श्रेष्ठ 'राष्ट्रोदया'साठी संघात चला...

विवेक मराठी    03-Mar-2018
Total Views |

आपल्या सर्वांची संस्कृती आणि पूर्वज एक आहे. त्या संस्कृतीचे नाव हिंदू संस्कृती असे आहे आणि म्हणून संपूर्ण हिंदू समाजाने देशाच्या उत्थानासाठी एकत्रित येण्याचे आवाहन या निमित्ताने पुन्हा एकदा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मेरठ येते 25 फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रोदय संगमच्या व्यासपीठावरून ते बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 3 लाखापेक्षा जास्त कार्यकर्ते उत्तर प्रदेशाच्या एका भागातून स्वखर्चाने एकत्र येतात. एका मैदानावर या तीन लाखांची संपूर्ण व्यवस्थादेखील उभारली जाते. कुठलाही गोंधळ न उडता, जमलेले 3 लाख कार्यकर्ते एका विशिष्ट रचनेत उभे ठाकतात. सामूहिक कार्यक्रम तालवाद्यांच्या बळावर (कुठल्याही मानवी सूचनेशिवाय) पार पडतात, सरसंघचालक यांच्या भाषणाशिवाय अन्य आवाज मैदानात घुमत नाही, आणि कुठलीही दुर्घटना न होता, अस्वच्छता न माजता, संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होते. असे चित्र जेव्हा संपूर्ण देश प्रत्यक्षपणे पाहतो, त्या वेळी समाजात एक सकारात्मक भाव निर्माण होतो. सुदृढ समाजनिर्मितीचा हा केवळ एक नमुना म्हणून संघ स्वयंसेवक याकडे पाहत असतात.

संघाला बाहेरून पाहणारी मंडळी याची वेगवेगळया पध्दतीने चिकित्सा करत असतात. आपल्या अभ्यासाप्रमाणे आणि पूर्वानुभावाप्रमाणे प्रत्येक अभ्यासक याकडे बघत असतो. त्यामुळे कुणाला मेरठ येथे झालेल्या राष्ट्रोदय संगमसारखे कार्यक्रम 2019ची तयारी वाटते, तर कुणाला संघाचे शक्तिप्रदर्शन. परंतु संघाला अभिप्रेत हेतू यांपैकी कुठलाही नसतो. संघाच्या स्थापना काळापासून स्वयंसेवकांचे विविध स्तरावर एकत्रीकरण करण्याची संघाची पध्दती आहे. त्यामुळे गाव, तालुका, जिल्हा अशा पातळयांवर वर्षभर वेगवेगळया निमित्ताने स्वयंसेवक एकत्रित येत असतात. अशाच एकत्रीकरणाचा पुढचा टप्पा म्हणजे अनेक जिल्ह्यांचे अर्थात प्रांताचे एकत्रीकरण होय. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून ते कोहिमापर्यंत असे एकत्रीकरणाचे अनेक कार्यक्रम वेळोवेळी होत आलेले आहेत. त्यासाठी निवडणुकांची तारीख संघाला कधी बघावी लागली नाही. महाराष्ट्रातदेखील 2015 साली औरंगाबाद येथे देवगिरी महासंगम आणि 2016 साली पुणे येथे शिवशक्ती संगम ही दोन विशाल एकत्रीकरणे पार पडली.

 संपूर्ण हिंदू समाजाने एकत्रित येण्याचे आवाहन

भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे, प्रत्येकाची जात, भाषा, प्रांत, उपासना पध्दती, खान-पान, पोषाख वेगळा असू शकतो, मात्र आपल्या सर्वांची संस्कृती आणि पूर्वज एक आहे. त्या संस्कृतीचे नाव हिंदू संस्कृती असे आहे आणि म्हणून संपूर्ण हिंदू समाजाने देशाच्या उत्थानासाठी एकत्रित येण्याचे आवाहन या निमित्ताने पुन्हा एकदा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मेरठ येते 25 फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रोदय संगमच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. आज दोन हजार वर्षांनंतरदेखील जगात दहशतवाद, जागतिक तापमानवाढ यासारख्या अनेक गंभीर समस्या आ वासून उभ्या आहेत. मानवी जीवनाने विविध क्षेत्रांत प्रगती करूनदेखील या समस्यांवर उपाय निघू शकला नाही. अशा वेळी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागून आहे. केवळ विविधतेत एकता एवढेच सूत्र नसून एकता ही विविध रूपांत प्रकटते, असे चिंतन येथे केले जाते. आणि म्हणूनच जाती-पाती, खान-पान, वेषभूषा, भाषा, उपासना पध्दती भिन्न असूनदेखील सगळे एकाच सूत्रात गुंफलेले आहेत. या सर्वांना जोडणारा धागा एक आहे, अशी धारणा जगभरात केवळ भारतातच आहे, किंबहुना ती केवळ धारणा नसून येथील जीवनपध्दतीच आहे. दहशतवाद, हिंसाचार यासारख्या समस्येचे मूळ निराकरण याच तत्त्वात आहे. त्याचबरोबर येथे निसर्गाची पूजा केली जात असल्यामुळे, त्याचे शोषण न करता दोहन करावे ही शिकवण याच मातीत दिली जाते. म्हणून पृथ्वीला, नदीला, पशूंना मातेची उपमा दिली जाते. त्यातून जो भाव निर्माण होतो, तो निसर्गाचा ऱ्हास रोखू शकतो. हे जगाला मान्य आहे.

मात्र येथील समजाला एकत्र न होऊ  देता जाती, पंथ, भाषा, वर्ण यांच्या द्वेषावर एकमेकांना लढवत राहून या समाजात वैमनस्य निर्माण करून त्यात निर्माण झालेल्या दरीत आपल्या स्वार्थाच्या पोळया भाजण्याचे काम काही तत्त्वांकडून केले जाते. अशांपासून हिंदू समाजाने सावध राहावे व जगाच्या कल्याणासाठी एकत्र यावे, असे आवाहन सरसंघचालक यांनी या वेळी केले.

कट्टरतेची व्याख्या

संघावर विविध पध्दतींनी कट्टरतेचे आरोप लावले जातात. राष्ट्रोदय संगमाच्या निमित्ताने सरसंघचालकांनी यातील हवाच काढून टाकली. आपण कट्टर हिंदू आहोत म्हणजे काय? असा प्रश्नदेखील अनेकांना पडत असेल, त्याचे उत्तर सरसंघचलकांनी या वेळी दिले आहे. कट्टर हिंदू असणे म्हणजे कट्टर अहिंसावादी असणे, कट्टर हिंदू असणे म्हणजे कट्टर सत्यनिष्ठ असणे अशी व्याख्या सरसंघचालकांनी करून अनेक प्रश्नाची उत्तरे या वेळी दिली. यामुळे कट्टर हिंदुत्व दाखविण्यासाठी कुणाला हिंसाचाराच्या कुबडया घ्याव्या लागणार नाहीत, त्याचप्रमाणे अशा हिंसाचारींचा संघाशी संबंध लावणाऱ्यांनादेखील स्पष्टता येईल. हिंदुत्वाची कट्टरता ही सत्याचे आचरण करूनच मिळविली जाऊ  शकते, त्यामुळे ढोंगबाजी करणाऱ्यांना येथे स्थान नाही, आणि त्यांचा संघाशी संबंध जोडण्याचे देखील काही कारण नाही, हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वांपुढे स्पष्टपणे मांडले.

संघात येण्याचे आवाहन

संघ हे संपूर्ण समाजाचे संघटन आहे. म्हणजे समाजात असलेल्या सर्व गटांचे. या कार्यक्रमात 94489 विद्यार्थी, 70580 व्यावसायिक, 53568 शेतकरी, 46572 व्यापारी, 33348 अध्यापक, 12534 वकील, 4205 डॉक्टर व 25181 अन्य अशी एकूण 3,40,477 संख्या नोंदणीकृत होती. यात समाजात कार्य करणाऱ्या सर्वांचे प्रतिनिधित्व केले गेले होते. देशभरात या प्रत्येक क्षेत्रांचे आपले स्वतंत्र संघटन आहे आणि सर्व जण आपल्या अधिकारांसाठी एकत्र येत असतात. मात्र संघात याच्या नेमके उलट आहे. स्वखर्चाने समाजाच्या उत्थानासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आज देशभरात संघ हे एकमेव उपलब्ध व्यासपीठ आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाने राष्ट्रनिर्मितीसाठी एकत्र संघात यावे, असे सरसंघचालक म्हणत असतील तर त्यात गैर ते काय? अशा आवाहनांची सवय नसल्यामुळे काहींना यात वेगळेपणा वाटू शकतो. परंतु हे आवाहन संघाच्या उत्थानासाठी नसून राष्ट्राच्या उत्थानासाठी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

आजच्या काळात केवळ संघाचे चाहते बनून न राहता, प्रत्यक्ष काम करण्यासाठी संघात यावे. आजवर आलेल्या स्वयंसेवकांनी एक लाख सत्तर हजारपेक्षा अधिक सेवा उपक्रम सुरू केले आहेत. सुदृढ समाजनिर्मितीसाठी आणि संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी समाज संघटित करण्याकरिता अनेकांचा हातभार लागण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून वेळोवेळी संघात सामील होण्याचे आवाहन सरसंघचालकांद्वारे केले जात असते. त्याला प्रत्येक पिढीने भरभरून प्रतिसाद दिला आहे, तो याही पिढीकडून नक्कीच मिळेल असा विश्वास आहे.

9579559645

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/