समर्थ नेतृत्वाचा गौरव

विवेक मराठी    09-Mar-2018
Total Views |

 

भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष निर्मलाताई - उर्मिला बळवंत आपटे यांना, त्यांच्या कार्याची उचित दखल घेत, काल जागतिक महिला दिनी नारीशक्ती हा पुरस्कार महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. त्यानिमित्ताने विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी रेखाटलेले निर्मलाताईंचे शब्दचित्र...

1993 च्या आसपास मी भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या डोंबिवली शाखेची सक्रिय सदस्य झाले. त्याआधीचा संघटनात्मक कामाचा अनुभव शून्य...(कधी गेलेच असते तर संघपरिवाराशी संबंधित एखाद्या कामातच गेले असते. कारण घर टिपिकल संघाचं नसलं तरी संघसमर्थकाचं नक्की होतं. पण घरून कधी असा आग्रह झाला नाही. त्यामुळे आम्ही दोघी बहिणी अशा Activityपासून लांबच राहिलो.) फक्त एकदाच आईच्या अत्याग्रहामुळे मी राष्ट्र सेविका समितीच्या चिपळूण इथे झालेल्या शिबिरात गेले होते. माझ्या मनाने गेले नसल्यामुळे ना मला तिथे कोणी मैत्रिणी मिळाल्या ना काही विशेष आठवण स्मरणात राहिली. लक्षात राहिलं ते भल्या पहाटे 4 वाजता उठणं (जे माझ्यासाठी कर्मकठिण काम होतं. आजही आहे आणि सेविकांचं भारलेपण. अभाविपचं कार्यकर्ता होणं तर लांबच पण एखादा कार्यक्रमही अटेंड केला नव्हता. अभाविपचे कार्यकर्ते जेव्हा कॉलेजच्या गेटवर सदस्य करून घ्यायचे तेव्हा माझ्या मनात कायम भीती असायची की जर का सदस्य झालो तर हे उद्यापासून कामात खेचणार आपल्याला. भीती यामुळे की, मला अशा कामाची आवड नाही असं त्यावेळी माझं मत होतं.
हे मत भारतीय स्त्री शक्तीशी संबंध येईपर्यंत कायम राहिलं. या संघटनेच्या कामात मी खेचलीच गेले. तो एक गंमतीशीर योग होता. त्यावेळी भारतीय स्त्री शक्तीने डोंबिवलीत पालकांसाठी शिबिर आयोजित केलं होतं. माझी लेक लहान असल्याने मी पालकत्वाची मुळाक्षरं गिरवत होते. या शिबिराचा फलक, त्यावर लिहिलेेले विषय बघितले आणि वाटलं की आपल्याला इथे पालकत्वाच्या काही चांगल्या टिप्स मिळू शकतील. त्या तशा मिळाल्याही. माझ्यातल्या पालकाला या शिबिरामुळे नवा दृष्टिकोन लाभला. शिबिराच्या समारोपाच्या सत्रात मी खूप मनापासून मनोगत व्यक्त केलं आणि तिथेच संघटनेला माझ्यातला कार्यकर्ता दिसला.(!) माझ्यासाठी पालक शिबिरापुरता या संघटनेशी संबंध होता पण तिथल्या कार्यकर्त्यांना माझ्यात संघटनेची भावी कार्यकर्ती दिसली. आणि हे पटवायला, माझ्या गळी उतरवायला डोंबिवलीतील पदाधिकारी- सुधाताई कानडे घरी येऊ लागल्या. सुरुवातीला मी गोंधळले. "मला असं काही काम करावं असं वाटत नाही, माझे स्त्रीपुरुष समानतेचे विचार हे कुठल्याही एका बाजूला झुकलेले नाहीत, मला माणूस म्हणून प्रतिष्ठा महत्त्वाची वाटते", हे आणि कायकाय सांगून पाहिलं. पण सुधाताई कानडेंनी ते सगळं शांतपणे कानाआड केलं. आणि मला संघटनेच्या दिशेने पावलं टाकायला राजी केलं. तिथे येणा-या सगळ्याजणी मोकळ्या मनाच्या होत्या, कामाची तळमळ आणि त्यासंदर्भातली स्वच्छ दृष्टी असणा-या होत्या, त्याहूनही विशेष म्हणजे कार्यकर्ती म्हणून एका पातळीवर राहून काम करणा-या होत्या. म्हणूनच, सर्वांमध्ये वयाने लहान असूनही मला त्यांच्यात मिसळायला वेळ लागला नाही. कार्यकर्ती म्हणून नातं जुळत असतानाच मैत्रीचे धागेही विणले गेले ते कायमसाठी. 
आज हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे, भारतीय स्त्री संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष निर्मलाताई आपटे यांना मिळालेला नारीशक्ती पुरस्कार. ही बातमी वाचली आणि माझाच या संघटनेतला प्रवास डोळ्यासमोर आला. 
काम नव्याने शिकताना डोंबिवलीतल्या प्रमुख कार्यकर्त्यांचं मी निरीक्षण करत होते. कोणत्याही कामाचं विचारपूर्वक केलेलं पक्कं नियोजन, नैतिकतेचं अधिष्ठान असलेली कार्यपद्धती, स्त्रीप्रश्नांची जाण आणि त्याचवेळी कुटुंबकेंद्री समाजरचनेला असलेला पाठिंबा ही दृग्गोचर होणारी संघटनेची वैशिष्ट्यं मनात नोंदवत होते. सामाजिक कामासाठी सामाजिक जाणीव ही पूर्वअट असली तरी तेवढ्यावरच भागत नाही. त्याला विचारपूर्वक केलेल्या नियोजनबद्ध कृतीची आणि अफाट परिश्रमांची जोड लागते हे मी या सगळ्यांकडून- डोंबिवली आणि अन्य ठिकाणी काम करणा-या कार्यकर्त्यांकडून शिकत गेले. 
या सगळ्यांमध्ये अधिक ठसा उमटला तो निर्मलाताईंचा. त्यावेळी त्या संघटनेच्या प्रांताध्यक्षा होत्या म्हणून नाही तर;
सतेज बुद्धी, निर्भीड स्पष्ट विचार व त्याचा निर्भय उच्चार आणि हाती घेतलेलं काम तडीस नेण्यासाठी अफाट श्रम करायची तयारी, या आणि अशा अनेक गुणांमुळे. Mathematics मध्ये M.Sc. केलेल्या निर्मलाताईंनी अध्यापनाचं कामही काही काळ केलं. गणित विषयाच्या अभ्यासामुळे असेल कदाचित पण त्यांच्या विचारांमधली crystal clear clarity ही लक्षवेधी आहे. बोलताना हळूहळू तापणारा स्वर आणि त्याला साजेसा गंभीर करडा चेहरा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतो. गेली 25 वर्षं तरी निर्मलाताई तशाच आहेत. वयाच्या खुणा आता थोड्याफार दिसत असल्या तरी जाणवण्याइतक्या ठळक नाहीत. कार्यकर्त्यांच्या दीर्घ आणि निवासी बैठकांमध्ये त्यांची अफाट कार्यक्षमता उठून दिसायची. वेगवेगळ्या विषयांशी संबंधित दिवसभर सत्रं असायची पण कोणत्याही सत्रात निर्मलाताई दमल्या आहेत, सत्र आवरतं घेत आहेत असं कधीही दिसत नसे. प्रत्येक विषयाची चोख तयारी आणि सूत्रबद्ध मांडणी करण्यामागे किती बौद्धिक परिश्रम घेत असतील याची कल्पनाच केलेली बरी!
भारतीय स्त्री शक्ती संघटनेचं आजचं स्थान तयार करण्यात निर्मलाताईंबरोबर अनेकींचं भरीव योगदान आहे याची जाणीव आहे पण पदावर असोत नसोत वैचारिक नेतृत्व निर्मलाताई करतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
संघटनेच्या प्रमुखाने लोकांसमोर किती वेळा यायचं, मंचावर कधी कधी बसायचं आणि दूरस्थपणे पण सजगतेने नव्या पिढीचं काम कसं न्याहाळायचं हे निर्मलाताईंकडून शिकावं. नियोजनाच्या पक्क्या असल्यामुळेच आणि प्रचंड क्षमतेमुळेच स्त्री संघटनेचं काम करतानाही राज्य महिला आयोग, दादरमधील शैक्षणिक संस्थेत कार्यवाहपदावरून केलेली अनेक उल्लेखनीय कामं आणि हे सगळं करत असताना सांभाळलेलं कुटुंब...त्यांची सगळी रूपं त्यांच्याविषयीचा आदर वाढवणारीच आहेत.
मी जवळजवळ 10 वर्षं संघटनेचं काम केल्यावर शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं. त्यासाठी मी ज्ञान प्रबोधिनीची निवड केली. त्यावेळी भारतीय स्त्री शक्तीतल्या माझ्या सहका-यांना वाईट वाटलं. ते अगदी स्वाभाविक होतं. ती भावना त्यांनी माझ्यापर्यंत मोकळेपणी पोचवलीही. पण मी कोणत्याही मतभेदाशिवाय/वादविवादाशिवाय संघटनेतून थांबते आहे, याची त्या सर्वांना खात्री पटली. नंतर मला आडकाठी तर झाली नाहीच पण माझ्याशी असलेलं स्नेहाचं नातंही तसंच राहिलं, अगदी आजतागायत.
गेल्या जुलै महिन्यात स्त्री शक्ती संघटनेच्या चार कार्यकर्त्या ज्यात - निर्मलाताई, नयना सहस्रबुद्धे, डॉ. मनिषा कोठेकर, जयश्री यांच्यासह मी, संघातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व रंगा हरिजी यांना भेटायला गेलो होतो. 2 दिवसांची ती एक अनौपचारिक बैठकच होती. या 2 दिवसांत पुन्हा नव्याने जाणवलं की, सत्तरी ओलांडलेल्या निर्मलाताईंमधली कार्यकर्ती आजही पंचवीस वर्षांपूर्वीइतक्याच उत्साहात आहे. नवनवीन माहिती जाणून घेण्याची उत्सुकता, नवनव्या योजना कार्यान्वित करण्याचा तोच उत्साह त्यांच्यात वसतीला आहे.

काही काही माणसं ही आपल्या आयुष्यातली ऊर्जाकेंद्र असतात. त्यांच्याशी बोललं, त्यांचं काम बघितलं की आपल्या मनाला आलेली मरगळ दूर होते. पुन्हा नवा उत्साह भरतो. निर्मलाताई या अशा ऊर्जाकेंद्र आहेत माझ्यासाठी. आजवर कधी मुद्दाम सांगितलं नाही त्यांना, आज या पुरस्काराच्या निमित्ताने त्याचा जाहीर उच्चार करते आहे.
हा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव होतो आहे ही विलक्षण आनंददायी घटना आहे.


- अश्विनी मयेकर.