर्गिक संपदा आणि तिचा उपयोग

विवेक मराठी    21-Mar-2018
Total Views |

देवराई तिथल्या घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहेच, तसंच ती तिथल्या जीवविविधतेसाठी जास्त प्रसिद्ध आहे. हे एक उत्तम दर्जाचं जंगल असतं. देवराईमध्ये त्या परिसरातील मूळ जंगलातील टिकून राहिलेली वनसंपदा असते. कंदमुळं, गवताच्या अनेक जाती, जमिनीवर पसरणाऱ्या वनस्पती, लहानमोठी झुडपं, लहानमोठी झाडं, खूप उंच वृक्ष, त्यावर वाढणाऱ्या वेली आणि इतर वनस्पती, शेकडो प्रकारचे पक्षी, वनस्पती, कीटक, फूलपाखरं, शेवाळं, बुरशी, जंगली प्राणी इत्यादी जीवसृष्टी देवराई अधिक दाट आणि गूढ करतात. अनेक प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक देवराईत सुरक्षित वातावरणात मोठ्या संख्येने आढळतात. 

कोणत्याही चांगल्या देवराईत शिरल्यावर आपला बाकी जगाशी संपर्क जवळपास तुटतो. आत शिरल्यावर आपल्याला दिसतात ते उंचच उंच वृक्ष, त्यावर असणाऱ्या अनेक आकाराच्या वेली, गच्च झाडोरा आणि विविध पक्षी, प्राणी यांचे आवाज आणि बरेचदा दर्शन. कुठे तरी वाहणाऱ्या ओढ्याचा किंवा नदीच्या पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, माकडं, भेकरं, पिसोरी (Mouse deer). मोर, ककणेर (Hornbill), घुबड, दयाळ, नंदन नाचण (Paradise flycatcher), राजगिधाड (King vulture) अशा अनेक पशुपक्ष्यांचं दर्शन होतं. काही देवारायांमध्ये तर शेकरू (Giant squirrel) आणि तिची घरटी दिसू शकतात. 

 

देवराईच्या मध्यावर किंवा एका बाजूला एखादं मंदिर असतं. निसर्गातूनच आलेला देव किंवा देवी असते. ती त्या देवराईची राखण करते. एखादा झरा किंवा ओढा असतो. क्वचित एखादी नदी असते. गारंबीच्या प्रचंड वेली असतात. उन्हाळ्यात जरा पानगळ झाल्यावर त्याच्या ४-६ फूट लांब शेंगा लटकताना दिसतात. अनेक दुर्मीळ झाडं दिसतात. एकूण वातावरण एकदम वेगळंच असतं. कोणीही भारावून जावं, शांत व्हावं अशी किमया हे देवराईमधलं वातावरण घडवून आणतं.

आत्तापर्यंत देवराईत झालेल्या माझ्या प्रवासात वनस्पतींच्या सुमारे १४५०हून जास्त प्रजाती नोंदण्यात मला यश आलंय. त्याचप्रमाणे, सुमारे १४० प्रकारचे  पक्षी, ८०हून जास्त प्रकारची फूलपाखरं, १८हून जास्त प्रकारचे सरपटणारे प्राणी, भेकरं, पिसोरी, हरणं, साळिंदर, खवले मांजर, माकडं, नीलगाय, गवा, रानमांजर, बिबट्या यांचा समावेश होतो, ते वनजीवन सुरक्षितपणे वावरताना पाहिलंय.      

देवराईमधील औषधी आणि दुर्मीळ वनस्पती - 

देवराई तिथल्या औषधी वनस्पतींच्या भांडारासाठी प्रसिद्ध आहे. बाहेरच्या भागात दुर्मीळ असणारी झाडं इथे चांगल्या दर्जाची आणि मोठ्या प्रमाणावर आढळतात. गावातील लोकांना आजारातून बरं करण्यासाठी गावातील जाणकार पैसे न घेता त्याचा वापर करतात.  चांगल्या देवराईमध्ये जीवविविधता चांगली आढळते. हिरडा, बेहेडा, आवळा, सर्पगंधा, गुळवेल, कावळी, धायटी, मुरुडशेंग, बकुळ, खैर, अमृता, सीताअशोक, चित्रक, गेळा, गारंबी, उक्षी, वाळा, कडू कवठ, रामेठा, पळसवेल, मोह, कुंभा, शिकेकाई, रिठा, कुंभा, कदंब, कुडा, कारवी, पळस, पांगारा, काटेसावर, करंज, मोह, अंजनी, हडक्या, कुंती, खुरी, उंडी, सुरंगी, नान्या, भेरली माड, आंबा, फणस, काजू, बिब्बा, करमळ इत्यादी शेकडो प्रकारच्या प्रजाती मिळतात.

दुर्मीळ वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या जातींची कंदीलपुष्पं, विविध प्रकारची ऑर्किड्स आदींचा समावेश होतो. याव्यतिरिक्त रानभेंड, चांदफळ, सातवीण, बेहेडा, आंबा, रानजायफळ वगैरे अतिशय उंच वाढणारी झाडंही दिसतात.

 

पण एक गोष्ट नक्की की देवराईमधील कोणत्याही गोष्टीचा व्यावसायिक वापर करायला बंदी असते.

पावसाळ्यात तर आपल्याला देवराईमध्ये असंख्य आणि विविध प्रकारची रोपं पाहायला मिळतात. पूर्ण संरक्षण असल्याने बिया तिथेच पडून रुजतात आणि दर वर्षी नवीन रोपं पावसाळ्यात वर येतात. अर्थात, यातील काहीच जगतात, बाकीची स्पर्धेत (पाणी आणि प्रकाश यासाठी होणारी स्पर्धा) मरून जातात. जर यातील रोपं आपण काढून जवळच्या भागात वृक्षारोपणासाठी वापरली, तर त्याचा फायदा होतो.

एक तर आपल्याला त्या परिसरात चांगली वाढणारी स्थानिक प्रजातींची तयार रोपं मिळतात, जी नैसर्गिक वातावरणात रुजली आहेत. दुसरं म्हणजे, त्यातील बरीच रोपं स्पर्धेत जीव गमावणार असतात ती आपण वाचवतो, आणि यासाठी वेगळा खर्च किंवा सोय करायची गरज पडत नाही. वृक्षारोपणासाठी एक निसर्गनिर्मित रोपवाटिका म्हणून आपण देवराई ही संस्था सहज वापरू शकतो.   
देवराईचं समाजातील स्थान

देवराई हे गावाचं सांस्कृतिक केंद्र असतं. गावाचे सर्व उत्सव सार्वजनिकरित्या देवराईमध्ये साजरे केले जातात. अनेक गावांमध्ये मासिक ग्रामबैठक देवराईमध्ये घेतली जाते आणि त्यात गावाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय सामूहिकपणे घेतले जातात. गावातील शाळा आणि मंदिराची दुरुस्ती या दोन गोष्टींसाठीच देवराईमधील एखाद-दुसरं झाड तोडायला ग्रामसभा क्वचित परवानगी देते. अन्यथा, झाड तोडणाऱ्या व्यक्तीला दंड भरावा लागतो. एकूणच, गाव देवराई उत्तमरित्या जपतं.

काही ठिकाणी काही विशेष नियम असतात. उदा. तुम्ही देवराईमध्ये जाताना कोयता किंवा विळा घेऊन जाऊ शकता, पण कुऱ्हाड न्यायला बंदी आहे. कारण सोपं आहे, कोयता किंवा विळा यांनी वाळक्या फांद्या तोडता येतील फक्त, पण कुऱ्हाड नेली तर झाड तुटू शकतं. अनेक देवरायांमध्ये अनवाणी जाण्याची परंपरा आहे. लोकांना या ठिकाणांपासून लांब ठेवायचा सोपा उपाय. कारण तुम्ही अनवाणी फार काळ आणि फार अंतर नाही जाऊ शकत.

थोडक्यात काय, कारणाशिवाय त्या भागात कोणीही जायचंच नाही अशी इच्छा आणि योजना यामागे सहज दिसून येते आणि ती व्यवस्थित कामही करताना दिसते. त्यामुळे जंगल दाट आणि सुदृढ राहायला मदत होते.

 “पाणी” आणि “जलसंधारण” या विषयाच्या दृष्टीने देवराईचं खूप महत्त्व आहे. ते नक्की काय आणि कसं, हे पुढच्या भागात पाहू या.

 

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून
 https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील. 
https://www.facebook.com/VivekSaptahik/