छंदातून व्यवसायाकडे!

विवेक मराठी    30-Apr-2018
Total Views |

 

उमजू लागण्याच्या वयात माणसाला छंद जडतात. काहींना ते अगदीच लहान वयात लागतात. ज्यांच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर होते, ते लोक नशीबवान आणि भाग्यवानच. मिलिंद व उत्तम कळसुलकर या दोन भावंडांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा, प्रयोग आणि दुरुस्त करण्याचा लहानपणापासूनचा छंद. या छंदाचे त्यांनी व्यवसायात रूपांतर केले. गोरेगाव येथे अइउऊ (ऍकॅडमी फॉर बिझनेस कोंचिग ऍंड डेव्हलपमेंट ) या संस्थेची वर्षापूर्वी निर्मिती केली.

 मुंबईतच लहानाचे मोठे झालेल्या मिलिंद आणि उत्तम कळसलुकर यांच्या या छंदामागे एक वेगळी कथा आणि रहस्य दडलेले आहे. वडील महादेव बाळकृष्ण कळसुलकर हे मेकॅनिकल इंजीनिअर. आई गृहिणी. दोघांचे आदर्श आईवडीलच. वडिलांनी या दोन भावांमध्ये लहानपणापासून इलेक्ट्रॉनिक गोष्टींची आवड निर्माण केली. मिलिंद आणि उत्तम हे दोघे लहान असताना रेडिओ, टेप रेकॉर्डर, बॅटरी, कॅसेट अशा विविध वस्तू त्यांच्या हातात पडत. या दोघांना याचा छंद जडला. बंद पडलेला रेडिओ कसा दुरुस्त करायचा याविषयी त्यांना वडिलांकडून धडे मिळायचे. वडील तंत्रज्ञान क्षेत्रात तरबेज होते. पाचवी-सहावीत असताना दोघा भावांना रेडिओ दुरुस्त करता येऊ लागले. खेळण्याबागडण्याच्या वयात ही लहान मुले रेडिओ व इतर इलेक्टि्रक वस्तू दुरुस्त करतात, हे पाहून आजूबाजूचे लोक अवाक होऊन जात. जसजसे या दोघे मोठे होऊ लागले, तसतसा त्यांना अशा वस्तूंचा लळा लागू लागला. सोमय्या कॉलेजमधून या दोघा भावांनी इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतले.

मिलिंद कळसुलकर आपल्या व्यवसायाची पार्श्वभूमी सांगतात,  ''1994 सालची गोष्ट असावी. दहावी-बारावीत जाण्यापूर्वी आम्ही एका कॉम्प्युटरचं डिझाइन केलं होतं. शाळकरी वय होतं. आपण हे डिझाइन व्यवस्थित केलं आहे की नाही? याविषयी वडिलांशिवाय कुणीही सांगणार नव्हतं. वडिलांकडून आत्मविश्वास मिळवला होता. त्यांना आमचं डिझाइन खूप आवडलं होतं. त्यामुळे आमची आवड वाढत गेली. नव्या क्षितिजाचं आव्हान पेलण्याची शक्यता निर्माण करत गेलो. मोठा भाऊ उत्तम याने अंतिम सिस्टिम डिझाइन तयार केलं. त्याचं प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी आम्ही पवई आयआयटीमध्ये घेऊन गेलो होतो. सलग दोन तास आम्ही हे डिझाइनचं रहस्य उलगडून सांगत होतो. या प्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते. संगणक विभागाचे प्रमुख डॉ. एस.एस. राव यांनी आम्हाला एक सूचना केली. ते म्हणाले, ''तुमचं ज्ञान बघून मी असं सुचवतो की तुम्ही व्यवसायामध्ये जा. तुम्ही जर नोकरी वगैरे करायला गेलात, तर तुमच्या ज्ञानाला मर्यादा पडतील.''

पुढे आम्ही दोघांनीही अर्धवेळ जॉब स्वीकारला. लोअर परळला एम्पायर कंपनी होती. त्या कंपनीतलं एक युनिट बंद पडलं होतं. हे युनिट आम्ही आठ दिवसात दुरुस्त करून दिलं. यामुळे कंपनीचा आमच्यावर विश्वास निर्माण झाला. अशा प्रकारे आमच्या व्यवसायाची पायाभरणी झाली. कॉलेजजीवनापासून सुरू झालेला हा व्यावसायिक प्रवास अनेकांना आधार देणारा ठरला आहे.

 महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वेळ व्यवसायात उतरलो. प्रथम 'कॉम्प कन्सल्टंट्स' नावाने कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं. या दरम्यान अतुल अत्रे व नरेंद्र बगाडे यांनी एक सूचना मांडली.  पुढच्या पिढीसाठी एखादं प्रशिक्षण केंद्र उभं करावं असा सल्ला दिला.

या विचारांतून आम्ही ट्रेनिंग सेंटर उभं करण्यासाठी धडपडू लागलो. ABCD (ऍकॅडमी फॉर बिझनेस कोचिंग ऍंड डेव्हलपमेंट) या संस्थेची वर्षापूर्वी निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील युवकांना व्यवसायामध्ये उतरण्यासाठी एक मार्गदर्शक संस्था असावी, यासाठी ही संस्था आकाराला आली. वडिलांनी ज्या प्रकारे सोप्या पध्दतीने आम्हाला शिकवलं, त्याच पध्दतीने युवकांना मार्गदर्शन करतो. दहावी व बारावी झालेल्या युवकांना अशा प्रकारचं व्यावसायिक मार्गदर्शन दिलं, तर कामाचं आणखी चीज होईल, असं वाटू लागलं. इलेक्ट्रॉनिक्स येण्यासाठी इंग्लिश येणं आवश्यक आहे, अशी एक समजूत झाली आहे. आपण जरा बघाल तर जगात जे विकसित देश आहेत - जर्मनी, चीन, फ्रान्स, जपान, कोरिया या देशांत इंग्लिशला तितकंसं महत्त्व नाही, तरीही हे देश इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात अग्रेसर आहेत. तिथे सर्व शिक्षण मातृभाषेतून दिलं जातं, हे विशेष. दहावीच्या व बारावीच्या मुलांसाठी इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञान मराठी, हिंदी व इंग्लिश या तिन्ही भाषांत देणार आहोत. युवकांना जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठी भांडवलापासून ते प्रत्यक्षात व्यवसाय सुरू होण्यापर्यंतचं सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे.

घरची जबाबदारी सांभाळत, आमची आवड जोपासण्याचा प्रयत्न केला. खरं तर हा व्यवसाय आम्ही शून्यातून उभा केला. सुरुवातीला आम्ही फील्डवर जाऊन काम करत असू. त्यामुळे जागेची गरज भासली नाही. त्यासाठी लागणारा खर्च व भांडवल वडील देत असत. जसा जसा व्यवसाय वाढत गेला, तशी पैशाची गुंतवणूक करून गोरेगाव इथे ऑफिस घेतलं. मित्रांकडून व नातेवाइकांकडून प्रोत्साहन मिळत गेलं. ज्या वेळी आम्ही या व्यवसायात उतरलो, तेव्हा या क्षेत्रात फारच कमी संस्था होत्या. आमच्या व्यवसाय जाहिरात करून वाढणारा नव्हता. ग्राहकांच्या आणि कंपनीच्या जोरावर आमच्या व्यवसायाला आकार देण्याचा प्रयत्न केला. ABCD (ऍकडमी फॉर बिझनेस कोचिंग ऍंड डेव्हलपमेंट) या माध्यमातून युवकांना व्यवसायात उतरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आमच्या कामाचं वेगळेपण सांगायचं झालं, तर आमचं ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण पुढच्या पिढीवरच भारताचं भवितव्य अवलंबून आहे. ही पुढची पिढी तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर राहिली पाहिजे, असा आमच्या संस्थेचा हेतू आहे. भविष्यात टेक्नॉलॉजीवर आधारित संशोधन संस्था उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या काळात ऑटोमोबाइल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात उत्पादन येणार आहेत व आव्हान असतील याचा अभ्यास संशोधन केंद्रात केला जावा, यासाठी संशोधन संस्था स्थापन करणार आहोत. आपलं राज्य इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात प्रगतिपथावर असावं यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे हे आपण पाहतोच. मेक इन इंडिया, स्टार्ट ऍप, मॅग्नेटिक महाराष्ट्र यासारख्या योजना राज्याला पुढे नेणाऱ्या आहेत. आम्हाला वेगवेगळया गोष्टी करून बघायला मनापासून आवडतात. त्याची पुढची पायरी म्हणजे जास्तीत जास्त युवकांपर्यंत जाऊन मार्गदर्शन करणं होय.''

कळसुलकर बंधू केवळ आपल्या व्यवसायापुरता मर्यादित विचार न करता 'सॅटर्डे क्लब'च्या माध्यमातून नवीन उद्योजकांना प्रोत्साहित करतात. महिन्यातून दोन वेळा सर्व उद्योजक एकत्र येऊन, उद्योग करण्याची इच्छा असलेल्या तरुणंाना मदत करत असतात. मराठी तरुण उद्योग क्षेत्रात येत नाही अशी ओरड असते, पण कळसुलकर बंधूंकडे पाहिल्यानंतर उद्योजक होण्याची प्रेरणा निर्माण होते.

- विकास पांढरे

  9970452767