उत्खनन महर्षी डॉ. मधुकर ढवळीकर

विवेक मराठी    28-Mar-2018
Total Views |

 'गाथा ऋषिमुनींची' या सदरातील दुसरे मानकरी आहेत पुण्याचे डॉ. मधुकर ढवळीकर. उत्खननशास्त्रातील आपल्या देशातलं हे एक मोठं नाव. अतुलनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवले गेलेल्या डॉ. ढवळीकर यांच्या नावावर अनेक महत्त्वाची उत्खननं, तसंच पुरातत्त्वशास्त्राशी निगडित इंग्रजी आणि मराठीतील विपुल ग्रंथसंपदा, आणि विविध परिषदांमध्ये सादर केलेले शोधनिबंध जमा आहेत.

दक्षिण आशियात ज्याचं अतिशय आदराने नाव घेतलं जातं, असा हा डेक्कन कॉलेजचा पुरातत्त्व विभाग. या कॉलेजमध्ये आधी प्रपाठक म्हणून, नंतर याच कॉलेजचे सहसंचालक आणि निवृत्तीच्या आधी काही वर्षं संचालक म्हणून डॉ. ढवळीकर यांनी पदभार सांभाळला. या क्षेत्रातले त्यांचे गुरू प्रा.एच.डी.सांकलिया यांनी उभारलेल्या या विद्याशाखेची कीर्ती त्यांच्या कार्यकालात आणखी दूरवर पसरली. या कामाविषयी, त्यांनी केलेल्या उत्खननाविषयी, तसंच संशोधनपर लेखनाविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

  हाण्या माणसाने ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये, असं म्हणतात. पण कधीकधी हा वेडेपणा करावासा वाटतो. विशेषतः जेव्हा इतिहास, भूगोल आणि या विषयांशी निगडित विद्याशाखांविषयी आपल्याकडे सार्वकालिक आणि सार्वत्रिक उदासीनता असताना काही मोजकीच माणसं या शाखांसाठी आपलं आयुष्य देतात, तेव्हा त्यांच्या या मार्गनिवडीचं मूळ कशात आहे, ते शोधावंसं वाटतं. अशी कोणती घटना, व्यक्ती किंवा आवड त्यांना या मार्गावर जाण्यासाठी उद्युक्त करत असावी? एका विशिष्ट परिघाबाहेरचे लोक जेव्हा यात फारसा रस घेत नाहीत, तेव्हा कुठली गोष्ट या मोजक्याच मंडळींना आयुष्यभर या विषयाशी आनंदाने बांधून ठेवत असेल? ...मनातल्या या प्रश्नांमुळेच या ऋषींचं कूळ शोधावंसं वाटलं.

डॉ. ढवळीकर आर्किऑलॉजीकडे वळले ते अपघातानेच. मुळातले फर्ग्युसन कॉलेजचे इकॉनॉमिक्सचे ते विद्यार्थी. शिक्षण चालू असतानाच, लायब्ररियनच्या एका छोटयाशा कोर्सनंतर अर्थार्जनाची गरज म्हणून गोखले इन्स्टिटयूटच्या ग्रंथालयात नोकरी स्वीकारली होती. ही लायब्ररी अतिशय समृध्द होती. आर्किऑलॉजिकल सर्व्हेऑफ इंडियामध्ये त्या वेळी सुपरिटेंडेंट म्हणून आलेले कृष्णस्वामी या लायब्ररीत येत असत. ते ढवळीकर यांच्या कामावर खूश होते. एकदा त्यांना हवे असलेले काही महत्त्वाचे संदर्भ मिळवून दिल्यावर त्यांनी आपुलकीने चौकशी केली. त्या नोकरीत दरमहा 95 रुपये मिळतात, हे ऐकल्यावर कृष्णस्वामी यांनी ढवळीकरांना आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या लायब्ररीत येण्याची ऑफर दिली. पगार इथल्याहून खूपच जास्त - दरमहा 250 रुपये. वास्तविक या पोस्टसाठी आवश्यक पदवीही ढवळीकरांजवळ नव्हती. पण कृष्णस्वामी यांचा त्यांच्यावर इतका लोभ लोभ जडला होता की त्यांनी लायब्ररियनचा सर्टिफिकेट कोर्स आणि गोखलेतला अनुभव यावर ढवळीकरांना सरकारी नोकरीत रुजू करून घेतलं. काही महिन्यातच पुण्यातलं कार्यालय अजंठा, वेरुळकरता म्हणून औरंगाबादला हललं. स्वाभाविकच ढवळीकरही तिकडे गेले. तोवर त्यांचं इकॉनॉमिक्समधून बी.ए.ही पूर्ण झालं होतं. नोकरीचं गाव बदललं आणि ढवळीकरांच्या आयुष्याची दिशाही!

औरंगाबादला गेल्यावर काही महिन्यांनी त्यांना अनपेक्षितपणे उत्खननाला जायची संधी मिळाली. उत्खननासाठी जात असलेले असिस्टंट सुपरिटेंडेंट थापर यांना कृष्णस्वामींनी ढवळीकरांना बरोबर घेऊन जायला सांगितलं. अगदी अनपेक्षितरीत्या वेगळया दिशेने सुरू झालेल्या आयुष्याच्या प्रवासातल्या पहिल्याच आश्चर्यकारक वळणाविषयी बोलताना डॉ. ढवळीकर म्हणाले, ''कृष्णस्वामी म्हणाले, इथे लायब्ररीत बसू नको. यांच्याबरोबर जा. उत्खननात काय मजा असते ती बघ. खरं तर कृष्णस्वामींना ऑफिसमधले सगळे वचकून असत. पण त्यांचा माझ्यावर खूप जीव होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी या विषयात रस घेऊ लागलो. नंतर मला त्यात इतकी गोडी निर्माण झाली की काही वर्षांनी मी पुणे विद्यापीठातून आर्किऑलॉजी या विषयात बाहेरून एम.ए. केलं आणि या परीक्षेत विद्यापीठात पहिला आलो.''

परीक्षेतल्या या घवघवीत यशाने तर ढवळीकर यांच्या करिअरची दिशाच बदलली. कृष्णस्वामी यांच्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या देशपांडे यांनीही त्यांना प्रोत्साहन दिलं, पुरातत्त्वशास्त्राविषयी रुची निर्माण केली आणि त्यांच्या सहवासात ती अतिशय नैसर्गिकपणे विकसितही झाली.

अशा रीतीने लायब्ररीत रुजू झालेले मधुकर ढवळीकर पुरातत्त्व विभागात काम करू लागले. इतकंच नव्हे, तर पुढे जाऊन उत्खननशास्त्रातले गाढे संशोधक म्हणून मान्यता पावले.

एम.ए.च्या परीक्षेतील यशामुळे प्रोफेसरडॉ. एच.डी. सांकलिया यांच्यासारख्या ऋषितुल्य माणसाशी ढवळीकरांचा परिचय झाला. त्यानंतर त्यांच्याच आग्रहामुळे लगेच पीएच.डी.साठीही ऍडमिशन घेतली. विषय होता - अजिंठयाचा सांस्कृतिक अभ्यास. पीएच.डी. करताना नोकरीत अडथळा येऊ नये यासाठी औरंगाबादला राहून अभ्यास करायची त्यांना परवानगी मिळाली. हा प्रबंध इतका दर्जेदार होता की पुणे विद्यापीठाने तो लगेच प्रकाशितही केला.

याच दरम्यान, आर्किऑलॉजीचं मुख्यालय असलेल्या दिल्लीला ढवळीकरांची बदली झाली. योगायोग असा की त्याच वेळी कृष्णस्वामी तिथे डेप्युटी डायरेक्टर जनरल होते. त्यामुळे पुन्हा उत्खननाच्या बऱ्याच संधी चालून आल्या. इथे असतानाच, अलेक्झांडरच्या राजधानीचं उत्खनन करण्यासाठी ते ग्रीसला गेले. खूप काही पाहायला आणि भरपूर शिकायला वाव देणारी अशी ती एक सुवर्णसंधी होती.

मुक्काम पोस्ट डेक्कन कॉलेज व्हाया नागपूर

औरंगाबाद-दिल्ली इथे मुक्काम करून जवळजवळ बारा वर्षांनी ढवळीकर पुण्यात परतले. दरम्यानच्या काळात एक-दीड वर्ष ते मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर होते. बारा वर्षांनी क्लास वन ऑफिसरची - सुपरिटेंडेंटची पोस्ट निघाली. मात्र अर्ज करूनही त्यांना इंटरव्ह्यूला बोलावलं गेलं नाही. डायरेक्टर जनरल बंगाली बाबू असल्याने, त्यांना त्या जागेवर फक्त बंगाली माणसाचीच वर्णी लावायची होती. या प्रसंगानंतर तिथे न थांबण्याचा सल्ला घेतला आणि नागपूर विद्यापीठाची जाहिरात वाचून तिथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. या विद्यापीठातील दोन वर्षांच्या काळात पवनारला उत्खनन केलं.

त्यानंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये असलेल्या आर्किऑलॉजी विभागात अध्यापनाची संधी चालून आली आणि सांकलियांसारख्या ऋषितुल्य गुरूबरोबर त्यांच्या आयुष्यातलं नवं पर्व सुरू झालं. अतिशय नेमक्या शब्दांत आपल्या गुरूचं वेगळेपण सांगताना डॉ. ढवळीकर म्हणाले, ''मी या क्षेत्रात जे काही थोडंफार केलं, ते त्यांच्यामुळेच! सांकलिया गुजराथी असल्याने विद्वत्तेला व्यवहारचातुर्याची जोड होती. आणि अन्य विद्वानांपेक्षा त्यांचं हेच वेगळेपण होतं.''

उत्खननपर्व

उत्खनन हा डॉ. ढवळीकरांच्या विशेष आवडीचा विषय. पुण्याला आल्यावर त्यांनी उज्जैनजवळच्या प्राचीन स्थळाचं उत्खनन केलं आणि त्यानंतर उत्खननाची मालिकाच सुरू झाली. एका वर्षात एक/दोन साईट्स तरी उत्खननासाठी असायच्या. वर्षातले हिवाळयाचे चार महिने उत्खननासाठी योग्य समजले जातात, उरलेले आठ महिने अध्यापन तर असतंच, आणि उन्हाळा-पावसाळयात ते शक्यही नसतं.

उत्खननासाठी साईट शोधायची कशी, काय असते त्याची प्रक्रिया, याची आपल्यासारख्या सर्वसामान्यांना काही कल्पना नसते. माणसाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधण्याचा वसा घेतलले डॉ. ढवळीकर याविषयी माहिती देताना म्हणाले, ''माणूस पूर्वापार पाण्याची सोय बघून वस्ती करत आला आहे. म्हणूनच नदीकिनारी मानवी वस्ती आणि संस्कृती यांचा हातात हात घालून प्रवास झाल्याचं आपल्याला दिसतं. नदीला पूर आला की वस्ती नामशेष होते. त्यावर मातीचा थर साठतो. कालांतराने पुन्हा तिथे मानवी वस्ती होते. पुन्हा काही काळाने पूर. ही प्रक्रिया चालूच राहते. अगदी शेवटचे जेव्हा लोक वस्ती सोडून जातात, तेव्हा सगळं उजाड होतं. नंतर होणाऱ्या पावसाने मग घळया पडतात. त्यामुळे तिथल्या मातीत जे काही वर्षानुवर्ष लपलेलं असतं, ते बाहेर येतं आणि ते इतिहासाचा मागोवा घ्यायला मदत करतं.

उत्खननातली सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सापडणारी खापरं. त्या भागातली वस्तीचा काळ कोणता, याचं खापरावरून अनुमान करता येतं. खापराचं टेक्श्चर, आकार खूप काही सांगतं, म्हणून तर खापरीला 'अल्फाबेट ऑफ आर्किऑलॉजी' असं म्हटलं जातं. त्याशिवाय त्या त्या काळातले मणी सापडतात, नाणी असतात. पण अगदी मागच्या काळात जेव्हा नाणी नव्हती, लेखही उपलब्ध नव्हते, अशा वेळी मिळणारी खापरं हा एकमेव आधार असतो.''

इनामगावाची उलगडलेली गोष्ट

इनामगावाचं उत्खनन हे डॉ. ढवळीकरांच्या कारकिर्दीचा मानबिंदू ठरलेलं काम. इनामगाव हे पुण्यात शिरूरजवळ असलेलं एक छोटं गाव. त्या गावातले काही लोक एकदा डेक्कन कॉलेजमध्ये आले. त्यांच्याजवळ खापराचे काही तुकडे होते. ''हे आमच्या गावात खूप मिळताहेत, एकदा तुम्ही बघायला या'' असं निमंत्रण दिलं.
डॉ. सांकलियांनी डॉ. ढवळीकरांवर ही जबाबदारी सोपवली. तिथून पुढची सलग तेरा वर्षं ते याच कामात गुंतलेले होते. हजारो वर्षांपूर्वी काळाच्या उदरात गडप झालेल्या मानवी वस्तीचा शोध लावायचा आणि एका संगतीने त्यांच्या विकासक्रमाचे टप्पे उलगडून दाखवायचे, तेही वर्षानुवर्षं अथक परिश्रम घेऊन... खायचं काम नाही हे! त्या उत्खननाविषयी ऐकताना एखादी अद्भुत कथा ऐकल्यासारखं वाटतं. ''ती जी साईट होती, तिथे साधारणपणे चार हजार वर्षांपूर्वी लोक राहायला आले आणि तीन हजार वर्षांपूर्वी निघून गेले. म्हणजे 1000 वर्र्षं तिथे वस्ती होती. त्यानंतर तो भाग उजाड झाला.''

उत्खननाचं काम हे एखाद्या शल्यविशारदाच्या कौशल्याने करावं लागतं. त्याच्या साधनांमध्ये डेंटिस्ट वापरतात त्या उपकरणांचा अंतर्भाव असतो. सांगायचा मुद्दा, इतक्या हळुवारपणे आणि चिवटपणे करण्याचं हे काम आहे. डॉ. ढवळीकर म्हणाले, ''पहिल्या 8/10 दिवसांच्या कामानंतर मातीचा रंग बदलायला लागला. ब्रशिंग करत गेलो, तसं अर्धवर्तुळाकृती आकार लक्षात आला. हे अर्धवर्तुळ का असावं, असा विचार करत काम चालू ठेवलं. गोल आकाराची घरं असतील, हे तोपर्यंत लक्षात आलं नव्हतं. गोल घरात राहण्यामागची कारणं काय असावीत? ज्या भागात पाऊसमान खूप कमी असतं, त्या भागात वारे खूप वाहतात, या वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी गोल घरं बांधली जातात.

एकत्र 3/4 झोपडया अशी तिथे रचना होती. या 3/4 घरांमध्ये चूल मात्र एकाच ठिकाणी होती. स्त्रियांची झोपडी वेगळी असे. पुरुषाने नवीन लग्न केलं तर त्या नव्या नवरीसाठी वेगळी झोपडी असे. पहिलं घर सापडल्यानंतर एकामागून एक घरं सापडत गेली.''

उत्खननाच्या पहिल्या वर्षात 35/40 घरं सापडल्यावर सांकलिया खूप खूश झाले. मात्र काम सुरू ठेवण्यासाठी निधीचा प्रश्न होता. त्याच दरम्यान, अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या एका जर्नलमध्ये या उत्खननासंदर्भातले एक-दोन लेख प्रकाशित झाले, आणि तिथल्या अभ्यासकांच्या नजरा इकडे वळल्या. साईट पाहण्यासाठी न्यूयॉर्क विद्यापीठातले प्रोफेसरआले. त्यांनी या विषयातलं पोटेन्शियल ओळखलं होतं. ते म्हणाले, ''तुमचा पैशाचा प्रश्न आम्ही सोडवू. आपण हे उत्खनन करू.'' सांकलियांनी त्यांना त्यासाठी सरकारकडून, यू.जी.सी.कडून परवानगी आणायला सांगितली. ते अमेरिकन प्राध्यापक यू.जी.सी.कडे गेल्यावर तिथले सेक्रेटरी शंकरनारायणन यांनी सांकलियांना फोन केला. म्हणाले, ''तुम्हाला कशाला हे अमेरिकन पाहिजेत? तुम्ही तुमचं प्रोजेक्ट मला समजावून सांगा, फंडिंगची व्यवस्था करता येईल.'' या दिलासादायक आश्वासनानंतर सांकलिया डॉ. ढवळीकरांना घेऊन दिल्लीला गेले. प्रोजेक्ट सादर केला, दर वर्षी या कामासाठी 1 लाखाची गरज आहे असं प्रोजेक्टमध्ये म्हटलं होतं. ''आमच्याकडची साधनं त्या वेळी इतकी तुटपुंजी होती की साईटच्या ठिकाणी उभारण्यासाठी चांगल्या दर्जाचे तंबूही नव्हते. आम्ही आपापलं ताट, वाटी, भांडंही घरून न्यायचो. आश्चर्य म्हणजे, त्यांनी पूर्ण पाच वर्षांचा निधी मंजूर केला आणि आमची चिंता मिटली. इनामगावच्या उत्खननाने पुन्हा एकदा वेग घेतला.''

या उत्खननाचं वैशिष्टय असं की नुसती लपलेली घरं शोधून काढली असं नव्हे, तर त्या वेळची लिखित साधनंही उपलब्ध नसताना तेव्हा समाजरचना कशी होती, आर्थिक परिस्थिती कशी होती, लोक धान्य कोणतं पिकवत होते, त्या धान्याचे वाण कोणते, त्या वेळी रोग कोणते होत असत, माणूस मेल्यावर पुरत असत की जाळत असत, अशा वेगवेगळया मुद्दयांवर अभ्यास करण्यात आला.

आर्किऑलॉजी या विषयात डेक्कन कॉलेजचा जो दबदबा आहे, त्यामागे सांकलियांचं मोठं योगदान आहे. त्यांच्याविषयी सांगताना
डॉ. ढवळीकर म्हणाले, ''सांकलिया हे दूरदृष्टी असलेले विद्वान पंडित होते. आर्किऑलॉजीतील संशोधन परिपूर्ण व्हावं यासाठी आवश्यक अशा विविध विद्याशाखेतल्या लोकांची त्यांनी कॉलेजमध्ये नेमणूक केली. अतिशय अद्ययावत प्रयोगशाळा उभारली. त्यामुळे उत्खननात सापडलेल्या धान्यांचं वाण ओळखणं, ती कोणत्या काळात लावली जातात, त्या वेळची पीक पध्दती या सगळयाचा अभ्यास केला गेला.

अगदी खालच्या थरात सापडलेल्या धान्यावरून लक्षात आलं की त्या काळातले लोक बार्ली पिकवत होते, तर दुसऱ्या थरात पीक बदललं. हा बदल खापरावरून लक्षात येतो. खापरांचे आकार बदलतात, त्यांच्यावरचं नक्षीकाम बदलतं. हे सांस्कृतिक बदलाचे निदर्शक असतात. दुसऱ्या थरात गहू लागले. त्या वेळी महाराष्ट्र हा काही गहू पिकवणारा प्रदेश नव्हता, मग गहू कसे सापडले? याचा विचार सुरू झाला. जिथे सिंचनाची सोय उपलब्ध आहे, तिथेच गहू होऊ शकतो. मग या लोकांनी गहू कसा पिकवला असेल? याचा विचार करायला लागलो. त्यांनी सिंचनाची पध्दत शोधलेली असली पाहिजे. ती शोधायला लागलो आणि तो शोध घेत असताना बंधाऱ्यासारखी बांधलेली एक संपूर्ण भिंत सापडली. त्याच्याशेजारी खणलेला एक कालवा (कॅनॉल) आणि नदीचं पाणी त्यांनी वळवलं होतं. ते साठवण्यासाठी त्यांनी एक टाकी केली होती. या पाण्यावर त्यांनी गहू पिकवला होता.''

या विषयाच्या अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी इनामगाव म्हणजे अक्षरश: अलिबाबाची गुहा होती. फक्त भारतातूनच नाही, तर परदेशातूनही मुलं शिकायला यायची.

इनामगावाची उत्खननकथा सांगताना डॉ. ढवळीकर पुढे म्हणाले, ''जळक्या स्वरूपातलं रोज किलोने धान्य मिळत होतं. पूर्वीच्या काळी गिरण्या नव्हत्या, पीठ करण्यासाठीही पाटे-वरवंटेच असत. त्यामुळे धान्य टिकवण्यासाठी त्यातला पाण्याचा अंश काढण्याकरता ते भाजून ठेवायची पध्दत होती. ते भाजताना काही जे जळले असतील, ते त्यांनी टाकून दिले, ते उत्खननात मिळाले. थोडा तांदूळ सापडला, समुद्रातले मासे सापडले, कडवे वाल सापडले. इथल्या लोकांची कल्याणपर्यंत देवाणघेवाण होत होती. मारलेल्या एका बैलापैकी निम्मा एका घरात तर निम्मा दुसऱ्या घरात सापडला. म्हणजे ते एकमेकांचे नातेवाईक असावेत असा कयास केला. एवढंच नाही, प्रत्येक घरात मिळालेल्या हाडांच्या अवशेषांच्या पृथक्करणावरून तो माणूस मांसाहारी होता की शाकाहारी, हेही ताडता आलं.

त्यांच्या आर्थिक स्थितीचाही अंदाज बांधता आला. आधी त्यांची तटबंदी असलेली मोठाली घरं होती. ऍन्थ्रोपॉलॉजीमध्ये म्हणजे मानववंशशास्त्रात असं संशोधन आहे की ज्या वेळी सिंचनाची अशी कृत्रिम पध्दत अवलंबली जाते, तेव्हा त्या समूहाचा एक मुखिया असतो. पाण्याचं न्याय्य वाटप करण्यासाठी, हिंस्र श्वापदांपासून समूहातल्या सदस्यांचं संरक्षण करण्यासाठी कोणा एकाकडे पुढारीपण असणं गरजेचं होतं. म्हणून मग त्यांच्या पुढाऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तोही सापडला. सगळी घरं एकेका खोलीची आणि एकच घर पाच खोल्यांचं सापडलं. तेव्हा या वस्तीत मुखिया होता, हे पक्कं झालं.

त्या वेळी मेल्यानंतर माणसं पुरण्याची पध्दत होती. मात्र पुरताना घोटयाखालचा भाग कापून टाकायचे. का? तर त्या माणसाचं भूत होऊ नये म्हणून! चार हजार वर्षांपूर्वीचे असे 130 सांगाडे सापडले. त्या वेळचे आजारही शोधून काढता आले. असं लक्षात आलं की यातली बरीचशी माणसं मलेरियाने गेली आहेत.

तिसऱ्या कालखंडामध्ये घरं लहान झाल्याचं लक्षात आलं. गहू पिकवणं बंद झालं होतं आणि ज्वारी जास्त मिळायला लागली. हरणाची हाडं जास्त सापडायला लागली. आधी किलोकिलोने सापडलेलं धान्य नंतर थोडं थोडं मिळायला लागलं. तो म्हणजे, तीन हजार वर्षांपूर्वी जेव्हा जगात सारखे दुष्काळ पडायला लागले, तो कालखंड होता. जगात सगळीकडेच ती स्थिती होती. त्यामुळे लोक हरणाच्या शिकारीवर जास्त अवलंबून राहायला लागले. हरणाचं मांस जास्त टिकतं, म्हणून त्याचं मांस. असा इतका परिपूर्ण अभ्यास आजपर्यंत भारतातल्या कोणत्याही साईटवर झालेला नव्हता, म्हणूनच हे उत्खनन-संशोधन भारतभरात, अगदी परदेशातही गाजलं. त्या काळात उत्खनन पाहण्यासाठी रोज पुण्याहून खास एक एस.टी. जायची. शाळा विद्यार्थ्यांना घेऊन जायच्या.''

हे उत्खनन इतकं प्रसिध्द झालं की, अमेरिकेतही इनामगावच्या या उत्खननावर आर्किऑलॉजीच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जायचे. याच कामावर 'फर्स्ट फार्मर्स ऑफ डेक्कन' हे पुस्तकही प्रकाशित झालं.

या महत्त्वपूर्ण कामासाठी डॉ. ढवळीकरांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरव करण्यात आला. पण वाईट याचं वाटतं की, आज मात्र त्या साईटच्या ठिकाणी या महत्त्वपूर्ण उत्खननाच्या काही खाणाखुणा नाहीत. शासनाचं औदासीन्य, दुसरं काय?

क्षेत्रपाळाच्या मूर्तीचा शोध

क्षेत्रपाळाच्या मूर्तीचा शोध हा डॉ. ढवळीकरांना लागलेला एक महत्त्वपूर्ण शोध. याविषयी ते म्हणाले, ''क्षेत्रपाळ म्हणजे शेताचा रक्षक. नांदेडमधलं कंधार हे ठिकाण म्हणजे राष्ट्रकूटांची राजधानी होती. राष्ट्रकूटांचा शेवटचा राजा, कृष्ण तिसरा याचा एक शिलालेख तिथे सापडला. त्या शिलालेखात गावाचं वर्णन आहे. गावातलं मंदिर अमुक दिशेला आहे, मदनाची बाग म्हणजे गावातल्या तरुण जोडप्यांसाठीची बाग, मोठा तलाव गावाच्या मध्यभागी आहे, क्षेत्रपाल भैरवाचं मंदिर गावाच्या अमुक दिशेला आहे... असं सगळं वर्णन त्यात होतं. आजही त्याच्या खुणा दिसतात. तिथल्या किल्ल्यावर आम्ही गेलो, तेव्हा मला एका पुतळयाचा पाय-पाऊल सापडलं, तेच पाच फूट उंचीचं होतं. थोडया अंतरावर कान सापडला, तो दीड फूट लांबीचा. हे आहेत तरी कोणत्या मूर्तीचे अवशेष, म्हणून शोध घेऊ लागलो. तिथून पुढे दोन मैलावर असलेल्या शेतात हे अवशेष सापडतात असं गावकऱ्यांनी सांगितलं म्हणून शोधत गेलो. त्या शिलालेखात क्षेत्रपाळाच्या मंदिराचं जे स्थान म्हटलं होतं, त्याच जागी हे शेत होतं. आम्ही खणत गेलो, तर घडीव दगडाला माणसाचा आकार दिलेला जवळजवळ 55 फूट उंचीचा क्षेत्रपाळ सापडला.'' ही एक महत्त्वाची उपलब्धी होती.

सिंधुसंस्कृतीतील औद्योगिक केंद्र

त्यानंतर डॉ. ढवळीकरांना वेध लागले ते सिंधुसंस्कृतीतील हडप्पन साईटचं उत्खनन करण्याचे. (आतापर्यंत सिंधुसंस्कृतीच्या 2000 साईटस् सापडल्या आहेत, त्यातल्या 1500 भारतात तर 500 पाकिस्तानात आहेत.) आणि ती इच्छाही पूर्ण झाली.

या उत्खननाविषयी सांगताना डॉ. ढवळीकर म्हणाले, ''उत्खननशास्त्रातील नव्या माहितीच्या आधारे मला सिंधुसंस्कृतीच्या हडप्पन साईटचं उत्खनन करण्याची इच्छा होती. चितळवाला नावाच्या माझ्या विद्यार्थ्याने गुजरातमध्ये मोरवीजवळ कुंतासी इथं छोटी एक-दीड एकराची साइट शोधली होती. त्याने मला पाहायला बोलावलं. संपूर्ण स्ट्रक्चर दगडी होतं. खापरं सापडली, ती सिंधुसंस्कृतीतली वाटत होती, म्हणून आम्ही उत्खनन करायचं ठरवलं. उत्खननानंतर ते पाच हजार वर्षापूर्वीचं औद्योगिक केंद्र निघालं. उत्पादन केंद्र होतं ते. तिथे मणी तयार करायचे. सिंधुसंस्कृती ही अतिशय प्रगत संस्कृती होती. सिंधुसंस्कृतीतील साईटवर सापडणाऱ्या विटांचा आकार हा सगळीकडे एकच असायचा. ती एक महत्त्वाची खूणच आहे म्हणा ना! त्या विटांचा आकार जर 40 से.मी. X 20 से.मी. X 10 से.मी. असेल, तर निश्चितपणे त्या सिंधुसंस्कृतीकालीन असतात. तसंच खापराच्या भांडयांचा विशिष्ट घाट असतो. त्या काळात मेजरमेंटची निश्चिती पक्की दिसते. भिंत 70 सेमीची म्हणजे तेवढीच आढळणार. कोणत्याही भागातल्या सिंधुसंस्कृती साईटचं उत्खनन केलं तरी या गोष्टी हमखास आढळायच्या.''

नाणकशास्त्र - इतिहासावर प्रकाश टाकणारं शास्त्र

नाणकशास्त्र हा डॉ. ढवळीकरांचा आणखी एक जिव्हाळयाचा विषय. त्याविषयी बोलताना ते महणाले, ''World Archeology नावाच्या इंग्लंडहून प्रकाशित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकासाठी मी Origin of Coinage in India या शीर्षकाचा निबंध लिहिला. नाण्यांच्या मदतीने विनिमयाला सुरुवात कशी झाली, नाणी पाडण्यामागचा हेतू काय, आपल्याकडे पैसाकेंद्री अर्थव्यवस्था होती का, याचा ऊहापोह त्यात केला होता.

गुप्त राजांची तर फक्त सोन्याची नाणी होती. त्यांनी जर फक्त सोन्याची नाणी पाडली असतील, त्यांच्या राज्यातला शेतकरी बाजारात काय रोज सोन्याची नाणी घेऊन जात असेल का? असा मी विचार करू लागलो. आणि म्हणून मी त्या निबंधात असं मत मांडलं की पूर्वीच्या काळातली बरीचशी नाणी ही Commemorative Medals आहेत. स्मरणार्थ किंवा गौरवार्थ काढलेली नाणी. त्यामुळे ती विपुल प्रमाणात उपलब्ध नसत.

त्याआधी कुशाणांची सोन्याची, चांदीची तसंच तांब्याचीही नाणी होती. नाण्यांचा चलनात वापर हा आपल्याकडे इराणमधून आला आहे.

नाण्यावर जे लेख असतात, त्यावरून तुम्हाला त्यांची सबंध वंशावळ काढता येते. नाण्यांवरून त्या काळातल्या आर्थिक स्थितीचा अंदाज येऊ शकतो. समजा, सोन्याचं नाणं असेल तर त्यात आणखी कोणत्या धातूंचं मिश्रण आहे, ते काढता येतं. काही नाणी त्या वेळच्या आदिवासी जमातींशी संबंधित आहेत. नाण्यांवर कोरलेल्या देवदेवतांवरून त्या काळातल्या श्रध्दांविषयी अंदाज करता येतो.

एकदा गुप्तांचा कालखंड संपला की मग मधल्या काळात मुसलमान येईपर्यंत नाणीच सापडत नाहीत. काही मोजक्या राजांनी नाणी काढली, पण अगदी मर्यादित. लोखंडाचं नाणं आणि त्यावर पितळयाचा पत्रा लावलेला. नंतरची इथली आर्थिक स्थिती खूप खालावलेली होती.''

ग्रंथसंपदा - पुढील पिढयांसाठी अनमोल ठेवा

उत्खनन-संशोधन, नाणकशास्त्रातील संशोधन याबरोबरच अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर डॉ. ढवळीकरांनी ग्रंथलेखन केलं आहे. 'महाराष्ट्राची कुळकथा', 'श्री गणेश - आशियाचे आराध्य दैवत', 'पर्यावरण आणि संस्कृती', 'आर्यांच्या शोधात' ही त्यातली वानगीदाखल काही उदाहरणं. पैकी, हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्र कसा होता, इथल्या लोकांचं जीवनपध्दती कशी होती याविषयी महाराष्ट्रातल्या वेगवेगळया ठिकाणी केलेल्या उत्खननाच्या आधारे लिहिलेल्या 'महाराष्ट्राची कुळकथा' या पुस्तकाला शासनाचा एक लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. बदलत्या पर्यावरणाचा संस्कृतीवर कसा परिणाम होत असतो याचं विवेचन करणारं, त्यांच्यातला परस्परसंबंध उलगडून दाखवणारं 'पर्यावरण आणि संस्कृती' हे पुस्तक, गणपती या आराध्यदैवताची पाळंमुळं आशिया खंडात कशी पसरली आहेत याविषयी माहिती देणारं पुस्तक... अतिशय सोप्या आणि ओघवत्या मराठी भाषेत लिहिलेली ही सगळीच पुस्तकं त्यांच्यातल्या साक्षेपी संशोधकाची झलक दाखवणारी आहेत. याशिवाय इंग्रजीतही त्यांच्या नावावर विपुल ग्रंथसंपदा आहे.

'आर्यांच्या शोधात' हे त्यांचं असंच एक इंटरेस्टिंग पुस्तक. त्यामुळे आर्य-अनार्य या जुन्यापुराण्या वादावर त्यांच्याकडून शंकासमाधान करून घेणं ओघानं आलंच. ते म्हणाले, ''खरं तर आता हा मूळचा इथला की बाहेरून आलेला, या वादाला काही अर्थच उरलेला नाही. कारण मानववंशशास्त्रातील डी.एन.ए.च्या एका संशोधनानंतर असं सिध्द झालंय की, जगातली सगळी प्रजा अगदी अमेरिकेपासून पार ऑस्ट्रेलियापर्यंतची, ट्रायबल्स, निग्रो सगळे धरून ही एका निग्रो आईची मुलं आहेत. तंजावरमधल्या राममूर्ती नावाच्या माणसामध्ये त्या बाईचा डी.एन.ए. सापडला. ती 70/80 हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून निघाली, टांघानिका इथून... म्हणजे ते लोक निघाले, त्यांची ही सगळी प्रजा आहे. मग असा प्रश्न विचारण्यात येतो की, ही सगळी जर एका निग्रो आईची मुलं असतील तर काही लोक गोरे का, काही काळे, असं का? तर याचं शास्त्रशुध्द उत्तर एकच... ते म्हणजे पर्यावरणाचा परिणाम. मराठी माणसाची अमेरिकेत वाढणारी तिसरी पिढी इथल्या त्याच्या नातेवाइकांपेक्षा गोरी दिसतेच ना? त्यामागेही तेच कारण आहे. चिनी, जपानी लोकांच्या डोळयांच्या अशा फटी का? तर तिथे थंडी, वारा फार जोरात असतो, म्हणून.''

टागोर फेलोशिपसाठी नवं संशोधन, नव्या उत्साहात

वयाच्या मर्यादांनी बांधलेली असतात ती तुमच्या-आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं. डॉ. ढवळीकरांसारख्या व्यक्तींना वाढतं वय हा अडथळा नसतो. (आज 83व्या वर्षी अगदी नियमितपणे ते पोहायला जातात, यात सगळं आलंच!) 80व्या वर्षी मिळालेल्या टागोर फेलोशिपसाठी डॉ. ढवळीकरांनी Cultural heritage of Mumbai हा विषय निवडला आणि दिलेल्या मुदतीत आपला प्रबंध सादर करणारे ते एकमेव होते, हे विशेष! कोणतंही कारण सांगून त्यांना मुदतवाढ घ्यावी लागली नाही. या संशोधनात त्यांनी प्रागैतिहासिक काळापासून बाराव्या शतकापर्यंतच्या मुंबईचा इथल्या लेण्यांच्या तसंच इतर अवशेषांच्या आधारे सांस्कृतिक इतिहास उलगडायचा प्रयत्न केला आहे.

आपल्या ध्यासविषयासाठी झपाटून काम केलं की त्या कामातूनच समाजऋण आपोआप फेडलं जातं. मग ते फेडण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही, हे डॉ. ढवळीकरांच्या भेटीतून मला उमगलं. अतिशय उत्साहात वर्तमानात जगणाऱ्या आणि झपाटून जाऊन इतिहासाचा शोध घेणाऱ्या अशा व्यक्तीला भेटलं, त्यांचा इथवरचा प्रवास समजून घेतला की नकळत आपल्यालाही त्या उत्साहाची लागण होते. कसं आणि का जगायचं? याची उत्तरं मिळून जातात.

9594961865