'स्वाभिमाना'ची वाजली शिट्टी

विवेक मराठी    07-Apr-2018
Total Views |

राजू शेट्टी ज्या पध्दतीने सध्या काँग्रेसशी जवळीक साधत आहेत, ते पाहता राजू शेट्टी यांच्या 'स्वाभिमानाची'च शिट्टी वाजली असे म्हणावे लागेल. 'भीक नको हवे, घामाचे दाम' अशी शेतकरी संघटनेची स्वाभिमानी घोषणा होती. संघटनेतून बाहेर पडलेले कुठलाही स्वाभिमान न दाखवता सत्तेच्या पदासाठी लाचार झालेले पाहिले की यांच्या स्वाभिमानाने कधीच शिट्टी वाजविली आहे, हे लक्षात येते.

आमच्या परिसरात एखाद्या गोष्टीचा शेवट झाला की 'शिट्टी वाजली' असे म्हटले जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी ज्या पध्दतीने सध्या काँग्रेसशी जवळीक साधत आहेत, ते पाहता राजू शेट्टी यांच्या 'स्वाभिमानाची'च शिट्टी वाजली असे म्हणावे लागेल. (राजू शेट्टी यांचे निवडणूक चिन्हही शिट्टीच होते.)

1980नंतर शेतकरी संघटनेची आंदोलने महाराष्ट्रभर पसरत गेली, पण त्याला पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. खरे तर शरद जोशी आधीपासून सांगत होते की कोरडवाहू आणि बागायती असा कसलाच भेद नाही. शोषण सर्वच शेतमालाचे होते. पण सहकाराच्या कृत्रिम ग्राईप वॉटरवर बाळसे धरलेला साखर उद्योग भल्याभल्यांची दिशाभूल करत होता. उसाचेही प्रश्न आहेत, उसाचाही उत्पादन खर्च भरून निघत नाही, हे पश्चिम महाराष्ट्रात कुणाला पटत नव्हते. 1995ला शरद जोशी यांनी औरंगाबादेत उसाची झोनबंदी उठविण्यासाठी उपोषण केले. तेव्हा गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी या प्रश्नात लक्ष घातले. शरद जोशींची मागणी मान्य झाली. उसाची झोनबंदी उठली. साखर उद्योगाला जराशी मोकळी हवा लागली. साखर कारखान्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात वाढायला लागली. स्पर्धा निर्माण झाली. एकाधिकारशाहीने आतापर्यंत काय आणि कसे नुकसान केले, ते शेतकऱ्यांच्या लक्षात यायला लागले. आतापर्यंत झोपी गेलेला पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरीही जागा व्हायला लागला. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटनेला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. 1999ला मिरज येथे शेतकरी संघटनेचे जे अधिवेशन झाले, त्याचे आयोजन रघुनाथदादा पाटील यांनी केले होते. त्या अधिवेशनाच्या यशात राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांचे मोठे योगदान होते.

शेतकरी चळवळीला मिळत चाललेला प्रचंड प्रतिसाद पाहता राजू शेट्टी यांची महत्त्वाकांक्षा जागी झाली. त्यांनी रघुनाथदादा पाटील यांच्याशी असलेल्या क्षुल्लक मतभेदांचे कारण पुढे करून शेतकरी संघटना सोडली आणि आपली स्वतंत्र स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी केली. खरे तर तेव्हाच राजू शेट्टी यांनी वेगळे नाव, वेगळा झेंडा, वेगळा बिल्ला तयार केला असता, तर त्यांच्या हेतूबद्दल क़ुणाला काही शंका राहिली नसती. पण त्यांनी तसे केले नाही. दिशाभूल करणारा हुबेहुब शेतकरी संघटनेसारखाच बिल्ला, फक्त खाली छोटया अक्षरात 'स्वाभिमानी' लिहिलेले, त्याच पध्दतीचा झेंडा, त्याच पध्दतीचे बॅनर रंगवायला सुरुवात केली आणि त्यांचा हेतू स्वच्छ नसल्याचे सगळयांच्याच लक्षात आले.

पश्चिम महाराष्ट्रात ज्यांना शेतकऱ्यांची चळवळ मोडून काढायची होती, त्या सर्वांना ही फूट म्हणजे सुवर्णसंधीच वाटली. शिवाय दक्षिण महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीविरुध्द काँग्रेसचा एक गट कार्यरत होताच. तसेच मराठा विरुध्द मराठेतर असाही एक वाद त्या परिसरात टोकाला गेला होता. या सगळयाचा परिणाम म्हणजे 2004च्या विधानसभेत राजू शेट्टी आमदार म्हणून निवडून आले. शेतकरी नेता असल्याची एक प्रतिमा राजू शेट्टींनी माध्यमांच्या साहाय्याने तयार केली. 2009च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी, सदाशिव मंडलीक आणि काँग्रेसचे प्रतीक पाटील अशी एक छुपी युतीच तयार झाली. राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करायचे म्हणून प्रतीक पाटील यांच्याबरोबर या दोघांना इतरांनी बळ पुरविले. पुढे हे तिघे निवडून गेल्यावर 'एकावर दोन फ्री' असे पोस्टर्स सांगलीत या तिघांच्या फोटोसह कार्यकर्त्यांनी झळकावले होते.

शेट्टी खासदार झाले. त्यांना काँग्रेसची साथ होती, तिथेच त्यांचा स्वाभिमान गहाण पडला होता. पण ते कागदोपत्री अपक्ष खासदार होते. त्यामुळे याची उघड चर्चा झाली नाही. पुढे रागरंग पाहून ते  भाजपाच्या गोटात गेले. शरद जोशींनी 1999मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला साथ दिली म्हणून शेतकरी संघटना सोडली असे सांगणारे राजू शेट्टी स्वत:च तिकडे गेले. राजू शेट्टी खासदार झाले, पण त्यांना आपला एकही कार्यकर्ता आमदार म्हणून निवडून आणता आला नाही. यातूनच 'लोकनेता' ही त्यांची प्रतिमा धूसर होऊन सौदेबाज ही प्रतिमा ठळक बनली. 2014च्या लोकसभेत भाजपाला विविध घटकांची सोबत हवी होती. त्यात रामदास आठवले, विनायक मेटे, महादेव जानकर यांच्याबरोबरच राजू शेट्टीही भाजपाच्या मांडीवर अलगद जाऊन बसले. स्वत:बरोबर त्यांनी सदाभाऊ  खोत यांनाही माढयातून खासदारकीला उभे केले. जानकर, खोत पडले, पण राजू शेट्टी भाजपाच्या लाटेत निवडून आले.

भाजपाबरोबर गेलो, तर पुढची निवडणूक अवघड आहे हे लक्षात आले. कारण शेतकरी असंतोषाने धुमसत होते. त्याचा परिणाम स्वत: राजू शेट्टीवरच होण्याची जास्त शक्यता होती. त्यांचे सहकारी सदाभाऊ  खोत विधान परिषदेवर आमदार झाले आणि राज्यमंत्री बनले. मग तर त्यांच्या पक्षातील व संघटनेतील कुरबुर प्रचंडच वाढली. सदाभाऊ  खोत यांनी बाहेर पडून रयत क्रांती संघटना काढली व आपले मंत्रिपद वाचविले. शरद जोशींशी शेट्टींनी केलेल्या द्रोहाचे उट्टे त्यांच्याच सहकाऱ्याने असे फेडले.

राजू शेट्टी यांनी योगेंद्र यादवांबरोबर काही काळ चुंबाचुंबी केली. दिल्लीला एक मेळावा आयोजित केला. शेतकऱ्यांच्या देशभरच्या 184 संघटना एकत्र करून देशव्यापी काहीतरी मोठे केल्याचा आभास निर्माण केला. (त्या मेळाव्याला दोन-चार हजार लोकही जमा झाले नाहीत.) पण मुळातच त्यांच्या विचारात व मांडणीत स्पष्टता शिल्लक राहिलेली नव्हती. शेतकऱ्यांचा संप झाला, तेव्हा त्यापासून दूर राहायचे का त्यात शिरून फायदा मिळवायचा, याचेही कोडे त्यांना सुटले नाही.

शेतकरी संपातील मागण्या डाव्यांच्या दबावाखाली मूळ शेतकरी आंदोलनाच्या मांडणीला विसंगत अशा बनत गेल्या. पण राजू शेट्टींना त्याचे कुठलेच आकलन झाले नाही. परिणामी तेही सगळे आंदोलन त्यांच्या हातून निसटले. नाशिकपासून मुंबईला निघालेला डाव्यांचा किसान लाँग मार्च हा राजू शेट्टींना टाळूनच निघाला.

भाजपा-समाजवादी-साम्यवादी असे सगळे भोज्जे शिवल्यावर आता शेट्टी काँग्रेसच्या आश्रयाला गेले आहेत. म्हणजे ज्या काँग्रेसच्या नेहरूनीतीने शेतकऱ्यांना लुटले, म्हणून शेतकरी आंदोलन उभे राहिले. हे आंदोलन उभे राहिले म्हणून राजू शेट्टी त्यात सहभागी झाले, या सहकाराविरुध्द कडक भूमिका घेतली, म्हणून त्यांच्या मागे लोक आले, आणि आता तेच शेट्टी याच आपल्या विरोधकाला सामील होत आहेत. याला काय म्हणावे?

गेली 15 वर्षे शेट्टी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून स्वतंत्रपणे संघटना चालवीत आहेत. शरद जोशी यांनी शेतकरी प्रश्नाची जी मांडणी केली, त्यापेक्षा वेगळे एक अक्षर तरी राजू शेट्टी यांनी मांडले आहे का?

राजू शेट्टी आता सतत स्वामिनाथन आयोगाची शिफारस करत असतात. त्यातील व्यवहारिक आणि वैचारिक गल्लत त्यांच्या लक्षात तरी येते का? आता बोंड अळीमुळे कापसाची कोंडी झाली, त्यावर राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष काय भूमिका घेणार?

मुळात आता प्रश्न असा आहे की शेट्टी जर काँग्रेसच्या दावणीला जाणार असतील, तर आतापर्यंत काँग्रेसने जी शेतीविरोधी धोरणे राबविली होती, त्याबाबत शेट्टी काय बोलणार? ज्या काँग्रेसशी राजू शेट्टी युती करायला निघाले आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून शरद पवार बसले आहेत. मग त्यांच्या बाजूला हे बसणार का? शेट्टींनी गेली 15 वर्षे शरद पवारांना जो विरोध केला, तो खोटा होता की काय? तेव्हा वैचारिक विरोध होता, तर मग आता काय वैचारिक साम्य निर्माण झाले आहे? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शेतीविषयक धोरणात काय फरक पडला आहे? पंजाबात-कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. तिथे शेतकऱ्यांसाठी काय हिताचे निर्णय घेतले गेले की जेणेकरून शेट्टींना या पक्षांची साथ द्यावी वाटू लागली आहे? शेट्टी यांनी मुंबईत संविधान बचाव मोर्चा आयोजित केला होता. मग ह्याच संविधानाचे 9वे कलम शेतकऱ्यावर अन्याय करणारे आहे, हे त्यांच्या का नाही लक्षात आले? का शेट्टी आता शेतीविरोधी कायदे तसेच राहावेत ह्या मताचे बनले आहेत? शरद जोशी यांची काहीच शिकवण न घेता हे मडके कच्चेच राहिले की काय?

शरद जोशींपासून वेगळे झालेले अनिल गोटे, पाशा पटेल, शंकर धोंडगे, राजू शेट्टी, सदाभाऊ  खोत आणि रविकांत तुपकर यांना आमदारकी, मंत्रिपदे, महामंडळाचे अध्यक्षपद असले लाभ मिळाले. मग यांनी या पदांचा वापर करून शेतकरी हितासाठी काय काय निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले, यंत्रणेवर दबाव टाकून शेतकरी हिताची कामे करून घेतली, याचा हिशोब शेतकऱ्यांसमोर मांडायला पाहिजे. पण हे होताना दिसत नाही.

'भीक नको हवे घामाचे दाम' अशी शेतकरी संघटनेची स्वाभिमानी घोषणा होती. संघटनेतून बाहेर पडलेले कुठलाही स्वाभिमान न दाखवता सत्तेच्या पदासाठी लाचार झालेले पाहिले की यांच्या स्वाभिमानाने कधीच शिट्टी वाजविली आहे, हे लक्षात येते. 'सरकार समस्या क्या सुलझाये? सरकार खुद समस्या है' अशी घोषणा देत देत ज्यांचा वैचारिक पिंड पोसला गेला, ते क्षणात बदलतात आणि सरकारी योजनांची/हस्तक्षेपाची शिफारस करायला लागतात हे पाहिले की चकित व्हायला होते. उद्या लोकसभेला राजू शेट्टी यांच्या विरोधात भाजपाने सदाभाऊ  खोत यांनाच उभे केले, तर हे दोघेही कुठल्या भाषेत एकमेकांना उत्तर देतील? 

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

9422878575