अमेरिका, उत्तर कोरिया आणि चीन तिघांचे त्रांगडे

विवेक मराठी    10-Apr-2018
Total Views |

एप्रिलमध्ये दोन कोरियांच्या नेत्यांनी शिखर परिषदेसाठी भेटायचे असे ठरले असतानाच मार्च महिन्याच्या सुरुवातीस डोनाल्ड ट्रंप यांनी मे महिन्यात आपण किम जाँग उन यांना भेटून थेट चर्चा करणार असल्याचे जाहीर करून गेल्या 7 दशकांपासून घोंगडे भिजत पडलेल्या प्रश्नावर तोडगा निघू शकतो असा आशावाद उत्पन्न केला. या घटनांकडे चीन कशा पध्दतीने बघत असणार असा विचार मनात यावा, तोच किम जाँग यांचे बीजिंगमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी भव्य स्वागत केल्याची बातमी बाहेर आली.

28 मार्च रोजी डेमॉक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑॅफ कोरिया म्हणजे उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जाँग उन यांनी 2011 साली अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पहिल्यांदाच सीमोल्लंघन करून बीजिंग येथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. आपले वडील आणि आजोबांप्रमाणे त्यांनी 20 डब्यांच्या शस्त्रसज्ज रेल्वे गाडीने राजधानी प्यॉनयांगहून बीजिंगला प्रयाण केले. दोन दिवसांची ही ऐतिहासिक भेट पार पडेपर्यंत त्याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली असली, तरी प्रसारमाध्यमांना खबर लागलीच. अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरियाबद्दल सातत्याने आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्याला कोरियानेही दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्र चाचण्यांनी प्रत्युत्तर दिले होते. दुसरीकडे चीनच्याही उत्तर कोरियाशी असलेल्या संबंधात सातत्याने तणाव निर्माण होत होते. इतके की, गेल्या वर्षी शी जिनपिंग यांनी आपला विशेष दूत उत्तर कोरियाला पाठवला असता किम जाँग उन यांनी त्याला भेटण्यास नकार दिला. परिणामी चीनने सुरक्षा परिषदेच्या उत्तर कोरियाविरुध्द निर्बंधांना पाठिंबा देतानाच स्वत:देखील पेट्रोलियम, कोळसा आणि महत्त्वाच्या खनिजांची उत्तर कोरियाला होत असलेली निर्यात थांबवून त्यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला. त्यावर किम जाँग उन यांनी अधिक आक्रमक भूमिका स्वीकारली. गेल्या वर्षीच्या अखेरीस जाणता-अजाणता पडलेल्या एखाद्या ठिणगीमुळे कोरियन उपखंडात युध्दाचा भडका उडून त्यात दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेसह चीन आणि रशियाही ओढले जातात की काय, अशी परिस्थिती असताना 2018च्या सुरुवातीपासून चित्र अचानक पालटायला लागले. किम जाँग उन यांनी दक्षिण कोरियाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवल्या आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जै इन यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. 9 ते 25 फेब्रुवारी 2018 या कालावधी दरम्यान दक्षिण कोरियातील प्येओंगचाँग शहरात आयोजित केलेल्या हिवाळी ऑॅलिंपिक स्पर्धांत उत्तर कोरिया सहभागी झाला. आइस हॉकी या खेळ प्रकारात दोन्ही कोरियांची संयुक्त टीम खेळली. या स्पर्धांच्या निमित्ताने अमेरिका आणि दोन कोरियांचे नेते एकत्र आले. किम जाँग उन यांची धाकटी बहीण किम जो याँग आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स उद्धाटन सोहळयात एकाच स्टँडमध्ये बसले होते. त्यानंतर एप्रिलमध्ये दोन कोरियांच्या नेत्यांनी शिखर परिषदेसाठी भेटायचे असे ठरले असतानाच मार्च महिन्याच्या सुरुवातीस डोनाल्ड ट्रंप यांनी मे महिन्यात आपण किम जाँग उन यांना भेटून थेट चर्चा करणार असल्याचे जाहीर करून गेल्या 7 दशकांपासून घोंगडे भिजत पडलेल्या प्रश्नावर तोडगा निघू शकतो असा आशावाद उत्पन्न केला. या घटनांकडे चीन कशा पध्दतीने बघत असणार असा विचार मनात यावा, तोच किम जाँग यांचे बीजिंगमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी भव्य स्वागत केल्याची बातमी बाहेर आली.

कोरियाच्या फाळणीपासून चीन उत्तर कोरियाचा पाठीराखा बनला आहे. किम जाँग उन यांचे आजोबा आणि वडील अध्यक्ष असताना हे संबंध अत्यंत घनिष्ठ होते. किंबहुना चीनच्या पाठिंब्यामुळेच उत्तर कोरियाची राजवट पराकोटीचे क्रौर्य, भ्रष्टाचार आणि हडेलहप्पी कारभार करूनही तगू शकली. उत्तर कोरियाच्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या 90%हून अधिक केवळ व्यापार चीनशी आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र आणि दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमागे पाकिस्तान आणि चीनची मदत आहे, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. उत्तर कोरियात वेळोवेळी अन्नधान्याची टंचाई असताना चीनने त्याला धान्याचा पुरवठा केला, तसेच कोरियन उपखंडात युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली असता चीन उत्तर कोरियाच्या राजवटीच्या पाठी उभे राहून परिस्थिती निवळायला मदत करतो. त्यामुळे कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेताना उत्तर कोरियाने चीनला विश्वासात घ्यायचा अलिखित नियमच बनला होता. 2011मध्ये अध्यक्ष किम जाँग इल यांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटे पुत्र किम जाँग उन वयाची तिशी गाठायच्या आतच अध्यक्ष बनले आणि ही परिस्थिती पालटू लागली. फेब्रुवारी 2013मध्ये उन यांनी आपल्या राजवटीतील पहिली आणि कोरियाची तिसरी अणुचाचणी केली. डिसेंबर 2013मध्ये स्वत:च्या काकांवर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना देहदंड देण्यात आला. फेब्रुवारी 2017मध्ये उन यांनी त्यांचा सावत्र भाऊ किम जाँग नाम याची मलेशियाच्या कौलालुंपूर विमानतळावर नर्व एजंटचा वापर करून हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी अवकाशात रॉकेट सोडून आपली क्षेपणास्त्र आता अमेरिकेतील शहरांचाही वेध घेऊ शकतात असा दावा केल्यानंतर उन यांनी नोव्हेंबर 2017मध्ये उत्तर कोरियाला अण्वस्त्रसज्ज देश म्हणून घोषित केले.

 

उन यांनी हाकालपट्टी किंवा हत्या केलेले अनेक अधिकारी चीनच्या मर्जीतील असल्यामुळे उत्तर कोरिया आणि चीनमधील संबंधांना तडे जाऊ लागले. उन यांच्याबद्दल कोरियाच्या बाहेर कोणाला फारशी माहिती नसल्यामुळे त्यांच्या अनाकलनीय वर्तनाबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली. वरिष्ठ लष्करी अधिकारी उन यांच्या विरोधात बंडाळी करणार आहेत येथपासून ते आर्थिक दिवाळखोरीमुळे उन यांची राजवट कोलमडून पडणार आहे अशी चर्चा होऊ लागली. उद्या किम जाँग उन यांच्या युध्दखोरीमुळे अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने तिच्यावर हल्ला केला, तर त्यांच्या सेना आपल्या दारात येतील, तसेच या युध्दामुळे निर्वासितांचे लोंढे कोरियातून चीनमध्ये येऊ लागले, तर त्यांच्यावर नियंत्रण राखणे कठीण जाईल याची चीनला काळजी होती. आता किम जाँग उन यांनी चीनला विश्वासात न घेता दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जै इन आणि डोनाल्ड ट्रंप यांच्याशी भेटी घेण्याचे ठरवल्यावर चीनच्या एका काळजीचे दुसऱ्या काळजीत रूपांतर झाले. जर अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील चर्चा यशस्वी झाली, तर त्याचे श्रेय ट्रंप यांना मिळून पूर्व अशियातील सगळयात महत्त्वाची महासत्ता हे आपले स्थान हिरावले जाऊन पुन्हा अमेरिकेकडे जाईल. जर ही चर्चा फिसकटली, तर सीमेवर सैन्याच्या आणि शस्त्रास्त्रांच्या तैनातीत त्याची परिणती होऊन युध्द थांबवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील या चिंतेपोटी चीनने आपले वजन वापरून शी जिनपिंग आणि किम जाँग उन यांच्यात भेट घडवून आणली. त्यासाठी उन यांच्या स्वागतात कोणतीही कसर ठेवली नाही.

चीन भेटीतून एकाच वेळी किम जाँग उन यांचा वाढलेला आत्मविश्वास आणि ट्रंप यांच्याशी वाटाघाटी करण्याचे दडपण दिसून येते. गेल्या काही महिन्यात ट्रंप यांनी आपल्याच प्रशासनातील उच्चपदस्थांच्या हाकालपट्टयांचे सत्र आरंभले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच.आर. मिकमास्टर यांची हाकालपट्टी करून त्यांच्या जागी युध्दखोर जॉन बोल्टन यांची नियुक्ती केली. परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन यांची हाकालपट्टी करून त्यांच्या जागी सीआयए या गुप्तचर संस्थेचे संचालक माइक पोंपिओ यांनी नेमणूक केली. तर पोंपिओ यांच्या जागी जिना हास्पेल यांची नेमणूक केली. संशयित दहशतवाद्यांना अमेरिकेच्या विविध देशांतील गुप्त तळावर नेऊन तेथे त्यांच्या अमानुष छळाचे आरोप हास्पेल यांच्यावर आहेत. अमेरिकेने कोरियन उपखंडातून तसेच जपानमधून आपले लष्करी तळ हटवावेत, अशी उत्तर कोरियाची मागणी आहे; तर उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्र कार्यक्रम बंद करावा, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. अण्वस्त्र कार्यक्रम सोडून दिल्यावर लिबियात गड्डाफी, इराकमध्ये सद्दाम आणि सीरियात बशर अल असाद यांचे जे झाले, ते पाहून किम जाँग उन आपला अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याची काडीचीही शक्यता नाही. दुसरीकडे उन यांचा बेभरवशाचा स्वभाव, तसेच चीन आणि रशियाचे सान्निध्य यामुळे अमेरिका आपले लष्करी तळ हलवणार नाही. त्यामुळे ही चर्चा कोलमडण्याचीच शक्यता अधिक आहे. या काळजीमुळेच किम जाँग उन यांनी चीनशी आपले संबंध पुनःप्रस्थापित करून अमेरिकेविरुध्द विमा कवच प्राप्त केले आहे. पुढील काही दिवसात किम जाँग उन यांनी मॉस्कोला भेट देऊन व्लादिमीर पुतीन यांना या पटावर आमंत्रित केल्यास आश्चर्य वाटणार नाही. यातून किम जाँग उनसारखा 34 वर्षांचा तरुण नेता देशाचा लहान आकार, वर्षानुवर्षांचे निर्बंध आणि विजनवासामुळे कमकुवत अर्थव्यवस्था आणि दारिद्रय यांची पर्वा न करता कशा प्रकारे अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि जपानसारख्या महासत्तांना आपल्या भोवती नाचवतोय, हे दिसून येते. दुर्दैवाने उन यांच्या मुत्सद्दीगिरीचा उत्तर कोरियातील लोकांना काहीही फायदा होणार नसून झालाच तर त्यांचे स्वत:चे आसन बळकट करण्यासाठी होणार आहे. अमेरिका, चीन आणि उत्तर कोरिया या त्रांगडयातून कोरियन उपखंडातील परिस्थिती आणखी चिघळणार नाही, अशी अपेक्षा आहे.

9769474645