आर्थिक नियोजन काटेकोरपणे करा

विवेक मराठी    23-Mar-2018
Total Views |

***धनंजय दातार****

जीवनात सुस्थितीत राहायचे असेल, तर पैशाचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. बहुतेकांची नेहमीची तक्रार असते, ती म्हणजे पैसा पुरत नाही आणि हाती उरत नाही. पण ही सबब व्यायामाला वेळ मिळत नाही, असे सांगण्यासारखीच आहे. निश्चयपूर्वक बचत केली नाही, तर पैसा कधीच हातात राहत नाही. समर्थ रामदासांचा उपदेश ध्यानात धरण्यासारखा आहे - 'मिळविती तितुके भक्षिती। ते कठीण काळी मरुन जाती। दीर्घ विचारे वर्तती। तेचि भले॥'

 आर्थिक नियोजन हा विषय फारसा अवघड नाही. फक्त काही ठोकताळे ध्यानात धरून शिस्तीने नोंदी करत गेल्यास त्यासारखी सोपी व फायदेशीर गोष्ट नसते. मी माझ्या बाबांकडून हे नियोजन शिकलो. ते लष्करात असल्याने राहणी, वेषभूषेपासून ते पत्रव्यवहारापर्यंत प्रत्येक बाबतीत शिस्त आणि टापटिपीचा आग्रह धरणारे होते. हवाई दलातून निवृत्त झाल्यावर त्यांनी एअर इंडियामध्ये स्टोअर कीपरच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. या पदाच्या दोन जागांसाठी दोन हजारांहून अधिक अर्ज आले होते. पण माझ्या बाबांनी त्यांचा अर्ज इतका मुद्देसूद लिहिला होता की पहिल्या टप्प्यातच या नोकरीसाठी त्यांची निवड झाली. बाबांना जुन्या काळापासून एक विशिष्ट सवय होती. ते कोणतीही बिले, पावत्या, माहितीपत्रके, वर्तमानपत्रे-मासिकांतील उपयुक्त कात्रणे जपून ठेवत आणि आम्हा भावंडांच्या शाळेतील वापरून झालेल्या वह्या रद्दीमध्ये न टाकता त्याच्यात आठवणीने तारीखवार चिकटवून ठेवत. याशिवाय ते जमा-खर्च, उधार-उसनवारी यांचे तपशीलही डायरीत नोंदवून ठेवत. हा उद्योग ते अत्यंत चिकाटीने हयातभर करत होते. मला त्याचे आश्चर्य वाटायचे.

एकदा मी त्यांना त्याचे कारण विचारलेही. त्यावर ते म्हणाले, ''दादा! आपण इतिहासातील चुकांपासून काही शिकत नाही. इंग्रज लोक हिंदुस्थानवर दीडशे वर्षे राज्य करून गेले, पण त्यांनी या देशातील आपल्या हालचाली, निर्णय, प्रशासकीय कामकाजाच्या अचूक नोंदी ठेवल्या. भारतीयांनी मात्र आपल्या इतिहासाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले नाही. त्यामुळे अनेक मौल्यवान कागदपत्रे गहाळ झाली, नष्ट झाली किंवा त्यांची बेफिकिरीने विल्हेवाट लावली गेली. दुसऱ्या कुणाचे कशाला, आपल्याच घराचे उदाहरण घे. आपले पूर्वज कोकणातून इतरत्र कधी स्थलांतरित झाले किंवा आपले मूळ गाव कोणते, याचा काहीही इतिहास आपल्याला ठाऊक नाही. मला माझ्या वडिलांची माहिती आहे, पण आजोबांची माहिती नाही. हे सगळे कशामुळे? तर तपशील न ठेवल्यामुळे. मी दोन गोष्टींसाठी ही नोंदीची शिस्त पाळतो. एक तर कालांतराने या नोंदी महत्त्वाचा पुरावा म्हणून उपयुक्त ठरतातच, तसेच त्या स्मरणरंजनाचा आनंदही मिळवून देतात.'' त्यांनी मला एक वही उघडून गंमत दाखवली. त्यात 1972 सालातील विविध बिले व पावत्या चिकटवून ठेवल्या होत्या. त्या दाखवून ते म्हणाले, ''दादा! बघ. त्या काळात वस्तूंच्या किमती कशा होत्या आणि आम्ही खर्चाची तोंडमिळवणी कशी करत होतो.'' मग त्यांनी हळूच त्या पावत्या वर उचलून खालचे पान दाखवले. त्यावर मी प्राथमिक शाळेत असताना लिहिलेला निबंध होता. तो दाखवून ते म्हणाले, ''हा बघ स्मरणरंजनाचा दुहेरी आनंद. तुझे बालपणही आम्हाला या वहीतून भेटत आहे.''

बाबांच्या निधनानंतर मला त्यांच्या सांगण्याचा पडताळा आला. बाबा अकस्मात गेले आणि मृत्युपत्र बनवण्याइतका वेळही त्यांना मिळाला नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यांच्या मालमत्तेत ज्यांचा संबंध नाही, असे लोक हक्क सांगायला पुढे आले. काही जण बाबांनी आपल्याकडून उधार रक्कम नेल्याचे सांगून ती मागायला आले. आम्हाला काय करावे सुचेना. अशा वेळी आम्ही बाबांनी जतन केलेल्या डायऱ्या उघडल्या अन् काय आश्चर्य! बाबांनी वेळोवेळी कुणाकडून किती पैसे घेतले होते, ते परत कधी केले, कुणाचे देणे बाकी आहे याच्या सविस्तर नोंदी करुन ठेवल्या होत्या. मालमत्तेचा तपशीलही त्यात होता. एरवी जी सरकारी कामे रखडली असती, ती त्या नोंदींच्या आधारे आम्ही सहजपणे मार्गी लावू शकलो. हे नोंदी करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले आणि मीसुध्दा तेव्हापासून काटेकोर नोंदी करू लागलो. हिशेब लिहून ठेवू लागलो. मुख्य म्हणजे पत्नीला विश्वासात घेऊन तिला ते व्यवहार समजावून देऊ लागलो. नेहमी लक्षात ठेवा. आपल्या पश्चात आपली पत्नी आपल्या मालमत्तेची मालक असते. मुलांचा हक्क नंतर येतो. त्यामुळे पत्नीला विश्वासात घ्या. आपल्या पश्चात तिचे नामनिर्देशन करायला चुकू नका. आपली मालमत्ता काय आहे, याची मुलांनाही स्पष्ट कल्पना द्या. कुटुंबाला पडद्याआड ठेवून कोणतेही व्यवहार छुपेपणाने करू नका. वारसांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.

अर्थनियोजन करताना लक्षात ठेवण्याचे ठोकताळे सोपे आहेत. दर महिन्याला आपण जमा-खर्चाचा आढावा घ्यावा. वर्षातील न टाळता येणाऱ्या खर्चांसाठी आधीच नियोजन करत राहावे. तीच गोष्ट गुंतवणुकीबाबत. 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे दरमहा निर्धाराने कमाईचा काही हिस्सा बाजूला ठेवला व त्याला आपत्कालीन स्थितीखेरीज हात लावायचा नाही, असा निश्चय केल्यास काही काळाने आपल्याकडे मोठा निधी तयार होतो. त्याच्या जोरावरही आपण खूप काही करू शकतो. माझ्या दोन मित्रांची उदाहरणे देतो. एकाला पर्यटनाची आवड आहे. त्याने सुरुवातीपासून बचत करून एक मोठी रक्कम जमा केली. ती बँकेत ठेव म्हणून ठेवली आहे. तो दर वर्षी त्या ठेवीच्या 90 टक्के रक्कम कर्ज घेतो. त्यात त्याची एका पर्यटन स्थळाची सहल आरामात पूर्ण होते. हे कर्ज तो पुढच्या वर्षभरात फेडून टाकतो. या मार्गाने त्याने आतापर्यंत पर्यटनाचा आनंद अगदी आरामात आणि सहकुटुंब घेतला आहे. दुसरा मित्र असेच दरमहा पैसे साचवतो आणि त्यातून साडेतीन शुभमुहूर्त व दोन-तीन गुरुपुष्य योग यावर थोडे सोने खरेदी करतो. पुरेसे सोने जमा झाले की पत्नीला अलंकार करतो. आज त्याच्या पत्नीला भरपूर अलंकार आहेतच, तसेच मुलीच्याही लग्नासाठीची अलंकारांची तयारी आहे. पटकन कार्य ठरले, तर निदान त्याच्या डोक्यावर हा तरी खर्च नाही. मला या दोघांच्याही व्यवहारी व बचतशील वृत्तीचे कौतुक वाटते.

काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. घरखर्चासाठीची रक्कम महिन्याला हातात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 30 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. 30 टक्के रक्कम कर्ज व देणे देण्यासाठी वापरावी आणि 30 टक्के रक्कम भविष्यातील गुंतवणुकीसाठी बाजूला काढावी. अशा रीतीने 90 टक्के रकमेचा विनियोग झाल्यावर उरलेली दहा टक्के रक्कम मनोरंजनासाठी वापरावी. भविष्यकालीन गुंतवणुकीपोटी केलेल्या बचतीचा वापर अन्यत्र करू नये. आजार खर्चापासून अथवा रुग्णालयीन खर्चापासून संरक्षण देणारी वैद्यकीय विमा पॉलिसी, तसेच मुदत विमा असणे अत्यंत आवश्यक आहे. नोकरीची अनिश्चितता वाटत असेल तर ती कधीही संपुष्टात आल्यास पुढचे सहा महिने कुटुंबाचा खर्च भागेल इतकी रक्कम साठवलेली असली पाहिजे. आमच्या कुटुंबावर एकदा दुर्दैवाने अडचणीची वेळ आली होती. बाबांना दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी व्हिसा न मिळाल्याने बेरोजगार म्हणून बसून सहा महिने मुंबईत राहावे लागले. आमच्याकडील बचतीला झरझर गळती लागली व एक दिवस असा आला की खात्यात पैसे नाहीत आणि घरात धान्य नाही. बाबांनी आईचे दागिने गहाण ठेवून घरात धान्य भरले. परमेश्वराची कृपा म्हणून पुढच्या काही दिवसांत बाबांना नोकरीसाठी बोलावणे आले आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला.

वयाच्या तिशीत साधारणपणे माणसे नोकरी-व्यवसायात स्थिरावतात. त्या क्षणापासून आपण बचत सुरू केली पाहिजे. वयाची पंचेचाळिशी ओलांडल्यावर कोणतीही नवी कर्जे उचलण्याचे धाडस करू नये अथवा मोठी देणीही करून ठेवू नये. मुला-मुलींची शिक्षणे, विवाह नजीक आलेले असतात आणि आपल्या नोकरी-व्यवसायातील कार्यक्षम वयाचा (ऍक्टिव्ह एजचा) शेवटचा टप्पा सुरू झालेला असतो. येथूनच आपण एकंदर आपल्या आर्थिक स्थितीचा नियमितपणे आढावा घेत राहावा. सर्व कागदपत्रे सुरक्षित राखावीत, पत्नी व आपले बँकेत जॉईंट अकाउंट असावे. करसंबंधित सर्व कागदपत्रे अचूक ठेवावीत. कर वाचवण्याचे मार्ग अवलंबावेत, परंतु चुकवण्याचे नकोत.

मित्रांनो! अर्थनियोजनाशी सुसंगत ठरेल असे एक संस्कृत सुभाषित मला मुद्दाम येथे द्यावेसे वाटते. आपल्यासाठी तो शहाणपणाचा सल्ला आहे.

क: काल: कानि मित्राणी को देश: को व्ययाऽऽ गमौ।

कस्याहं का च मे शक्तिरिती चिन्त्यं पुन: पुन:॥

(वेळ कुठली, मित्र कोण, प्रदेश कोणता, खर्च किती, जमा किती, मी कोण, माझी शक्ती किती, हा विचार पुन्हा पुन्हा करावा.)

 

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 00971505757887 या व्हॉट्स ऍप क्रमांकावर  पाठवू शकतात.)