समस्यांवर नको, उपायांवर बोलू या

विवेक मराठी    20-Apr-2018
Total Views |

गुन्ह्यानंतर त्वरित न्याय व ग़ुन्हेगाराला कडक शिक्षा हे भविष्यात गुन्हा करणाऱ्याला जरब बसण्यासाठी गरजेचे आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचे आहे ते त्यामागची मानसिकता लक्षात घेऊन त्यावर मूलगामी उपायांची रचना करणे. मुलींच्या सामाजिक सुरक्षेसाठी मुलींनाच जबाबदार धरणे पुरेसे नाही. त्यासाठी समाजात निरोगी, निर्भय वातावरण निर्माण करायला हवे. यासाठी किशोरवयीन मुलींसोबत मुलांनाही प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

 देशात महिला अत्याचाराचा दुर्दैवी प्रसंग घडतो अन अचानक सर्व समाजमनाच्या संवेदना जाग्या होतात. गुन्ह्याचा, गुन्हेगाराचा निषेध करून समाजमन थांबत नाही, तर तो कोणत्या जातीचा, धर्माचा, विचारधारेचा याचा शोध सुरू होतो. कित्येकदा नेमकी माहिती न घेता सोयीस्कर तर्काच्या आधारे रान पेटवले जाते. दुर्दैवाने या सगळयात प्रश्नाच्या मुळाशी जाणे राहून जाते, मग उपायांची चर्चा करणे दूरच.

कोणत्याही गुन्ह्यानंतर त्वरित न्याय व गुन्हेगाराला कडक शिक्षा हे भविष्यात गुन्हा करणाऱ्याला जरब बसण्यासाठी गरजेचे आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचे आहे ते त्यामागची मानसिकता लक्षात घेऊन त्यावर मूलगामी उपायांची रचना करणे. खरे तर अगदी लहानपणापासूनच लिंगसमभाव, समादर या गोष्टी मनावर बिंबवल्या जायला हव्यात. आपले शिक्षण व कुटुंबरचनादेखील या बाबतीत फारशी यशस्वी ठरलेली नाही. नवनव्या माध्यमांना हाताळणाऱ्या व माहिती, आदर्श, संवाद सर्वच बाबतीत या माध्यमांवर अवलंबून असणाऱ्या मुलामुलींच्या मनात प्रचंड अस्थिरता, गोंधळ आहे.  लैंगिकता वा अन्य भावनांची हाताळणी, आयुष्यात एखादे उच्च ध्येय असणे, अंगात खदखदत असलेला असंतोष वा ऊर्जा याला विधायक वळण देणे याचे प्रशिक्षण किशोरवयीन मुलामुलींसाठी फार आवश्यक आहे. दुर्दैवाने या सर्व बाबतीत कठुआतील डोंगरदऱ्यांत भटकणारा अल्पवयीन मुलगा असो वा उच्चभ्रू शाळेत जाणारी मुले, दोन्हीही स्तर सारखेच अभावग्रस्त आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींच्या सामाजिक सुरक्षेसाठी मुलींनाच जबाबदार धरणे पुरेसे नाही. त्यासाठी समाजात निरोगी, निर्भय वातावरण निर्माण करायला हवे.

यासाठी पुरुषांचीही मानसिकता बदलायला हवी व त्याची सुरुवात किशोरवयीन मुलग्यांच्या प्रशिक्षणापासून व्हायला हवी आहे. महाराष्ट्रातील काही स्वयंसेवी संस्था यावर काही ठोस कार्यक्रम राबवीत आहेत.

अनेक संस्थांनी किशोरवयीन मुलींबरोबरच किशोरवयीन मुलांसाठीही विविध शिबिरे, कार्यशाळा यांची रचना केली आहे. त्यातून त्यांना मिळणारा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. शिक्षणतज्ज्ञ व प्रयोगशील कार्यकर्त्या असलेल्या शोभना भिडे या नाशिकच्या 'आनंदनिकेतन' या शाळेच्या माध्यमातून अनेक वर्षे किशोरवयीन मुलामुलींमध्ये काम करत आहेत. या विषयात त्यांनी असे मत मांडले की ''अत्याचारांच्या अनेक कारणांचा विचार करताना त्यामागची मानसिकता व ती कशातून निर्माण होते हे लक्षात घ्यावेच लागते. याचे मूळ प्रामुख्याने पौंगडावस्थेत होणाऱ्या स्थित्यंतरापर्यंत जाऊन पोहोचते.

 

प्रसारमाध्यमातून सतत समोर दिसणारे आक्रमक व विकृत लैंगिक चित्रण, थरारक व देमार चित्रपट वा मालिका, बारीकसारीक तपशिलासह समजणाऱ्या हिंसाचाराच्या बातम्या यामुळे पौगंडावस्थेतील मुलांच्या मनावर परिणाम होतोच. या संवेदनांमुळे संप्रेरकांचे असंतुलन निर्माण होऊन वयात येण्याचे प्रमाण अलीकडे येत आहे.

त्यातच नैतिक मूल्यांच्या बदलत्या संकल्पना, स्वातंत्र्य या संकल्पनेचे अतिरिक्त भान याची भर पडते. मुलांच्यात एक प्रकारचे भावनिक अस्थैर्य येते. या वयात आत उसळणाऱ्या लैंगिक भावना, आक्रमकता, जबरदस्त उत्सुकता या भावनांना कसे हाताळायचे हे त्यांना समजत नाही.  सहनशीलतेची पातळी कमी असते. पडते, नमते घेण्याची सवय नसते, नकार पचवता येत नाही. संपत चाललेल्या संवादामुळे नेमके मार्गदर्शन मिळत नाही. मग मुले समवयस्कांच्या अपरिपक्व चर्चा व इंटरनेट यावरच सर्वस्वी अवलंबून राहतात. यातूनच मग काही टोकाची अविचारी कृत्ये घडतात. काही मुलांच्यात या संवेदनांविषयी घृणा उत्पन्न होते. या साऱ्यापासून मुलांना दूर ठेवायचे, तर त्यांच्यासमोर त्यांच्या आवडीचे काहीतरी ध्येय असावे लागते. सर्वात महत्त्वाचे आहे ते मुलांना संवादातून बोलते करणे, मोकळे करणे.

मुलांना हल्ली सगळे माहीत असते हा समज चुकीचा आहे. अर्धवट माहिती फार घातक असते. मुलांना योग्य वयात योग्य प्रकारे व योग्य माध्यमातून योग्य माहिती मिळणे फार गरजेचे आहे. नाशिकच्या आनंदनिकेतन शाळेत आम्ही अनेक वर्षे सातत्याने मुलामुलींसाठी एकत्र 'आत्मभान' शिबिरे घेत आहोत. त्यात असे लक्षात येते की मुले गटात एकमेकाच्या आधाराने मोकळे बोलतात. मुलामुलींच्या अतिशय निरोगी मोकळया चर्चा होऊ  शकतात. शरीररचना, वयात येणे व त्या काळातले शारीरिक तसेच भावनिक बदल, मैत्री, प्रेम, आकर्षण यातील फरक, समाजमाध्यमांचा जबाबदार वापर असे अनेक विषय यात चर्चा, प्रसंग सादरीकरण अशा विविध प्रकारे हाताळले जातात. खरे तर शाळा हे या चर्चांसाठीचे सर्वात योग्य ठिकाण आहे. हा विषय निरंतर चर्चांतून विकसित होत राहणारा असल्यामुळे विविध विषयांच्या निमित्तानेही हे विषय पुढे नेता येतात. मुलांच्या कोणत्याही प्रश्नाचे स्वागत आहे, अशा आश्वासक वातावरणात माहिती देत राहिले, तर मुले विषय गांभीर्याने घेतात, माहिती विचारतात असा अनुभव आहे.

मूल ज्या संकल्पनेत वाढते, त्यातून त्याचा एक लिंगविशिष्ट दृष्टीकोन तयार होतो. त्यातूनच पुढे लिंगभेदाला प्रोत्साहन मिळते. पण अशा निरंतर कृतिसत्रांतून मुलांच्या मनात लिंगसमभावाची पेरणी सहज करता येते. यासाठी एकास एक बोलणे, समुपदेशन, गटचर्चा अशा विविध मार्गांनी जावे लागते. मुलांनी समाजाचा घटक म्हणून वावरताना त्यांनी स्वत:च्या लैंगिक आयुष्याची जबाबदारी नीट पेलावी, आपल्या भावना योग्य पध्दतीने हाताळायला शिकावे, स्वत:चे शरीर नीट ओळखावे व जपावे हे सांगतानाच, दुसऱ्याच्या शरीराचा आदर करावा, हेही सांगता येते.''

आत्मभान शिबिरातून मुलांना हे भान देण्यात शोभनाताई व त्यांचा चमू किती यशस्वी झाला आहे, हे शिबिरांना मिळणारा प्रतिसाद व त्याला गावोगाव येत असलेली मागणी यातून सिध्द झाले आहे. परंतु मुख्य गरजेचा आहे तो मुलामुलींशी नित्य व योग्य संवाद. खरे तर आताचे पालक यात खूपच मागे पडत आहेत. कारण बदलाच्या प्रचंड वेगापुढे त्यांना माहीत असलेली पारंपरिक संस्कारांची वा आज्ञापालनाची पध्दत आता पुरेशी ठरत नाहीये. दर वेळी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे शक्यही नाही व व्यवहार्यही. मुलांशी संवाद साधू शकणारे 'किशोर मित्र' जर समाजात तयार होऊ शकले, तर थेट मानसोपचारतज्ज्ञांची गरजही नाही.

पालक, शिक्षक वा या अवस्थेतून पार पडलेली व मुलांचे आदर्श बनू शकतील अशी तरुण मुले-मुली असे 'संवादक' बनू शकतात. मात्र त्यासाठी याचे थोडे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. किशोरवयीन मुलामुलींसाठी काम करणाऱ्या संस्थांना एकत्र आणून या विषयासाठी रीतसर प्रशिक्षण कार्यक्रम बनवणे, संस्थांच्या अनुभवांचे आदानप्रदान होऊन काही चांगले साहित्य, अभ्यासक्रम व निरंतर प्रशिक्षणाची व्यवस्था उभी करणे हे काम सेवावर्धिनी ही संस्था करत आहे. त्यातून गावोगावचे कार्यकर्ते प्रशिक्षित व्हावेत व विशेषत: किशोरवयीन मुलांसाठी कार्यक्रम-शिबिरे-संवाद याचे प्रमाण व गती वाढावी, असे प्रयत्न संस्था करते आहे.

कोपर्डी असो वा कठुआ, अशा दुर्घटना या संस्काराचा, नीतिमूल्यांचा व पालकत्वाचा पराभव दर्शवतात. त्याला वारंवार सामोरे जायचे नसेल, तर समाजाच्या निरोगी मानसिकतेसाठी सर्वांनी शास्त्रशुध्द व नेमके प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे.

9890928411