मनावरचं मळभ दूर करताना

विवेक मराठी    23-Mar-2018
Total Views |

मन म्हणजे जणू माळरानीचा वारा

चारी वाटा मुक्तपणे धावणारा...

मन म्हणजे पाणीच म्हणा ना

जे मिसळलं त्याला लगेच सामावून घेणारं

मन म्हणजे माती लाल-काळी

कधीतरी जे कुशीत पहुडलं, त्या बीजाला नवा जन्म देणारी

मन म्हणजे प्रकाश-किरण

अनंत योजने प्रवास करतही तेजाने झळकणारा

मन म्हणजे विस्तीर्ण आकाश, दूरदूर पसरलेलं

विश्वाचा पसारा व्यापूनही अमर्याद उरणारं.

खरंच, मनाची महती काय सांगावी!! म्हणून तर त्या पंचमहाभूतांसारखं भासतं ते.. माणसाच्या जन्मापासूनच शरीर-मनाच्या एकत्रित कार्यातूनच व्यक्तिमत्त्व आकारतं. आयुष्याचे सोहळे होतात, जीवन सार्थकी लागतं, त्यात शरीराच्या स्वास्थ्याइतकीच महत्त्वाची भूमिका आहे मानसिक आरोग्याची.

पण आज आपण पाहतो, जशी पंचमहाभूतांना प्रदूषणाची लागण झाली आहे तशीच ती मनालाही... विविध दोषांनी या सहज लक्षात येतात, त्यासाठी आपण तत्काळ फिजिशियनकडे जातो, आवश्यक चाचण्या करतो आणि आपल्या आजाराचं निदान होतं, तत्काळ औषधं सुरू होतात. ही शारीरिक आरोग्याबाबत असलेली सहजसोपी प्रक्रिया मानसिक आरोग्याबाबत मात्र सहज अन् सोपी राहत नाही.

प्रथम समजून घेणं आवश्यक आहे ते मानसिक आरोग्य ही संकल्पना. व्यक्ती भावनिकदृष्टया स्थिर असणं, मन आणि बुध्दी यांचा योग्य समतोल असणं आणि सामाजिक भूमिका सुयोग्य पध्दतीने बजावणं या तीन गोष्टींचा समावेश मानसिक आरोग्यात  होतो. म्हणजेच मानसिक आरोग्याचा संबंध व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाशी आहे.

मुळात आपलं किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडलं आहे हे लक्षात घेणं, स्वीकारणं हे सर्वात कठीण आहे. गाडी इथेच 'यू टर्न' करते आणि आपण विपरीत वर्तनाचे बाह्य घटकांचे दाखले देत समर्थन करतो. मध्यंतरी विभवची चिडचिड खूपच वाढली. पण त्याच्या मते घरात, ऑफिसमध्ये माणसं बेफिकिरीने वागतात, मुद्दाम दुर्लक्ष होतं सूचनांकडे, म्हणून मला राग येतो.

मुंबईमध्ये अशाच एका आजोबांची केस. आजींना जाऊन दोन वर्षं झाली. पण आजही एकटेपणाने दु:ख कवटाळत तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या घरी ते बहुतांशी झोपूनच असतात. घरात कसलाही आवाज नाही, दारं-खिडक्या घट्ट मिटलेल्या. कुणाशी बोलावसं, बाहेर पडावं अशी इच्छा नाही आणि यांतून कोणताही शारीरिक आजार नसतानाही ते रुग्णाईत म्हणून आयुष्य जगत आहेत. ते नैराश्याची शिकार झाले आहेत.

नैराश्य, चिंता, विकृती या सामान्यपणे बहुतांश प्रमाणात आढळणारे मानसिक विकार; पण व्यसन करणं, चोरी करणं, मारहाण करणं, स्वत:ला वा इतरांना इजा पोहोचवणं, इतरांशी जुळवून न घेणं, संशय घेणं, (वस्तू, व्यक्ती, जागा अशा) विशिष्ट गोष्टींची भीती वाटणं, अचानक कोलमडून जाणं, संकटांचा सामना न करू शकणं, सततची चिडचिड, आत्महत्येचे विचार मनात येणं, खूप आनंद वा खूप दु:ख वाटणं, बदल न स्वीकारणं इत्यादी साऱ्या गोष्टींचा समावेश मानसशास्त्र मानसिक अनारोग्यामध्येच करतं.

तर असं हे मनाचं आरोग्य, मनाचं स्थान निश्चित दाखवता येत नसलं, तरी शरीरावरचा मनाचा अंमल मात्र स्पष्टच दिसतो.

अलीकडे अशा काही घटना वाचनात, ऐकण्यात आल्या आणि प्रकर्षाने जाणवलं - खरंच, आपण मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा कमकुवत मनाची, रोगट विचारांची नवी पिढी तयार झाल्यास नवल वाटणार नाही.

आता हे पाहा ना, परवा एका महिलेने छोटया बाळाला हॉस्पिटलमध्ये जन्म दिला आणि दरम्यान हॉस्पिटलमध्ये येताना एका नातेवाइकांकडे दिलेले तिचे दागिने हरवल्याचं तिला कळलं. इतक्या आनंदाच्या क्षणीदेखील हा धक्का तिला सहन न झाल्याने तिला पॅरालिसिसचा झटका आला.

दहावीच्या पेपरच्या आधीच्या रात्री हृदयविकाराचा झटका येऊन विद्यार्थ्याचा अंत ही बातमी तर मन हेलावणारी आणि तितकाच विचार करायला लावणारी.

मानसिक आजार हे जसे काही जैविक, जनुकीय घटकांमुळे होतात, तसेच ते आयुष्यात माणसाला मिळणारे अनुभव, आजूबाजूचं वातावरण यातूनही होतात. आज आपल्या भारतात तीन कोटी दहा लाख युवा मानसिक आजारांशी सामना करत आहेत आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी व्यक्तिगत पातळीवर, कुटुंबामध्ये, शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक स्तरावर काही घटक जबाबदार आहेत का, याबाबत आपण अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल.

माझ्याकडे एक नार्कोटिक्स युवक काउन्सेलिंगसाठी आला होता. मनाची दारं हळूहळू मोकळी होत होती. आधी त्याच्या बोलण्यात बेफिकिरी, मग नकार, त्यानंतर असमर्थतता डोकावू लागली आणि अचानक तो रडू लागला. 5 मिनिटं मनसोक्त रडल्यावर तो म्हणाला, ''आईबाबांनी मला तेव्हा का नाही थांबवलं? का नाही मला वेळ दिला? मला का नाही समजून घेतलं?'' कुटुंबातली जिव्हाळयाची रिकामी जागा ड्रग्जनी भरून काढली होती. याला अन्य काही घटकही कारणीभूत असतात - उदा. संगत, परिसर, मुबलक पैसा, इच्छाशक्तीचा अभाव इ. पण मुलाने मात्र खोलवर मनात आईवडिलांकडेच बोट दाखवलं होतं.

वाढती व्यसनाधीनता हा वैयक्तिक आणि सामाजिक, मानसिक आरोग्याच्या बिघाडाचाच तर परिणाम आहे. मुळात आपलं मानसिक आरोग्य बिघडलं आहे हे कसं ओळखावं? असा प्रश्न पडू शकतो. त्यासाठी आपल्यामध्ये खालीलपैकी एक व अधिक लक्षणं 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ आणि नियमित दिसतात का, ते आपण स्वत: तपासू शकतो.

* निरुत्साह.

* खाण्याची इच्छा नसणं वा खूप भूक लागणं.

* सतत काही ना काही शारीरिक तक्रारी, अंगदुखी, डोकदुखी, पोटदुखी इ. पचनविकार, धडधड.

* एकाकी वाटणं.

* व्यसनाच्या आहारी जाणं.

* गोष्टी विसरायला होणं.

* राग, चिडचिड.

* अनामिक चिंता, भीती

* कुणाशीही न पटणं.

* छोटया छोटया गोष्टींवरून वाद.

* नेहमी दुसऱ्यांच्या चुका दिसणं.

* मूड सतत बदलत राहणं.

* भास होणं, आवाज ऐकू येणं.

* इतरांना वा आपल्याला इजा करण्याचे विचार.

* बेचैनी.

* दैनंदिन कामदेखील व्यवस्थित करू न शकणं, खूप चुका करणं इ.

आज आपल्या मानसिक आरोग्याबाबत बोलायचं, तर आपण मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे काही घटक समजून घेणं आवश्यक आहे.

1) स्वजाणीव - स्वत:ला वास्तवाच्या प्रकाशात पाहणं, ओळखणं हा मानसिक आरोग्याचा पहिला घटक. अनेकदा स्वत:बद्दल चुकीच्या धारणा असतात. त्यातून चुकीच्या अपेक्षा निर्माण होतात. मग यातून फाजिल आत्मविश्वास येतो किंवा निरस, निष्प्रभ आत्मप्रतिमा तयार होते. आई-वडील, कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्या वागण्याबोलण्यातून आपण स्वत:ची आत्मप्रतिमा योग्य की अयोग्य ते तपासू शकतो. मी कोण आहे, काय आहे याची ज्याला यथार्थ जाणीव झाली, त्याचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं.

2) परिस्थितीचं भान : आपला परिसर, लोक, त्यांच्या धारणा यांचं भान सुटलं तर पदरी निराशाच येते. इथे मला राहुल गांधी यांचा एक किस्सा आठवला, बंगळुरूमधील एका कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना खुला (खुला!!) प्रश्न केला. ''Do you think Make in India works?'' सर्वांनी ''हो'' म्हटलं. चार चार वेळा प्रश्न विचारूनही उत्तर तेच आलं. यासाठी आजूबाजूच्या गोष्टी घटना, त्यांचे समाजावर, आपल्यावर होणारे परिणाम याची जाणीव असेल तर मानसिक आरोग्य सुदृढच राहतं.

3) स्पर्धा : आजकाल स्पर्धा इतकी बोकाळली आहे. दुसऱ्याच्या अपयशाच्या खांद्यावर उभारून स्वत:च यश साजरं करण्यात धन्यता वाटते. तर दुसरीकडे दहावीच्या, बारावीच्या मुलामुलींना भेटताना, बोलताना जाणवतं एक एक गुण म्हणजे जणू एक एक श्वास वाढवून मिळणं आहे. माझ्यापेक्षा त्याला जास्त गुण मिळाले तर मत्सर, असूया दिसते. त्यात पालकांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षाचं ओझं अनेकदा मनाला विकृतींकडे नेतं.

भौतिकवाद : 'मेरे पास माँ है' हे शब्द फिल्म इंडस्ट्रीत आजही यादगार आहेत. पण आता माणसांपेक्षाही वस्तूला आपल्या आयुष्यात प्राथमिकता आलेली आहे. अशीच एक केस मला आठवते. बारावी झालेला मुलगा आपल्या माता-पित्याशी अजिबात बोलत नाही. सेशनदरम्यान जे वास्तव समोर आलं, ते असं - ''आम्ही आईवडील म्हणून त्याला जे म्हणेल ते दिलं, तरी तो आमचा राग करतो'' हे आईवडिलांनी सांगितलं, तर मुलगा म्हणतो - ''कधी माझ्या डोक्यावर मायेने हात नाही फिरवला. कधी प्रेमाने माझी चौकशी नाही केली. वस्तू दिल्या हव्या तेव्हा, पण 'मी वस्तू नाही' हे विसरले. तसंच वागवलं मला.'' भावनांचा हळुवारपणा जाऊन आपलं मन आता श्रीमंती दर्शवणाऱ्या वस्तूंमध्ये, मोबाइलमध्ये गुंतू लागलंय. त्या वस्तूंच्या परिमाणानेच आपण नाती मोजू लागलोय. 'जे मला आत्ता लाभ देतं ते माझं. जे मला पैशाने विकत घेता येतं आणि नको तेव्हा दूर ठेवता येतं, ते सुखावह असं वाटत चाललंय.' आणि अशातून असमान वाटू लागलं आहे.

भावना हाताळणं - भावना हा मनाचा प्राण आहे. भावांच्या इंधनावरच मनाची धाव असते. विचार मेंदूमध्ये निर्माण होतात आणि भावना त्याचा परिणाम असतो. आपल्या मनातील भावनांना समाजमनाच्या जडणघडणीवर पारखून घ्यावं लागतं. प्रत्येक भावना जशीच्या तशी व्यक्त होऊन चालत नाही. विशेषतः आपल्याला जेव्हा कोणी आपली चूक दाखवतं, तेव्हा आपल्याला आधी राग येतो. आपण त्या गोष्टीला कारण देतो किंवा ते दुसऱ्यावर ढकलून देतो आणि इथे आपण नापास होतो. प्रथमतः समोरची व्यक्ती जे सांगते ते ऐकून घेणं, संपूर्ण ऐकून घेणं आवश्यक असतं, तरच आपण आपल्या मेंदूमध्ये त्याचा योग्य संदर्भ लावू आणि योग्य त्या भावनाच निर्माण होतील. आपलं दुःख, आपला राग, आपला आनंद साऱ्यांना जबाबदारीने हाताळलं, तर त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. फार आनंदानेही हृदयविकार आला अशा अनेक केसेस आहेत. तर भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान हरला, तेव्हा तिथल्या एका नागरिकाने स्वतःचा टेलिव्हिजन सेट फोडून टाकल्याचं वाचलेलं मला आठवतं.

दृष्टीकोन : दृष्टीकोन म्हणजे माणसाला मिळालेला तराजू आहे. सुख मोजायचं की दुःख, ही निवड आपली. एक कोरा कागद कॉलेज विद्यार्थ्यांना दिला आणि त्यावर काय दिसतं ते विचारलं... कुणी सांगितलं - काहीही नाही. कुणी सांगितलं पांढरा रंग, कुणी म्हटलं त्या कागदाच्या खालील वहीवरचं मुखपृष्ठ, तर एकाने सांगितलं निरभ्र आकाश... आयुष्यात हे नाही, ते नाही याचा शोध घेण्यात आपण फार शक्ती वाया घालवतो. एक नकारात्मक विचार दहा नकारात्मक गोष्टींना जन्म देतो आणि दहा गोष्टी शंभर विचारांना. जे या चक्रात अडकतात, ते सुंदर आयुष्य जगणं विसरतात आणि कुरतडत जगू लागतात.

शारीरिक स्वास्थ्य - मन आणि शरीर परस्परांवर परिणाम करतात. शरीरातील दीर्घकाळ असलेला बिघाड, सततची स्टिरॉईड्स व अन्य औषधं यामुळेही मनाला आपणदेखील आजारी आहोत असं वाटू लागतं आणि मग शरीरावर त्याचा अधिकच विपरीत परिणाम होतो. दीर्घकाळ एकाच जागी झोपून राहिलेल्या व्यक्तीला भ्रम होऊ लागतात. विचित्र स्वप्नं पडतात.

म्हणून आज आपण पाहू मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो बरं...

1) मानसिक आरोग्याची संकल्पना समजून घेऊ.

2) मानसिक व्याधी कोणालाही होऊ शकते. ते अमान्य करणं धोकादायक ठरू शकतं.

3) आपलं मनाचं आरोग्य बिघडलं, तर समुपदेशक, सायकिऍट्रिस्ट यांची मदत घेऊ.

4) नियमित व्यायाम करू.

5) पोषक आहार, पुरेसं पाणी पिऊ.

6) एखादा छंद जोपासू, ज्यातून पैसे मिळवणं हा हेतू नसेल.

7) मोबाइल हाती घेण्याच्या वेळा ठरवून घेऊ.

8) Whats appवर नाही, तर प्रत्यक्ष भेटीगाठी करू.

9) स्वतःला ओळखण्याचा व स्वीकारण्याचा प्रयत्न करू.

10) प्रत्येक गोष्टीत संयम दाखवू. स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करू.

11) उपचारांना पुरेसा वेळ देऊ.

मानसिक आरोग्याचा भला-बुरा परिणाम समाजजीवनावर होत असतो. रात्रीच्या अंधारात पुतळयाची विटंबना करणारी माणसं ही मानसिक अनारोग्यानेच त्रस्त असतात, कारण स्वतःच्या कृतीची जबाबदारी घेण्याची क्षमता त्यांच्यात नसते. पण ज्या समाजात निरामय मानसिक आरोग्य नांदतं, तो समाज अधिकाधिक प्रगल्भ  आणि प्रगत होत जातो. कारण त्यात भीती, चिंता, संशय, अविवेकी स्पर्धा, अपेक्षांचं ओझ, बुवाबाजी अशा कोणत्याही नकारात्मकता प्रवेश करत नाहीत.

मग या लेखाच्या निमित्ताने करायची सुरुवात मनाच्या शुध्दीकरणाची... त्यात कळत-नकळत शिरलेल्या विकारांचं मळभ हटलं ना, तर स्वच्छ अन् सुबक व्यक्तिमत्त्व निश्चितच लाभेल. पटतंय ना?

 - लेखिका समुपदेशक आहेत.

9823879716

suchitarb82@gmail.com