बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीमधले घोटाळे

विवेक मराठी    18-Apr-2018
Total Views |

 

***इंद्रनील पोळ***

अमित भारद्वाजने बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीच्या जगात तुलनेने बऱ्याच आधी पाऊल टाकले. भारतात बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीबद्दल साक्षरता पसरवण्यात अमित भारद्वाजचा मोठा हात आहे, हेदेखील खरेच. अमित भारद्वाजने लिहिलेली पुस्तके वाचून बऱ्याच भारतीयांनी क्रिप्टोकरन्सीच्या जगात पदार्पण केले. मीदेखील बिटकॉइन आणि ब्लॉकचेन समजून घेताना त्याच्या पुस्तकांचा सुरुवातीला आधार घेतला होता, हे इथे मान्य करतो. पण हीच लोकप्रियता आणि बुध्दिमत्ता अमित भारद्वाजच्या डोक्यात गेली आणि त्यातून जन्म झाला 8000 मध्यमवर्गीय सामान्य लोकांचा बळी घेणाऱ्या घोटाळयाचा.

अलीकडेच नेटफ्लिक्सवर ओशोवरची डॉक्युमेंटरी 'अ वाइल्ड वाइल्ड कंट्री' बघत होतो. ती बघत असताना मनात घोळत होते की बुध्दिमत्ता आणि अहंकार यातली रेषा फार धूसर असते. ओशोंच्या आणि मुख्यत: त्यांच्या सहकाऱ्यांच्या बुध्दिमत्तेचे अहंकारात रूपांतर होऊन, नियम पाहिजेत तसे वाकवण्याच्या मुजोरीपर्यंत गेलेले त्यांचे अनुयायी, आणि त्यातून गर्ततेकडे सुरू झालेला ओशोंचा प्रवास याचे सुंदर चित्रण या डॉक्युमेंट्रीमध्ये केलेले आहे. हे डोक्यात घोळत असतानाच अमित भारद्वाज या माणसाने बिटकॉइन या चलनाद्वारे आठ हजार लोकांना दोन हजार कोटींचा चुना लावल्याची बातमी वाचण्यात आली आणि अहंकार आणि बुध्दिमत्तेबद्दल माझ्या मनात घोळत असलेला विचार पक्का होण्यास आणखी मदत झाली. आता कोणाला प्रश्न पडेल की ओशो आणि बिटकॉइन यांचा काय संबंध? किंवा अमित भारद्वाज असा कोण मोठा लागून गेला आहे की त्याची तुलना ओशोबरोबर व्हावी? खरे तर हा संबंध व्यक्तींचा नसून वृत्तीचा आहे. जगाचे नियम स्वत:ला हवे तसे वाकवूनही कोणी आपल्याला हात लावू शकणार नाही, या फाजील आत्मविश्वासात एखाद्याच्या बुध्दिमत्तेची परिणिती होते हीच ती वृत्ती होय.

भारतीय क्रिप्टोकरन्सी जगात अमित भारद्वाज हे तसेच प्रसिध्द नाव आहे. या लेखात आपल्याला व्यक्तीबद्दल बोलायचे नसले, तरी दोन हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या व्यक्तीची मनोवृत्ती समजून घेणे हे हा घोटाळा समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.

अमित भारद्वाजने बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीच्या जगात तुलनेने बऱ्याच आधी पाऊल टाकले. भारतात बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीबद्दल साक्षरता पसरवण्यात अमित भारद्वाजचा मोठा हात आहे, हेदेखील खरेच. अमित भारद्वाजने लिहिलेली पुस्तके वाचून बऱ्याच भारतीयांनी क्रिप्टोकरन्सीच्या जगात पदार्पण केले. मीदेखील बिटकॉइन आणि ब्लॉकचेन समजून घेताना त्याच्या पुस्तकांचा सुरुवातीला आधार घेतला होता, हे इथे मान्य करतो. पण हीच लोकप्रियता आणि बुध्दिमत्ता अमित भारद्वाजच्या डोक्यात गेली आणि त्यातून जन्म झाला 8000 मध्यमवर्गीय सामान्य लोकांचा बळी घेणाऱ्या घोटाळयाचा.

नेमका कसा घडला हा घोटाळा?

हे समजून घेण्यासाठी आपल्याला बिटकॉइन किंवा सामान्यत: कुठलीही क्रिप्टोकरन्सी कशी काम करते, हे थोडक्यात समजून घ्यावे लागेल.

बिटकॉइन किंवा क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमके काय? अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास क्रिप्टोकरन्सी हा डिजिटल चलनाचा एक प्रकार आहे. डिजिटल चलन म्हणजे नेमके काय? कुठल्याही वस्तूच्या क्रय-विक्रयासाठी मनुष्य समाज कित्येक शतके चलन व्यवस्था वापरतो आहे. नाणी, कागदी नोटा इत्यादी रूपात ही चलन व्यवस्था असू शकते - किंबहुना असतेच. गेल्या तीस वर्षांत झालेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जशा सगळयाच गोष्टी बदलल्या आहेत, तशीच चलन व्यवस्थासुध्दा काही प्रमाणात बदलली आहे. आज तुम्ही एखादी गोष्ट इंटरनेटद्वारे विकत घ्यायची म्हटल्यास तुम्ही भौतिक रूपात हे चलन देत नसून डिजिटल रूपात ते विक्रेत्याला देता. अर्थात तुमच्या बँकेतून ते चलन विक्रेत्याच्या बँकेत जमा होते. किंवा पेटीएमसारखे वॉलेट वापरूनदेखील तुम्ही एखादी गोष्ट विकत घेऊ  शकता. यात कुठेही चलनाची भौतिक देवाण-घेवाण होत नाही.

पण मग प्रश्न पडतो की जर तंत्रज्ञान वापरून आधीच सुरळीतपणे चलन व्यवहार होत असेल, तर बिटकॉइनसारख्या नवीन चलनाची गरज का पडावी? याचे उत्तर अर्थशास्त्राच्या दोन परस्पर भिन्न विचारधारांमध्ये दडलेले आहे. आजपर्यंत वापरात येणारे प्रत्येक चलन हे केंद्रीय चलन आहे. अर्थात त्या चलनावर एखाद्या केंद्रीय संस्थेचे संपूर्ण नियंत्रण असते. किती चलन छापायचे, किती चलन अर्थव्यवस्थेत खेळू द्यायचे हे ढोबळपणे ती केंद्रीय संस्था ठरवते. उदाहरणार्थ, भारतात रिझर्व्ह बँक ऑॅफ इंडिया हे काम करते. प्रत्येक देशाच्या चलनामागे कुठली ना कुठली केंद्रीय संस्था असते. त्या चलनाबद्दल सगळे निर्णय ही संस्था घेते. ह्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या संस्थेने गरजेपेक्षा जास्त चलन अर्थव्यवस्थेत आणले, तर त्या चलनाचे मूल्य कमी होऊन महागाई वाढते, सामान्य माणसाच्या बँकांमध्ये असलेल्या बचतीला काही मूल्य उरत नाही, इत्यादी. यावर उपाय म्हणून काही अर्थशास्त्रज्ञ विकेंद्रित पध्दतीचा वापर सुचवतात, जिथे एखादी केंद्रीय संस्था याबाबत निर्णय घेत नसून त्या चलनाचा वापर करणारा प्रत्येक जण त्या चलनाच्या निर्मिती प्रक्रियेत, तसेच वितरण व्यवस्थेत सहभागी असतो.

विकेंद्रीकरणामुळे केंद्रीय पध्दतीतले दोष दूर होऊन चलन हे संपूर्णत: फक्त आणि फक्त आर्थिक दळणवळणाचे साधन म्हणून उरते, असा हा युक्तिवाद आहे. हे बोलायला किंवा कागदोपत्री मांडायला कितीही आदर्श वाटत असले, तरी अगदी आताआतापर्यंत अमलात आणणे जवळजवळ अशक्य होते. इंटरनेट सर्वदूर पोहोचल्यानंतर मात्र पहिल्यांदा अशी विकेंद्रित चलन पध्दती निर्माण होण्याच्या शक्यता वाढल्या. 2009मध्ये सातोशी नाकामोटो हे टोपणनाव घेतलेल्या अज्ञात व्यक्तीने अथवा व्यक्तिसमूहाने एका श्वेतपत्रिकेद्वारे सर्वप्रथम हे विकेंद्रीकरण कसे करता येईल याचे भक्कम गणित मांडले आणि त्यातून बिटकॉइन नावाचे चलन उभे राहिले. बिटकॉइन हे पहिले संपूर्ण विकेंद्रित चलन असून त्याने चलन व्यवहारातल्या बऱ्याच त्रुटी दूर केल्या. बिटकॉइनने पहिल्यांदा कागदी चलनाचे दुष्परिणाम - उदाहरणार्थ, काळा पैसा साठवणे, पैशाचे दर्ुव्यवहार इत्यादी गोष्टींवर एक भक्कम उत्तर दाखवले. याचे कारण हे विकेंद्रित चलन असल्यामुळे याद्वारे होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची नोंद चलन व्यवस्थेत प्रत्येक नोडवर व्हायला लागली. त्यामुळे नोंदींमध्ये गडबड करणे, त्या बदलणे इत्यादी गैरव्यवहारांना लगाम बसला.

असे असतानादेखील मग बिटकॉइन वापरून एखाद्या व्यक्तीला दोन हजार कोटींचा घोटाळा करणे कसे शक्य झाले? हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. त्याचे उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला हा घोटाळा नेमका काय आहे हे समजून घेतले पाहिजे.

अमित भारद्वाज हा गेले एक दशक किंवा त्याहून अधिक काळ तंत्रज्ञानाच्या जगतात आहे. 2012मध्ये त्याने भारतातली पहिली ई-कॉमर्स कंपनी सुरू केली, जी बिटकॉइनमध्ये चलन स्वीकारत होती. इथून क्रिप्टोकरन्सीशी त्याचा संबंध आला. 2016मध्ये भारद्वाजने संपूर्णपणे क्रिप्टोकरन्सीमध्ये काम करणारी कंपनी सुरू केली आणि इथून त्याच्या गैरव्यवहारांना सुरुवात झाली. इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ही संकल्पना मुळात विकेंद्रित चलन व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश ठेवून निर्मित केलेली आहे. आज हौशी लोक गुंतवणूक म्हणून मोठया प्रमाणात त्याचा उपयोग करत असले, तरी गुंतवणूक हा त्याचा मूळ उद्देश नाही. आणि अमित भारद्वाज इथेच अडकला. त्याने लोकांना हे गुंतवणुकीचे साधन म्हणून विकायला सुरुवात केली. गुंतवणूकसुध्दा मल्टीलेव्हल मार्केटिंग स्वरूपाची होती. कुठल्याही मल्टीलेव्हल मार्केटिंगमध्ये असतो तसाच इथेही नवीन आलेल्या प्रत्येकाने जास्त लोकांना या योजनेत जोडल्यावर त्यांना नफा मिळणार होता. साधारणत: कुठलीही मल्टीलेव्हल मार्केटिंग स्कीम गैरव्यवहारावर आणि घोटाळयावर आधारित असते, तशीच ही स्कीमसुध्दा होती. भारद्वाजने लोकांना अतिशय विश्वसनीय असे प्रलोभन द्यायला सुरुवात केली, ते म्हणजे तुम्ही समजा त्याच्या कंपनीत एक बिटकॉइन गुंतवला, तर तो तुम्हाला या एका बिटकॉइनवर दर महिन्याला दहा टक्के या दराने 18 महिने व्याज देणार.

खरे तर गुंतवणूकदारांच्या मनात इथेच शंका यायला हवी होती. कुठलीही गुंतवणूक या प्रकारचा परतावा देत नाही. त्यातून बिटकॉइन हे मुळातच चलन असून सध्या अतिशय मोठया चढउतारातून जातेय. पण एकूणच तंत्रज्ञानाबद्दल असणाऱ्या उदासीनतेमुळे आणि झटपट श्रीमंत होण्याच्या स्वप्नांमुळे बऱ्याच लोकांनी त्याच्याकडे पैसे गुंतवायला सुरुवात केली. बरे, जर गुंतवणूक रुपयात असून व्याज बिटकॉइनमध्ये मिळाले असते, तरी एक वेळ गणित काही प्रमाणात जुळले असते. मात्र, भारद्वाज गुंतवणूकसुध्दा बिटकॉइनमध्ये घेत होता. हा परतावा कसा मिळेल हे विचारल्यावर त्याचे उत्तर किचकट तांत्रिक असायचे, जे सामान्य माणसाच्या डोक्यावरून जाईल. पण क्रिप्टोकरन्सीमध्ये थोडीतरी गती असणाऱ्या माणसाला त्याची चलाखी लगेच लक्षात यायची.

भारद्वाज सांगायचा की या गुंतवणुकीतून तो चीनमध्ये एका मोठया बिटकॉइन मायनिंग फार्ममध्ये पैसे गुंतवतो. बिटकॉइन माइनिंग फार्म हे कॉम्प्युटर सर्व्हर्सने भरलेले मोठे मोठे गोडाऊन असतात, जिथे सलग सांख्यिकीने नवीन बिटकॉइन तयार होतात. (हा जरा तांत्रिक विषय असून या लेखाचा विषय नाही. तरी जिज्ञासूंनी 'बिटकॉइन मायनिंग' गूगलवर शोधावे.) पण भारद्वाज याच्या एकतर हे लक्षात आले नाही किंवा त्याने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले की बिटकॉइन ज्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे, ते तंत्रज्ञान चलन निर्माणाच्या आणि चलन वितरणाच्या बाबतीत अतिशय चोख असून त्यात नेहमी संतुलन राखून असते. त्यामुळे त्याने बिटकॉइन मायनिंगसाठी कितीही सर्व्हर्स वापरले असते, तरी त्याच्या वाढत्या मल्टीलेव्हल मार्केटिंग स्कीमच्या गुंतवणूकदारांना दर महिना दहा टक्के व्याज देणे त्याला निव्वळ अशक्य होते.

शेवटी व्हायचे तेच झाले. गुंतवणूकदारांचा पैसा बुडाला आणि पोलिसांनी अमित भारद्वाज पळून जात असताना त्याला दिल्ली विमानतळावर पकडले.

या संपूर्ण घोटाळयात बिटकॉइनचा सहभाग नगण्य आहे. भारद्वाजने बिटकॉइन फक्त एक गुंतवणुकीची वस्तू म्हणून वापरले. या संपूर्ण घोटाळयाचा बिटकॉईन व्यवहाराशी अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. त्याने बिटकॉइनऐवजी सोने वापरले असते, तरी हा घोटाळा असाच झाला असता. बिटकॉइनच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन लोकांना लुबाडायचा एक तुलनेने सोपा मार्ग त्याला मिळाला, एवढेच. त्यातून बिटकॉइनची तांत्रिक किचकट माहिती त्याच्या पथ्यावर पडली आणि क्रिप्टोकरन्सी विश्वातली त्याची विश्वासार्हता त्याच्या कामाला आली. यातून आणखी एक गोष्ट सिध्द झाली, ती म्हणजे तंत्रज्ञानाने आर्थिक गैरव्यवहारांवर कितीही आळा घालायचा प्रयत्न केला, तरी कमी कष्टात श्रीमंत होण्याची मनुष्याची मूळ लालसा यावर वेळोवेळी पाणी फेरत असते आणि फेरत राहणार.

pole.indraneel@gmail.com

(लेखक तंत्रज्ञान विशेषज्ञ असून सध्या जर्मनीमध्ये आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि व्हर्च्युअल रिऍलिटी यासारख्या नव-तंत्रज्ञानावर काम करतात.)