बचत आणि गुंतवणूक

विवेक मराठी    29-Mar-2018
Total Views |

आपल्या नियमित उत्पन्नातून नियमित खर्च वजा जाता जी शिल्लक राहते, तिचा योग्य तो विनिमय करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. हातात चार पैसे खुळखुळले की ते लगेच खर्च करून टाकण्याची अनेक जणांना ऊर्मी येते. मग आपल्याला अनेक दिवस घ्यावासा वाटणारा एकदम भारीचा मोबाइल घेऊन टाकला जातो किंवा आवश्यकता नसलेल्या जीवनशैलीविषयक गोष्टींवर पैसे खर्च केले जाऊ शकतात.

 मुळात आपल्या हातात नियमित शिल्लक राहील हे बघणं आणि त्या शिलकीतून सातत्याने बचत आणि गुंतवणूक करत राहणं हे आपल्याच जीवनशैलीसाठी दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचं असतं.

 अडीअडचणीला पटकन वापरता येतील यासाठी बाजूला ठेवलेले पैसे म्हणजे बचत. हे रोख स्वरूपात ठेवलेले असू शकतात किंवा बँकेच्या बचत खात्यामध्ये किंवा ठेवींमध्ये ठेवलेले असू शकतात. ह्या बचतीवर अगदी नगण्य किंवा शून्य परतावा मिळत असतो. ह्याच्या मूल्यामध्ये वाढ होत नाही (उलट झालीच, तर महागाईमुळे घटच होत असते). पण कोणत्याही इमर्जन्सीच्या वेळी हे पैसे जेवढे आहेत तेवढ्या दृश्यमूल्याला (Face valueला) उपलब्ध असतात. आपल्या उत्पन्नानुसार आणि जीवनशैलीनुसार प्रत्येकाने काही हजारांपासून ते काही लाखांपर्यंतची बचत केलीच पाहिजे.

 हे काही हजार किंवा लाख रुपये एका महिन्यात जमा होत नाहीत. हे जमा करण्यासाठी शिस्तशीरपणे दर महिन्याच्या शिलकीतून काही रक्कम बाजूला ठेवत गेलं पाहिजे. बँकांच्या आवर्ती जमा योजना (recurring deposit schemes) ह्या अशा बचतीसाठी उत्तम मार्ग असतो. अगदी शे-दोनशे रुपयांपासून ते हजार-पाच हजारांपर्यंत कितीही रकमेची आवर्ती जमा करत राहता येते. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ नियमाने वर्षा-दोन वर्षांत बऱ्यापैकी रक्कम बचत म्हणून आपल्या गाठीशी येऊ शकते.

 आपली बचत किती असावी, याचं स्वतःचं एक उद्दिष्ट ठरवावं. ते किती काळामध्ये आपल्याला गाठायचं आहे हेही ठरवावं आणि शिस्तशीरपणे नियमित पैसे बाजूला ठेवत (किंवा आवर्ती ठेव योजनेत ठेवत) ते गाठावं.

 बचतीचा उद्देश पूर्ण झाला की नियमित हातात राहणाऱ्या शिलकीतून गुंतवणूक करायला सुरुवात करावी.

 जे केल्याने मूळ रकमेवर मोठ्या प्रमाणात परतावा मिळतो, त्याला गुंतवणूक म्हणतात. हा परतावा नियमित उत्पन्नाच्या रूपात मिळू शकतो किंवा गुंतवलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम परत मिळते अशा स्वरूपात मिळू शकतो.

 बचत आणि गुंतवणूक यांतला महत्त्वाचा फरक म्हणजे, बचत ही अत्यल्प किंवा शून्य परतावा गृहीत धरून केलेली असते. त्यात बचत केलेली रक्कम हाताशी असणं, मूळ रक्कम सुरक्षित असतं आणि ती हवी तेव्हा वापरता येणं अपेक्षित असतं. या उलट गुंतवणूक करताना त्यात मोठ्या प्रमाणात परतावा मिळणं अपेक्षित असतं. गुंतवलेली रक्कम सहजासहजी हाताशी उपलब्ध नसते आणि इमर्जन्सीला वापरता येतेच असं नाही.

 घर, जमीन, सोनं-चांदी, आयुर्विमा (LIC Policies), म्युचुअल फंड्स आणि शेअर्स ह्या सगळ्यांना आपण गुंतवणुकीचे प्रकार मानतो. मात्र हे सर्व प्रकार एकसारखे नसतात. (यातले काही गुंतवणूक प्रकार आहेत असं मानलंही जात नाही).

 गुंतवणुकीचे प्रकार काय असतात, त्यातले योग्य ते प्रकार कोणत्या निकषांवर निवडायचे आणि कशामध्ये गुंतवणूक करायची याचा प्राधान्यक्रम कसा ठरवायचा, याविषयी पुढच्या लेखामध्ये.

  प्रसाद शिरगावकर

facebook.com/prasad.shir