'मोदित्व' निवडणूक फिरवणार?

विवेक मराठी    12-May-2018
Total Views |

 

कर्नाटक निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'एन्ट्री' होताच साऱ्या चर्चेचा रोखच बदलून गेला आहे. 2014नंतर 4 वर्षं उलटल्यानंतरही कर्नाटकासारख्या दक्षिणेकडील राज्यात असलेली 'मोदित्वा'ची जादू पाहून काँग्रेस, जनता दलासकट खुद्द भाजपा कार्यकर्तेही नि:शब्द झाले. कर्नाटकाच्या रणसंग्रामाला अखेरच्या टप्प्यात मिळालेल्या या कलाटणीमुळे आता मोठमोठे राजकीय विश्लेषकही गोंधळून गेले आहेत. काँग्रेसचं बहुमत इथपासून ते जनता दलाच्या पाठिंब्याने भाजपा सरकार इथपासून ते आता थेट भाजपाला स्पष्ट बहुमतच मिळतं की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

देशातील 31 राज्य सरकारांपैकी काँग्रेसची सत्ता आता केवळ 4 राज्यांत उरली आहे. त्यातही कर्नाटक हे यापैकी एकमेव मोठं राज्य आहे. ते टिकवण्यासाठी काँग्रेस 'करो या मरो'च्या आवेशात मैदानात उतरली. दुसरीकडे काँग्रेसच्या हाती असलेलं हे एकमेव मोठं राज्य हिरावून घेऊन, दक्षिण भारताचं प्रवेशद्वार असलेलं कर्नाटक जिंकत 'दक्षिण दिग्विजया'ची मुहूर्तमेढ रोवणं आणि 2019च्या दृष्टीने पायाभरणी करणं या हेतूने भाजपाही त्वेषाने या लढाईत उतरला. 'सरकारा बदलीसी, बीजेपी गेल्लसी' अशी हाकच भाजपाने कन्नडिगांना दिली. दि. 12 मे रोजी राज्यात सर्वत्र मतदान होणार असून दि.15 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. गेल्या महिन्याभरापासून कर्नाटकच्या हवेत असलेला प्रचाराचा धुरळा आता खाली बसला असून त्याची जागा आता धाकधुकीने, दडपणाने आणि औत्सुक्याने घेतली आहे.

2008मध्येच खरं तर भाजपाच्या दक्षिण दिग्विजयाचं द्वार खुलं झालं होतं. परंतु, काही वर्षांतच 2008मधील विजयाचे शिल्पकार आणि राज्यातील भाजपाचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी पक्षाविरोधात बंड केलं आणि कर्नाटक जनता पक्ष स्थापन केला. 2013मध्ये या 'कजप'ने जागा जिंकल्या केवळ 6, मात्र मूळची भाजपाचीच असलेली 9.79 टक्के मतं हिरावून घेत भाजपाचं मोठं नुकसान केलं. 2008मध्ये 33.93 टक्के मतं मिळवत स्पष्ट बहुमतात सत्तेत आलेला भाजपा 40 जागा आणि 19.89 टक्के मतं एवढयावरच मर्यादित राहिला. तर, काँग्रेस पक्ष भाजपामधील या दुहीचा फायदा घेत स्पष्ट बहुमत - म्हणजे 122 जागा आणि 36.59 टक्के मतं मिळवत सत्तेत आला. कर्नाटक काँग्रेसमधील अनेक गटातटांतून अखेर मूळचे देवेगौडांच्या जनता दल (सेक्युलर)मधून आलेले सिध्दरामैय्या मुख्यमंत्री झाले आणि सलग पाच वर्षं त्यांनी कर्नाटकाचा राज्यशकट किमान राजकीय पृष्ठभूमीवर तरी यशस्वीपणे सांभाळला. या दरम्यानच्या काळात येडियुरप्पा पुन्हा भाजपामध्ये परतले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा जोमाने कामाला लागले. आता या निवडणुकीत सिध्दरामैय्या आणि येडियुरप्पा हेच आपापल्या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. मात्र, या दोघांच्या भांडणात आपल्याही पदरात काही घसघशीत पडेल आणि नशीब बलवत्तर असेल तर चक्क मुख्यमंत्रिपदही मिळेल, या आशेवर आणखी एक व्यक्ती आहे, ती म्हणजे एच.डी. देवेगौडा यांचे वारसदार आणि जनता दल (सेक्युलर)चेही वारसदार एच.डी. कुमारस्वामी!

सध्याच्या अनुमानानुसार दक्षिण कर्नाटकात कोडागू (कुर्ग), दक्षिण कन्नड (मंगळुरू), उडुपी, शिमोगा, चिकमंगळूर आणि दावणगिरी या जिल्ह्यांमध्ये भाजपा चमकदार कामगिरी करेल, असा अंदाज आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा प्रदेश भाजपाला खुणावतो आहे, भाजपाच्या आशा पल्लवित करतो आहे, तो म्हणजे खुद्द राजधानी बंगळुरू शहर! बंगळुरूमध्ये बंगळुरू ग्रामीण जिल्हा आणि बंगळुरू शहर जिल्हा असे दोन जिल्हे आहेत. बंगळुरू शहरात लोकसभेचे 3, तर विधानसभेचे 28 मतदारसंघ आहेत. बंगळुरू शहर गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला बनला असून 2013मधील अंतर्गत कलहकाळातही यामध्ये मोठा फरक पडलेला नाही. बंगळुरू उत्तर, मध्य आणि दक्षिण हे तिन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत. येथील 28पैकी 13आमदार काँग्रेसचे, तर 12 भाजपाचे आहेत. जनता दलाकडे येथील 3 जागा आहेत. 2008मध्ये 28पैकी 18 जागा भाजपाकडे होत्या आणि काँग्रेसकडे केवळ 10. 2013मध्ये भाजपामधील मतविभागणीमुळे काँग्रेसच्या 3 जागा वाढल्या, तर जनता दलालाही शहरात 'एन्ट्री' करत 3 जागा मिळवता आल्या. भाजपाच्या विद्यमान 43 आमदारांपैकी 13 केवळ या एका शहरातून निवडले जातात. भाजपाचा वरचश्मा असलेल्या बंगळुरूकडे काँग्रेसशासित राज्य सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असल्याचं बंगळुरूवासीय उघडपणे बोलतात. मोदी लाट, सिध्दरामैय्यांच्या विरोधात सत्तापरिवर्तनाची लाट किंवा 'ऍंटी-इन्कम्बन्सी', भाजपाचं वर्षानुवर्षांपासूनचं तळागाळापर्यंत पोहोचलेलं मजबूत संघटन या तीन घटकांच्या जोरावर बंगळुरू शहरातून भाजपा 28पैकी 18 ते 20 जागांपर्यंत मुसंडी मारेल, असा अंदाज आहे.

बंगळुरूचा अपवाद वगळता बंगळुरूच्या दक्षिण-पश्चिमेकडे असलेले मंडया, हासन, म्हैसूर, चामराजनगर हे सारे भाजपासाठी आव्हानात्मक जिल्हे. हा भाग काँग्रेस व कर्नाटकातील तिसरा मोठा पक्ष जनता दल (सेक्युलर) या दोघांचा बालेकिल्ला. त्यातही विशेषत: मंडया-हासन हा भाग माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) पक्षाचा जीव की प्राणच. तर म्हैसूर, चामराजनगर ही काँग्रेसची शक्तिस्थानं. या जिल्ह्यांव्यतिरिक्त कोडागू (कुर्ग) हा एकमेव जिल्हा भाजपासाठी अनुकूल आहे, ज्या जिल्ह्यातून केवळ दोन आमदार निवडले जातात (जे दोन्ही भाजपाचे आहेत). दक्षिण कन्नड, उडुपी, चिकमंगळूर आणि शिमोगा - कर्नाटकच्या सौंदर्याचा मुकुटमणी म्हणता येतील इतके नितांतसुंदर जिल्हे. हेच जिल्हे, आता कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीतही महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत. हे जिल्हे म्हणजे भाजपाचे एकेकाळचे बालेकिल्ला. 2013च्या निवडणुकीत काँग्रेसला मिळाल्या 15, जनता पक्षाला 5 आणि 4 जागा मिळवत भाजपा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. काँग्रेस-जनता दलाला मिळालेल्या 20 जागांवर कर्नाटक जनता पक्षाने खालेल्या मतांचा परिणाम जबरदस्त होता, जो भाजपाला अगदीच समुद्रसपाटीवर घेऊन आला. कर्नाटकात पुन्हा मुसंडी मारण्यासाठी भाजपाला आता विधानसभेत किमान शंभरी पार करावीच लागणार असून त्यासाठी या 4 जिल्ह्यांतील 25पैकी 18 ते 20 जागा भाजपाला कोणत्याही परिस्थितीत जिंकाव्याच लागणार आहेत. त्यामुळे कोणताही बेसावधपणा न बाळगता या भागात भाजपाने अत्यंत शिस्तबध्दरित्या, संपूर्ण ताकद पणाला लावून आणि जोमाने आपली वाटचाल केली आहे. शिमोगा-चिकमंगळूरला खेटूनच असलेल्या दावणगिरी, चित्रदुर्ग आणि तुमकुर या जिल्ह्यांतील जनतेच्या मनाचा थांगपत्ता लावणं मात्र अवघड आहे. कारण या तीन जिल्ह्यांचा आजवरचा राजकीय प्रवासही तसाच आहे. संमिश्र आणि अनाकलनीय. तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये या तीन जिल्ह्यांत स्पर्धा आणि चुरस आहे. बंगळुरू शहराच्या सान्निध्यात आणि त्यामुळे प्रभावाखाली असलेले, मात्र राजकीयदृष्टया स्वतंत्र वाटा चोखाळणारे असलेले कोलार, चिकबल्लापूर, रामनगर आणि बंगळुरू (ग्रामीण) या चारही जिल्ह्यांत यंदा (नेहमीप्रमाणेच) 'कांटे की टक्कर' आहे. या जिल्ह्यांचा पूर्ण ताबा मिळवण्याची आशा कोणत्याच पक्षाला नसली, तरी येथील 19पैकी किमान 7 ते 8 जागा मिळवण्यासाठी भाजपा, तर सध्या असलेल्या 7 जागा टिकवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल प्रयत्नशील आहेत. वेळोवेळी होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये चारही जिल्ह्यांमध्ये त्या त्या वेळच्या विद्यमान 'मूड'ला नाकारून स्वत:चा असा वेगळा, धक्कादायक निकाल देण्याची प्रवृत्ती इथे आहे. त्यामुळेच बंगळुरू शहरातील राजकारणाचा प्रभाव मात्र या जिल्ह्यांमध्ये तितकासा आढळून येत नाही. या चारही जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण 19 विधानसभा मतदारसंघांपैकी सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहेत 7, जनता दल (सेक्युलर)च्या ताब्यात आहेत 7, तर भारतीय जनता पक्षाकडे केवळ 1 जागा आहे. 2008मध्येही भाजपा स्पष्ट बहुमतात सत्तेत असताना इथे मात्र भाजपाकडे 18पैकी 5 जागा होत्या आणि काँग्रेसकडे 10. जनता दलाकडेही येथील 4 जागा होत्या. या साऱ्या उलटसुलट निकालांमुळेच या 4 जिल्ह्यांच्या स्वभावाची उकल करणं सर्वच राजकीय पक्षांसाठी एक मोठं कोडं ठरतं.

सिध्दरामैय्या आणि बी.एस. येडियुरप्पा. दोन्ही कर्नाटकाच्या राजकारणात कसलेले, मुरब्बी आणि स्वत:चं स्थान असलेले नेते. सिध्दरामैय्या यांनी काँग्रेससारख्या पक्षात, देशभरात पक्षाची पडझड होण्याच्या काळात स्वत:चा आणि पक्षाचाही वरचश्मा राज्यात कायम राखण्यात यश मिळवलं. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापासूनही त्यांनी गेल्या 5 वर्षांत सुरक्षित अंतर राखलं. राज्यातील पक्षांतर्गत मल्लिकार्जुन खर्गे गट आणि इतर गटही त्यांनी वरचढ होऊ दिले नाहीत. मात्र, यामुळे सिध्दरामैय्या हा कर्नाटक काँग्रेसचा एकखांबी तंबू बनला. तो तंबू मजबूत करण्याच्या नादात त्यांनी मुस्लिमांना चुचकारण्यासाठी टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणं, बहामनी साम्राज्याचा उदोउदो करणं हे निर्णय हिंदू समाजात अस्वस्थता निर्माण करणारे ठरले. स्वतंत्र लिंगायत धर्माच्या प्रकरणात केलेल्या आततायीपणामुळे यामध्ये आणखी भर पडली. म्हैसूरमधील चामुंडेश्वरी मतदारसंघातून निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे स्वत:च्या कुरुबा जातीची मतं लक्षणीय असलेल्या बदामी (जि. बागलकोट)मधूनही लढण्याचा निर्णय कन्नडिगांना फारसा रुचलेला दिसत नाही. त्यातच राहुल गांधींनी प्रचारात उडी घेताच चर्चेचा फोकस केवळ सिध्दरामैय्या यांच्यावरून राहुल आणि सिध्दरामैय्या असा झाला आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'एन्ट्री' होताच साऱ्या चर्चेचा रोखच बदलून गेला आहे.

बी.एस. येडियुरप्पा हे कर्नाटकाच्या राजकारणातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व. अत्यंत आक्रमक राजकारणासाठी ते प्रसिध्द आहेत. कर्नाटकात भाजपा उभा करण्यात त्यांचं योगदान मोठं आहे. 2011 ते 2013 या काळात घडलेल्या घडामोडींमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला काहीसं ग्रहण लागलं. त्यानंतर जरी ते स्वगृही परतले असले, तरी जुने भाजपा कार्यकर्ते अजूनही या घटना विसरलेले नाहीत. तिकीट वाटपाच्या आणि प्रचाराच्या नियोजनाच्या काळातही येडियुरप्पांसोबत कजपमध्ये गेलेले आणि भाजपामध्येच राहिलेले, अशा दोन गटांमध्ये दरी होती. मात्र, 'टास्क मास्टर' अमित शाह स्वत: प्रचारात उतरल्यावर ही दरी नष्ट झाली असल्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा दावा आहे. शिवाय, येडियुरप्पा यांचं इतक्या वर्षांपासूनचं काम, संघटनेसाठी त्यांनी घेतलेले कष्ट यांचा प्रभाव कायम आहे. या वेळीही ते वय वर्षं 75 असतानाही अथकपणे प्रचारात गुंतले होते. संपूर्ण राज्य पालथं घालत होते.

मुख्यमंत्रिपदाच्या दोन्ही चेहऱ्यांच्या - अर्थात आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या या लढतीला भलतंच महत्त्व प्राप्त झालं होतं. जनमत चाचण्यांमधील कल काँग्रेसकडे होता आणि भाजपा दुसऱ्या स्थानावर राहण्याचा अंदाज होता. कालांतराने काँग्रेसचं स्पष्ट बहुमत अंधुक झालं, आणि देवेगौडांचा जनता दल पक्ष चर्चेत आला. वास्तविक पाहता, माजी पंतप्रधान पिता आणि माजी मुख्यमंत्रिपुत्र हेच सर्वेसर्वा असलेल्या या पक्षाला आज राज्यात 3-4 जिल्हे वगळता फार स्थान नाही. कुमारस्वामी यांचे ज्येष्ठ बंधू रेवण्णा आणि त्यांचे पुत्र प्रज्वल यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आणि त्यातून देवेगौडा कुटुंबात निर्माण झालेला कलह हाही या वेळी त्यांना मारक ठरणार आहे. त्यामुळे जनता दल या वेळीही 25-30 जागांपर्यंतच सीमित राहील, अशीच शक्यता आहे. त्यातच, निकालानंतर सत्तास्थापनेत निर्णायक भूमिका बजावण्याची या पिता-पुत्रांची स्वप्नं पंतप्रधान मोदींनी धुळीस मिळवल्याचं दिसत आहे. मोदींच्या सभांना होणारी उत्स्फूर्त गर्दी, भाषणांना मिळणारा प्रतिसाद, सर्वच जातींतील तरुणांमध्ये त्यांची असलेली 'क्रेझ' यामुळे भाजपाला त्यांच्याच अंदाजापेक्षाही अधिक बळ मिळालं. मोदींचं हिंदी भाषण सुरुवातीला कन्नड दुभाषाकडून ऐकणारे कन्नडिग नंतर नंतर दुभाषा नाकारून हिंदीतच भाषण ऐकण्याचा आग्रह धरू लागले. मोदींनी 'सरकारा बदलीसी' म्हणताच, श्रोत्यांकडून 'बीजेपी गेल्लसी'चा जयघोष होऊ लागला. 2014नंतर 4 वर्षं उलटल्यानंतरही कर्नाटकासारख्या दक्षिणेकडील राज्यात असलेली 'मोदित्वा'ची जादू पाहून काँग्रेस, जनता दलासकट खुद्द भाजपा कार्यकर्तेही नि:शब्द झाले. कर्नाटकाच्या रणसंग्रामाला अखेरच्या टप्प्यात मिळालेल्या या कलाटणीमुळे आता मोठमोठे राजकीय विश्लेषकही गोंधळून गेले आहेत. काँग्रेसचं बहुमत इथपासून ते जनता दलाच्या पाठिंब्याने भाजपा सरकार इथपासून ते आता थेट भाजपाला स्पष्ट बहुमतच मिळतं की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. राज्यातील 224 मतदारसंघांमधील 5 कोटी मतदार अंतिम निर्णय घेणार असून विधानसौधवर कोणाचा झेंडा फडकणार, यासाठी 15 मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.   

9594969650