वृध्दत्वाचेही नियोजन करा

विवेक मराठी    27-Apr-2018
Total Views |

नोकरी-व्यवसायातून निवृत्त होण्याचे वेध लागतात, तेव्हा सुरवातीला माणूस एकदम खूश होतो. त्याच्या हातात मोठा निधी येणार असतो. आजवरच्या धावपळीतून मुक्त होऊन शांत जीवन जगता येणार असते. मुलांसाठी खर्च करण्याची गरज नसल्याने मिळणाऱ्या निवृत्तिवेतनात मजेत राहण्याचे स्वप्न तो रंगवत असतो. पण वृध्दत्वाचे, आरोग्याचे आणि संपत्तीचे वेळीच नीट नियोजन केले नाही, तर पुढे मनस्ताप वाटयाला येतो. वृध्दापकाळी फक्त दोन गोष्टीच आपल्या साथीला धावून येतात - पैसा आणि आपला जोडीदार.

 मुंबईत आपल्या सदनिकेत एकाकी राहणाऱ्या एका वृध्द महिलेचा झोपेत मृत्यू झाला आणि इमारतीतील शेजाऱ्यांनाही ते तीन-चार दिवसांनंतर समजले, अशी बातमी अलीकडेच माझ्या वाचनात आली. मागे एक प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेत्रीचाही वृध्दापकाळी तिच्या बंगल्यात असाच एकाकी अवस्थेत मृत्यू झाला होता. अशा घटना वाचल्यानंतर माझे मन नेहमी हळहळते. माझ्या एका मित्राबाबतही अगदी असेच घडले होते.

ही साधारणपणे दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी कामानिमित्त मुंबईत मुक्कामाला होतो. एक दिवस सकाळीच माझ्या फोनची रिंग वाजली. पलीकडून माझ्या एका मित्राच्या कंपनीचा अकाउंटंट बोलत होता. माझ्या मित्राचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याची दु:खद बातमी त्याने दिल्याने मला धक्काच बसला. कारण हा मित्र मध्यमवयीन व अविवाहित होता. कार्यक्षमपणे आपली कंपनी चालवत होता. तो एकटेपणाचे आयुष्य जगत असला, तरी व्यसनांपार्सन आणि आळसापासून दूर होता. इतक्या अनुकूल गोष्टी असतानाही त्याला कोणतीही चाहूल न लागता मृत्यूने अकस्मात गाठले होते.

मी काही सांत्वनपर बोलण्याआधी त्या अकाउंटंटने दुसरा धक्का दिला. तो म्हणाला, ''दातार साहेबऽ, आमच्या सरांचे निधन अगदीच दुर्दैवी ठरले. अखेरच्या क्षणी त्यांच्याजवळ मदतीला कुणीच नव्हते. शुक्रवारी रात्री कधीतरी ते झोपेतच गेले. शनिवारी आणि रविवारी कंपनीला सुटी असते. दोन दिवस कुणालाही न कळता सरांचा मृतदेह घरात तसाच पडून होता. सोमवारी ते ऑॅफिसला न आल्याने मी चौकशीला घरी गेलो, तर बेल वाजवूनही कुणी दार उघडेना. अखेर शेजारच्या लोकांना बोलावले आणि त्यांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीला आली. पण त्याहून वाईट म्हणजे शरीराचे पोस्ट मॉर्टेम करावे लागले आणि अद्याप तो देह शवागारात पडून आहे, कारण सरांना जवळचे कुणीच नातलग नव्हते. त्यांच्या एका लांबच्या भाच्याला आम्ही कळवले आहे. तो येईपर्यंत थांबणे भाग आहे. दरम्यान, सरांच्या संपर्कात असलेल्या लोकांना ही बातमी कळवण्याचे काम मी करतो आहे.''

मी मित्राच्या अंत्यसंस्काराला गेलो, तेव्हाही तेथे मोजकेच लोक उपस्थित होते. मित्राला अखेरचा निरोप देताना मनात सहज वाटून गेले की अविवाहित राहून माझ्या मित्राने काय मिळवले असेल? त्याला एकटेपणाची खंत जाणवत असेल का? आज स्थिती अशी आहे की एकटेपणाचे दु:ख केवळ अविवाहित लोकांच्याच वाटयाला येते असे नव्हे, तर जोडीदार आधी निघून गेल्याने वृध्दत्वाचा काळ जुन्या आठवणींच्या आधाराने एकाकी कंठणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्याही मोठी आहे. त्यातही ढोबळमानाने असे म्हटले जाते, की पती-पत्नीमध्ये पत्नी अगोदर निवर्तली तर पतीही फार काळ जगत नाही, कारण त्याला उतारवयात मुलांपेक्षाही केवळ पत्नीचा आधार आणि सहवास अधिक मोलाचा वाटतो. पण स्त्रियांची मानसिकता थोडी वेगळी असते. पती गेल्यानंतर त्या मुलांचे फुललेले संसार बघण्यात आणि अंगभूत कामसू वृत्तीनुसार जमेल तेवढी मदत करण्यात गुंतून जातात. त्यामुळे त्या पती निवर्तल्याची अगदीच हाय खात नाहीत. अर्थात हे माझे मत आहे. ते अचूक असेल असे नाही, पण मी माझ्या वडिलांचे उदाहरण पाहिले आहे.

माझी आई सन 2003मध्ये निवर्तली. त्यानंतर वडिलांच्या पूर्वीच्या स्वभावात कमालीचे परिवर्तन झाले. एरवी तापट स्वभावाचे आणि आईशी वाद घालणारे माझे बाबा आईची साथ सुटल्यानंतर उदास, एकाकी आणि अबोल झाले. काही काळ त्यांनी शेती, बागकाम आणि वाचन आणि टीव्हीचे कार्यक्रम यात मन रमवण्याचा प्रयत्न केला. नातवंडांमध्ये खेळताना आणि त्यांचे लाड पुरवतानाही त्यांना एकीकडे आईचे या जगात नसणे बेचैन करून सोडायचे. आम्ही त्यांचे वृध्दत्व आनंदी करण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला, पण खरे तर बाबा मनातून खचले होते. आईच्या निधनानंतर पाच वर्षांतच तेही हे जग सोडून गेले. म्हणूनच जीवनात जोडीदाराचे असणे आणि नसणे फार महत्त्वाचे ठरते, असे मला वाटते.

प्रथमपासून ठरवून अविवाहित राहिलेल्या किंवा ऐहिक मोहांपासून फारकत घेऊन संन्यास मार्गाकडे वळलेल्या लोकांची एकटेपणा स्वीकारण्याची मानसिक तयारी झालेली असते. परंतु संसारी माणसाचे तसे होत नाही. त्याला निवृत्तीनंतर एकटेपणा खायला उठतो. कधीकधी दोन पिढयांच्या विचारांत खूप अंतर पडते. त्यामुळे मुला-नातवंडांशी विचार जुळतीलच असे नसते. या स्थितीत पती-पत्नी हेच दोघे एकमेकांना समजून घेणारे सोबती असतात. मुले-नातवंडे काळजी घेणारी मिळाली तर ठीक, पण तीच जर वडिलोपार्जित मालमत्तेचा लोभ बाळगणारी असली, तर त्या वृध्दांची परवड होते. एकेकाळी हजारो कोटी रुपयांचा धनी असलेल्या एका उद्योगपतीला व्यवसायाचा कारभार मुलाकडे गेल्यानंतर मालकीची एक स्वतंत्र खोलीही मिळाली नाही. नटसम्राट नाटकातील गणपतराव बेलवलकरांसारखी त्याच्यावर 'कुणी घर देता का घर?' म्हणायची वेळ आली.

माझे बाबा याबाबत दूरदृष्टीचे होते. त्यांनी दोन गोष्टी अगदी योग्य केल्या. पहिली म्हणजे त्यांनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत स्वत:च्या व्यवसायाच्या नाडया आणि मालमत्तेचे अधिकार स्वत:कडे ठेवले. निवृत्त होताना त्यांनी दुबईतील दुकानांची जबाबदारी माझ्याकडे सोपवली, तरी शेवटपर्यंत तेच मालक राहिले आणि नफ्यातील ठरावीक हिस्सा काटेकोर हिशेब करून घेण्याचा हक्क त्यांनी सोडला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी व्यवसायाची वाटणी करून दिली, तरी भावनाविवश होऊन कधीही स्वत:ची संपूर्ण मालमत्ता आम्हा भावंडांकडे सोपवली नाही. ते मला स्पष्टपणे बजावत, ''दादाऽ, पुरुषाने स्वकष्टाने कमवलेल्या संपत्तीवर त्याच्या पश्चात पहिला अधिकार त्याच्या पत्नीचा असतो आणि तिच्या पश्चात मग वारसांचा क्रमांक लागतो. पुरुष असो अथवा स्त्री, त्यांनी अखेरपर्यंत परस्वाधीन न होता खमके राहावे. अन्यथा कुठली वाईट वेळ येईल ते सांगता येत नाही. तूसुध्दा एक दिवस वृध्द होणार आहेस, म्हणून आधीपासून सावध करतोय.''

बाबांच्या या सल्ल्यात नक्कीच तथ्य आहे. काळ कुणावर कशी वेळ आणतो, हे सांगता येणार नाही. माझ्या पत्नीची समाजसेवेमुळे एका राजघराण्यातील वृध्द गृहस्थांशी ओळख झाली होती. ते माझ्या पत्नीला मुलीसारखी मानत. पुढे जेव्हा ते गृहस्थ आजारपणाने अंथरुणाला खिळले, तेव्हा आम्ही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला मधून-अधून जात असू. दर खेपेस तेथे एक करारी स्त्री हजर असायची. ती बहुधा त्यांची दुसरी पत्नी असावी. तिला सर्व जण रानीमाँ म्हणत. पतीच्या हयातीत ही बाई इतकी मिजासखोर होती, की अक्षरश: जेवणाच्या ताटालाही लाथ मारायला कमी करायची नाही. काळाची गती केवढी विचित्र! या राजेसाहेबांनी मृत्युसमयी सर्व मालमत्ता पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाकडे सोपवली आणि रानीमाँच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. वृध्दापकाळात त्यांना कुणी विचारेना. ज्या जेवणाला त्या लाथ मारत, तेच जेवण त्यांना वेळेवर आणि पोटभर मिळेनासे झाले. त्या दाण्या-दाण्याला मोताद झाल्या. अखेर त्यांचा मृत्यूही उपासमारीने खंगून झाला.

मित्रांनोऽ, तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडला असेल, की व्यवसाय व्यवस्थापनाचे सांगण्याऐवजी मी हे काय सांगतो आहे? हे संपत्ती व्यवस्थापन (वेल्थ मॅनेजमेंट) आहे. तुम्ही तुमच्या पैशांची योग्य ती काळजी घेतली नाहीत, तर पुढे तुमचीही काळजी कुणी घेणार नाही. ज्यांना आपले उतारवय खरोखर गोल्डन एज म्हणून आणि सुखात घालवायचे असेल, त्यांच्यासाठी मी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. माझ्या वडिलांनी मला हा शहाणपणाचा सल्ला दिला आहे आणि मला तो पटला आहे.

1) घामाने मिळवलेली आपली संपत्ती स्वत:साठी आणि जोडीदारासाठी राखून ठेवा. सक्रिय वयातच त्यातून आनंदाचे क्षण जगून घ्या आणि निवृत्तीनंतर ते धन तुमच्या दैनंदिन व वैद्यकीय गरजांसाठी वापरा. 2) मुलांप्रती कर्तव्य निभावा, पण पुढच्या पिढयांसाठी अतिरिक्त संपत्ती साठवत बसू नका. आपकमाई खर्चताना माणूस दहादा विचार करतो, पण बापकमाई उधळताना तिची किंमत नसते. मुलांना त्यांचे धन कष्टाने कमवू द्या. घामाची किंमत त्यांच्या लक्षात आणून द्या. 3) मरेपर्यंत कोणत्याही क्षणी भावनावश होऊन आपली सर्व पुंजी वारसांकडे सोपवून पराधीन होऊ नका. आपले इच्छापत्र हयातीतच नोंदवून ठेवा आणि त्यात संपत्तीचा व मालमत्तेचा हक्क प्रथम जोडीदाराला व त्याच्या मृत्यूनंतर मग वारसांना द्या.

ऑॅस्कर वाइल्डचे एक वाक्य आहे -

When I was Young, I thought that money was the most important thing in life; now that I am old I know that it is.

(अर्थ - मी जेव्हा तरुण होतो, तेव्हा वाटायचे की पैसा ही जीवनातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. मी आता वृध्द झालोय आणि समजतेय की ते खरे आहे.)

मला वाटते की या वाक्यात पैशाबरोबरच जोडीदाराचाही समावेश करायला हवा.

***

(या लेखावर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 00971505757887 या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवू शकतात.)