एवढयाशा तिळाचा डोंगराएवढा महिमा

विवेक मराठी    27-Mar-2018
Total Views |

 

 लहानपणी अलीबाबा आणि चाळीस चोर या कथेतून 'तिळा तिळा दार उघड' म्हटल्यावर संपत्तीने भरलेल्या गुहेचं दार उघडणारा तीळ नियमित वापरात आणून आरोग्याच्या गुहेचं दार उघडायला हरकत नाही. कारण तिळात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईचं प्रमाण उत्तम असल्याने मानवी शरीरास ही लहानशी बी फारच उपयुक्त आहे. आपल्या प्राचीन आयुर्वेदाला या फायद्यांची कल्पना असल्याने भारतीय पूर्वापार तिळाचा सढळ हस्ते वापर करायचे.

 "एक तीळ सात जणांत वाटून खावा' किंवा 'तिळभरही जागा देणार नाही'पासून जानेवारीत मकरसंक्रांतीला तिळगूळ घेऊन गोड बोलायला सांगणाऱ्या तिळाबरोबर आजची ही मसालेदार यात्रा. तिळकुटापासून तिळाच्या लाडूंपर्यंत, तेलापासून मसाल्यांपर्यंत मुक्तहस्ताने वापरला जाणारा तीळ हा प्रकार शंभर टक्के भारतीय उपज आहे. तिळाबद्दल बोलण्यासारखं काय आहे? असा विचार कुणाच्याही मनात सहज येऊ  शकतो. खरं तर तिळासारखी क्षुल्लक गोष्ट आपल्या खिजगणतीतही नसते, हेच या विचारामागचं खरं कारण आहे.

ख्रिस्तपूर्व काळात प्राचीन हडप्पा व सिंधू नदीच्या काठावर वसलेल्या नागर संस्कृतीत तिळाचा वापर केला जाण्याचे पुरावे मिळाले असल्याने हे जंगली झुडूप मानवी उपयोगी असल्याचा शोध प्राचीन असल्याला दुजोरा मिळालाय. भारतीय मसाल्यांमध्ये आणि आयुर्वेदिक उपचारांमध्ये पूर्वापार वापरात असलेले तीळ भारतीय जीवनाचं अविभाज्य अंग आहे. इंग्लिशमध्ये सिसम सीड म्हणून ओळखलं जाणारं तीळ भारतात उगवणारं स्थानिक पीक आहेच, तसंच सहारा वाळवंटाच्या आफ्रि कन भागात उगवणारं जंगली फूलझाडं प्रकारात मोडणार झुडूप आहे. गम्मत म्हणजे दोन्ही ठिकाणी - आपल्या भारतात आणि तिकडे आफ्रिकेत हे झुडूप जंगली असलं, तरी त्याच्या बियांसाठी, म्हणजेच तिळासाठी त्याची लागवड केली जाते. Sesamum indicum, अर्थात सेसमम इंडिकम या वनस्पतिशास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या तिळाच्या झुडपाचं वैशिष्टय म्हणजे शुष्क आणि रखरखीत भागात, कमी पावसाच्या प्रदेशात इतर झुडपांना जगायला कठीण अशा वातावरणात ही झुडपं व्यवस्थित जगतात. दुष्काळसदृश पर्यावरणात सहजतेने जगणं आणि उत्पादन देणं हे या झुडपांचं ठळक वैशिष्टय म्हणता येऊ  शकतं.

हिंदुस्थानात तिळाचे उपयोग व वापर अनेक शतकांपासून प्रचलित आहेत. जसं इंग्लिश भाषेत ऑॅईल या शब्दाची उत्पत्ती ऑॅलिव्ह या शब्दापासून झाली असं समजतात, तसंच आपल्याकडच्या संस्कृत भाषेतील तैल हा शब्द तिळाशी जोडलेला आहे. हिंदी, मराठी आणि गुजरातीच नाही, तर अगदी पूर्वेकडच्या राज्यांमध्येही तीळ, तिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या तेलबिया दक्षिण भारतात मात्र एल्लू किंवा नुवुल्लू अशा मजेशीर नावाने ओळखल्या जातात. तिळाचं झुडूप बहुवार्षिक समजलं जातं. वर्षाच्या आत साधारण चार ते पाच फुटांची पूर्ण उंची गाठणार तिळाचं झुडूप पावसाळयानंतर घंटेसारख्या गुलाबी पांढऱ्या फुलांनी बहरायला सुरुवात होते. याच घंटाकार फुलांबरोबर देठाच्या बेचक्यात एखाद इंचाच्या शेंगाही लागायला सुरुवात होते. निसर्गातले ऊन, वारा आणि पाऊस हे मुख्य घटक प्रत्येक पिकाच्या वाढीवर परिणाम करत असतात. प्रत्येक वनस्पतीला फुलण्यासाठी लागणारा विशिष्ट प्रकाशाचा कालावधी म्हणजे फोटोपीरिअड असा क्लिष्ट शास्त्रीय शब्द वापरला जातो. ह्या फोटोपीरिअडवर त्या त्या वनस्पतीचं फुलणं आणि फळणं अवलंबून असतं. तिळाच्या शेंगाही ह्याला अपवाद नसतात. या शेंगांना मिळणारा उन्हाचा काळ तिळाच्या फळधारणेवर परिणाम करत असतो. सुरुवातीला गर्द हिरव्या असणाऱ्या ह्या शेंगा हळूहळू भरायला सुरुवात होते. चार पाकळया असलेल्या ह्या शेंगेतल्या प्रत्येक ओळीत बारा ते चौदा तीळ हारीने रचलेले असतात. निसर्गत: प्रत्येक शेंगेत सुमारे पन्नास ते पंचावन्न तीळ असतात. साधारण शंभर-सव्वाशे दिवसात - म्हणजेच तीन ते चार महिन्यांत तीळ तयार झालेले असतात. पक्व शेंगा योग्य वेळेत, म्हणजेच रंग बदलायला लागल्यावर काढणं गरजेचं असतं. नाहीतर, शेंग उकलून त्यातल्या बिया, म्हणजेच तीळ सर्वत्र उधळले जाऊ  शकतात. हे काढून ठेवलेले तीळ कीडामुंगीपासून वाचवल्यास, तसेच सहज चार-पाच वर्षं ठेवले जाऊ  शकतात. आपल्या देशात पांढरट आणि राखाडी मळकट रंगाच्या तिळांप्रमाणे काळया रंगाच्या तिळाचं उत्पादन घेतलं जातं. या काळया तिळांमध्ये प्रचंड पोषणमूल्यं असूनही ते फक्त धार्मिक कार्यासाठीच वापरले जातात. दुर्दैवाने, आपल्याकडे भोजन आदींसाठी त्यांचा वापर केला जात नाही. बाकी पांढऱ्या आणि मळकट रंगाच्या तिळांचा वापर दक्षिण आशियाई देशांत व भारतीय उपखंडात, अमेरिकन देशांतही केला जातो. मात्र, युरोपमध्ये पांढरे व हलक्या रंगाचेच तीळ वापरले जातात. चीनमध्ये काळे तीळ खाण्यात आवर्जून वापरले जातात.

जगभर तिळाचे विविध वापर प्रचलित आहेत. भारतीयांना संपूर्ण बीच्या वापराचे आणि तिळाच्या तेलाचे उपयोग प्राचीन काळापासून ज्ञात आहेत. मी आयुर्वेदाचा अभ्यास केला नसल्याने तिळाचे विविध आयुर्वेदिक उपयोग यावर भाष्य करणं अनुचित ठरेल. मात्र आयुर्वेद उपचार पध्दतीत स्नेहन, मर्दन याच्या जोडीला विरेचनासाठी तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. भारतीय स्वयंपाकशास्त्र तिळासारख्या चिमण्या बीमध्ये असलेलं प्रचंड पोषणमूल्य पूर्वापार जाणत असल्याने तिळाचे अनेक पदार्थ घराघरांमध्ये केले जातात. थंडीच्या काळात शरीराला गरजेची असलेली उष्णता व पोषण या लहानशा घटकातून मिळतं. म्हणूनच थंडीच्या काळातच येणाऱ्या मकरसंक्रांतीला गूळ घालून केलेले तिळाचे लाडू खाण्याची पध्दत आहे. तीळ लावलेली भाकरी, तिळकूट, चटणी, भाजीत, आमटीत मिसळून, तीळ हलवा वगैरे तिळाचे पदार्थ प्रचलित आहेतच. तिळाच्या बीमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड मेदाम्ल जास्त प्रमाणात असतं. यामुळेच तीळ तेलात असणारे आम्लघटक हृदयाचा शत्रू समाजलं जाणारं रक्तातील कोलॅस्टेरॉल वाढू देत नाही. या लहानशा बीमध्ये अनेक जीवनसत्त्वं मोठया प्रमाणात भरलेली आहेत, ज्यात लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, तांबं, कॅल्शियम यांचा समावेश आहे. तिळातल्या लीगनॅन घटकात मानवी शरीराला कर्करोगाशी व वृध्दत्वाशी लढण्यास मदत करतील अशी मूल्यं आढळली आहेत. तिळात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईचं प्रमाण उत्तम असल्याने मानवी शरीरास ही लहानशी बी फारच उपयुक्त आहे. आपल्या प्राचीन आयुर्वेदाला या फायद्यांची कल्पना असल्याने भारतीय पूर्वापार तिळाचा सढळ हस्ते वापर करायचे. गेल्या काही वर्षांत टांझानिया व इटली तीळ उत्पादनात अग्रक्रमी असून भारत व सुदान पाठोपाठ चीनही तिळाच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. युगांडा, नायजेरिया यासारख्या आफ्रिकन देशांसह हल्ली अमेरिका खंडातील काही भागातही तिळाचं उत्पादन घ्यायला सुरुवात झाली आहे.

तिळाची जगभरातून सर्वात जास्त आयात करणारा देश म्हणजे जपान. जपानी भोजनात भाजक्या तिळापासून केलेल्या पदार्थांचा आणि तिळाच्या तेलाचा सर्वात जास्त वापर केला जातो. यातही पॉलिश केलेल्या म्हणजेच वरचं आवरण काढून टाकलेल्या तिळापेक्षा साल अबाधित ठेवलेल्या तिळाला प्राधान्य दिलं जात. चीन हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, जो उत्तम प्रतीचे तीळ देशात आयात करून स्वत:कडे पिकणारे दुय्यम दर्जाचे तीळ दक्षिण आशियाई देशांमध्ये निर्यात करतो. तिळाच्या बीमध्ये पन्नास टक्के तैलांश असल्याने त्याचा सर्वात जास्त व्यापारी वापर होणं सहाजिकच आहे. भोजन, खानपान, बेकरी उद्योग या मुख्य वापराव्यतिरिक्त सौंदर्यप्रसाधनांमध्ये आणि वैद्यकीय उत्पादनांमध्ये तिळाचं तेल महत्त्वाचा घटक म्हणून वापरलं जातं. तिळापासून निघणाऱ्या तेलात सेसमॉल नावाचा घटक असतो. हा महत्त्वाचा 'ऍंटी ऑॅक्सिडंट' समजला जातो. तिळाच्या तेलात तळलेले अथवा तेलापासून बनवलेले पदार्थ दीर्घकाळ टिकतात. जशी दाण्यातून तेल काढल्यावर उरलेली पेंड उपयोगी समजली जाते, तसंच तिळाचं तेल काढल्यावर उरलेल्या तीळभुश्याला 'सेसम मील' म्हणून ओळखलं जात. दुभत्या जनावरांसाठी आणि पोल्ट्रीतल्या प्राण्यांसाठी हे सेसम मील उत्तम खाद्य समजलं जातं. साल काढून गुळगुळीत केलेल्या तिळापेक्षा साल असलेले भरड तीळ खाण्याकडे, हल्ली आरोग्याच्या बाबतीत जागरूक होत चाललेल्या लोकांचा कल वाढत चालला आहे. लहानपणी अलीबाबा आणि चाळीस चोर या कथेतून 'तिळा तिळा दार उघड' म्हटल्यावर संपत्तीने भरलेल्या गुहेचं दार उघडणारा तीळ नियमित वापरात आणून आरोग्याच्या गुहेचं दार उघडायला हरकत नाही. 

roopaliparkhe@gmail.com

 

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग
like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/