देवराईची संकल्पना

विवेक मराठी    07-Mar-2018
Total Views |

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. हे जंगल देवाला अर्पण केलेलं असल्याने याची अजिबात तोड होत नाही. या जपलेल्या जंगलातील सर्व जीवविविधता धार्मिक भावनेने पिढ्यानपिढ्या सांभाळली जाते. हे देवाच्या मालकीचं जंगल आहे, त्यामुळे यातील कोणत्याही गोष्टीचा वापर व्यापारासाठी करायचा नाही, कोणतंही झाड तोडायचं नाही या ठाम श्रद्धेने या जंगलांचं संरक्षण केलं जातं. बहुतांश वेळा देवराईला कुंपण किंवा संरक्षक भिंत नसते, कोणी राखणदार नसतात, पण तरीही केवळ धार्मिक भावनेने या जंगलांचं रक्षण केलं जातं. श्रद्धेने असलेलं सामाजिक बंधन हा सर्वात जास्त परिणामकारक ठरणारा घटक आहे. 

मी BNHSमध्ये पीएच.डी.साठी काम करत असताना मला महाराष्ट्रातील देवरायांवर संशोधन करण्याची संधी मिळाली. त्या निमित्ताने पूर्ण राज्यभर फिरून सामान्य नागरिक, वन खातं, महसूल खातं, तालुका आणि गावपातळीवरील सरकारी आणि खाजगी संस्था, विविध स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने सर्व माहिती मिळवता आली. हे काम पुढे चालू ठेवून प्रबंध पूर्ण केला. आत्तापर्यंत जवळपास १६०० देवरायांना प्रत्यक्ष भेट देऊ शकलो. या एका संधीमुळे मला करियरसाठी एक वेगळाच आणि तुलनेने दुर्लक्षित, पण अभ्यासाच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय मिळाला. एका दुर्लक्षित पण लोकसहभागातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या संकल्पनेचा अभ्यास करायची संधी मिळाली.

देवराई कशी ओळखावी -

एखाद्या परिसरात फिरताना उजाड परिसरात, गावाच्या जरा बाहेर, दोन गावांच्या मध्ये, जंगलाच्या एका कडेला किंवा शेतांमध्ये अचानक चांगला जंगलाचा राखलेला भाग - ज्यात शिरणं कठीण आहे किंवा जो एकदम वेगळा दिसतोय किंवा एखादं उत्तम दर्जाचं जंगल आहे, एखादं मंदिर किंवा उघड्यावर स्थापना केलेले देव दिसले, की समजावं की ही देवराई आहे.

खरं तर देवराई ही संकल्पना केवळ फोटो बघून किंवा वर्णन वाचून कळत नाही, ती प्रत्यक्ष अनुभवण्याची आहे. कोणत्याही चांगल्या देवराईत शिरल्यावर आपला बाकी जगाशी संपर्क जवळपास तुटतो. आतलं आणि बाहेरचं तापमान, आर्द्रता यात जाणवण्याएवढा फरक अनुभवायला मिळतो. आत शिरल्यावर आपल्याला दिसतात ते घनदाट छाया देणारे उंचच उंच वृक्ष, त्यावर असणाऱ्या अनेक आकाराच्या आणि प्रकारच्या वेली, गच्च झाडोरा आणि विविध पक्षी, प्राणी यांचे आवाज आणि बरेचदा दर्शन. कुठेतरी वाहणाऱ्या ओढ्याचा किंवा नदीच्या पाण्याचा आवाज. देवराईच्या मध्यावर किंवा एका बाजूला, कधीकधी देवराईच्या बाहेरही, एखादं मंदिर असतं. निसर्गातूनच आलेला देव किंवा देवी असते - उदा., वाघजाई, काळकाई, वनदेव इत्यादी. ती त्या देवराईची आणि गावाची राखण करते. एखादा झरा किंवा ओढा असतो. क्वचित एखादी नदी असते. सर्वसाधारणपणे देवराई गावाच्या सीमेवर आढळते. देवराई गावात असू शकते, गावाच्या सीमेवर असू शकते, गावापासून लांब असू शकते, जंगल आणि गाव याच्यामध्ये असू शकते. कोकणात अनेक ठिकाणी तर एकाच गावाच्या प्रत्येक वाडीत एक याप्रमाणे देवराया दिसून येतात. ही सार्वजनिक जंगलं आहेत. बहुतांश देवरायांमध्ये पाण्याचा एक तरी स्रोत असतो.

महाराष्ट्राचा विचार केला, तर देवराया सह्याद्री पर्वतरांगेच्या (पश्चिम घाटाच्या) आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये आढळतात. तसंच सातपुडा डोंगररांगा, यवतमाळ व नांदेडजवळील आदिवासी भाग, भंडारा, गडचिरोली, वगैरे भाग - जिथे आदिवासी वस्ती आहे, त्या भागात देवराया आढळतात. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या भागात देवरायांची संकल्पना आढळत नाही किंवा त्याबद्दल काही नोंद नाहीये.

आपण जर नीट पाहिलं, तर लक्षात येईल की ज्या मराठवाड्यात आणि पश्चिम विदर्भात देवराई ही संकल्पना नाही. तिथे जंगलं कमी आहेत, एकूणच झाडझाडोरा कमी आहे आणि पाण्याचं

दुर्भिक्षसुद्धा आहे. म्हणजे, देवराई असलेल्या ठिकाणी पाण्याचे स्रोत चांगले राहतात, किंवा पाण्याचे स्रोत चांगले राहण्यासाठी देवराया राखल्या गेल्या, असंही म्हणता येईल.


 

आजपर्यंत मी केलेल्या संशोधनात ३७८३ देवारायांची नोंद केली आहे.  मुंबईमध्ये तर माहुल गावानजीक समुद्रामधल्या बेटावर एक देवराई आहे. या ठिकाणाला ‘रामादेवी’ या नावाने ओळखलं जातं. तिथे ओहोटीच्या वेळेला चालत जाता येतं. या रामादेवीच्या देवराईत विहीर आहे गोड पाण्याची आणि गोड्या पाण्यातील झाडं दिसतात. पिंपळ, पायर, काटेसावर, उंबर, जंगली बदाम, इत्यादी झाडं इथे बघता येतात.   

बहुतेक देवरायांमधे पाण्याचा एकतरी स्रोत असतो. मग तो झरा असेल, विहीर असेल, तलाव असेल, ओढा असेल, नदी असेल किंवा पुष्करणी असेल.

खरं तर मलातरी असंच वाटतं की देवराई संकल्पना ही पाण्यासाठीच तयार केली गेली असावी. उत्तम राखलेलं जंगल, त्यात लोकांचा फार कमी वावर आणि चांगल्या जंगलामुळे होणारं जलसंधारण आणि मृद्संधारण.

आजही सह्याद्रीमध्ये अनेक गावांत अनेक देवराया अशा आहेत की गावातल्या विहिरी आटतात, पण गावापेक्षा उंच असलेल्या देवराईमध्ये वर्षभर पाणी मिळतं. कित्येक ठिकाणी संपूर्ण गाव त्या एकाच स्रोतावर अवलंबून असतं.

कोकणात अनेक ठिकाणी देवरायांमध्ये असलेल्या स्रोताचं पाणी गावापर्यंत नेलेलं आढळतं. त्या गावातील लोकांना माहीत असतं की जोपर्यंत देवराई आहे, तोपर्यंत पाणी मिळणार आहे. त्यामुळे गाव जास्त काळजी घेऊन देवराईचं संरक्षण करतं. देवराई जर गावापेक्षा उंच ठिकाणी असेल आणि चांगली राखलेली असेल, तर त्या गावातील विहिरी जास्त काळ पाणी देतात असाही अनुभव आहे.

उदाहरणार्थ, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ही कुडावळे गावची देवराई. १५०० लोकसंख्येचं, बहुतेक सर्वात मोठं महसुली गाव आणि तालुक्यामधील सर्वात मोठी आणि चांगली राखलेली ४६ हेक्टरवर पसरलेली ही देवराई. कोणत्याही ऋतूत गेलं तरी दुपारी १२ वाजताही उन्ह खाली येत नाही, एवढी घनदाट वृक्षराजी असणारी ही देवराई. या गावाचा आणि देवराईचा विशेष संबंध आहे. देवराईमधून एका नदीचा उगम होतो. ती नंतर भारजा नदीला जाऊन मिळते. या नदीचं पाणी गावकऱ्यांनी गेल्या शतकात किंवा त्याही आधी उताराने गावात आणलंय. पूर्वी दगडी पाटाने हे पाणी आणलं होतं, आता पाईपमधून आणलं जातं. गावाला हे पाणी वर्षभर, फुकट आणि भरपूर मिळतं. या पाण्याला एवढं जोर आहे की नळ बसवले तर उडून जातात किंवा पाईप फुटतात. त्यामुळे, हे पाणी वर्षभर वाहत असतं. गावाची पाण्याची गरज भागली की हे पाणी ओढ्याने गावाच्या पुढे परत नदीला मिळतं.

देवराईत शिरलं की जगाशी संपर्क तुटल्यासारखं होतं. आत गेल्यावर बाहेरच्या जगातले आवाज गायब होऊन वेगवेगळ्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज येतात. या देवराईत अगदी चिमण्या, बुलबुल, दयाळ यापासून ते मोर, हॉर्नबिल, नंदन नाचण, हळद्या यांसारखे पक्षीही सहज दिसतात.

साळिंदर, माकड, वानर, भेकर, पिसोरी, नीलगाय, तरस इत्यादी प्राणीही आहेत इथे. वर्षातून एक-दोनदा बिबट्याही हजेरी लावून जातो.

गावकऱ्यांना नक्की माहीत आहे की ही नदी आहे म्हणून आपण आहोत आणि देवराई आहे म्हणून ही नदी आहे. त्यामुळे सगळे देवराई आणि पाणीसाठा जपतात.

देवराईमधील वनसंपदा, पक्षि- आणि प्राणिजीवन, त्यातील विविधता, दुर्मीळ वनस्पती आणि पक्षी, प्राणी यांची उपस्थिती, गावातील लोकांची श्रद्धा, त्यांचे उत्सव आणि रोजच्या जीवनातील देवराईचं स्थान, औषधी वनस्पती आणि इतर उपयोग, गावाचं सांस्कृतिक केंद्र म्हणून असलेलं देवराईचं स्थान इत्यादी अनेक पैलू आहेत, ज्यावर प्रकाश टाकणं आवश्यक आहे. या पैलूंवर माहिती घेऊ या पुढील भागांमध्ये.

डॉ. उमेश मुंडल्ये