सदाशिवाच्या शूलापरि तो...

विवेक मराठी    13-Apr-2018
Total Views |

जगणं फार महाग झालंय,

आखीव, रेखीव, बेतीव झालंय.

चक्र थांबता थांबत नाही.

थांबणाऱ्याला क्षमा नाही.

शरीर नुसतं धावत सुटतं,

मन हाका मारत सुटतं.

मोह काही सुटत नाही अन देव काही भेटत नाही.

रूक्ष कोरडे व्यवहार सारे,

कोवळं काही दिसत नाही.

काहीतरी निसटतंय अशी हुरहुर आहे, पण काय ते कळत नाही.

.....अशा वेळी काय करावं ? आपल्या आतली ओल संपत चालली आहे, असं जाणवलं की एखाद्या कवितेला भेटावं! पाडगावकरांच्या शब्दात, 'सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं!'

कवितेने मुठीत धरलेल्या असतात उजेडाच्या बिया. तिच्या बंद मुठीतून झिरपणारा मंद प्रकाश आपल्याला खुणावतो, आपल्या आतला माणूस जागवतो. ती आपल्याला विझू देत नाही. म्हणून कवितेची सोबत हवी. पण दर वेळी अभ्यासकाच्या नजरेतूनच कविता समजते, भेटते असं नाही. कधीकधी सर्वसामान्य वाचकाच्या नजरेला ती निराळीच दिसते. प्रत्येकाच्या अनुभवाचा परीघ निराळा.

कविता ऐकताना त्याच्या मनात जागे होणारे संदर्भ निराळे. त्या संदर्भाचा इवला खडा पडताच त्याच्या मनात उमटणारे भावतरंग निराळे. त्यामुळंच अनेकदा, कविता एखाद्या रसिकाचं बोट धरून, त्या कवीने कल्पनाही न केलेल्या रस्त्यावरून त्याच्या मनात  असलेल्या आशयाच्या खूप पुढे जाईल, तर कधी त्यातल्या एखाद्याच शब्दाचे -ओळीचे तरंग पुन्हा पुन्हा उमटत राहतील.

म्हणून इथे आपण अभ्यास, चिकित्सा नाही करायची! होरपळलेल्या मनाला, सुकत चाललेल्या आयुष्याला बोट धरून कवितेच्या चांदणवाटेवर सोडून द्यायचं फक्त! ती वाट सारं विसरायला लावते. तिच्या स्निग्ध प्रकाशात जग निराळं दिसतं.

वास्तवाच्या भयसावल्यादेखील तिच्या चांदणी रसात बुडल्या की रम्य दिसू लागतात. सारे अभिनिवेश, आकांक्षा बाजूला ठेवून अनवाणी पायांनी या वाटेवर चाललो तर जगायला, ताजं टवटवीत राहायला लागणारी ओल पावलातून आत येते! या चांदणवाटेवर सर्व रसांनी परिपूर्ण असलेल्या कवितांना भेटत राहू!

सदाशिवाच्या शूलापरि तो...

मराठी माणसाचं भाग्य की अनेक दिग्गज कवींच्या अलौकिक कवितांचा समृध्द प्रदेश मराठी साहित्यात आहे. अभ्यासकांनाही उभा जन्म पुरणार नाही, इतका विस्तीर्ण काव्यप्रदेश. कितीतरी लोभावणाऱ्या चांदणवाटा आहेत! केवळ कुसुमाग्रजांच्या कवितांवर लिहायचं ठरवलं तरी आपली झोळी दुबळी ठरेल, इतका मोठा त्यांच्या लेखनाचा पैस. सूर्यपूजक कुसुमाग्रजांची कविता एकीकडे प्रखर, तेज:पुंज, तत्त्वनिष्ठ, तितकीच हळुवार कुसुमकोमल! पण ती केवळ कल्पनांच्या जगात रमली नाही. अलंकारिक शब्दांच्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून तिने तुच्छतेने समाजाच्या तळातल्या घटकांकडे पाहावं हे त्यांना कधीच मंजूर नव्हतं. त्यांच्या कवितेने क्रांतीचा उद्घोष केला, शेतकरी-मजूर-सैनिक यांच्या व्यथा बोलक्या केल्या. अनेक महानायकांवरही कुसुमाग्रजांनी कविता लिहिल्यात, पण त्यांच्या या कविता म्हणजे आरत्या नव्हेत. त्या व्यक्तीचं महानपण त्यांच्या कोणत्या गुणात वा कार्यात होतं हे अगदी नेमकेपणाने ते आपल्याला दाखवतात. त्या व्यक्तित्वाचा अर्क एखाद्या चित्रपटातून  वा चरित्रग्रंथातून जेवढा समजेल, त्यापेक्षा अधिक त्यांच्या नजरेतून त्या महापुरुषाला पाहताना आपल्याला कवितेतून सापडतो.

कुसुमाग्रजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेली कविता म्हणजे बाबासाहेबांचं सुरेख काव्यशिल्प!

सदाशिवाच्या शूलापरि तो

असा परजला

वादळ पिऊनी तो जलधीसम असा गरजला

मेघ होऊनि तो धरणीला

असा भेटला

वीज होऊनि तिमिरावरती

असा पेटला

वज्रबलाने शतशतकांचा

अडसर तुटला

मृत मातीवर नव्या मनूचा

अंकुर फुटला

शंकरांच्या त्रिशूळासारखी बाबासाहेबांनी त्यांची लेखणी, वाणी आणि कृती त्यांनी भोगलेल्या हजारो वर्षांच्या अन्याय्य परंपरांविरुध्द परजली होती. शंकराच्या हातातला त्रिशूल हा अभद्र, अमंगल वाईट गोष्टी नष्ट करणारा.

हिंदू धर्मात खोलवर रुजलेली जातिव्यवस्थेची अमंगल, अभद्र परंपरा समूळ उखडण्यासाठी त्यांनी एक नवा लखलखता त्रिशूल समाजाच्या हाती दिला, तो 'शिका-संघटित व्हा-संघर्ष करा' या मंत्राचा.

स्वत: बाबासाहेबांनी स्वत:चे कर्तृत्व सिध्द केल्यानंतरही त्यांना सोसावे लागलेले अपमान, उपेक्षा हे पोटात घालून ते समुद्रासारखे गर्जत होते, भारतीयत्वाची व राष्ट्रीयत्वाची आपली मर्यादा न सोडता! सगळया जगाने टाकून दिलेले मालिन्य, क्षार पोटात असूनही समुद्र सृष्टीचं जलचक्र सुरू ठेवण्यासाठी मेघ तयार करतो नि पुन्हा पृथ्वीवर सर्जनाचे मळे फुलवतो. बाबासाहेबांनी अफाट ज्ञानसाधनेच्या घुसळणीनंतर तयार झालेले विचारांचे, तत्त्वज्ञानाचे मेघ या मातीतून नव्या विचारांचे अंकुर उगवण्याच्या आशेने पाठवले. त्यांच्या विजेसारख्या लख्ख तेजस्वी विचारांनी समाजाचे डोळे दिपवले! शतकांच्या अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग दृग्गोचर झाला. त्यांच्या वज्रनिर्धाराने परंपरांचे अडसर तटकन तुटले! मृतवत झालेल्या अस्मितेवर त्यांनी आपल्या अवघ्या आयुष्यालाच असं काही शिंपडून टाकलं की त्या मातीतून अस्मितेचा हुंकार उमटला! नवी समाजव्यवस्था, नवी परंपरा निर्माण करणारा आधुनिक मनू त्यातून जन्माला आला. नव्या विचारांचा, नव्या दृष्टीकोनाचा, नवी क्षितिजं दाखवणारा! कुसुमाग्रजांच्याच 'दूर मनोऱ्यात' या कवितेतल्या 'किरणांचा उघडून पसारा

काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी'

या ओळींप्रमाणे शतकांच्या काळोखावर तेजाची लेणी खोदणारा देवदूत होता तो!

- 9890928411