कर्मचारी हे साधन नसून संपत्ती!

विवेक मराठी    30-Mar-2018
Total Views |

'ह्युमन रिसोर्स' या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषांतर मानवी साधनसंपत्ती असे आहे. 'साधनसंपत्ती' हा शब्द मला खूप आवडतो. पण त्याच वेळी मनात विचार येतो, की किती व्यवसायिक किंवा उद्योजक आपल्याकडील मनुष्यबळाला संपत्ती मानतात? 'जितना काम, उतना दाम' अशी कठोर व्यवहारी वृत्ती अंगात मुरलेली असते, तेथे कामगारांना केवळ साधन मानले जाते. खरे तर व्यवसायाचे यश हे सामूहिक असते. श्रेय मालकाला मिळत असले, तरी त्यामागे परिश्रम कर्मचाऱ्यांचे असतात, हे शहाण्या व्यावसायिकाने ओळखले पाहिजे.

मी एकदा माझ्या एका मित्राला भेटायला त्याच्या दुकानात गेलो होतो. दारात पाऊल ठेवत असताना मला मोठयाने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज अर्थातच माझ्या मित्राचा होता. दुकानातील कुणी कर्मचाऱ्याने कामात हयगय केल्याच्या कारणावरून माझा मित्र त्या कर्मचाऱ्याची कडक शब्दांत हजेरी घेत होता. दुकानातील अन्य सेवकवर्ग एकदम चिडीचूप होता. मी थोडा वेळ थांबून अंदाज घेतला आणि मित्राकडे मोर्चा वळवला. मला बघताच माझ्या मित्राच्या चेहऱ्यावरील तणाव निवळला. त्याने खुणेनेच समोर बोलणी खात उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याला जाण्याची खूण केली आणि माझे स्वागत करून मला केबिनमध्ये घेऊन गेला.

संभाषणाला सुरुवात करताना मी मित्राला विचारले, ''अरे काय झाले? इतका का रागावला होतास? त्याच्या हातून काही गंभीर चूक झाली का?'' त्यावर माझा मित्र हसून म्हणाला, ''अरे, हे लोक नेहमी कामात चालढकल करतात. पगार पूर्ण आणि वेळच्या वेळी मिळण्याची अपेक्षा ठेवताना दुकानाची कामे वेळच्या वेळी करायला नकोत का? त्याची त्यांना लाज तर वाटत नाहीच, उलट सबबी सांगत बसतात. मऊ लागल्यावर लोक कोपराने खणतात, म्हणून मला अधूनमधून असा कडक अवतार धारण करावा लागतो.''

मी त्यावर मित्राला समजावले, ''हे बघ. कामात ढिलाई केल्यावर कर्मचाऱ्याला जाब विचारण्यात काहीच चूक नाही, पण सर्वांसमक्ष खरडपट्टी काढणे योग्य नव्हे. तू त्याला केबिनमध्ये बोलवून त्याची चूक समजावून दिली असतीस, तर योग्य झाले असते. मालकाने आपल्या संतापी वृत्तीचे जाहीर प्रदर्शन दुकानात कधीच करू नये. तो स्वभाव अन्य कर्मचाऱ्यांत झिरपायला फारसा वेळ लागत नाही. आणखी एक गोष्ट तुझ्या कदाचित लक्षात आली नसेल, पण मी ती बघितली. तू त्या कर्मचाऱ्यावर ओरडत असताना दुकानातील तुरळक तीन-चार ग्राहकही घाबरून घाईगडबडीने निघून गेले. हे तर दुकानाचे न भरून येणारे नुकसान असते.'' यावर माझ्या मित्राला त्याची चूक उमगली. त्याने योग्य तो बोध घेतला.

मला नेहमी आश्चर्य वाटते की पुष्कळसे व्यवसायिक आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ पगारी नोकर समजतात. खरे तर व्यवसायाच्या प्रगतीत मालकाचा एकटयाचा वाटा नसतो. ते यश सांघिक असते. इंग्रजीतील ह्युमन रिसोर्स शब्दाला मराठीत मानवी साधनसंपत्ती म्हणतात. पण बहुतेक मालक कर्मचाऱ्यांना संपत्ती न समजता केवळ साधन समजतात. कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा विचार केला, त्यांना विश्वासात घेतले किंवा त्यांच्याशी आपुलकीने वागले, तर ते खरोखर कंपनीला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतात. मला सुरुवातीपासून हा पक्का अनुभव आहे.

मी स्वत: माझ्या कारकिर्दीची सुरुवात वडिलांच्या दुकानात झाडलोट, लादीसफाई आणि हमालीकामाने केली आहे. मी सुरुवातीपासून माझ्या दुकानातील कर्मचाऱ्यांशी मैत्रीचे गोफ विणले. मालकाचा मुलगा म्हणून अहंकाराने वागण्यापेक्षा त्यांच्यातील एक कर्मचारी बनून वावरलो. सन 1990 मध्ये आमची दुबईत पाच गोदामे होती. मी जेव्हा जेव्हा मालसाठयाची पडताळणी करण्यासाठी तेथे जाई, तेव्हा आम्हा सगळयांचा एक परिपाठ असायचा. दुपारपर्यंत भरपूर काम केल्यावर आम्ही एकत्र भोजन करत असू आणि भोजनसुटीच्या वेळात कंपाउंडमध्ये मस्त क्रिकेट खेळत असू. याचे बरेच फायदे होत. अंगात आळस येत नसे आणि आमचे कर्मचारी मला मालकाचा मुलगा म्हणून दबकून न राहता त्यांचा मित्रच समजत.

एक दिवस असेच आम्ही क्रिकेट खेळून गोदामात मालसाठयाच्या पडताळणीसाठी परतलो होतो. तेथे तात्पुरत्या उभारलेल्या शेडमध्ये मी नोंदी करत बसलो होतो. तेवढयात बाहेरून प्रचंड स्फोटाचा कर्णकर्कश्श आवाज ऐकू आला आणि जोराचा हादरा बसला. काय झालेय हे समजायच्या आत आमच्या गोदामावर तुटकी लाकडे, वस्तू, लोखंडी वस्तूंचा जोरदार मारा झाला. मी बाहेर धाव घेतली आणि बघितले तर शेजारच्या कंपाउंडमधील एका गोदामात जबरदस्त स्फोट झाला होता आणि आगीचे लोळ उठले होते. शेजारचा एक व्यापारी त्याच्या गोदामात फटाक्यांचा साठा उतरवून घेत असताना त्या साठयाला अचानक आग लागली होती. ती आग पसरत पसरत आमच्या गोदामांकडे येत होती. माझ्या चार गोदामांतील धान्य, वस्तूंचा साठा त्या स्फोटाने हवेत उडून पसरला होता. फटाक्यांचा साठा असल्याने स्फोटांची मालिकाच सुरू झाली. ते जळते फटाके हवेत उडून आगीत भर घालत होते. मी सुन्नबधिर होऊन बघत होतो. माझी पावले जमिनीला चिकटली होती. आगीचा लोळ माझ्या दिशेने येत असताना जीव वाचवून पळायचे भानही मला उरले नव्हते. संमोहित झाल्यासारखा मी खिळून उभा होतो. तेवढयात आमच्या दुकानात काम करणारा रतन नावाचा एक बांगला देशी कामगार पळत आला. जिवाची पर्वा न करता त्याने मला ढकलत ओढून नेले आणि बाहेर उभ्या असलेल्या गाडीत अक्षरश: कोंबले. ड्रायव्हरने तत्काळ गाडी सुरू करून मला लांब नेले. त्या दिवशी रतन नसता, तर त्या आगीने माझाही बळी घेतला असता.

नंतरही मला माझ्या कर्मचाऱ्यांच्या जिद्दीचा आणि आपुलकीचा वेळोवेळी प्रत्यय आला. मी दुखण्याने निराश आणि हतबल झालो होतो. कोणत्याही औषधाने गुण येत नव्हता. या आजारात आपण नक्की मरणार आणि मग या व्यवसायाचे, माझ्या कुटुंबाचे काय होणार? या विचाराने मी हैराण झालो होतो, पण माझ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी मला त्या निराशेतून बाहेर काढण्याचा चंग बांधला. त्यांनी माझ्या पत्नीला दिलासा दिला आणि माझ्या औषधोपचारांकडे, शुश्रुषेकडे लक्ष देण्यास सांगितले. त्या सर्वांनी हट्ट धरून मला माझ्या कामाचे तास कमी करायला लावले. कंपनीची व दुकानांची जबाबदारी चोख सांभाळली. मी त्या जीवघेण्या दुखण्यातून बरा झाल्यावर माझ्या कर्मचाऱ्यांचे ऋण कधीच विसरलो नाही. त्यांना ज्या गोष्टीत आनंद वाटेल त्या गोष्टीला मी नेहमी प्रोत्साहन देत गेलो.

आजही माझ्या कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याला अन्य कंपनीतून अधिक पगाराची संधी आली, तर तो मला सांगायला येतो. त्या वेळी मी मालक म्हणून स्वत:चा स्वार्थ बघत नाही. त्याला अडवत नाही. प्रत्येकाला आपल्या प्रगतीचा विचार करण्याचा आणि कुटुंबासाठी अधिक पैसे मिळवण्याचा हक्क आहे. मी कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्याचे देणेही न थकवता तत्काळ अदा करण्याची सक्ती आमच्या लेखा विभागावर केली आहे. या पारदर्शक आणि मैत्रिपूर्ण व्यवहारामुळे माझ्या कंपनीत काम करणारे आणि अन्यत्र गेलेले कर्मचारीही माझे कायमचे मित्र बनले आहेत. आजही ते आपली प्रगती सांगण्यासाठी, सल्ला घेण्यासाठी माझ्याकडे येतात. ही माझी खरी आनंदाची कमाई आहे.

मित्रांनो! बडया कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी खूप काही उपक्रम राबवत असतात. तेथे कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एचआरडी विभाग आणि व्यवस्थापक कार्यरत असतात, परंतु माझा सल्ला विशेषत: छोटया व्यावसायिकांसाठी आहे. कर्मचाऱ्यांकडे माणूस म्हणून बघा. त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवू नका. गुणवत्तेचे बक्षीस द्या. मग बघा, हेच कर्मचारी आपला व्यवसाय कसा यशाच्या शिखरावर नेतात ते!

सम्राट औरंगजेबाने आपल्या तिसऱ्या मुलाला एक पत्र पाठवले होते. त्यातील मजकुराचे भाषांतर मला येथे द्यावेसे वाटते. हिंदुस्थानचा शहेनशहा या पत्रात म्हणतो, 'तुझा खासगी सचिव मुस्तफा कुली बेग तुझे काम काळजीपूर्वक करतो, हे पुरेसे आहे. त्याला वरचा हुद्दा किंवा खान ही गौरवाची पदवी द्यायची असल्यास मला लिहून कळव. मी नक्की ते करेन. प्रामाणिक माणूस हा शुध्द सोन्यासारखा असतो. जगात माणसे खूप आढळतात, पण प्रामाणिक माणसे कमी असतात. प्रामाणिकपणा व कामसूपणा हे देवाने मानवाला दिलेले जन्मजात उच्च गुण आहेत. आपल्या हाताखालचे लोक सुखी असावेत, यासाठी मालकाने त्यांना प्रोत्साहन व बक्षीस द्यावे. त्यांना चरितार्थाची काळजी करायला लागू नये. भौतिक गरजांना वंचित राहिल्याने ते नाइलाजाने भ्रष्ट मार्गाकडे वळतात. लक्षात ठेव, आनंदी आणि समाधानी कर्मचारीच अधिक जोमाने काम करतो.'

मला वाटते, एका राज्यकर्त्याने दिलेला हा सल्ला प्रत्येक उद्योजक-व्यावसायिकासाठीही तितकाच बोधप्रद आहे.

***

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 00971505757887 या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवू शकतात.)