केल्याने देशाटन...

विवेक मराठी    02-Apr-2018
Total Views |

मी शाळा किंवा पाठयपुस्तकांतून जितके शिकलो नसेन, एवढे मुक्त जगातील अनुभवांतून शिकलो आहे. विशेषत: माझे व्यक्तिमत्त्व समृध्द होण्यात आणि मला व्यवसायाची नवी दृष्टी लाभण्यात विविध देशांत घडलेल्या प्रवासांचा फार मोठा वाटा आहे. परदेशांमधील शिस्त, संस्कृती, आतिथ्य, माणुसकी यातून माझ्याही जाणिवेचा परीघ विस्तारला. त्यामुळे परदेशात जाण्याची संधी मिळाली तर ती सोडू नये, या मताचा मी आहे.

मी परदेशात जाऊन एक बहुराष्ट्रीय उद्योग समूह स्थापन करणारा यशस्वी उद्योजक होईन, असे भविष्य माझ्या लहानपणी कुणी वर्तवले असते तर मला हसू फुटले असते, कारण माझ्या एकंदर शालेय प्रगतीकडे बघून वडिलांनी अभ्यासाबाबत विचारपूस करणे कधीचेच सोडून दिले होते आणि मी पुढच्या आयुष्यात किमान टर्नर, फिटर किंवा वायरमन होऊन पोटापुरते मिळवावे या अपेक्षेने आईने मला टेक्निकल स्कूलमध्ये घातले होते. पण नशिबाने माझ्या आयुष्यात प्रगतीचा पहिला दरवाजा उघडला तो मला परदेशात जाण्याची संधी देऊन. वडिलांना मदत करण्यासाठी मी दुबईला गेलो. त्या शहराने माझी कडक परीक्षा घेतली आणि कसोटीवर उतरल्यावर माझ्यावर यश-समृध्दीचा वर्षावही केला.

देशाटन आपली दृष्टी व्यापक बनवते आणि आपल्याला अनुभवसंपन्न बनवते, याबाबत माझ्या मनात शंका नाही. म्हणूनच ज्यांना शिक्षण-नोकरी-व्यवसाय किंवा पर्यटनाची संधी मिळेल, त्यांनी परदेशांमध्ये अवश्य जाऊन तेथील समाजांचे सूक्ष्म निरीक्षण करावे, त्यांच्यात मिसळावे, त्यांच्यातील चांगले गुण आत्मसात करावेत, असे मी आवर्जून सांगतो. परदेश प्रवासांनी माझ्यातील पुष्कळशा त्रुटी दूर करून माझ्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवला आहे.

मी दुबईत सर्वप्रथम गेलो, तेव्हा मला तेथील स्थानिक अरबी भाषेचा गंधही नव्हता आणि इंग्लिशही तोडके-मोडके जमत होते. यामुळे माझी फार अडचण व्हायची. एखादा ग्राहक स्थानिक अरबी भाषेत बोलू लागताच माझी तारांबळ उडे. मला इंग्लिश नीट बोलता येत नाही, हे बघून काही उच्चभ्रू लोक मुद्दाम माझी मजा करत. ते अस्खलित इंग्लिशमधून माझ्यावर वाक्यांची फैर झाडत. मला त्या सफाईने उत्तरे देता येत नसत. हा परकी भाषेचा न्यूनगंड मोडून पडण्यास एक अरब ग्राहक कारणीभूत ठरला. तो माणूस अरबीतून माझ्याकडे काही चौकशी करू लागताच मी भांबावून त्याच्या तोंडाकडे बघत राहिलो. काही वेळानंतर त्यालाच उमगले की त्याची भाषा मला येत नाही. त्यावर त्याने एका वस्तूकडे खूण केली आणि मनगट उभे धरून दुसऱ्या हाताने त्याच्या मध्यावर थाप मारली. त्यासरशी माझी टयूब पेटली. त्याला ती वस्तू अर्धा किलोमध्ये हवी होती. मी तो पॅक काढून देताच तो हसला आणि निघून गेला.

परदेशात जाताना स्थानिक भाषा येत नसल्याचा न्यूनगंड बाळगू नये. तुम्ही नवखे आहात हे तेथील लोकांनाही ठाऊक असते. ते भाषेवरून तुमची चेष्टा कधीच करत नाहीत. उलट तुम्ही त्यांची भाषा जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास आनंदाने मदत करतात. मी अरबी भाषा अशीच प्रयत्नपूर्वक ऐकून-ऐकून बोलायला शिकलो. एकदा भाषेचा न्यूनगंड गळून पडताच मी एका संभाषण वर्गात नाव नोंदवून इंग्लिशही उत्तम बोलायला शिकलो. येथे मी एक गोष्ट स्पष्ट करतो की परदेशात जाताना तुम्हाला तेथील भाषा आली नाही तरी चालते, पण तुम्ही तेथे तीन वर्षांहून अधिक काळ राहिलात आणि तरीही ती भाषा शिकला नाहीत, तर मात्र तुमच्या प्रगतीच्या अनेक संधी हातातून जातात आणि तेथील लोकांनाही तुमच्या वागण्यात हट्टीपणाचा किंवा अहंकाराचा संशय येऊ लागतो.

माणसाने परदेशात कधी जावे. एकतर आपल्यावर नात्याच्या जबाबदाऱ्या नसताना, म्हणजे अविवाहित असताना जावे किंवा विवाहित असल्यास कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करून जावे. मी आणि माझी पत्नी युरोपमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना आमचे मराठी भाषेतील संभाषण ऐकून जवळ उभा असलेला वेटर एकदम भावनाशील झाला. त्याच्याशी बोलताना त्याचे डोळे पाणावल्यासारखे वाटले. मग आम्ही विचारपूस केल्यावर त्याने सांगितले, की तो तीन वर्षांपासून त्या हॉटेलात नोकरी करत होता आणि घरी पैसे पाठवायचे असल्याने भारतात सुट्टीसाठी जाण्याचा प्रवास खर्च टाळत होता. मात्र त्याची व्यथा ही होती, की विवाह झाल्यावर सहाच महिन्यांत त्याला परदेशात जायची संधी मिळाली होती. त्याला गेली तीन वर्षे पत्नीच्या वियोगाचे दु:ख व्याकूळ करत एकाकी जीवन जगावे लागत होते. आम्हालाही त्याचे वाईट वाटले. म्हणून मी तरुणांना आवर्जून सांगतो की विवाहित असाल तर आधी वैवाहिक मधुर सहजीवनाचा, नात्यातील प्रेमाचा आनंद घ्या आणि नंतर पराक्रम करायला बाहेर पडा.

परदेशांत असताना मी तेथील भारतीयच नव्हे, तर परदेशी समाजांकडूनही खूप शिकलो. कुणी रोखठोकपणे आपली चूक दाखवून दिली, तर त्याचा अपमान मानला नाही. मला आठवते, मोबाइल जेव्हा नवीन होते, तेव्हा एका बैठकीत मी रिंग वाजली म्हणून पटकन फोन कानाला लावला. समोरची व्यक्ती एक युरोपियन वयस्कर गृहस्थ होते. ते माझ्यावर रागावले, पण त्यांनी हेही समजावून दिले की समोरची व्यक्ती बोलत असताना संभाषण तोडणे किंवा त्यात व्यत्यय आणणारे हावभाव करणे, अगदी कान-नाक-कपाळ चोळण्याच्या सवयीही अपमानास्पद ठरतात. मी त्यातून बोध घेतला आणि नंतर बिझनेस एटिकेट्स काटेकोर पाळण्यात पारंगत झालो. मला गुजराती-सिंधी-पंजाबी-अरबी-बांगला देशी अशा विविध देशांतील व्यावसायिकांकडून व्यवसायातील कानमंत्र शिकायला मिळाले आहेत.

काही प्रेरणादायी अनुभवही मला परदेशांमध्येच शिकायला मिळाले, ज्यामुळे माझ्या कार्यशैलीत मोठे बदल झाले. उदाहरणार्थ, मी पूर्वी माझा व्यवसाय पारंपरिक पध्दतीने चालवत होतो. जिरे-बडीशेप अशा वस्तूंमध्ये काडयांचा कचरा येत असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केल्यावर मी त्यावर उपाय-योजना करायचे ठरवले. नेमके त्याच वेळी दुबईत दरसाल भरणारे वर्ल्ड फूड एक्झिबिशन भरले होते. या प्रदर्शनात खाद्य उद्योगाला गरजेची नवी यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान प्रदर्शित केले होते. खाद्यवस्तूंना मानवी स्पर्श न होता ती सुरक्षित पॅक होऊन ग्राहकांच्या हातात पडेल, असे तंत्रज्ञानही त्यात होते. मी त्या यंत्रांची ऑॅर्डर दिली आणि मसाल्याचे कारखाने उघडले. उत्पादने शुध्द, स्वच्छ व सुरक्षित मिळू लागल्याने ग्राहकांचा माझ्यावर विश्वास बसला, जो आजवर कायम टिकून आहे. बदलते तंत्रज्ञान स्वीकारणे हितकारक असते, हे मी त्यातून शिकलो. आजही मी परदेशांत जाऊन महत्त्वाची प्रदर्शने बघतो आणि त्यातून नवे कल समजून घेतो.

मी दुबईत भारतीय व विशेषत: मराठी संस्कृतीचे जतन करण्यास प्रयत्नशील आहे. यापाठीमागेही परदेशातील एक अनुभवच कारणीभूत आहे. एकदा मी पत्नीसह इटलीमध्ये सहलीसाठी गेलो होतो. दिवसभर फिरल्यानंतर सायंकाळी आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पायी परत चाललो होतो. भूक लागली होती म्हणून आम्ही आसपास एखादे रेस्टॉरंट दिसतेय का, ते बघत होतो, पण जरा उशीर झालेला असल्याने बहुतेक रेस्टॉरंट बंद झालेली दिसली. अशाच एका बंद झालेल्या रेस्टॉरंटच्या समोर उभ्या असलेल्या वृध्द दांपत्याला आम्ही विचारले, की ''येथे जवळपास खाण्याची सोय असलेले ठिकाण आहे का?'' त्यांनी आम्हाला विचारले, ''तुम्ही कुठून आलात?'' आम्ही भारतीय पर्यटक आहोत, हे समजल्यावर त्या दोघांनी माघारी वळून बंद केलेले रेस्टॉरंटचे शटर उघडले. ते रेस्टॉरंट ते दोघेच चालवत होते आणि रोजच्या वेळेप्रमाणे बंद करून घरी चालले होते. त्या इटालियन गृहिणीने झटपट करता येण्यासारख्या डिश बनवून पंधरा मिनिटांत आम्हाला खाऊ  घातले. जाताना आम्ही त्यांचे आभार मानू लागलो, त्यावर ते म्हणाले, ''तुम्ही इतक्या लांबून आमचा देश बघायला आलात तर तुम्हाला येथे थोडेसेही खायलाही मिळू नये? आमच्या देशात आलेल्या पाहुण्यांना एक वेळही उपाशी राहायला लागणे, हा आम्ही आमचा राष्ट्रीय अपमान समजतो. आम्ही फार काही केले नाही. तुमचे आतिथ्य करणे आमचे कर्तव्यच होते.''

परदेशी लोकांपुढे आपल्या देशाचा मान-सन्मान आणि संस्कृती कशी जपावी, याचे आदर्श उदाहरण मी त्या दिवशी बघितले. त्यांचे स्वत:च्या देशाविषयीचे प्रेम आणि परदेशी माणसांप्रतीची आपुलकी मला खूप भावली. मी दुबईत परतलो तो हीच दृष्टी घेऊन. अगदी आजही मी दुबईसह आखाती देशांत भारतीय संस्कृतीचा गौरवपूर्ण प्रचार आणि प्रसार करण्यात सक्रिय आहे. भारतीयांनी जगभर जाऊन आपल्या देशाची शान वाढवणारी कामगिरी करावी, असे मला वाटते.

मित्रांनो! परदेशात गेल्याने कोणते लाभ होतात, हे सांगणारे एक छान सुवचन अनुकरणीय आहे आणि ते खरे ठरते, हा अनुभव मी नेहमीच घेतला आहे -

केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार।

शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार॥

***

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 00971505757887 या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवू शकता.)