साम्यवाद - तत्त्वज्ञान आणि वस्तुस्थिती

विवेक मराठी    14-May-2018
Total Views |

 

तथाकथित शांततावादी धर्म आणि प्रत्यक्ष वर्तणूक यांचा जितका संबंध असतो, तितकाच संबंध साम्यवाद आणि प्रत्यक्ष समता यांचाही असतो. ‘‘Some are more equal...’’  हा शेरा उगाच पडलेला नाही. आणि सरतेशेवटी ती फक्त एक हिंस्र आणि हुकूमशाही राज्यव्यवस्था बनते.

साम्यवादी विचारांबद्दल ऐकलेला एक शेरा कायम लक्षात राहण्यासारखा आहे - 'जी व्यक्ती 20 वर्षे साम्यवादी विचारांच्या प्रेमात पडत नाही, तिला हृदय नसते आणि जी व्यक्ती 25व्या वर्षीही साम्यवादी असते, तिला डोके नसते.'

ग्रंथांमध्ये, भाषणात, चर्चेत उत्तम वाटणारा हा साम्यवादी विचार प्रत्यक्षात मात्र जगभर पराभूत होताना दिसत आहे. कारण पुस्तकी तत्त्वज्ञान आणि त्याचे प्रत्यक्ष आचरण यामध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे, त्यामुळे साम्यवाद हा फक्त भीतीच्या किंवा बळाच्या मुक्त वापरण्यानेच प्रत्यक्षात उतरवता येतो अशी समजूत होते. आणि शेवटी जे प्रत्यक्षात उतरते त्याचा आणि पुस्तकी साम्यवादाचा कहीही संबंध नसतो हे स्पष्ट होते. तथाकथित शांततावादी धर्म आणि प्रत्यक्ष वर्तणूक यांचा जितका संबंध असतो, तितकाच संबंध साम्यवाद आणि प्रत्यक्ष समता यांचाही असतो. 'Some are more equal...'  हा शेरा उगाच पडलेला नाही. आणि सरतेशेवटी ती फक्त एक हिंस्र आणि हुकूमशाही राज्यव्यवस्था बनते.

एका बाबतीत हे धार्मिक अतिरेकी आणि साम्यवादी यांच्यात एक साम्य दिसते. हे दोघेही स्वत:बरोबरचे अन्यथा विरोधी अशा काळया-पांढऱ्या रंगात सर्व जगाची वाटणी करतात आणि त्यामुळे अशा आपल्याबरोबर नसलेल्यांना कोणताही हक्क नाही, वेळप्रसंगी अगदी जगण्याचासुध्दा नाही अशी मानासिकता तयार होते. म्हणजे धर्म ही अफूची गोळी आहे असे कंठशोष करत ओरडणारा साम्यवादही आता एक धर्म झाला आहे, आणि हिंस्र अतिरेकी तर साम्यवादी पहिल्यापासूनच आहेत, हे त्यांचा इतिहास वरवर चाळला तरी सहज लक्षात येते.

मात्र ह्या दोघांमध्ये एक मोठा फरकही आहे. साधारणत: सर्व धार्मिक अतिरेकी - काही विशेष कामगिरी नसेल तर - काहीतरी धार्मिक चिन्ह धारण करतात. अर्थात ह्या वाक्याचा व्यत्यास मात्र खरा नाही - म्हणजे अशी चिन्हे धारण करणारा अतिरेकी असतोच असे नाही. मात्र साम्यवादी असे कोणतेही चिन्ह धारण करत नसतो आणि विविध मुखवटे धारण करण्यासाठी त्याला याचा फायदा होतो.

ह्या दोन्ही अतिरेक्यांमध्ये आणखी एक साम्य आहे. हे दोघेही जेव्हा अल्पसंख्य असतात, तेव्हा कायदा, भारतीय घटना, मानवता यांची जपमाळ जपतात. हेच ज्या वेळी बहुसंख्य होतात किंवा ह्यांना पाठिंबा देणारे शासन असते, त्या त्या वेळी मुखवटे फेकून अत्यंत मग्रूर आणि शिरजोर होऊन हिंसक कारवाया करू लागतात.

साम्यवाद्यांकडे अशा मुखवटयांची कमतरता नाही. कामगार पुढारी, राजकीय विचारवंत (?), अर्थतज्ज्ञ, अन्य शाखांचे - खासकरून सामाजिक विद्याशाखांचे तज्ज्ञ अशा अनेक मुखवटयांचा वापर करत इतिहास, संस्कृती, सामाजिक व्यवस्था इत्यादींचा नाश करत समाजाचे तुकडे करत शेवटी देशाचे तुकडे करणे आणि तथाकथित साम्यवादी राजवट प्रस्थापित करणे हे त्यांचे एकमेव ध्येय आहे.

जगातील कोणत्याही तथाकथित साम्यवादी देशात अन्य लोकशाही देशांप्रमाणे खुल्या निवडणुका होत नसताना, भारतात लोकशाही व्यवस्थेत निवडणुका लढवून आणि भारतीय घटनेच्या शपथा घेत सरकार बनवत असताना प्रत्यक्ष राज्यकारभार करताना मात्र त्यांचा कार्यक्रम वेगळयाच दिशेने जातो, हे दीर्घकाळ साम्यवादी राजवट असलेल्या राज्यांचा व त्या कालावधीत झालेल्या विकासाचा अभ्यास केल्यास स्पष्ट होते. फक्त भारतातले प्रांत होते, म्हणून बंगाल, केरळ आणि त्रिपुरा इथे मोठा रक्तपात न होता सत्ता परिवर्तने झाली. अर्थात ह्या तिन्ही ठिकाणी अनेक हिंदुत्ववादी बळी पडले, हे विसरता येत नाही; मात्र रक्तरंजित क्रांती करावी लागली नाही, ह्याचे कारण ती भारताची राज्ये आहेत.

धार्मिक अतिरेकी आणि साम्यवादी यांच्यात आणखी एक साम्य आहे. ह्या दोघांनाही देश, समाज, संस्कृती इत्यादी मान्य नाहीत. त्यामुळे जगातले त्या त्या धर्माचे अनुयायी (इथे वर म्हटल्याप्रमाणे साम्यवाद हा एक धर्मच अभिप्रेत आहे) एकच आहेत, त्यांना देश वगैरे सीमा लागू होत नाहीत आणि त्यांची पत्रास बाळगण्याचे करण नाही, असे दोघांचेही तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे अर्थातच देशद्रोह ही संकल्पना रशिया, चीन आदी साम्यवादी देश सोडले तर इतरांना लागू नाही असा साम्यवाद्यांचा, तर सर्व जग विशिष्ट धर्माचे करणे हा त्या धार्मिक अतिरेक्यांचा अधिकार असतो, असा ठाम विश्वास ह्या दोघांनी मनात बाळगलेला असतो.

ह्या दोन्ही गटात आणखी एक समान धागा आहे, तो म्हणजे हिंदू, भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास यांच्या द्वेषाचा. ह्या दोघांनाही भारताचे काहीही चांगले झालेले बघवत नसावे, इतका द्वेष अगदी वैचारिक क्षेत्रातील कोणत्याही चर्चेत आणि प्रतिपादनात दिसतो. प्रथम नेहरूंच्या आशीर्वादाने सुरू झालेली ही परंपरा पुढील प्रत्येक सरकारच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंब्याने वाढलेली दिसते. कदाचित हिंदुत्ववादीच फक्त आपल्याला पुरे पडतील असे राजकीय विरोधक आहेत आणि म्हणून त्यांच्या मुळावरच आघात करावेत, ही खेळी यामागे असू शकते.

नक्षलवाद हा साम्यवाद्यांचा एक महत्त्वाचा मुखवटा आहे. खरे तर 'क्रांती ही बंदुकीच्या नळीतून जन्माला येते' ह्यावर प्रत्येक साम्यवाद्याची श्रध्दा असते. त्यामुळे एकीकडे निवडणुका आणि वैचारिक असहिष्णुता चालूच असली, तरी दुसरीकडे प्रत्यक्ष हिंसक संघर्ष चालू असतो. 1967 साली नक्षलबरी ह्या बंगालमधील एका खेडयातून सुरू झालेल्या ह्या हिंसक चळवळीने विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मोठे उग्र रूप धारण केले होते. बिहारच्या नेपाळ सीमेपासून ते थेट आंध्र प्रदेश आणि कर्नाटक इथपर्यंत व्याप्ती असलेली ही चळवळ दहा राज्यांमधील 180पेक्षा जास्त जिल्ह्यांत पसरली आहे. 'Red Corridor' ह्या नावाने ओळखला जाणारा हा पट्टा सलग असल्याने सर्व अवैध हालचालींसाठी उपयुक्त आहे. तसेच पूर्व किनाऱ्यावरील जवळजवळ निम्मा भाग ह्या चळवळीच्या पट्टयात येतो. तसेच डोंगराळ आणि जंगलांचा भाग हे ह्या चळवळीचे मोठे बलस्थान आहे. एका अंदाजाप्रमाणे ह्या चळवळीने 2000 ते 2010 ह्या दहा वर्षांत सुमारे 3000पेक्षा जास्त माणसांचा बळी घेतला आहे. तसेच 3,50,000पेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत. 2010नंतर ह्या चळवळीला उतरती कळा लागली असे दृश्य माध्यमांमध्ये येत असले आणि प्रत्यक्ष मृत्यू आणि हल्ले यांच्या प्रमाणात घट दिसत असली, तरी तो सरकारी धोरणांचा विजय मानण्याचे कारण नाही. 2010नंतर राबवलेल्या एकात्मिक कार्य योजनेचा काही फायदा नक्कीच झाला आहे.

परंतु यामागे आणखी एक कारण आहे आणि ते जास्त महत्त्वाचे आहे.

दऱ्याखोऱ्यांतील आणि जंगलातील हे युध्द आता शहरात नेण्याची योजना आखून त्याप्रमाणे सावकाश पण निश्चितपणे नवीन मुखवटा धारण करण्याची ही प्रक्रिया बराच काळ चालू आहे. ह्याआधी उल्लेख केलेले वैचारिक 'तज्ज्ञ' यासाठी उत्तम साहाय्यकारक होते. अनेकानेक सेवाभावी संस्था, मानवाधिकार गट, राजकीय गट, साधारणत: समाजाच्या अंतिम टोकावरील तरुणांच्या संघटना इत्यादींमध्ये प्रवेश करणे, हळूहळू त्या संस्था हा नवीन अजेंडा आपलाच मानतील अशी स्थिती आल्यावर त्या नावाखाली धरणे, निदर्शने इत्यादी करून हळूहळू ती निदर्शने हिंसक होतील अशी व्यवस्था करणे आणि येनकेन प्रकारे सरकारवरचा विश्वास नष्ट होऊन अनागोंदी माजेल हे ध्येय गाठणे अशी योजना असते.

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या एका लेखात G4 war असे याचे वर्णन केले आहे. प्रत्यक्ष हिंसक संघर्ष आणि राजकारण, प्रत्यक्ष सैनिक आणि सामान्य नागरिक यातील सीमारेषा अस्पष्ट करत ही व्याप्ती वाढवत नेणे ही पध्दत नवीन नाही. क्युबामध्ये 1957-58मध्ये फिडेल कॅस्ट्रोने ह्या पध्दतीशी मिळतीजुळती पध्दत वापलेली आहे.

परंतु आता हा धोका या पुढच्या स्थितीत पोहोचला आहे, आणि समाजाला याची पुरेशी जाणीव नाही.

मुस्लीम अतिरेक्यांचे मनुष्यबळ, त्यांची प्रशिक्षण व्यवस्था आणि पैसा पुरवठा व्यवस्था, तसेच कट्टर मनुष्यबळ आणि साथीला नक्षल्यांची/साम्यवाद्यांची माध्यमांवरील घट्ट पकड, त्यांना असलेले चिनी शस्त्रसामग्रीची आणि हत्यारांची पुरवठा व्यवस्था आणि जंगलातील प्रशिक्षण आणि लपण्याच्या जागा यांच्याबरोबरच नागरी भागातील मनुष्यबळाचे जाळे असणारे हे दोन्ही गट एकत्र येण्याची हालचाल वेग धरत आहे. असे झाले तर पूर्ण चित्र बदलू शकते.

परंतु हे फक्त इथेच थांबत नाही. केम्ब्रिज ऍनालेटिकावर असणाऱ्या आरोपांपैकी 50% जरी खरे असले, तरी ह्या कंपनीचा भारतातील राजकारणातील प्रवेश, काँग्रेसने त्यांना दिलेले कंत्राट, काँग्रेसची वाढती तडफड आणि कोणत्याही टोकाला जाऊन देशातील सर्व घटनात्मक आणि संसदीय व्यवस्थांवरचा जनतेचा विश्वास उडेल ह्यासाठी चालू असलेले सर्वतोपरी प्रयत्न, आणि त्यांच्याकडील असणाऱ्या पैशाचा ओघ ह्या बाबी जर वरील दोन्ही गटांच्या हालचालींना जोडून बघितले, तर वेगळेच चित्र उभे राहते, जे अत्यंत भयावह आहे.

ज्यांना 'reading between the lines' म्हणतात तशा बातम्या बघितल्या किंवा वाचल्या, तरी ह्या दृष्टीकोनाला आधारभूत असणारे बरेच बिंदू लक्षात येतात. अचानक वाढलेली जातीय आंदोलने, माध्यमांमधून काही विशिष्ट जातीच्या किंवा धर्मांच्या बाजूने किंवा विरोधात चालवली जाणारी चळवळ आणि त्यात सरकारला आणि काही संघटनांना ठरवून बदनाम करण्याचा प्रयत्न आणि ह्या सगळयाला असलेला 'We will not allow the BJP to win the election in 2019, AT ANY COST' हा सोनिया गांधींच्या वक्तव्याचा संदर्भ हे बिंदू शांत डोक्याने जोडले, तर जे चित्र दिसते ते भयानक आहे इतकेच म्हणता येते.

ह्या लेखाबरोबरच राष्ट्रीय सुरक्षेच्या दोन मुद्दयांचा - भौगोलिक सुरक्षा आणि राजकीय सुरक्षा यांचा - विचार पूर्ण होईल.

उरलेले तीन मुद्दे - आर्थिक, सामाजिक आणि माहिती सुरक्षा हे पुढे कधीतरी.

9158874654