गुंतवणुकीचे प्रकार

विवेक मराठी    12-Apr-2018
Total Views |

आपल्याकडे येणाऱ्या पैशामधून खर्च करून झाले आणि योग्य तितकी बचतही करून झाली की उरलेल्या पैशाची गुंतवणूक करत राहून त्यातून ‘मत्ता’ (assets) निर्माण करत राहणं गरजेचं असतं. जे केल्याने मूळ रकमेवर मोठ्या प्रमाणात परतावा मिळतो, त्याला गुंतवणूक म्हणतात हे आपण पाहिलंच. हा परतावा नियमित उत्पन्नाच्या रूपात मिळू शकतो किंवा गुंतवलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम परत मिळते अशा स्वरूपात मिळू शकतो. असा परतावा मिळण्यासाठी योग्य प्रकारच्या मत्ता निर्माण करणं गरजेचं असतं.

 घर, जमीन, सोनं ह्या पारंपरिकदृष्ट्या आपल्याला प्रिय असणाऱ्या मत्ता. पैसे साठवून (किंवा वेळप्रसंगी कर्जही काढून) घर-जमिनी-सोनं घेणे हे आपण करत असतो. यातलं राहतं घर, वापरत असलेली जमीन आणि हौस किंवा प्रतिष्ठा म्हणून घेतलेले सोन्याचे दागिने ह्या मत्ता म्हणून खूप आकर्षक वाटत असल्या, घेतल्या जात असल्या, तरी या परतावा देणाऱ्या गुंतवणुकी असतातच असं नाही. एकतर स्वतःच्या वापराचं घर-जमीन-दागिने ह्यातून नियमित उत्पन्न मिळत नाही. शिवाय अत्यंत दुर्धर प्रसंग ओढवल्याशिवाय आपण ह्या मत्ता विकतही नाही. त्यामुळे हे तिन्ही प्रकार मत्ता म्हणून हवेहवेसे वाटत असले (आणि आपण घेतही असलो) तरी त्यांना आपली गुंतवणुक समजू नये. (तसंच कितीही महागाची घेतली असली, तरी आपण वापरत असलेली कार ही गुंतवणूक अजिबातच समजू नये. एकतर ती उत्पन्न काहीच देत नाही आणि विकताना ती खरेदीच्या किमतीपेक्षा अत्यंत कमी किमतीला विकावी लागते.)

 आपलं राहतं घर सोडून आणखी एखादं घर घेणं ही मात्र गुंतवणूक असते. ते घर भाड्याने देऊन त्यातून नियमित उत्पन्न मिळवू शकतो किंवा काही वर्षांनी त्याची किंमत वाढल्यावर ते विकून भरपूर परतावा मिळवू शकतो. तसंच आपल्या वापरातली सोडून जादाची जमीन घेणं हाही गुंतवणुकीचा पर्याय असू शकतो. जमिनीच्या किमती (सहसा) वाढत असतात. जमीन विकत घेऊन किंमत वाढल्यावर ती विकणं हा गुंतवणुकीचा पर्याय असू शकतो.

 मात्र घर किंवा जमीन ह्या मत्ता विकत घेण्यासाठी मुळात मोठ्या रकमेची गरज असते. राहतं घर किंवा वापरातली जमीन सोडून अधिकची मत्ता विकत घेण्याइतके पैसे आपल्याजवळ असतातच असं नाही. असं असताना कर्ज काढून अधिकची मत्ता घेणं गुंतवणुकीच्या दृष्टीने योग्य असतंच असं नाही. कर्जावर द्यावं लागणारं व्याज आणि अधिकच्या घरातून मिळणारं भाडं ह्यांचा ताळमेळ आपल्या देशात जुळत नाही. (गृहकर्जावर १०% ते १४% व्याज द्यावं लागतं, मात्र भाड्याचं उत्पन्न हे घराच्या किंमतीच्या ३% ते ५% असतं). त्यामुळे खिशात स्वतःचे भरपूर पैसे असतील तर ह्या दुसरं घर किंवा अधिकची जमीन ह्या गुंतवणुकी कराव्यात, कर्ज काढून करू नयेत.

 गुंतवणुकीचा सध्याचा जगातला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे ‘बाजारातली’ गुंतवणूक. ‘बाजार’ म्हणजे शेअर बाजार किंवा रोखे बाजार (किंवा वस्तू विनिमय बाजार). शेअर बाजाराची अगदी थोडक्यात ओळख सांगायची तर, देशभरातले छोटो-मोठे उद्योगधंदे चालवणाऱ्या सार्वजनिक कंपन्यांच्या भांडवलाचा काही भाग हा भांडवल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतो. त्या भांडवलाचा हिस्सा आपण विकत घेऊ शकतो. (सोप्या भाषेत शेअर्स विकत घेणं.) हे केल्याने त्यांच्या मालकीचा एक छोटा हिस्सा आपल्याकडे येतो आणि मालकीचा हिस्सा आपल्याकडे आल्याने त्या कंपन्यांच्या नफ्याचा हिस्सा (लाभांश किंवा dividend) आपल्याला मिळायला लागतो!

 आपण स्वतः उद्योगधंदा उभा करून त्यातून नफा कमावण्यापेक्षा एखाद्या यशस्वी उद्योगाच्या मालकीचा हिस्सा विकत घेऊन त्यातून नफ्याचा लाभांश मिळवत राहण्याची ही आधुनिक अर्थव्यवस्थेमधली उत्तम सोय आहे! आपल्याला नियमित उत्पन्न देण्याची आणि विकल्यानंतर भरपूर परतावा देण्याची शक्यता शेअर बाजारातल्या गुंतवणुकीत असते.

 मात्र शेअर बाजार म्हणजे सट्टेबाजी, शेअर बाजार म्हणजे नशिबाचा खेळ, शेअर बाजार म्हणजे संपूर्ण बेभरवशाची गुंतवणूक अशा अनेक समजुती आपल्याकडे असल्याने आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसं यापासून चार हात लांबच राहतो. (किंवा अभ्यास न करता उडी घेऊन हात पोळून घेतो).

 हे होऊ नये, यासाठी शेअर बाजार म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यात गुंतवणूक करण्याचे काय पर्याय आहेत यांचा अभ्यास केला पाहिजे. याविषयी पुढील लेखामध्ये.

  प्रसाद शिरगावकर