बोधिवृक्ष आणि काटेरी झुडूप

विवेक मराठी    29-Mar-2018
Total Views |

तर ठरल्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांचा मुंबईतील एल्गार मोर्चा 26 मार्च रोजी पार पडला. संभाजी भिडे गुरुजी यांना अटक करावी या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या समविचारी पक्ष-संघटनांनी मिळून हा मोर्चा काढला होता. सत्तेच्या कोणत्याही पदी नसलेल्या एका सामान्य माणसाला अटक व्हावी म्हणून ही सर्व शक्ती एकवटली होती. या मंडळींनी संभाजी भिडे गुरुजींवर भीमा कोरेगाव येथे दंगल घडवल्याचा आरोप ठेवला आणि स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी या आरोपाचा न्यायनिवाडा करून भिडे हे गुन्हेगार आहेत अशी घोषणा केली. प्रश्न असा आहे की, जर प्रकाश आंबेडकरांकडे भिडे गुरुजींविरुध्द सबळ पुरावे आहेत, तर ते पोलिसांकडे न जाता मोर्चा कशासाठी काढतात? सर्वसामान्य जनतेला आणि व्यवस्थेला वेठीस धरण्याचा का प्रयत्न करतात? 26 तारखेच्या मोर्चानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भिडे गुरुजींविरुध्द पुरावे नसल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि त्याचे समविचारी बोलभांड यांना काय हवे आहे? याचा विचार व्हायला हवा. या मंडळींना खरेच भीमा कोरेगाव घटनेबाबत दुःख वाटते की त्या घटनेचा उपयोग करून त्यांना दुसराच हेतू साध्य करून घ्यायचा आहे?

'संभाजी भिडे यांना अटक करा' ही मागणी घेऊन निघालेल्या मोर्चात अनेक संघटनांचे वक्ते बोलले. त्यांच्या भाषणाचे सूत्र होते हिंदुत्वविरोध. संभाजी भिडेंचा निषेध करत सुरू झालेली ही भाषणे हिंदुत्वाला, पर्यायाने संघाला दूषणे देऊन संपत होती. या साऱ्या भाषणांचा आढावा घेतला तरी आपल्या लक्षात येईल की या मंडळींचा मोर्चा केवळ संभाजी भिडेंच्या विरोधात नसून हिंदुत्वाच्या विरोधात आहे. सत्तेतील हिंदुत्ववादी या गणंगांचे मनसुबे पूर्ण न करण्यात अडथळा आहेत, हीच त्यांची पोटदुखी आहे. पण आज संघावर, हिंदुत्वावर थेट आरोप करण्याची हिंमत त्यांना होत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करून त्याच्या आधाराने हिंदुत्वावर आरोप करण्याचा सपाटा या मंडळींनी लावला आहे. महाराष्ट्रात आणि केंद्रात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे याचे प्रकाश आंबेडकरांना इतके दुःख झाले की ते मुख्यमंत्री, पंतप्रधान ही संवैधानिक पदेही मानायला तयार नाहीत. म्हणजे एका बाजूला संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उद्घोष करायचा आणि त्याच संविधानानुसार झालेल्या मतदानातून निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना व पंतप्रधानांना मानत नाही असे म्हणायचे, याच्यासारखा दुसरा दुटप्पीपणा पाहण्यात आला नव्हता. बरे, एवढे करूनही प्रकाश आंबेडकर थांबत नाहीत, तर ते पुढे म्हणतात की ''हिंदुत्ववाद्यांना संविधान बदलायचे आहे. त्यांनी नवीन संविधान तयार केले आहे.'' प्रकाश आंबेडकरांकडे जसे संभाजी भिडेंविरुध्द सबळ पुरावे आहेत, तसेच हिंदुत्ववाद्यांनी तयार केलेल्या संविधानाबाबतही पुरावे असतील, तर ते समाजासमोर मांडावेत. त्या पुराव्यांच्या आधाराने हिंदुत्ववाद्यांविरुध्द रान उठवावे. पण प्रकाश आंबेडकर असे करणार नाहीत. कारण त्यांचा हेतू वेगळा आहे. त्या हेतूत समाज, राष्ट्र आणि एकात्मता यांना स्थान नाही. तसे स्थान असते, तर त्यांनी बिनाआधाराचे आरोप केले नसते. आज आंबेडकरी समाज काही अंशी तरी प्रकाश आंबेडकरांबरोबर आहे, कारण भीमा कोरेगावच्या घटनेमुळे या समूहाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. प्रकाश आंबेडकर त्याचे भांडवल करण्यात यशस्वी झाले असले, तरी त्यांनी संविधानावर दाखवलेल्या अविश्वासामुळे आंबेडकरी समाज त्यांना धिक्कारू शकतो. प्रकाश आंबेडकरांना दलित समाजाचे ऐक्य नको आहे, कारण एकसंघ समाज त्यांच्या या अविचारी कृतीचे आणि विचाराचे समर्थन करणार नाही. त्यांच्यावर एकाकी पडण्याची वेळ येईल. त्यामुळे विखुरलेल्या समाजातील काही मंडळींना हाताशी धरून, त्यांची माथी भडकावून त्यांना रस्त्यावर आणण्याचे तुलनेने सोपे काम प्रकाश आंबेडकर करत आहेत.

सर्वांना बरोबर घेऊन सकारात्मक दिशेने जाणे आणि त्यातून मौन क्रांती घडवून आणणे अवघड असते. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांच्यावर गाढ श्रध्दा असावी लागते. जो संविधानाचा समर्थक असतो, तो अराजकाची भाषा करत नाही, तर संविधानाच्या माध्यमातून व्यवस्था परिवर्तनाचा आग्रह धरतो. प्रकाश आंबेडकरांनी मोर्चात प्रसारमाध्यमांशी बोलताना, ''सरकारने संभाजी भिडेंना अटक केली नाही, तर पुन्हा आठ दिवसांनी आंदोलन करू'' असे सांगितले, तर 27 तारखेला एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असे सांगितले की ''संभाजी भिडेंना अटक झाली नाही, तर पावसाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालू.'' एका रात्रीत अशी भूमिका कशी काय बदलली? यामागे काय विशेष कारणे आहेत का? एका रात्रीत प्रकाश आंबेडकरांचे असे मतपरिवर्तन कशामुळे झाले?

एकूणच समाजात दुही माजवण्याचे आणि समाजाला अराजकाच्या दिशेने घेऊन जाण्याचे मूठभरांचे जे काही प्रयत्न सातत्याने चालू आहेत, त्याला बळ देण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे समविचारी मित्र करत आहेत. अराजक केवळ परकीय आक्रमणातून निर्माण होते असे नाही, तर राष्ट्रांतर्गत सामाजिक दुहीतून आणि परस्परांविषयी विद्वेषातून समाजात अराजक निर्माण होत असते. समाजात परस्परांविषयी विद्वेष निर्माण करून गेली काही वर्षे अराजकाचा श्रीगणेशा केला आहे. मग विषय कधी भांडारकरांचा असो की कधी दादोजी कोंडदेवांचा असो, किंवा अगदी अलीकडचा भीमा कोरेगावच्या दंगलीचा असो. एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून तो समाज म्हणजेच सारे हिंदू असे गृहीत धरून आपल्या विखाराच्या पिचकाऱ्या टाकण्याची सध्या होड लागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले आदर्श असल्याचे हे सारे जण सांगतात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी प्रतारणा करतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, ''माझा ब्राह्मणांना विरोध नसून ब्राह्मण्याला विरोध आहे.'' तर आज बाबासाहेबांचे नाव घेऊन अराजकाला निमंत्रण देणारे ब्राह्मण्याऐवजी ब्राह्मणांना विरोध करत आहेत. याचे वर्णन करण्यासाठी बोधिवृक्ष आणि काटेरी झुडपे या शब्दांचा आधार घ्यावा लागतो. बाबासाहेब हे शांत, शीतल, सर्वांना कवेत घेणारे बोधिवृक्ष होते, तर प्रकाश आंबेडकर हे विखार आणि विद्वेष यांतून समाजमन दूषित करणारे, अराजकाला निमंत्रण देणारे काटेरी झुडूप आहेत. समाज नेहमी शांत, शीतल सावली देणाऱ्या बोधिवृक्षाचा स्वीकार करतो, हे प्रकाश आंबेडकरांनी समजून घ्यायला हवे. 

q