चव

विवेक मराठी    12-May-2018
Total Views |

मामी कायम हसतमुख असायच्या. रात्री वडेवाटप व्हायचं ते दुकानातल्या कामगारांसाठीच असायचं. पावणेनवाच्या सुमारास मामी दुकानाच्या कोपऱ्यावर लपल्यासारख्या उभ्या असायच्या. बाबा एक-दोन वडे बांधून कुणाला तरी त्यांना द्यायला सांगायचे. त्यात काय एवढं लाजण्यासारखं? असं मला वाटायचं. बटाटावडा नसला, तर साबुदाणा वडा, कचोरी त्या न्यायच्या नाहीत.

पहिल्यापासूनच मला सणासुदीला फार उत्साह नसतो. मी काय अगदी गरिबीतून, एक वेळ जेवून, फाटके कपडे घालून, दिव्याखाली अभ्यास करून आता बऱ्या परिस्थितीत आलोय अशातला भाग अजिबात नाही. पण असं का वाटतं, ते माहीत नाही. काही प्रसंग, माणसं मला विनाकारण आठवतात. सणाचा झगमगाट मला फार मोह घालत नाही, उलट अनुत्साहित करतो.

बाबा दुकानात कामाला होते. मी 1985-1986ला संध्याकाळी पाच ते नऊ पार्ट टाइम कामाला जायचो. पगार दोनशे रुपये. कंपासपेटीतल्या पट्टीएवढी लांब रोस्ट आमंड कॅडबरी साताठ रुपयाला मिळायची. माझे निम्मे पैसे त्यातच संपायचे. उरलेले डयूकचा मँगोला पिण्यात जायचे. दुकानात खूप मोठे आणि नामवंत लोक यायचे. छान अनुभव होता तो सगळा.

दुकानात रोज संध्याकाळी गरम गरम बटाटेवडे, साबुदाणा वडे विक्रीला असायचे. कचोऱ्या असायच्या. बटाटावडा सणसणीत असायचा. दोन खाल्लेत तर जेवायला नको चार तास. उरलेले वडे रात्री वाटून टाकले जायचे झुंबड उडायची. मग आळीपाळीने दिले जायचे सगळयांना.

दुकानाच्या मागे तीन चाळी होत्या. बरीच कुटुंबं राहायची. त्यात एक ***कर मामी राहायच्या. दहा # दहाची खोली. मोरी, ओटा, कॉट सोडून तीन माणूस बसू शकतील एवढी मोठी जागा शिल्लक उरायची. घरात मामी, त्यांचा नवरा, मुलगा, तीन मुली आणि एक नातू असं भरपूर मनुष्यबळ. पुढयातलं खाताना पुढच्या जेवणाची चिंता डोक्यात असणार, कसं अंगी लागेल सांगा. बाबांनी अनेक कुटुंबांना न बोलता जमेल तेवढं अन्नाला लावलं, त्यात मामी एक होत्या.

दुकानात निवडलेलं धान्यं विकायला असायचं. मामी घरी पोती न्यायच्या निवडायला. सगळे मिळून दिवसाला शंभरचं पोतं करायचेच. मामा सतत आजारी. मुली नोकरी करायच्या. किती पैसा मिळणार! पण मामी कायम हसतमुख असायच्या. रात्री वडेवाटप व्हायचं ते दुकानातल्या कामगारांसाठीच असायचं. पावणेनवाच्या सुमारास मामी दुकानाच्या कोपऱ्यावर लपल्यासारख्या उभ्या असायच्या. बाबा एक-दोन वडे बांधून कुणाला तरी त्यांना द्यायला सांगायचे. त्यात काय एवढं लाजण्यासारखं? असं मला वाटायचं. बटाटावडा नसला, तर साबुदाणा वडा, कचोरी त्या न्यायच्या नाहीत. मला जाम उत्सुकता या प्रकाराची.

बटाटावडा राहिला नाही, तर बाबांना जास्त वाईट वाटायचं. त्यांनी मला कारण सांगितलं आणि मी गार पडलो. इतकी वर्षं झाली, तरी ते आठवलं तरी मला बेचैन व्हायला होतं. मामी वडे घेऊन गेल्या की नळाखाली पातेलं धरायच्या. प्रत्येकाला किमान एक वाटी तरी हवीच. त्या पाण्याला फोडणी द्यायची. वडयाची पारी काढायची, आतली भाजी त्यात टाकायची की मग त्याला बटाटयाचा रस्सा तयार झाला असं म्हणतात. दिवस काय कुणाचे राहत नाहीत. त्यांच्या मुलींची लग्नं झाली, मुलाला, नातवाला नोकरी लागली. आता त्या आहेत-नाहीत... काही माहीत नाही.

खाऊन खाऊन चरबाटलेली मुलं, मुली अधाशासारखा वडापाव खाताना आता दिसतात. मी बघत असतो. एखादा म्हणतो, ''हा साला ना, पारी जाम जाड करतो'' आणि ती फेकून आतली भाजी पावात रगडून, लाल चटणीत बुडवून खातो. त्यातला शेवटचा भाजी न पोहोचलेला पावाचा तुकडा तो फेकून देतो. मग मला हटकून कायम अंबाडा घातलेल्या, बुटक्या, स्थूल, हसतमुख ***कर मामी आठवतात आणि तोंडाची चव जाते ती जातेच.

9823318980