संघ, राज्यघटना आणि राज्यघटनेतील बदल

विवेक मराठी    27-Mar-2018
Total Views |

 

संघाला सत्तेचे राजकारण करायचे नसल्यामुळे, सत्ता कशी राबवावी, हे सांगणाऱ्या अभ्यासाचा ओघानेच प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे ज्या मंडळींना राज्यघटनेच्या मूलभूत विषयाची माहिती नाही, ती मंडळी घटनाबदल करायला निघाली आहेत? हे संघअज्ञानी लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. या ठिकाणी आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे जे लोक संघावर भन्नाट आरोप करतात, त्यांना तरी 'सं वि धा न' ही चार अक्षरे सोडून संविधानाविषयी काही माहिती असते का?

''देशाची राज्यघटना बदलण्याचा संघाचा छुपा अजेंडा आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर, संघ भारताची राज्यघटना बदलून टाकेल. संघाच्या वतीने हे काम भारतीय जनता पक्ष करील. 2019च्या निवडणुका या संदर्भात अखेरच्या सार्वत्रिक निवडणुका असतील, असे समजले पाहिजे.'' राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुध्द अतिशय योजनाबध्द रितीने जो अपप्रचार चालतो, त्याचा हा सारांश आहे. असे आरोप करणारे अगदी काल-परवापर्यंत म्हणत होते की, संघाचे काम वाढले आणि राज्यसत्तेत स्वयंसेवक गेले की या देशातील मुसलमानांच्या कत्तली सुरू होतील, त्यांच्या मशिदी पाडल्या जातील आणि ख्रिश्चनांची तीच स्थिती होईल.

परंतु आता असे लक्षात येते की, संघाचा द्वेष करणाऱ्या मंडळींनी मुसलमान आणि ख्रिश्चन हा विषय काही काळापुरता बाजूला ठेवला आहे. आता त्यांना संविधानाचा पुळका आलेला आहे. संविधान धोक्यात आल्यास देश धोक्यात येईल, देशाचे ऐक्य टिकणार नाही, सामाजिक ऐक्य नाहीसे होईल आणि भारत धर्माधिष्ठित राज्य होईल या भाषेतच ही सर्व मंडळी आपले विचार मांडत असतात. माणूस पूर्णतः अज्ञानी असेल तर ते एका वेळेस चालते, त्याला सज्ञान करता येऊ शकते. माणूस पूर्ण ज्ञानी असेल तर काही प्रश्न निर्माण होत नाहीत. परंतु तो जर अर्धवट ज्ञानी असेल, तर प्रश्नच प्रश्न निर्माण होतात. संघ आणि संविधान यावर टीका करणारे पूर्ण अज्ञानी नाहीत आणि तसे पूर्ण ज्ञानीदेखील नाहीत. सर्व मंडळी अर्धवट ज्ञानी आहेत.

ज्या संघाला धरून टीका चाललेली आहे, त्या संघाचा प्रथम विचार करू या. संघाचे काम सांस्कृतिक आहे. राज्यसत्ता हस्तगत करणे हे संघाचे काम नाही. राज्यसत्ता हस्तगत करण्यासाठी लोकशाहीत राजकीय पक्ष लागतात. हे राजकीय पक्ष संविधानाने आखून दिलेल्या मार्गाने काम करतात. लोकांचा पाठिंबा मिळवितात आणि सत्तेवर येतात. राज्यसत्ता कशी राबवायची, याचे नियम राज्यघटना सांगते. या नियमांना सर्वोच्च कायदा असे म्हणतात. राज्यघटनेच्या कायद्याच्या प्रकाशात सत्तेवर येणाऱ्या राजकीय पक्षाला धोरणात्मक कायदे करावे लागतात. या सगळया खेळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोठेच नसतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकीय संघटना नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान नाही. संघ राजकीय पक्ष नसल्यामुळे, मतपेढया या स्वरूपात संघ देशातील जनतेचा विचार करीत नाही आणि करू शकत नाही. संघाचे काम समग्र हिंदू समाजाच्या संघटनेचे काम आहे. या संघटनेच्या कामाचा आधार आहे - 'हे हिंदुराष्ट्र आहे, हिंदू समाज या राष्ट्राचा पुत्ररूप समाज आहे, आपला समाज अतिशय प्राचीन आहे आणि संपूर्ण समाज संस्कृतीने परस्परांशी घट्टपणे जोडलेला आहे.'

समग्र समाज संघटनेचे काम राजकीय विचारांच्या आधारे होणे अशक्य आहे. प्रत्येक राजकीय पक्षाची विचारसरणी वेगळी असते आणि राजकीय पक्षांची सतत परस्पर स्पर्धा असते. या स्पर्धेतून मोठया प्रमाणात कटुता निर्माण होते,र् ईष्या निर्माण होते; जो आपल्या विचाराचा नाही, तो आपला नाही, अशी भावना तयार होते. म्हणून राजकीय पक्षाच्या माध्यमातून समाजाचे सांस्कृतिक संघटन बांधणे अशक्य कोटीतील गोष्ट असते. संघाचे काम राष्ट्राचा विचार करण्याचे आहे. राष्ट्र म्हणजे भूमी, जन, आणि संस्कृती. यातील तिघांचे - राष्ट्र, जन आणि भूमी यांचे नीट संवर्धन कसे होईल, हे पाहणे हे संघाचे काम आहे. सत्तेवर लोक येतात आणि जातात, परंतु राष्ट्र अमर आणि कायमचे असते. सत्तेवर बसणाऱ्या राजकीय पक्षाचे आयुष्य सत्ता काळाने मर्यादित असते. संघाचे आयुष्य, ही सत्तेबाहेरील संघटना असल्यामुळे, निरंतरचे असते.

संविधान हा राज्याचा विषय असतो. राज्य म्हणजे तीन प्रकारची सत्ता. 1) कायदे करण्याची सत्ता, 2) कायद्याची अंमलबजावणी करण्याची सत्ता, 3) ज्ञानदानाची सत्ता, याला सत्तेचे त्रिभाजन म्हणतात. राजेशाही आणि हुकूमशाही या तिन्ही सत्ता काही मूठभर लोकांच्या हातात एकवटलेल्या असतात. लष्करशाही, हुकूमशाही, एकपक्षीय हुकूमशाही, राजेशाही, असे सत्तेचे प्रकार आहेत. या प्रकारात सत्ता राबविणारी माणसे आणि शोषित माणसे यांचा परस्परांशी काहीही संबंध नसतो. राजा अथवा हुकूमशाह करेल तो कायदा. त्याची अंमलबजावणीदेखील तोच करणार आणि पुढे जाऊन कायद्याच्या अंमलबजावणीचा न्यायनिवाडादेखील तोच करणार.

'निरंकुश सत्ता भ्रष्ट करते' अशी एक उक्ती आहे. निरंकुश सत्तेस सत्ताधारी कुणालाही जबाबदार नसतात. ते कायद्यांच्या वर असल्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांना शासन होऊ शकत नाही. ते कुणालाही केव्हाही अटक करू शकतात आणि त्याचे प्राणही घेऊ शकतात. पाकिस्तानचा झिया, इराकचा सद्दाम, इराणचा शहा आणि खोमेनी, फिलिपाइन्सचा मार्कोस इत्यादी या काळातील उदाहरणे आहेत.

वास्तविक पाहता समाजात अनाचार वाढू नये, अनागोंदी वाढू नये, प्रत्येक जिवाला त्याच्या जिवाची शाश्वती वाटली पाहिजे, त्याला निर्भयपणे त्याचे जीवन जगता आले पाहिजे यासाठी राज्यसत्तेचा उगम झाला. हुकूमशाही, राजेशाही, शासनातील काही शासक लोकांची काळजी करणारे निघाले आणि त्यांनी राजधर्माचे पालन केले. या राजधर्माचे दुसरे नाव घटना किंवा संविधान असे आहे. ज्या ज्या प्रदेशात तिथल्या तिथल्या शासकांनी राजधर्माचे पालन करून शासन केले, ते ते राजे लोकप्रिय झाले. लोकांनी त्यांच्या स्मृती जागृत ठेवल्या. आपल्या भारतात बळीराजा, राजाराम, हर्षवर्धन, सम्राट अशोक, राजा शिवाजी यांचा या बाबतीत उल्लेख करावा लागतो. राजेशाहीत किंवा हुकूमशाहीत राजा चांगलाच निघेल, याची काहीही हमी नसते. एकूण या इतिहासामध्ये लोकांवर जुलूम करणाऱ्या राजांचीच संख्या अधिक असल्याचे लक्षात येते.

राज्य नीट चालवायचे असेल तर राज्याला घटना पाहिजे. घटना अथवा संविधान म्हणजे काय? तर त्याचा अर्थ होतो, राज्य करण्याची जी शक्ती राज्यकर्त्यांना मिळाली आहे, तिच्यावर कोणत्या प्रकारची कायदेशीर बंधने आवश्यक आहेत. यासाठी घटनेच्या कायद्याला सर्वोच्च कायदा मानण्यात येते. या सर्वोच्च कायद्याचे उल्लंघन कुणालाही करता येत नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रीमंडळातील मंत्री या सर्वांना संविधानाच्या कायद्याप्रमाणेच सत्तेचा वापर करता येतो. यापेक्षा जास्त काही करण्याचा प्रयत्न झाल्यास सर्वोच्च न्यायालय तो प्रयत्न हाणून पाडते. सर्वोच्च न्यायालय सांगते की, तुमचे हे करणे, वागणे, बोलणे, संविधानाला धरून नाही, म्हणून तुम्ही केलेला कायदा आहे, त्याची अंमलबजावणी करता येणार नाही. घटनाविरोधी कायदा आहे.

संघाला सत्तेचे राजकारण करायचे नसल्यामुळे, सत्ता कशी राबवावी हे सांगणाऱ्या अभ्यासाचा ओघानेच प्रश्न निर्माण होत नाही. माझ्या माहितीप्रमाणे राज्यघटनेवर अधिकारवाणीने बोलू शकणारा एकही संघकार्यकर्ता सापडणे दुर्मीळ आहे. यामुळे ज्या मंडळींना राज्यघटनेच्या मूलभूत विषयाची माहिती नाही, ती मंडळी घटनाबदल करायला निघाली आहेत? हे संघअज्ञानी लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. या ठिकाणी आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे जे लोक संघावर भन्नाट आरोप करतात, त्यांना तरी 'सं वि धा न' ही चार अक्षरे सोडून संविधानाविषयी काही माहिती असते का? निवडून आलेल्या ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत लोकप्रतिनिधींना 'सं वि धा न' या चार अक्षरांपलीकडे काय माहीत असते? हे विधान सर्वांसाठी लागू होणार नाही. अनेक अभ्यासू नगरसेवक, आमदार, खासदार, असतात, ते नक्कीच संविधान म्हणजे काय, हे समजत असतील, परंतु बाकीच्यांचे काय?

भारतीय संविधान हे कलमांचे गाठोडे नव्हे. जवळजवळ साडेचार हजाराहून अधिक कलमे या संविधानात आहेत. एक-एक कलम वाचायला घेतले तर सामान्य माणूस दहा कलमांनंतर झोपून जाईल. कारण ती संवैधानिक भाषा आहे. कायद्यालाही कायदा सांगणारी संवैधानिक भाषा आहे. अशा भाषेत सामान्य माणसे विचार करीत नाहीत आणि बोलतही नाहीत. हे संविधान समजून घेण्यासाठी संविधानावर भाष्य करणाऱ्यांची पुस्तके वाचायला लागतात. ती बहुतेक सर्व इंग्लिशमध्ये आहेत. मराठीत फार कमी आहेत आणि ती फार गंभीरपणे वाचावीत अशा योग्यतेची नाहीत. (असे माझे मत आहे)

या संविधानाने राज्ययंत्रणेवर तीन गोष्टींची जबाबदारी टाकलेली आहे. पहिली जबाबदारी देशाचे ऐक्य टिकविण्याची, दुसरी जबाबदारी देशात एकात्मता निर्माण करण्याची आणि तिसरी जबाबदारी रक्तपात विरहित मार्गाने अहिंसक सामाजिक क्रांती घडवून आणण्याची. हे तिन्ही विषय विस्तृत लेख लिहिण्याचे विषय आहेत. देशाचे ऐक्य म्हणजे देशाची भौगोलिक एकता. देशाची एकात्मता म्हणजे जाती-पाती, उपासना पंथ, भाषा, यात विभागलेल्या लोकांत 'आम्ही एक आहोत, आम्ही भारतीय आहोत, भारत आमचा देश आहे' अशा प्रकारची भावना निर्माण करणे. आणि सामाजिक क्रांती म्हणजे जातिभेदांमुळे निर्माण झालेली विषमता दूर करून नागरिक या नात्याने सर्वांना एका समान भूमिकेवर आणण्याचे आहे. आपले उपासना मार्ग वेगवेगळे असतील. कुणी देवळात जाईल, कुणी मशिदीत जाईल, तर कुणी चर्चमध्ये जाईल, एखादा गुरुद्वारात जाईल, दुसरा देहरासनात जाईल, तिसरा विहारात जाईल. या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या उपासना पध्दतीप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य राज्यसत्तेने दिले पाहिजे, असे आपली ही राज्यघटना सांगते. माणसामाणसात कोणताही भेद करण्यास, लिंगभेद करण्यास मज्जाव करते आणि अस्पृश्यतेला पूर्णपणे बंदी घालते.

खरे म्हणजे संविधान हा राज्याचा राजधर्म आहे. हा राजधर्म सांगतो की, राज्य धर्माप्रमाणे - म्हणजे न्याय, नीती, सत्य, यावर चालेल. राज्य उपासना पध्दतीच्या आधारे नागरिकांमध्ये कोणताही भेदभाव करणार नाही. राज्याचा कारभार करणारे बहुसंख्य हिंदू असले, तरी हे हिंदुराज्य होणार नाही. एक देव, एक ग्रंथ, एक प्रेषित, एका प्रकारची उपासना ही आपल्या राज्यात निर्माण होणार नाही. आपल्या घटनाकारांनी या राजधर्माचा फार गंभीरपणे विचार करून उपासनेचे स्वातंत्र्य देणारी कलमे या घटनेत टाकलेली आहेत. गेली सत्तर वर्षे ही राज्यघटना जिवंतपणे चालू आहे. पुस्तकातील राज्यघटना हे घटनेचे अचेतन शब्द असतात, परंतु तिची जेव्हा अंमलबजावणी सुरू होते, तेव्हा घटनेतील प्रत्येक वाक्ये, स्वल्पविराम, पूर्णविरामदेखील सजीव होऊन चालू लागतात.

आपले हे राज्य जातीपातीमुक्त असावे, राज्यात सर्व उपासना पंथांना समादर मिळावा, स्त्री-पुरुष समानता असावी, माणमाणसांत भेद नसावेत, भारत अस्पृश्यतामुक्त असावा, प्रत्येकाला स्वतःचा विकास करून घेण्याची भरपूर संधी मिळावी, भाषेवर भांडणे होऊ नयेत, आपल्या भौगोलिक सीमांचे रक्षण झाले पाहिजे, भारत एक होता, एक आहे आणि उद्याही एकच राहिला पाहिजे, हे सर्व करण्याचे माध्यम म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. जे संघाच्या मनात आहे आणि संघाच्या रोजच्या व्यवहारात आहे, त्यातील बहुतेक गोष्टी आपल्या घटना समितीतील 288 सभासदांनी 166 दिवस अतिशय गंभीर चिंतन करून आता देश आपल्यालाच चालवायचा आहे, हे लक्षात घेऊन या घटनेची निर्मिती केलेली आहे. या सर्व चर्चेला कलमबध्द करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आज आपल्यापुढे लिखित स्वरूपात जी घटना उभी आहे, तिची शब्दरचना बाबासाहेबांनी केलेली आहे.

अशा या राज्यघटनेशी सत्ताकारणामुळे संघाचा संबंध नसतो, परंतु राष्ट्रकारण करत असताना, राज्य, राष्ट्राचे एक अंग असते, या अर्थाने राज्यघटना आपल्या राष्ट्राच्या राज्य अंगाचा कसा विचार करते? हे समजून घेणे फार आवश्यक ठरते. ही राज्यघटना तिच्या कलमाद्वारे राष्ट्र दुर्बळ करण्याचा काहीही परिणाम करीत नाही. अंमलबजावणी करणारे अनेक राजकीय नेते राज्यघटनेचा दुरुपयोग करतात, स्वतःला पाहिजे तशी तिला वाकविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना राज्यघटनेशी मनमानी करू द्यायची नसेल तर 'आम्ही भारतीय लोक...' ज्यांनी ही राज्यघटना अंगीकृत केली आहे, त्यांचे एक मोठे काम बनते की, आपण जागरूक राहिले पाहिजे. अज्ञानी माणूस जागरूक राहू शकत नाही, म्हणून संविधान साक्षर होणे ही या काळाची सर्वात मोठी गरज आहे.

vivekedit@gmail.com

 

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/