नाक कापले जाण्यापूर्वी...

विवेक मराठी    31-Mar-2018
Total Views |

मागच्या लेखात आपण माकाचे आजार निर्माण करणाऱ्या सर्दीची कारणं बघितली. अर्वाचीन शास्त्राच्या मते व्हायरस (विषाणू), बॅक्टेरिया (जीवाणू), फंगस (बुरशी) अशा कोणत्याही जीवाच्या हल्ल्याचा परिणाम म्हणून सर्दी होते. शरीराचं बल कमी पडलं तर ती टिकते आणि पुढचे व्याधी निर्माण होऊ शकतात.

   सायनसायटीस मध्ये सर्दी, कणकण, नाक चोंदणं याबरोबर डोकेदुखी हे मुख्य लक्षण असतं. या वेदना विशेषतः भुवयांच्या वरील भागात आणि गालावर असतात. खाली वाकल्यावर वेदना वाढतात. वाफ घेतल्यावर त्या कमी होतात. सायनस असलेल्या या जागांना सूज आलेली दिसतात. या लक्षणांवरून निदान आजाराचं निदान सहज होऊ शकतं.

   नाकाचं हाड वाढलं असेल तर किंवा नाकात मासांकुर वाढला असेल तर संबंधित नाकपुडी बंद होऊन श्वास घ्यायला नाकात अडथळा निर्माण होतो. विजेरीच्या प्रकाशात नाक तपासल्यास या दोन्ही गोष्टी डोळ्यांना स्पष्ट दिसतात. त्यासाठी फार क्लिष्ट तपासण्या करण्याची गरज नसते.

   हे आजार जास्त दिवस अंगावर काढले तर श्वास कमी पडत गेल्यानं अनुत्साह, आळस, ग्लानि, अंगदुखी, एकाग्रतेचा अभाव अशा दैनंदिन जीवनात अडथळा आणणाऱ्या लक्षणांची त्यात भर पडत जाते.

   आयुर्वेदाच्या मते आजाराची कारणं दूर करणं हा कोणत्याही आजाराच्या चिकित्सेतील पहिला टप्पा असतो. कमी औषधात आजार लवकर बरा व्हावा असं वाटत असेल तर हे पथ्यपालन आवश्यक आहे. गोड, आंबट, खारट, गार, दुधाचे पदार्थ, कच्चं सॅलड (टोमॅटो, काकडी इ.), पनीर, फलाहार हे सगळे पदार्थ वर्ज्य करायला हवेत. याउलट गरम आणि ताजा आहार, आहारात मसाल्यांचा समावेश, सूर्यास्तापूर्वी जेवण हे नियम पाळायला हवेत. क्वचित गोड पदार्थ खायचाच असेल तर तो जेवणानंतर न खाता जेवणाच्या सुरवातीला खावा. फळं फारच आवडत असतील तर रसदार फळांच्या ऐवजी गर असलेली फळं खावी, ती देखील सकाळी/ संध्याकाळी/ जेवणानंतर न खाता दुपारच्या जेवणात खावी. अर्थात जिभेला अशी सूट दिली की औषधं आणि त्यांचा कालावधी वाढणार याची तयारी ठेवावी.

  अगदी पाश्चात्य वैद्यक शास्त्रानुसार देखील, नाकाच्या आजारांवर शस्त्रकर्म हा शेवटचा उपाय आहे. म्हणूनच शस्त्रकर्म करून नाक कापून घेण्यापूर्वी आयुर्वेदातील उपायांचा जरूर विचार करावा. (खरं तर तो सुरवातीलाच व्हायला हवा.)  कुठलातरी लेख/ पुस्तक वाचून आपल्या मनानं औषध सुरु करू नये. जवळचा वैद्य गाठावा आणि त्याचा सल्ला मानावा.

   या तिन्ही विकारात आयुर्वेदातील ‘नस्य’ (नाकात औषधी तेल/ तूप/ काढा/ चूर्ण घालणे) हे कर्म फार उपयोगी ठरतं. किंबहुना नस्य हा नाकाच्या आजारातील प्रधान उपक्रम आहे. आजार आणि रुग्णाची गरज यानुसार नस्याचं औषध, त्याचं प्रमाण हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं असू शकतं.  म्हणून वैद्यांच्या सल्ल्याप्रमाणेच ते करत राहावं. त्यात टाळाटाळ, कंटाळा अजिबात करू नये. थोडं बरं वाटल्यावर मनानं ते बंद करू नये. वैद्य सांगतील तोपर्यंत चालू ठेवावं.

   याशिवाय वाफ घेणं, निलगिरीचा रुमाल जवळ ठेऊन त्याचा वास घेत राहणं, बाहेर जाताना नाकावर रुमाल बांधून घेणं, कपाळ आणि गाल यावर सकाळी किंवा रात्री सुंठ/ वेखंडाचा लेप घालणं, अधूनमधून गरम पाणी पिणं हे उपाय आरामदायी ठरतात.

   कपालभाती, भस्त्रिका आणि सूर्यभेदन यांचा नियमित अभ्यास केल्यास नाकातील आणि पोकळ्यांमधील कफ पातळ होऊन बाहेर पडायला मदत होते. यांचं प्रमाण वैद्यांकडून ठरवून घ्यावं. अतिरेक टाळावा. योगाभ्यासातील जलनेती देखील नाकाच्या विकारांमध्ये उपयोगी ठरते. मात्र ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावी. त्यात चूक झाली तर कानात पाणी जाऊन नको ते आजार आयुष्यभरासाठी मागे लागू शकतात.

    हवेचं प्रदूषण करणाऱ्या घटकांची अॅलर्जी असेल तर नाकाचे हे आजार हमखास होतात. अॅलर्जी म्हणजे एखाद्या गोष्टीला शरीराकडून दिली जाणारी अवाजवी प्रतिक्रिया होय. ही प्रतिक्रिया अर्थातच सर्दीच्या स्त्रावांच्या रुपात असते. ती कमी करायची असेल तर ध्यानाचा उत्तम उपयोग होतो. ध्यानामुळे मन शांत होतं. मनाच्या प्रतिक्रियांची तीव्रता आणि शीघ्रता कमी होते. त्याचे परिणाम शरीरावर होऊन शरीर देखील अॅलर्जीच्या रूपातील आपल्या प्रतिक्रिया कमी करतं.

    नाकाच्या आजारांत शस्त्रक्रिया टाळायची असेल तर आयुर्वेदात त्यासाठी योग्य मार्ग आहेत. इंग्लिश नावांना घाबरून, आयुर्वेदात याला औषध नाही असं परस्पर ठरवू नये. ग्रंथात त्या आजारांना कदाचित वेगळं नाव असेल, कदाचित नाव नसेलही... परंतु शरीरात झालेल्या बदलांचा अभ्यास करून वैद्य अशा आजारांची चिकित्सा निश्चित करु शकतात.