मार्कस आणि मोदी

विवेक मराठी    22-Mar-2018
Total Views |

2019 साली काय होणार, हे झाले भविष्य, त्याची चिंता करण्याचे कारण नाही. 2019 साल आपण टाळू शकत नाही. त्याला भेटावेच लागणार आहे. म्हणून भूतकाळाला ज्या विचारांनी आणि कृतींनी भेटलो, तीच शस्त्रे घेऊन 2019च्या भेटीला जायचे आहे. मार्कसने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी दिलेला हा 'मोदी संदेश' आहे.

काळाबरोबर राहण्यासाठी व्हॉट्स ऍप आणि फेसबुकवर राहावे लागते. माझ्यासारख्या गंभीर विषयाचे वाचन करणाऱ्याला हे दोन्ही विषय (व्हॉट्स ऍप आणि फेसबुक) आयुष्यातील मौल्यवान वेळ वाया घालविण्याची साधने ठरतात. माझे काम व्हॉट्स ऍप आणि फेसबुकवरील नव्वद टक्के मजकूर न वाचता डिलीट करून टाकण्याचे असते. त्यातही वेळ जातो, परंतु वाचण्यापेक्षा तो कमी जातो. अनेकांना मी विनंती करतो की, लांबलचक आर्टिकल्स, कविता, व्हिडिओ पाठवू नका, पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. मग तो नंबर ब्लॉक करावा लागतो. त्याला नाइलाज असतो. शेवटी प्रत्येकाचे खासगी आयुष्य असते. त्यात इतरांना वाजवीपेक्षा जास्त ढवळाढवळ करण्याची अनुमती देता येत नाही.

असे जरी असले, तरी काही वेळा व्हॉट्स ऍपवर असा काही मेसेज येतो की जो माझ्यासाठी ज्ञानाचा दरवाजा उघडतो. शंकुतला अय्यर यांनी मार्कस ऑरेलिअस यांचे एक अवतरण मला पाठविले. इंग्लिशमधील अवतरण असे आहे - When a bunch of known corrupt people unite against one man & spare no effort to ridicule him, blackmail him & attempt to assassinate his character, blindly follow that one man! नंतर असे लक्षात आले की, हे अवतरण फेसबुकवरदेखील व्हायरल झालेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राज ठाकरे ते राहुल गांधी अशा राजपुत्रांनी जे शरसंधान सुरू केले आहे, त्याचा संदर्भ या अवतरणाशी आहे.

त्याचा भावानुवाद असा - 'जेव्हा विख्यात भ्रष्ट लोकांचा समूह एका माणसाविरुध्द उभा राहतो आणि त्याला कमीपणा आणण्याची एकही संधी सोडत नाही, त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न करतो, अशा वेळी आपण काय केले पाहिजे - तर डोळयावर पट्टी बांधून त्या एका माणसाच्या मागे चालले पाहिजे.' नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करता येत नाही, अकार्यक्षमतेचा आरोप करता येत नाही, घराणेशाहीचा आरोप करता येत नाही, स्त्रियांच्या संदर्भातील काही आरोप करता येत नाही, दलितविरोधी म्हणून त्यांच्यावर आरोप करता येत नाही, मग त्यांच्याविरुध्द कोणते आरोप केले जातात? सांगायलाच पाहिजे का? राज ठाकरे आणि राहुल गांधी यांचे भाषण वाचा किंवा बघा.

आता अनेक वाचकांसमोर प्रश्न उभा राहिला असेल की, मार्कस ऑरेलिअस कोण? मार्कस ऑरेलिअस रोमन सम्राट होता. त्याचा कालखंड इ.स. 121 ते 180 असा आहे. इ.स. 161 ते 180 या काळात तो रोमन सम्राट होता. मुस्लीम इतिहासात जसे सत्यावर चालणारे चार खलिफा प्रसिध्द आहेत, तसे रोमन साम्राज्यात सर्वोत्तम सम्राट म्हणून पाच सम्राटांची नावे घेतली जातात, त्यात मार्कस ऑरेलिअस यांच्या नावाचा समावेश केला जातो. ते स्टॉइक पंथाचे होते. 'मेडिटेशन्स' या नावाचे त्यांचे पुस्तक आहे. ते तत्त्वज्ञानावरील आहे. जगाच्या इतिहासात तत्त्वज्ञानी राजे हाताच्या बोटावर मोजण्याइतके झाले. आपल्या परंपरेत राजा जनकाचे यात नाव घेतले जाते. आपण म्हणू शकतो की, मार्कस ऑरेलिअस हा रोमन जनक राजा होता.

वर दिलेले त्याचे अवतरण नरेंद्र मोदी यांना पूर्णपणे लागू होत असल्यामुळे त्यांच्या वरील पुस्तकात अशी बरीच अवतरणे नरेंद्र मोदी यांना अप्रतिमरित्या लागू होणारी आहेत. त्यातील विचार काळाच्या कसोटीवर टिकलेले आहेत, म्हणून ते शाश्वत आहेत. त्यामुळे हे विचार मांडून आज जवळजवळ दोन हजार वर्षे होत आली, तरी त्यातील ताजेपणा अजिबात संपत नाही.

निवडणुका जवळ आल्या असल्याकारणाने नरेंद्र मोदी यांच्यावर ज्याला जसे सुचेल आणि भावेल असे आरोप होताना दिसतात. मार्कस ऑरेलिअस हे सम्राट होते, परंतु राजनीतीचा स्वभाव राजेशाही असो की लोकशाही असो, बदलत नाही. मार्कस ऑरेलिअस म्हणतो, ''आपण जे काही ऐकतो, ती मते असतात, वस्तुस्थिती नसते. आपण जे काही पाहतो, ते यथादर्शन असते, सत्यदर्शन नसते.'' मतांचा सध्या असा पाऊस पडत आहे. त्याकडे किती लक्ष द्यायचे? ऑरेलिअस म्हणतो, ''सकाळी जेव्हा तुम्हाला जाग येते, तेव्हा स्वतःशीच संवाद करा की, ज्या लोकांशी माझा आज संबंध येणार आहे, ते उचापतखोर, कृतघ्न, गर्विष्ठ, अप्रमाणिक आणि मत्सरग्रस्त आहेत. ते असे आहेत, कारण ते वाईट आणि चांगले यांच्यामधली निवड करू शकत नाहीत. परंतु मी चांगल्यातील सौंदर्य पाहतो आणि वाईटातील कुरूपता ओळखतो. त्यामुळे मला कुणीही दुखावू शकत नाही. कोणीही मला कुरूपतेत गुंतवू शकत नाही. म्हणून मी माझ्या जवळच्या लोकांवरदेखील रागवत नाही किंवा त्यांचा द्वेषही करत नाही. आपण सगळे एकत्र काम करण्यासाठी जन्मलो आहोत, जसे हात-पाय एकत्र काम करतात, डोळे एकत्र काम करतात, खालचा जबडा आणि वरचा जबडा एकत्र काम करतात. दुसऱ्याच्या कामात अडथळे निर्माण करणे हे अनैसर्गिक आहे.'' मोदींच्या कार्यशैलीवर मार्कस ऑरेलिअस हे नेमके भाष्य कसे करू शकले, याचे आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

मोदींच्या टीकाकारांची देशात काही कमी नाही. मध्यंतरी पुरस्कार वापसीची टूम निघाली, असहिष्णुतेचे आरोप झाले, हिंदुराष्ट्राची घोषणा होणार आणि राज्यघटना गुंडाळून ठेवणार असले फुसके बार सोडण्यात आले. मार्कस ऑरेलिअस म्हणतो, ''जेव्हा दुसरा कुणी तुमच्यावर दोषारोप करतो किंवा तुमचा द्वेष करतो, त्याच्या आवाजात आवाज मिसळून अन्य लोकही तेच बोलू लागतात, तेव्हा त्यांच्या अंतर्मनात जा आणि ते कोणत्या प्रकारचे लोक आहेत, याचा शोध घ्या. मग तुमच्या लक्षात येईल की, चिंता करण्याचे आणि त्यांचे बोलणे गंभीरपणे घेण्याचे काही कारण नाही. तुमच्याविषयी त्यांनी जे विशिष्ट मत बनविले आहे, ते गांभीर्याने घेण्यासारखे नाही.'' नरेंद्र मोदी हेच करतात. त्यांच्यावर इतके आरोप झाले किंवा प्रश्न उपस्थित केले, त्यांना उत्तरे देण्याच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. प्रश्नकर्त्यांचे अंर्तमन ते जाणून असल्यामुळे अशा टीका-टिप्पणीने ते कधी विचलित झाल्याचे दिसले नाही. मार्कस ऑरेलिअस यांचे फार सुंदर वाक्य आहे, ''जीवन सुखी करण्यासाठी फार थोडे लागते आणि ते प्रत्येकात असते, ते म्हणजे तुम्ही कसा विचार करता.'' मोदी सुखी आहेत, कारण ते योग्य विचार करूनच आपले मार्गक्रमण करतात.'' मार्कसच्या शब्दात, ''जीवनातील आनंद तुमच्या विचाराच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो.''

मोदींना सतत लक्ष्य करण्याचा ज्यांचा उद्योग झालेला आहे, त्यांच्यासाठी मार्कस ऑरेलिअस यांचे हे बोल तंतोतंत लागू होणारे आहेत. ''आपल्या शेजाऱ्याविषयी भन्नाट मते बनविण्यात जीवनाचा राहिलेला वेळ वाया घालवू नका. तो काय करून राहिला आहे, का करून राहिला आहे, तो असा का वागतो,  तो असा का विचार करतो, अशा प्रकारची योजना त्याने का बनविली, अशा प्रकारचा विचार करीत राहणे म्हणजे तुमच्यामध्ये असलेल्या शासकाशी बेइमानी करणे होय आणि दुसरे चांगले काम करण्याची संधी वाया घालविणे होय.'' आता आपल्या डोळयासमोर नावे आणा. कोण कोण स्वतःशीच बेइमान राहून आपल्या जीवनातील चांगले काही करण्याची संधी घालून बसले आहेत, हे तुम्हाला समजेल. नाशिक महानगरपालिका दिली होती, म्हणजे संधी दिली, तिचे सोने करण्याऐवजी माती झाली. दिल्लीचे राज्य दिले, आता रोज माफीनामा मागण्याची नामुश्की आली.

राजनीती करताना खऱ्या अर्थाने ती लोकनीती करावी लागते. मार्कस ऑरेलिअस हा तर सम्राट, पण तोही लोकनीतीविषयी जे म्हणतो, ते तत्त्वज्ञ सम्राटच म्हणू शकतो. तो म्हणतो, ''खरे सांगायचे, तर जनता हेच आमचे अंतिम गंतव्य स्थान आहे. आमचे काम त्यांच्या भल्याची चिंता करणे आणि त्यांच्याबरोबर राहणे हे आहे. कधीकधी आपल्या कामात त्यांच्याकडून विघ्ने उत्पन्न केली जातात, जशी नैसर्गिक वातावरणात सूर्य, वारा, पाऊस, प्राणी, यांच्याद्वारे उत्पन्न केली जातात. त्यामुळे आमच्या कृतीला अडथळा जरूर निर्माण होतो, परंतु आमच्या हेतूंना किंवा आमच्या चित्तवृत्तींत अडथळा निर्माण होण्याचे कारण नाही. कारण आपण बदलासाठी तयार असतो आणि आपली भूमिका समावेशक असते. ज्या बाधा आपल्या समोर निर्माण झाल्या आहेत, त्यांचे आपल्या हेतुपूर्तीसाठी संधीत रूपांतर करण्याचा विचार मन करीत राहते. कृतीला बाधा म्हणजे दुसऱ्या अर्थाने कृती गतिशील करण्याचाच मार्ग असतो. मार्गात झालेला अडथळा हाच नवीन मार्ग होतो.'' ज्याला यशस्वी राज्य करायचे आहे, त्याला याच मार्गाने जावे लागते. मोदी तरी दुसरे काय करीत आहेत?

नरेंद्र मोदी यांच्याविरुध्द जी चिखलफेक चालते, ती ऐकताना कधीकधी बरे वाटत नाही आणि रागही येतो. राजनीतीत हे चालायचेच. मार्कस म्हणतो, ''टीकाकारांसारखे न बनणे आणि न वागणे हाच त्यांच्यावरील सर्वात मोठा सूड असतो.'' म्हणून शिवतीर्थावर कोण काय बोलला किंवा दिल्लीत कोण काय बोलला, हैदराबादमध्ये कोण काय बोलले आणि कोलकात्यात कोणते सूर उमटले, याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे आणि त्यांच्या भाषेत त्यांना उत्तरे न देणे हाच त्यांच्यावर उगवलेला सूड असतो.

जीवन एकदाच जगायचे असते, हे हिंदू माणसाला सांगायला नको. तो संतांची अवतरणामागून अवतरणे सांगायला सुरुवात करेल, पण मार्कस तर रोमन. तो जेव्हा म्हणतो, ''मृत्यूचे भय माणसाने बाळगता कामा नये, जीवनाची सुरुवातच न करणे याचे भय बाळगले पाहिजे.'' म्हणजे जीवन जगण्याची कला आत्मसात केली पाहिजे. म्हणून ''भविष्याची चिंता करू नये. भविष्यकाळ आपल्याला भेटणारच आहे. आणि त्याला भेटण्यासाठी आज आपल्याकडे विचाराची आणि कृतीची जी शस्त्रे आहेत, त्यांना बरोबर घेऊनच भविष्याला भेटावे लागेल.'' 2019 साली काय होणार, हे झाले भविष्य, त्याची चिंता करण्याचे कारण नाही. 2019 साल आपण टाळू शकत नाही. त्याला भेटावेच लागणार आहे. म्हणून भूतकाळाला ज्या विचारांनी आणि कृतींनी भेटलो, तीच शस्त्रे घेऊन 2019च्या भेटीला जायचे आहे. मार्कसने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी दिलेला हा 'मोदी संदेश' आहे.