॥कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम॥

विवेक मराठी    05-Mar-2018
Total Views |

‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अन्यथा अपेक्षाभंग ठरलेला आहे. जो आनंद मिळतो आहे, त्याचं मूळ शोधण्याच्या नादात तुम्ही आनंद आणि त्या आनंदाचं कारण दोन्ही हातचं घालवून बसता. फुलाचा गंध मनाला मोहवून टाकतो म्हणून फूल चुरगळून त्यात गंध शोधणं हा वेडेपणाच.


तुकोबांचे अभंग म्हणजे जगण्यासाठी, जगताना येणाऱ्या अडचणींसाठी एक उत्तरांचं गाईडच म्हणावं लागेल. आपल्याकडे पूर्वी लेखनकला किंवा वाचनाचं प्रमाण तितकंसं नव्हतं. अशा काळात हे गेय अभंग हाच ज्ञानाचा ठेवा होता. ह्यामध्ये एक सुलभता तर होतीच, तसंच लोकांना कळणारे त्यांच्या रोजच्या जीवनातले दाखले असल्यामुळे त्यांना त्यातील मर्म समजायला वेळ लागायचा नाही. अध्यात्म म्हणजे काहीतरी कर्मकांड आणि जप-तप नव्हे, तर रोजच्या आयुष्यातील आपली कर्म जबाबदारीने करत राहणं होय. आपल्याला काही सांगायचं असेल तर ते समोरच्याला समजून यायला हवं, नाहीतर सांगण्याचा उपयोग काय? त्यासाठी दोघांनाही एकाच भाषा कळायला हवी. नाहीतर ह्याचं त्याच्यापर्यंत पोहोचताना त्याचे भलतेच अर्थ निघायचे आणि संवादाचा मूळ हेतू साध्यच होणार नाही. ह्यावर भाष्य करताना तुकारामांनी मोठं सुरेख उदाहरण दिलं आहे - कानडी आणि मराठी ह्या खरं तर शेजारणी, पण दोघींमध्ये असणारा फरक मात्र मोठा आहे. सहजासहजी त्या एकमेकींना कळून येत नाहीत.

कानडीने केला मर्‍हाटा भ्रतार। एकाचे उत्तर एका न ये तैसें ॥ध्रु.॥

मज नको करूं कमळापति। देई या संगति सज्जनांची॥१॥

तिने पाचारिले इल बा म्हणोन । येरु पळे आण जाली आतां॥२॥

तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न। तेथें वाढे सीण सुखा पोटीं॥३॥

तर असा सोपा दाखला देत ते सांगतात, देवा, माझ्या बाबतीत असं करू नको !! हे कमलापती, मला नेहमीच सज्जनांची भाषा कळू दे, अर्थात दुष्ट विचार माझ्यासाठी न कळणाऱ्या भाषेसारखे असू देत .म्हणजे अगदी आजूबाजूला असले तरी ओळखच नसल्यामुळे माझ्यावर त्यांचा कोणताच परिणाम होणार नाही. पुढे ते म्हणतात – नाहीतर असं व्हायचं, तिने त्याला ‘इकडे ये’ म्हणायचं आणि हा पळून जायचा. जर मला सद्विचारांची ओळख नसेल तर असंच व्हायचं रे बाबा माझं. म्हणून तुकाराम म्हणतात, जे असे एकमेकांपासून, एकमेकांच्या विचारापासून दूर आहेत, कळण्याच्या पलीकडे आहेत, तिथे सुखसुद्धा कष्टीच होणार. म्हणजे चांगलं बोललेलं तरी ते समोरच्याला कळलंच नाही, तर त्याचा उपयोग तो काय !! अशाच आणखी एका अभंगात तुकाराम म्हणतात, ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अन्यथा अपेक्षाभंग ठरलेला आहे. जो आनंद मिळतो आहे, त्याचं मूळ शोधण्याच्या नादात तुम्ही आनंद आणि त्या आनंदाचं कारण दोन्ही हातचं घालवून बसता. फुलाचा गंध मनाला मोहवून टाकतो म्हणून फूल चुरगळून त्यात गंध शोधणं हा वेडेपणाच. मूल आवडतं म्हणून त्याला कोणी खातं का? मोती सुंदर असतो म्हणजे तो जिथून आला ते पाणीही चविष्ट असं नसतं. सुस्वर निर्माण करणारं वाद्य फोडलं, म्हणून आतून नाद सापडणार आहे का? अगदी अशाच प्रकारे आपण कर्म करीत असताना एकसारखे त्यात फळ कसं मिळेल, काय मिळेल, मिळेल ना? असा विचार त्या कर्माची गती कमी करतो आणि फळापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अवघड होत जातो. यावरून आठवलं, एक माणसाने एक रोप लावलं आणि रोज पाणी घालून झालं की लगेच रोप उपटून त्याची मूळ किती खोल गेली आहेत, हे तपासायचा. अशाने ते झाड होऊ शकेल का? प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि त्या वेळेची एक मर्यादा, तितका वेळ त्यासाठी देणं हीसुद्धा तपश्चर्याच!! म्हणून तुकाराम म्हणतात – वर्म – जे मूळ आहे, ते कधीच कोणाला दाखवू नये म्हणजे उघड करू नये. कारण त्याच्या न दिसण्यात, लपून राहण्यात खरं मर्म आहे.

परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल। खाऊं नये मूल आवडतें॥१॥

मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद। यंत्र भेदुनि नाद पाहूं नये॥२॥

कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम। तुका म्हणे वर्म दावूं लोकां॥३॥

थोडक्यात काय, एकाग्र चित्ताने केलेलं काम फळापर्यंत घेऊन जातं. त्यामध्ये अडसर ठरते ती अतिचिकित्सा.