रडू

विवेक मराठी    27-Mar-2018
Total Views |

रडू येणं म्हणजे मन मोकळं होणं. मनातील सर्व डोळयावाटे बाहेर येणं म्हणजेच रडणं. तर या रडण्याचंदेखील अनेक कारणं आणि प्रकार आहेत. आजवर  आपण हमसाहमशी, स्फुंदून, घळाघळा, ओकसाबोकशी, मूक, टाहो फोडून, तोंडात रुमाल दाबून, अंधारात उशीत तोंड खुपसून, कुणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून किंवा कुशीत शिरून, कुणालातरी बघितल्यावर गहिवरून, दृष्टी धूसर होईपर्यंत....

 तुम्ही किती प्रकारांनी आणि कारणांनी रडला आहात आजवर? हमसाहमशी, स्फुंदून, घळाघळा, ओकसाबोकशी, मूक, टाहो फोडून, तोंडात रुमाल दाबून, अंधारात उशीत तोंड खुपसून, कुणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून किंवा कुशीत शिरून, कुणालातरी बघितल्यावर गहिवरून, दृष्टी धूसर होईपर्यंत....

माझं - म्हणजे वडिलांचं मूळ गाव बोरवाडी, निजामपूर माणगावजवळ. आजोबांच्या तेराव्याला आजीला सहा मुलांसकट बाहेर काढलं, त्यानंतर आजीने कधीच पाऊल ठेवलं नव्हतं गावात. आम्ही तर नाहीच. आता तिथे पडकं जोतं शिल्लक आहे, विहीर आहे, थोडी जमीन आहे आणि मागे शिल्लक राहिलेल्या लोकांच्या आठवणीतलं विद्वांस कुटुंब आहे. उन्हासारखं दारिद्रय भरपूर. खूप वर्षं झाली या गोष्टीलासुध्दा. तरी तीसेक झाली असतील. आजीला एकदा आणि शेवटचं गावाला जाऊन यायचं होतं. आम्ही सगळे, काका, आतेभाऊ आणि आजी निघालो. कुणाकडे जाणार.. माहीत नाही. तिथे कुणी ओळखीचं असेल-नसेल... माहीत नाही. मॅटॅडोर करून गेलेलो. गावच्या भैरीदेवीला नमस्कार करून परतायचं नाहीच कुणी ओळखीचं भेटलं तर, अगदीच नाही तर निजामपूरला काका होतेच.

गावात शिरलो. परांजपे होते ओळखीचे, तिथे विसावलो. गप्पा झाल्या. मग गोरेकाकूंकडे गेलो. एवढया मोठ्ठया घरात गोरेकाकू एकटया राहायच्या. दात नांगराच्या फाळासारखे पुढे, मागे लिंबाएवढा अंबाडा, म्हातारी वेतासारखी ताठ. त्यांची दोन्ही पोरं पुण्यात. बाबांचे चांगले मित्र. ''कुशा, आहे तोवर मी इथेच राहणार. मला लागतंय कितीसं? तुम्ही परत गावात आलात ते बरं झालं.'' म्हातारीने पाया पडल्यावर तोंड भरून आशीर्वाद दिला. ''अरे, त्या ### कडे जाऊन ये रे बाबा. दोघंच असतात, खूप आनंद होईल गेलास तू तर. एवढे एवढेसे घरातून बाहेर पडलात, आज तेवढयाच वयाच्या तुमच्या मुलांबरोबर आलात. काळ निघून जातो रे! जखम बरी होते, पण व्रण राहतात. असो! आता बरंय ना? जुनं उगाळून फक्त हात काळे आणि डोक्याला शीण.''

आमची वरात थोडयाच अंतरावरच्या एका घरात गेली. डॉर्मिटरी असते तसा मोठा चौकोनच होता घर म्हणजे. समोरासमोर दोन कॉट होत्या. एकावर आजोबा आणि एकावर आजी बसलेल्या. दोघंही पुतळयासारखे शांत बसले होते. ''कोण आहे?'' ''मी कुशा, विद्वांस. येऊ  का?'' ''अरे, ये, ये'' बसल्या जागेवरूनच आजी म्हणाल्या. ''आईसुध्दा आलीये, भालू आलाय, माझी बायको सुमन, मुलं - जयंता, रणजीत - आणि कुमीचा आदित्यही आलाय.''

म्हातारीच्या तोंडावर अमर्याद आनंद पसरला. ''किती वर्षं झाली रे, याच्या-त्याच्याकडून कळायचं अधनंमधनं. बरं वाटायचं. दिवस काही कुणाचे रहात नाहीत. शेणातले किडे काही कायम शेणात रहात नाहीत. निभावलात सगळयातून. येसू, बस गं इथे माझ्या शेजारी. आठवलं तरी अंगावर काटा येतो अजून. तेव्हा आम्ही कुणीच काही करू शकलो नाही तुमच्यासाठी, याची खंत कायम वाटायची, अजूनही वाटते. पण आपल्या हातात कुठे काय असतं?''

सगळयांच्या चौकशा झाल्या, आठवणी निघाल्या. हा आहे का, तो कधीच गेला, ती आता मुलाकडे असते, अमक्याचं वाईट झालं, तमक्याचं नशीब पालटलं वगैरे चर्चा झाली. त्यांची दोन्ही मुलं मुंबईला असतात असं कळलं. आजी म्हणाल्या, ''आम्ही दोघेच इथे असतो. कुणी येत नाही आणि जात नाही. पैसे येतात, माणूस येणं अवघड झालंय बघ. मला तर आता अजिबातच दिसत नाही. यांना एका डोळयाने अंधुकसं दिसतं. रहातोय कसेबसे मरायची वाट बघत. डोळयांमुळे कुठे जाणं नाही, येणं नाही. दोघे नुसते बसून असतो दिवसरात्र कॉटवर.''

घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं. पुढचं मला ऐकवेना. मी आणि आदित्य बाहेर आलो आणि बाहेरच्या कट्टयावर बसून ढसाढसा रडलो फक्त. फार जगू नये माणसाने, एवढं खरं.  

9823318980