परिवर्तन संसार का नियम है

विवेक मराठी    11-Apr-2018
Total Views |

 

'अनित्य अशा या जगाचा परिवर्तन हाच नियम आहे' हा उपदेश भगवान कृष्णाने अर्जुनाला गीतेमधून केला होता. तो केवळ उपदेश नसून ते त्रिकालाबाधित सत्य आहे. काळ कधीच कुणासाठी थांबत नसतो. तो सृष्टीपासून माणसाच्या जीवनात नेहमीच बदल घडवत राहतो. आसपास घडणारे असे बदल वेळीच ओळखून त्यांच्याशी लवकर जुळवून घेणारे लोक प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात. मला हे उमगले, तेव्हा मीसुध्दा माझ्या व्यवसायाची पारंपरिक चाकोरीबध्द पध्दत बदलली आणि त्याचा फायदाही झाला.

माझ्या वडिलांनी दुबईत सुरू केलेले दुकान टिपिकल भारतीय पारंपरिक शैलीने चालणारे होते. वस्तूंच्या मांडणीला शिस्त नव्हती. कोणती वस्तू कुठे ठेवलीय, हे आम्हालाच ठाऊक असे. ग्राहकाने काउंटरपलीकडे उभे राहून वस्तूंची यादी द्यायची आणि आम्ही त्यानुसार त्याला वस्तू काढून द्यायच्या, अशी वर्षानुवर्षे चालत आलेली पध्दत आम्ही अनुसरत होतो. अगदी सुरुवातीला आम्ही बिलाचा हिशेब कोऱ्या कागदांवर लिहायचो. नंतर ग्राहकांची संख्या वाढली, तसा वेळ वाचवण्यासाठी आम्ही एक कॅलक्युलेटिंग मशीन घेतले. तेही बरीच वर्षे वापरात होते.

सन 1995मध्ये दुकानाची जबाबदारी माझ्यावर सोपवून बाबा भारतात निघून गेले. खरे तर मला त्या वेळी दुकानाच्या रचनेत व कार्यशैलीत बदल करण्याची चांगली संधी होती, पण माझाही स्वभाव काटकसरी व जुने ते सोने समजण्याचा असल्याने मी बदलासाठी तितकासा अनुकूल नव्हतो. पण एक दिवस काळाने ती वेळ आणलीच. पहिला आमूलाग्र बदल माझ्या जीवनशैलीत घडला आणि नंतर कार्यशैलीतही. मी आजारपणामुळे निराशेच्या इतका टोकाला गेलो होतो, की मला मृत्यूची भीती सतावत होती आणि मी अकाली गेल्यास पत्नी व लहान मुलांचे कसे होणार, याची काळजीही लागून राहिली होती. अनेक तपासण्या, औषधे सेवन आणि विविध उपचार केल्यानंतरही दुखणे बरे होत नसल्याने अखेर मी देवाला शरण गेलो. 'सुखी जीवन जगण्याची आणखी एक संधी दे, मी स्वत:ला बदलून दाखवीन' अशी कळवळून प्रार्थना केली. सुदैवाने परमेश्वराला माझी दया आली असावी. योग्य समुपदेशक, डॉक्टर व अचूक उपचार पध्दती लाभल्याने मी दुखण्यातून बरा झालो. देवाला वचन दिल्यानुसार मी दैनंदिन जीवनशैलीत बदल केला. आरोग्य, व्यायाम, आहार यामध्ये नियमितता आणली.

व्यवसायाच्या कार्यशैलीत बदल करण्यासाठी मात्र माझ्या कौटुंबिक जीवनात घडलेला एक गंमतीचा प्रसंग कारणीभूत ठरला. त्या प्रसंगाने माझ्या विचारसरणीत बदल घडण्यास चालना मिळाली. घटना अगदी साधी होती. माझा मोठा मुलगा हृषीकेश शाळकरी वयात होता. त्याचे केस खूप वाढले होते. मी त्याला ते कापून घेण्याची सूचना केली. त्यावर तो म्हणाला, ''बाबा! मला केस कापायचे आहेत, पण त्यासाठी सलूनमध्ये वेळ ठरवून घ्यावी लागणार आहे. मी सुटीचा दिवस बघून आधी फोन करून वेळ निश्चित करतो.'' मला प्रथम तो काय बोलतोय, हे लक्षात येईना. मी म्हणालो, ''अरे! तुला सलूनमध्ये जायचंय, डॉक्टरकडे नव्हे. अपॉइंटमेंट कसली ठरवतोस? आपल्या नेहमीच्या सलूनमध्ये जा आणि 20 दिऱ्हॅममध्ये केस कापून ये. मी गेली वीस वर्षे तिथूनच केस कापून घेतोय.'' त्यावर मुलगा म्हणाला, ''बाबा! मला ते नेहमीचे सलून नकोय. माझे सर्व मित्र जेथे केस कापतात तिथे मी जाणार आहे. त्या सलूनमध्ये खूप गर्दी असते. स्पेशल हेअरकटसाठी 100 दिऱ्हॅम घेतात, पण त्यासाठी वेळ ठरवून घ्यावी लागते.''

''100 दिऱ्हॅम! म्हणजे पाचपट महाग?'' मी ओरडलोच. ''अरे! काय वाटेल ते दर आकारताहेत आणि तुम्हाला बरी अशीच ठिकाणे सापडतात उधळपट्टी करायला!'' त्यावर माझा मुलगा शांतपणे म्हणाला, ''बाबा! तुम्ही एकदा त्या सलूनमध्ये केस कापून बघाच, म्हणजे तुम्हालाही समजेल की लोक त्या ठिकाणी का गर्दी करतात ते.'' हृषीकेशच्या बोलण्याने माझ्याही मनात कुतूहल निर्माण झाले आणि मी त्या सलूनला भेट दिली. तो खरेच सांगत होता. त्या सलूनची पूर्ण रचनाच ग्राहकांच्या गरजा आणि आराम लक्षात ठेवून केली होती. ते सलून वाटतच नव्हते. सौंदर्यपूर्ण अंतर्रचना, कमालीची स्वच्छता आणि शांतता, मंद संगीत, प्रसन्न करणारा सुगंध, अत्याधुनिक यंत्रसामग्री, गणवेशधारी उच्च प्रशिक्षित केशकर्तनकार. दुकान न वाटता एखाद्या कंपनीचे कार्यालयच वाटत होते. तेथे प्रत्येक व्यक्तीला कोणती केशरचना चांगली दिसेल याचे मार्गदर्शनही केले जात होते.

मी अंतर्मुख झालो. दुकान व सेवेची ती नवी शैली बघून मला आमची दुकाने डोळयासमोर आली. जग बदलाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपणही स्वत:ला बदलले नाही, तर मागे पडणार, याची मला जाणीव झाली. त्यातून दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र असलेल्या ठिकाणी राहूनही व्यवसायाचे नवे ट्रेंड समजून घेतले नाहीत, तर काय उपयोग? हा विचार मनात बळावला. नवी स्टाईल आत्मसात करण्यात नवी पिढी नेहमीच एक पाऊल पुढे असते. मला आमच्या कुटुंबाची कपडे शिवण्याची जुनी स्टाईल आठवली. मी शर्ट व पँटसाठी कापड घेताना मुलांसाठीही त्याच ताग्यातील कापड निवडायचो. आमचा वर्षानुवर्षे ठरलेला एक टेलर होता, त्याच्याकडून आमच्या तिघांसाठी पँट-शर्ट शिवून घेतले जायचे. मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांनी ही प्रथा झुगारून दिली. ती आईला सांगू लागली, ''बाबांना त्यांच्या आवडीनुसार कपडे शिवून घेऊ  देत. आम्हाला मात्र ब्रँडेड कपडेच घेत जा. आमचे भावांचे एकसारखे कपडे बघून इतर मुले आम्हाला हसतात.'' मुलांच्या या मानसिकतेचाही मी शांतपणे विचार केला. प्रत्येक वेळी जुने ते सोने या मानसिकतेला चिकटून बसण्यात अर्थ नसतो आणि वेळ ओळखून नव्याचा अंगीकार करणे फायद्याचे असते, हे मला उमगले. व्यवसायातही पुढे जाण्यासाठी नव्याचा अंगीकार हे तंत्र उपयोगी पडेल, याची मला खात्री झाली.

त्यानंतर मी आमच्या साध्या दुकानांचे रूपांतर सुपर स्टोअरमध्ये करण्याचा धडाका लावला. नवी दुकाने उघडताना प्रशस्त जागा निवडू लागलो. आजच्या ग्राहकांना स्वत: वस्तू निवडण्यास आणि हाताळण्यास आवडते, हे लक्षात घेऊन स्टोअर्समध्ये वस्तूंची मांडणी आटोपशीर, ग्राहकांना सोयीची आणि सौंदर्यपूर्ण केली. इंटेरियर डिझायनरना बोलवून त्यांच्या सल्ल्याने आकर्षक अंतर्रचना केली. बिलिंग सिस्टिम संगणकाधारित बनवली. त्यात रीडर्सचा वापर सुरू केला. ग्राहकांना खरेदीसाठी कार्ट्स आणि बास्केट्स उपलब्ध करून दिल्या. आमची उत्पादने अस्सल, शुध्द व सुरक्षित असावीत आणि मानवी स्पर्श न होता पॅकबंद स्वरूपात थेट ग्राहकांच्या हातात पडावीत, यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून प्रकल्प उभारले. त्यात आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे निकष स्थापित केले. पूर्वी मी नव्या दुकानांचे उद्धाटन अगदी साध्या पध्दतीने करत होतो. परंतु ग्राहकांना मात्र उद्धाटनाच्या झगमगाटी समारंभाचे आकर्षण होते. उद्धाटनासाठी कुणी सेलिब्रिटी असला तर त्यांना हवा होता. मी हे लक्षात ठेवले आणि प्रत्येक उद्धाटनाला बॉलिवूडची नामवंत तारका बोलवू लागलो. आजही हा परिपाठ कायम आहे आणि मला त्याचा खूप फायदा होतो आहे.

मित्रांनो! जगाचा प्रवास आता सेलर्स मार्केटकडून बायर्स मार्केटकडे सुरू झाला आहे. ग्राहक सेवेला कमालीचे महत्त्व आले आहे. ग्राहक हा राजाच असतो आणि त्याचा विश्वास मिळवला तर तो आपल्यालाही राजा बनवतो. त्यामुळे एकही ग्राहक गमावला जाणार नाही, याकडे व्यावसायिकाने लक्ष देणे आवश्यक आहे. एकेकाळी दुकानात 'आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही' अशी पाटी अभिमानाने मिरवली जायची. आजकाल ग्राहकांना त्यांच्या वास्तव्याच्या जवळपास ब्रँड हवे असतात. त्यामुळे शाखा विस्तार ही काळाची गरज ठरली आहे. ग्राहकांच्या गरजा, अपेक्षा आणि पसंती याला कमालीचे महत्त्व आले आहे. उत्पादने, तंत्रज्ञान, कामाची शैली, विचारसरणी, ग्राहकसेवा या सगळयांत नवे बदल घडवणारे आणि अभिनवता आणणारेच पुढील काळात यशस्वी होतील, हे निश्चित.

केशवसुतांच्या 'तुतारी' कवितेतील दोन ओळी मला पटतात -

जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका

सडत न एका ठायी ठाका, सावध! ऐका पुढल्या हाका॥

 (या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 00971505757887 या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवू शकतात.)