हे शुभ संकेत आहेत!

विवेक मराठी    20-Apr-2018
Total Views |

मागच्या आठवडयात आपल्या समाजजीवनाची खरी ओळख करून देणारी एक महत्त्वाची घटना घडली. ती जरी हैदराबादमध्ये घडली असली, तरी एकूणच भारतीय समाजव्यवस्थेचे आणि मानसिकतेचे प्रतिबिंब त्यातून प्रकट झाले, असे म्हणायला हरकत नाही. तामिळनाडूतील प्राचीन रंगनाथ स्वामी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने एका विद्वान दलित बांधवाला खांद्यावर बसवून मंदिराच्या गाभाऱ्यात नेले. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचे नाव सी.एस. रंगराजन असे असून ज्या दलित बांधवाला खांद्यावर घेऊन मुनीवहन हा विधी पूर्ण केला गेला, त्याचे नाव आदित्य पार्सरी असे असून तेही आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी पुरुष आहेत. एखाद्या मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने एका दलित बांधवाला आपल्या खांद्यावर घेतले आणि मंदिरात नेले, तर त्यात काय विशेष? आणि त्याला कशाला इतके महत्त्व दिले पाहिजे? असाही प्रश्न आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातील काही मंडळींना पडू शकतो. किंवा समाजाला धर्माच्या दावणीला पुन्हा बांधण्याचा सनातन्यांचा डाव आहे असाही आरोप काही मंडळी या घटनेच्या पार्श्वभूमीवर करू शकतात. आम्हाला मात्र हा शुभ संकेत वाटतो, ज्यातून नव्या समाजजीवनाची दिशा स्पष्ट होत आहे. आणि म्हणूनच भारतीय समाज- व धर्मइतिहासात सुवर्णाक्षरात या घटनेची नोंद केली पाहिजे.

जातिभेद कायद्याने अस्पृश्यता संपली. सामाजिक जीवनात जरी परस्परांशी हीन भावनेने व्यवहार केला जात नसला, तरी धार्मिक क्षेत्रात - विशेषतः मंदिर-देवालयात असा उच्च-नीचतेचा व्यवहार होतो आणि तो धर्मापेक्षाही जास्त प्रमाणात मानवी मनाशी जोडलेला आहे. एका बाजूला सारी एकाच ईश्वराची लेकरे असा उद्घोष करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच लेकरांमध्ये जातीच्या आधाराने भेदभाव करत कोणाला गाभाऱ्यात प्रवेश द्यायचा आणि कुणाच्या सावलीचा विटाळ मानायचा, हे ठरवले जात होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर स्वामी रंगनाथ मंदिरातील ही घटना म्हणजे  'भेदाभेद अमंगळ' अशी ग्वाही मानायला हरकत नाही. दक्षिणेकडील राज्यांत धर्म, मंदिर, कर्मकांड अशा गोष्टींमध्ये थोडी जास्तच कर्मठता आचरली जात असते. त्या पार्श्वभूमीवर हे पुढचे पाऊल आहे आणि शुभ संकेत देणारी अशी पावले दक्षिणेतील सर्वच राज्यांत लवकरच उमटतील, अशी शक्यताही या निमित्ताने निर्माण झाली आहे. कारण सामाजिक बदलाचे एक पाऊल हे कित्येक दशकांचे असते. काही वर्षे समाजाची मानसिकता तयार करण्यात खर्ची घातल्यावरच बदलाच्या दिशेने वाटचाल सुरू होते.

आपण महाराष्ट्रात या वाटचालीचा शुभारंभ संत चोखोबांच्या विद्रोहाने झालेला आहे. पुढच्या काळात संत गणपती महाराज, स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर, साने गुरुजी इत्यादी महापुरुषांनी समन्वय, संवाद आणि सहभाग या तीन सूत्रांच्या आधाराने या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे. समाजाची मानसिकता घडवून आणली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मंदिर प्रवेश हा विषय फार संघर्षाचा किंवा धार्मिक संघर्षाचा राहिला नाही. तरीही ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही दलित बांधवांना मंदिरात प्रवेश नसतो. यामागेही खोटया परंपरा आणि रूढीच उभ्या असल्याचे आपल्या लक्षात येते. मागील काही वर्षांत मराठवाडयातील काही गावांत संघकार्यकर्त्यांनी समन्वय आणि संवाद यांच्या बळावर मंदिर प्रवेशाचे कार्यक्रम घडवून आणले आहेत.

मंदिर हे जसे श्रध्दाकेंद्र आहे, तसेच सामाजिक शक्तिकेंद्रही असते. आजच्या काळात या शक्तिकेंद्राचा सुयोग्य वापर कसा करता येईल आणि आपला समाज सबळ कसा करता येईल, याचा विचार करायला हवा. मानवी मूल्यांना प्रतिष्ठा देताना मंदिरे आणि धर्म यांचा अडथळा असता कामा नये. त्यासाठी समाजाचे घटक म्हणून आपण सजग झाले पाहिजे.

बदलत राहणे हा समाजाचा स्थायिभाव आहे आणि समाजाचा घटक असणारा माणूस याला अपवाद नाही. माणसाचे विचार बदलू शकतात, व्यवहार बदलतो याचा आपण नुकताच अनुभव घेतला आहे. विद्वेषाची पेरणी करत धर्मसंस्थापक झालेला माणूस गेली पंधरा-वीस वर्षे सामाजिक जीवनात धुमाकूळ घालत होता. देव-धर्म आणि संस्कार यावर बेछूट टीका करून आपला वेगळा धर्म वर्धिष्णू करू पाहत होता. पुरुषोत्तम खेडेकर नावाचा हा माणूस नुकताच पंढरीत जाऊन पांडुरंगाच्या चरणी लीन झाला. गळयात तुळशी माळा घालून घेतलेले त्याचे अनेक फोटो सामाजिक माध्यमांवर प्रकाशित झाले. पुरुषोत्तमांत अशा प्रकारचा बदल झाला असेल आणि संतांनी दाखवलेला समतेचा, ममतेचा मार्ग ते स्वीकारत असतील आणि महाराष्ट्राने शतकानुशतके अनुभवलेले पंढरीच्या वाळवंटातील समतेचे रिंगण आपल्या सहकाऱ्यांना, अनुयायांना समजावून सांगणार असतील, तर त्यासाठी त्यांचे स्वागत करायला हवे. समाजात कधीतरी अवनतीचा काळ येतो. निसर्गनिर्मित भेदाऐवजी मानवनिर्मित भेदांना महत्त्व प्राप्त होते, तेव्हा कुणीतरी मंदिराच्या गाभाऱ्यावर कब्जा करतो, तर कुणीतरी मंदिराबाहेर तिष्ठत उभा राहतो. ही भेदरेषा संपवण्यासाठी मानसिक बदल घडवून आणणे आवश्यक असते. त्यासाठी खूप मोठया प्रमाणात सामाजिक परिश्रमाची, संवादाची गरज असते. प्रयत्न केला, मानसिकता बदलली तर काय होऊ शकते, याची प्रचिती स्वामी रंगनाथ मंदिरातील मुनीवहन सोहळयाने दिली आहे.

या शुभ संकेताचा हात धरून आपण पुन्हा एकदा पावन भूमी मंगळवेढा पाहिले पाहिजे. देवाशी भांडणाऱ्या चोखोबाच्या समाधीची अवस्था काय आहे? आज एका छोटया चबुतऱ्यापलीकडे तेथे चोखोबांची कोणतीही अस्तित्व खूण नाही. ज्याने आपल्याला सकारात्मक विद्रोह शिकवला, त्याची उपेक्षा आपण किती दिवस करणार आहोत? चोखोबांचे कालोचित स्मारक उभारणे हे आपले सामाजिक  दायित्व आहे. आपण ते कसे पूर्ण करणार? की चोखोबांनी आपल्या हयातीत उपेक्षा भोगली आणि इतक्या शतकांनंतरही तशीच चालू राहावी अशीच आपली सामाजिक धारणा आहे? तशी धारणा नसेल, तर साऱ्या महाराष्ट्राने पुढाकार घेऊन संत चोखोबांचे स्मारक उभारले पाहिजे आणि त्याची सुरुवातही वर उल्लेख केलेल्या शुभ संकेतापासून झाली पाहिजे.