आठवणीतले पानतावणे सर

विवेक मराठी    29-Mar-2018
Total Views |

 

आदरणीय पानतावणे सर,

एका छोटया कार्यकर्तीचा विनम्र नमस्कार.

तुम्हाला पद्मश्री मिळाल्याचं समजल्यावर खूप आनंद झाला होता. या वेळी औरंगाबादला आल्यावर नक्की भेटायचं ठरवलेलं, तर आज एकदम तुम्ही गेल्याची बातमी! खूप भरून आलं एकदम. तसा खूप परिचय नव्हता आपला. तुम्ही तर ओळखलंही नसतं कदाचित. पण तुमच्या व्यक्तित्त्वाचा उबदार जिवंत ठसा त्या घडणाऱ्या वयात उमटलेला. त्याचं महत्त्व किती होतं, ते आज एकदम लख्खकन जाणवलं. अपार कृतज्ञता दाटून आली पुन्हा एकदा. जे भेटून तुम्हाला सांगायचं होतं, ते आता असं लिहावं लागत आहे.

88 साली विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ काम करण्यासाठी कार्यक्षेत्र मिळालं औरंगाबाद. नुकता नामांतराच्या दंगलीने होरपळलेला प्रदेश. जेमतेम विशीत पाय ठेवलेली एक ब्राह्मण मुलगी एका देशव्यापी भक्कम संघटनेच्या अद्भुत रचनेवर विश्वास ठेवून घरच्यांनी पाठवलेली. परिषदेच्या अभ्यासवर्गांतून नेहमीच निखळ समतेचेच संस्कार मनावर झालेले. पण आता ते प्रत्यक्ष कामातून प्रकटवायचे होते. सर्व लहानमोठया कॉलेजमध्ये आणि वस्त्यांमध्ये संपर्क असायचा.एक एक करत शहरातल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्याही भेटी चालू असत.

तुमचं नाव खूप ऐकलेलं.  तुमचा व्यासंग, अस्मितादर्श चळवळ व तुमचं लिखाण यातून तुमच्याविषयी आदर वाटत असे. कधीही टोकाच्या भूमिका वा सूडाची भाषा तुमच्या तोंडी नव्हती. नव्या लेखकांना तुम्ही अस्मितादर्शमधून पुढे आणत होता, त्याच उमदेपणाने तुम्ही आमच्यासारख्या संघटनांच्या समरसतेच्या प्रयत्नांनाही स्वीकारत होता. तुम्हाला एकदा तरी भेटता यावं अशी आल्यापासून फार इच्छा होती.

इतके दिवस मराठीच्या पुस्तकातच केवळ भेटलेली अनेक माणसं प्रत्यक्ष भेटत होती. मिलिंद कॉलेजचे प्राचार्य होते प्र.ई. सोनकांबळे सर, तसेच बाबूराव जगताप सर, फ.मुं. शिंदे सर अशी कितीक नावं. ठकार सरांना भेटून त्यांच्या तोंडून बाबासाहेबांच्या आठवणी ऐकताना थरारून जायला होत असे. आम्ही बाबासाहेबांचं लिखाण वाचत होतो. चर्चा होत. अभ्यास चाले. पण महत्त्वाचं होतं ते कार्यकर्ते जोडणं.

आपलं काम सर्वस्पर्शी असलं पाहिजे, काही विशिष्ट समाजात ते रेंगाळू नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत त्या वेळी सगळीकडेच. तिथला कार्यकर्त्यांचा गट मात्र खराच तसा होता.  आधी येऊन गेलेल्या पूर्णवेळांनी लावलेल्या झाडांची नीट निगराणी करून फळं खाणं, इतकंच काम होतं खरं तर.

पण तेही तितकंसं सोपं नव्हतं, हे हळूहळू समजू लागलं. आम्ही एकेका कार्यकर्त्याला जोडण्यासाठी जिवाचं रान करत असू नि छान कामात आलेला सूर जुळलेला कार्यकर्ता अचानक तुटून जाई. तोडला जाई. त्याच्या 'समाजाच्या' विषयीची त्याची कळकळ एकदम जागी होई. देशाचा, विद्यार्थ्यांचा विचार एकदम पुसला जाई. खूप दु:ख व्हायचं. परिषदेमुळे होणारा माणूसपणाचा विकास आम्ही अनुभवत होतो. त्यापासून हा वंचित राहू नये असं वाटायचं.

विद्यार्थिदशेत आपली जात-धर्म विसरून एकत्र येऊन कामं करावीत, त्यातूनच व्यक्तिविकास होईल व त्यातूनच सहजपणे समरस समाज घडेल, यावर श्रध्दा होती.

मिलिंद कॉलेज, आंबेडकर कॉलेज इथे नित्य संपर्क असायचा. छोटे कार्यक्रमही व्हायचे. संघर्षही असायचा. प्राचार्य सोनकांबळे सर नेहमीच सहकार्य करायचे. ते सारं जाणून होते. तुम्ही करताय ते योग्य आहे असा दिलासा नेहमीच त्यांनी दिला. जगताप सर आणि मनोहर गरुड सर हे तर आमचे पालकच होते!

काही काही निमित्ताने कार्यकर्ते तुम्हाला भेटत, कार्यक्रमांची माहिती देत. तसंच काही कार्यक्रमांच्या निमित्ताने तुमच्या घरी येऊन तुम्हाला भेटण्याचा योग आला. दर वेळी एखाद्या उत्तुंग, ॠषितुल्य व्यक्तीला भेटल्याचा आनंद व्हायचा. पानतावणे सरांना भेटलो, त्यांच्या घरी आम्हाला चहा मिळाला, मोकळया गप्पा झाल्या ही बाब आमच्यासाठी फार मोठी होती! समतेची लढाई लढणाऱ्यांनी त्यांच्या मार्गाविषयी कोणतेही पूर्वग्रह न ठेवता केलेला परस्परांचा सहज, मोकळा स्वीकार फार मोलाचा होता.

इतका विद्वान माणूस, पण किती पराकोटीचा साधा, सौम्य, विनयशील असं वाटलेलं. मग संपर्क सुरू राहिला. तुम्हाला आमच्याविषयी नि:संशय प्रेम होतं. आमचे प्रयत्न तुम्ही पाहत, जाणत, नावाजत होता. अशा एकेक माणूस जवळ येण्यातूनच हे जातीयतेचं विष मनातून जाईल, यावर तुमचाही विश्वास होता.

पुण्याला होणाऱ्या समरसता संमेलनाचे उद्धाटक म्हणून येण्याचं तुम्ही मान्य केलंत, तेव्हा केवढं श्रीमंत वाटलं होतं आम्हाला! तुम्ही आलात. लहान-मोठया प्रसंगांत, कार्यक्रमांत आम्हाला साथ दिलीत.

बाबासाहेबांनी मांडलेल्या जातिअंताच्या महायुध्दातल्या या छोटया लढाया होत्या, ज्या लढणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांच्या पाठीवरही तुमचे हात होते. पण त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद त्या वर्षी तुम्हाला मिळायचं होतं. संघपरिवाराच्या समरसतेच्या प्रयत्नांना पाठबळ दिल्यामुळे तुम्ही अपात्र ठरलात. 'तुम्ही आमच्याकडे येऊन बाटला' असं म्हणून चळवळींनी तुम्हाला नावं ठेवली. काँग्रेस सरकारने तुम्हाला अध्यक्षपद नाकारलं. तुम्ही शांतच होता. पुढे पुन्हा युती सरकार आल्यावर सरकारला त्या अन्यायाचं परिमार्जन करायचं होतं. पण तुम्ही इतके उद्विग्न झाला होता की आता तो विषयच नको असं म्हणून तुम्ही ते नाकारलंत. ज्या समाजासाठी ,विचारांसाठी, चळवळींसाठी तुम्ही झटत होता, त्यापासून दूर राहणं शक्य नव्हतं, योग्यही नव्हतं. आम्हालाही तुमच्यासारख्यांची अडचण समजत होती. तुम्हाला तुमचे शब्द, तुम्ही पुढे केलेला मैत्रीचा हात मागे घ्यायला लावणं हे खरं तर समाजाचं, परिवर्तनाच्या प्रयत्नांचं नुकसान होतं. तुम्हाला याची खंत वाटत होती. पण तरीही समन्वयाचाच मार्ग  योग्य आहे यावरची तुमचीही श्रध्दा ढळली नाही. तुम्हाला पद्मश्री घेताना पाहणं आमच्या भाग्यात नव्हतं. ती एक मानवंदना होती तुमच्या समन्वयवादी भूमिकेला दिलेली.

तुमच्याबरोबर या अन्य मंडळींचा उल्लेख मुद्दाम केला. या साऱ्यांचे ॠणाईत आहोत आम्ही. संघटना म्हणूनही, व्यक्ती म्हणूनही. संघटनेने दिलेला विचार प्रत्यक्षात आणताना कार्यकर्त्याला अनेक विपरीत अनुभवांना सामोरं जावं लागतं. एक प्रकारची उपेक्षा, तुच्छता, हेटाळणी, उपहास, अविश्वास हे सारं त्याच्याही वाटयाला येतं. कार्यकर्ता नावाची एक 'जात' अन आपापल्या विचारसरणीची एक 'पोटजात' त्याला चिकटते. एका अर्थी वर्षानुवर्षं जातिभेद सोसलेल्यांची वेदनाच काही अंशी अनुभवायला मिळते. त्यातून हे सोसूनच आपल्याला काम पुढे न्यायचंय, हे अधोरेखित होत राहतं.

पण कधीकधी टोकाचा विखार अनुभवायला मिळतो. बंद दरवाजावर धडका मारतो आहोत अशा अनुभवाने कार्यकर्ता हताश होतो. अशा वेळी व्यवहारात यश कमी-जास्त येत असलं, तरी तुमचा मार्ग बरोबर आहे असा विश्वास देणारं बाहेरचं कुणीतरी लागतं. तुमच्याकडे नेहमीच हा विश्वास मिळत होता. पानतावणे सरांना आपला प्रामाणिकपणा कळतोय हे आम्हाला खूप मोलाचं होतं. आमची प्रामाणिक तळमळ तुमच्या हाती सुरक्षित होती.

तुमच्या स्निग्ध, मृदू नजरेत आणि बोलण्यात तो स्वीकार, तो विश्वास नेहमी जाणवला. तो नसता, तर कदाचित समरसतेच्या विचारावरची श्रध्दा इतकी बळकट झाली नसती. तुम्ही रोष पत्करूनही समरसतेच्या विचारांबरोबर उभे राहिलात, ही बाबासाहेबांच्या विचारांची तुम्ही केलेली प्रामाणिक पाठराखण होती. समाज खरंच एकजीव करायचा असेल, तर मैत्रीचे हात दोन्हीकडून पुढे यायला हवेत ना सर? तुम्ही व तुमच्या बरोबरीने हे सारेच लोक असा हात पुढे करत होते. दुर्दैवाने, खरी समता नको असलेले आणि जातींना-जातभाईंना राजकारणासाठी वापरून घेणारे लोक सतत समाजाच्या समोर येत राहिले. असे पुढे होणारे हात मागे खेचत राहिले. तुमच्यासारखा समन्वयाचा विचार तितका समोर आला नाही. आक्रस्ताळेपणा करणाऱ्यांची दखल घ्यावीच लागते. पण तुम्ही जी अस्मिता फुलवू पाहत होता, ती अशी स्वार्थी, विध्वंसक कधीच नव्हती. तुम्ही एकेक माणूस उभा करत होता. आमच्याही उभं राहण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे.

आज जातीच्या अस्मितेचा विपरीत अर्थ लावून रान पेटवलं जातंय. समन्वयाचा गाडा मुश्किलीने ढकलत आणावा, तर कुठलातरी उन्मादी समूह तो ढकलून द्यायला आडवा येतो. मतभेद तेव्हाही होते. पण राजकारण, समाजकारण आजच्याइतकं निर्दय नव्हतं.

तुम्हाला याचं निश्चित दु:ख होत असणार. पण या अग्नितांडवाखाली तुम्ही जिवंत ठेवलेले मानव्याचे काही झरे होते, आहेत अन असतील. तुम्ही कधी विखार पेरला नाही, तर तुम्ही पेरलेली बंधुतेची बीजं कुठेतरी उगवत असतीलच ना! आत्ता चालू असलेले फुटीचे प्रयत्न तात्पुरते यशस्वी होतीलही कदाचित. पण अंतत: तुम्ही आम्ही स्वतंत्रपणे पाहिलेलं पण एकच असलेलं स्वप्न साकार होईल, असा विश्वास वाटतो. समन्वयाचा तुमचा वारसा जपला जाईल अशी आशा वाटते.

बाबासाहेबांचं स्वप्न साकार करणं ही आपली जबाबदारी मानणाऱ्या सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांना तुमच्यासारखे संतुलित समन्वयवादी पाठीराखे हवे आहेत सर. आज तुमच्याविषयीची ही कृतज्ञता व्यक्त करताना शब्द अपुरे पडत आहेत. तुमच्या आठवणींपुढे विचारांपुढे नतमस्तक होताना तुम्ही जागवलेली खरी अस्मिता बळकट करण्याच्या प्रयत्नांना साथ देत राहू, समन्वयाच्या मार्गाने एकरस समाजनिर्मितीसाठी यापुढेही झटत राहू, असा विश्वास तुम्हाला देत आहे.

प्रणाम!

विनीता शैलेंद्र तेलंग

9890928411