जात कोणती पुसू नका

विवेक मराठी    14-May-2018
Total Views |

 

***धनंजय दातार***

अलीकडच्या काही वर्षांत महाराष्ट्रातील समाजकारणावर जातीय दुराभिमानाचा प्रभाव वाढत चालल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. त्यातही चिंताजनक म्हणजे तरुण पिढीचे जाती-धर्माच्या झेंडयाखाली ध्रुवीकरण होत आहे. खरे तर आजच्या तरुणाईनेच या जाती-धर्मातील भेदाच्या भिंती मोडून टाकण्याची गरज आहे. किमान आपला जात-धर्म घरापुरता मर्यादित ठेवला पाहिजे आणि बाहेर वावरताना केवळ माणुसकीचा धर्म पाळला पाहिजे, असे मला वाटते.

मला माझ्या आयुष्यात जात-धर्माचा कधीच उपयोग झालेला नाही. त्यामुळे 'जातीसाठी खावी माती' अशा म्हणींवर माझा विश्वास नाही. उलट कवी वसंत बापट यांच्या कवितेतील 'जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलांस त्यांचा रंग कोणता पुसू नका' या ओळी मला आवडतात आणि पटतात. हा जात नावाचा प्रकार सुदैवाने माझ्या आयुष्यात लहानपणापासून दूर राहिला आहे. अमरावती जिल्ह्यातील शिरखेडसारख्या छोटया खेडयात माझे बालपण गेले. शाळेत आम्ही कधी एकमेकांच्या जाती विचारल्या नाहीत किंवा गावातील लोकही एकमेकांच्या जाती लक्षात ठेवण्याची उठाठेव करणारे नव्हते. सगळेच गरीब असल्याने समान हाल-अपेष्टांना तोंड देत होते.

माध्यमिक शिक्षणासाठी मी मुंबईत दाखल झालो. बाबा हवाई दलात नोकरीला असल्याने आम्ही मुंबईत कालिना उपनगरात मिलिटरी क्वार्टर्समध्ये राहायचो. तेथे तर भारतातील वेगवेगळया प्रांतांमधील लोक आम्हाला शेजारी म्हणून लाभले. त्यामुळे आपोआपच राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार होऊन 'एक भारतीय' हीच माझी ओळख बनली. या शेजाऱ्यांच्या सहवासाने मी आणि माझा भाऊ अगदी लहान वयातच हिंदी संभाषणात पारंगत झालो. त्याशिवाय आम्हाला विविध प्रांतांच्या संस्कृतींचा, शिष्टाचाराचा व खाद्यपदार्थांचाही परिचय झाला. पुढे मी दुबईत गेलो, तेव्हाही मला तेथे विविध जाती-धर्माच्या लोकांकडून आपुलकीने मदत झाली. आमच्या दुकानांचे ग्राहक मराठी, पंजाबी, गुजराथी, सिंधी, केरळी, तमीळ होतेच, तसेच स्थानिक अरबी आणि पाश्चिमात्य देशांतीलही होते. या सगळयांकडून मला खूप शिकायला मिळाले. सुरुवातीला मला अरबी भाषा येत नव्हती, तेव्हा माझ्या भाषेचा न्यूनगंड एका अरबी ग्राहकानेच दूर केला. आमचा धंदा अडचणीत असताना मला नफ्याची पहिली संधी देणारे मुल्ला चाचा हे व्यापारी बांगला देशी होते, तर पहिली मोठी ऑॅर्डर मिळाल्यावर केवळ त्या पत्राच्या आधारे खरेदीसाठी कर्ज देणारा बँकेचा व्यवस्थापक एक पाकिस्तानी होता. मला नैराश्यातून बाहेर काढणारी वृध्द डॉक्टर एक ब्रिटिश होती. मला पाठदुखीच्या वेदनेतून ऍक्युपंक्चर उपचारांनी बरे करणारा एक चिनी माणूस होता. या सगळयांनी कधी माझा धर्म आणि देशही चुकूनही विचारला नाही.

दुबईत विविध भारतीय समाजांचे लोकही मला देवासारखे भेटले. आमच्या दुकानात आंध्र प्रदेशचे एक गृहस्थ कामाला होते. त्यांना मी अण्णा (मोठा भाऊ) म्हणत असे. तापाने आजारी असताना त्यांनी आईच्या मायेने माझी शुश्रुषा केली होती. कितीतरी मराठी, पंजाबी, केरळी माणसांनी आपापल्या प्रांतातील उत्तम उत्पादने भारतातून परत येताना दुकानात विक्रीला ठेवण्यासाठी अगत्याने आणून दिली होती. गुजराथी, सिंधी समाजातील लोकांनी मला व्यवसायातील शहाणपणाचे धडे हातचे राखून न ठेवता सहजपणे दिले. या सगळयाचा परिणाम म्हणजे मला कधीही कुठल्या अस्मितेची बाधा झाली नाही. मी व्यवसायात ग्राहकसेवेचा आणि वैयक्तिक आयुष्यात माणुसकीचा धर्म नेहमीच श्रेष्ठ मानला. आमच्या कर्मचारिवर्गात विविध प्रांतांचे लोक आहेत. मी कधी कुणाला हा आपल्या जातीचा-धर्माचा-देशाचा माणूस या निकषावर रोजगार दिला नाही.

जातीचा फुकाचा अभिमान मिरवण्याचा उद्योजकीय कौशल्याशी काही संबंध नसतो. तसेही व्यवसाय हे असे खुले क्षेत्र आहे, जेथे प्रवेश करण्यासाठी जात-धर्म-प्रांत-देश-शिक्षण-आर्थिक स्तर अशा कोणत्याही अटी नसतात. येथे यशस्वी होण्यासाठी फक्त कष्ट, चिकाटी, कल्पकता आणि सौजन्य या गुणांची गरज असते. अगदी सुरुवातीला आमच्या दुकानात एक माणूस कामाला होता. तो व्यापारासाठी प्रसिध्द असलेल्या एका समाजातील होता आणि त्याला त्याचा गर्वही होता. तो माझ्याशी बोलताना नेहमी म्हणायचा, की ''व्यापार-धंदा करावा तो आमच्या लोकांनीच. इतरांचे ते काम नाही.'' मला त्याच्या त्या गर्विष्ठपणाचे हसू येत असे. 'तुमच्या समाजाचे लोक जर व्यापारात इतके निष्णात असतील तर मग तुमच्यावर आमच्या दुकानात नोकरी करण्याची वेळ का यावी?' असा प्रश्न माझ्या जिभेवर येत असे, परंतु वाद घालण्याचा माझा स्वभाव नसल्याने मी त्याचे ते शेरे कानाआड करीत असे. पुढे या माणसाने नोकरी सोडून व्यापारात पदार्पण केले, पण तेथे तो अयशस्वी ठरला. माणूस जातीच्या आधारावर नव्हे, तर कष्टाने आणि गुणवत्तेने यशस्वी होतो, हा माझा आडाखा अगदी अचूक ठरला.

मी स्वत:ची जात-धर्म किंवा आवड-निवड व्यवसायात आणत नाही. हा यशाचा मंत्रही मला एक पंजाबी जैन व्यापाऱ्याकडून मिळाला आहे. मी त्याच्या सुपर स्टोअरमध्ये कामाचे प्रशिक्षण घेत होतो. त्या वेळेस मी इतर सर्व कामे उत्साहाने करायचो, परंतु गायीचे मांस (बीफ) व डुकराचे मांस (पोर्क) हाताळण्याची मला किळस येई आणि मी त्या कामाला नकार देत असे. एक दिवस त्या मालकाने मला याचे कारण विचारले. माझे म्हणणे ऐकल्यावर तो हसून म्हणाला, ''अरे, आम्ही तर पंजाबी जैन आणि कट्टर शाकाहारी आहोत. रोजच्या जेवणात कांदा-लसूणही खात नाही. पण दुकानात मला माझ्या आवडींपेक्षा ग्राहकांच्या गरजेला प्राधान्य द्यावे लागते. एकदा व्यवसाय पत्करला म्हणजे त्यात स्वत:चा जात-धर्म किंवा पसंती-नापसंती आणून चालत नाही.'' त्या माणसाचा सल्ला अचूक होता.

पण आपण स्वत: जातनिरपेक्ष असलो, तरी इतर लोक तसा विचार करतीलच असे नव्हे. मला दुबईत माझ्या दुकानात एकदा एका विचित्र प्रसंगाला तोंड द्यावे लागले. एक महिला बराच वेळ थांबून प्रत्येक वस्तूच्या पाकिटावरील उत्पादक कंपनीची माहिती बारकाईने वाचून बघत होती. मी कुतूहलाने तिला त्याचे कारण विचारले. त्यावर ती स्पष्टपणे म्हणाली, ''मला एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी बनवलेली उत्पादनेच हवी आहेत.'' त्या विचित्र मागणीने मला धक्का बसला. मी तिला शांतपणे समजावले, ''ताईऽ, तुम्ही चुकीचा विचार करताय. पोटाला जात नसते. जगातील हजारो कंपन्यांत वेगवेगळया जाती-धर्म-पंथांचे कामगार काम करतात. ते कष्ट करून उत्पादने बनवतात ते ग्राहकाचा धर्म बघून नव्हे, तर आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी. वेगळे उदाहरण देऊन विचारतो, तुम्ही आजारी पडलात तर आधी बरे व्हायला प्राधान्य द्याल की डॉक्टरचा धर्म किंवा औषध विक्रेत्याची जात बघत बसाल?'' या प्रश्नावर ती महिला निरुत्तर झाली. तिला आपल्या विचारातील चूक लक्षात आली. जाताना मला इतकेच म्हणाली, ''तुझे म्हणणे खरे आहे आणि दुकानाचे नावही अगदी तुझ्या वागणुकीला साजेसे आहे.''

मला त्या दिवशी माझ्या बाबांच्या दूरदृष्टीचा खरोखर अभिमान वाटला. आमच्या दुकानाचे 'अल अदील' हे नाव त्यांनी विचारपूर्वक निवडले होते. 'अल अदील'चा अरबी भाषेतील अर्थ आहे 'भला माणूस'. हे समर्पक नाव ठेवण्याची कल्पना माझ्या बाबांना संत ज्ञानेश्वरांच्या विश्वकल्याणाच्या तत्त्वज्ञानातून सुचली. सगळयांचे हित बघणारा आणि सगळयांशी भलेपणाने वागणारा व्यावसायिक त्यांना अभिप्रेत होता. बाबा पूर्वी हवाई दलात असल्याने तेथे त्यांचे सर्व जाती-धर्माचे आणि प्रांतांचे मित्र होते. त्याचाच उपयोग त्यांना व्यवसाय नावारूपाला आणण्यात झाला. दुबईत दुकान सुरू केल्यावर ते भारतीय ग्राहकांच्या गरजा आपुलकीने जाणून घेत. निरनिराळया प्रांतांमध्ये चांगल्या वस्तू कोणत्या मिळतात, लोकांना काय आवडते अशी माहिती करून घेत. ग्राहकांनी सांगितलेल्या वस्तू आठवणीने मागवून घेत. मीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून विविध समाजांतील लोकांची मैत्री जोडली, ज्याचा मला व्यवसायात खूप फायदा झाला.

मित्रांनो! जातीच्या दुराभिमानामुळे विकास होत नसतो, उलट समाजाचे हजारो वर्षे भरून न येणारे नुकसान होत असते, हे आपल्या इतिहासातून दिसून आले आहे. आता या एकविसाव्या शतकात तरी आपण हे अहंकाराचे आणि भेदभावाचे काटे मनातून काढून टाकू या. एक संस्कृत सुभाषित आहे -

अयं निज: परोवेति गणना लघुचेतसाम।

उदार चरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥

(अर्थ - हलक्या मनोवृत्तीची व्यक्ती 'हा माझा, तो परका' असा भेदभाव करते, परंतु विशाल मन असलेला माणूस सर्व जगालाच आपले कुटुंब मानतो.)

 

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 971505757887 या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवू शकतात.)