दुःखाचे मूळ - अहंकार

विवेक मराठी    14-May-2018
Total Views |

दुःखाचे मूळ - अहंकार

अहंतागुणे सर्वही दुःख होते।

 अहंता, अहंकार हे सर्व दुःखाचे मुख्य कारण आहे, असे समर्थ रामदास मनाच्या श्लोकात म्हणतात आणि स्वतःच आत्मचिंतन करून प्रत्येकाने आपल्या अहंकाराचा शोध घेऊन तो विवेकाने दूर करावा, असे समर्थ सुचवितात. अहंता, अहंकार, अहंभाव, गर्व, ताठा, मीपणा हे सर्व एकाच अर्थाचे शब्द आहेत. संत तुकाराम म्हणतात, अहंकार गळून पडताच जीवनात सुखाचा सुकाळ होतो.

 मनाच्या श्लोकातील समर्थांचा ‘सुखदुःखविचार’ या विषयांतर्गत माणसाच्या दुःखाचे त्रिविध प्रकार आपण गेल्या लेखात पाहिले. आता या लेखात दुःखाची जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी अहंकार, अहंता हे मुख्य कारण आहे असे म्हणतात, त्याचा विचार करू. 

अहंतागुणे सर्व ही दुःख होते।

मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते॥

सुखी राहता सर्व ही सुख आहे।

अहंता तुझी तूंचि शोधून पाहे॥

अहंता म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे मीपणा, अहंपणाचा ताठा. महाभारतात, रामायणात, पुराणांमध्ये अहंकाराच्या दुष्परिणाम दर्शविणार्‍या अनेक बोधकथा आहेत. माणसाचे षड्रिपू म्हणजे सहा विकार - दुर्गुण हे माणसाच्या दुःखाची कारणे आहेत, पण अहंकार त्यापैकी मुख्य कारण होय, असे समर्थ म्हणतात. अहंकारामुळेच सर्व दुःखे होतात असे सांगत समर्थ मनालाच अहंतेचा शोध घेण्यास सांगतात. मनोबोध विवरणात प्राचार्य अ.दा. आठवले म्हणतात - ‘‘सर्वप्रथम माणसाला स्वतःचा अहंकार लक्षातच येत नाही. एखाद्याने लक्षात आणून दिला तरी तो अहंकार न वाटता स्वाभिमान वाटतो आणि त्या गैरसमजातच माणूस स्वतःच्या अहंकाराला स्वाभिमान म्हणून कुरवाळीत बसतो.’ म्हणूनच समर्थ स्वतःचा अहंकार स्वतःच्या मनाने शोधण्यास सांगतात. गंमतीचा भाग म्हणजे स्वतः स्वतःचा अहंकार शोधण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळाही आपला अहंकारच असतो. त्यामुळे विवेकबुद्धीच्या साहाय्यानेच आत्मचिकित्सा करून तटस्थपणे अहंकाराचा चिकाटीने शोध घ्यावा लागतो, तेव्हाच अहंकार हाती लागतो.

अहंकारामुळे माणूस स्वतःही दुःखी होतो व इतरांनाही दुःखी करतो. अहंकारामुळे अनेक दोष निर्माण होतात व माणूस अहंकारी वृत्तीनेच आपल्या या दोषांचेही समर्थन करतो. अहंतेची दुष्ट शक्ती लक्षात यावी, म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये अहंतेबद्दल वेगवेगळ्या श्लोकांत वारंवार सांगितलेले आहे. विशेषतः श्लोक १५९, १६०, १६१, १६६ असे ओळीने चार श्लोक अहंतेबद्दलचेच आहेत. त्याशिवाय श्लोक क्र. ४५, ९७, ११३, ११४, ११५ या श्लोकांतही अहंता-गर्व याविषयी सूक्ष्मपणे काही गोष्टी लक्षात आणून दिलेल्या आहेत. लेखाच्या मर्यादेमुळे ते सर्व श्लोक संपूर्णपणे इथे देत नाही. जिज्ञासू वाचकांनी, अभ्यासकांनी ते श्लोक मुळातून वाचावेत. त्या श्लोकातील फक्त एक-एक चरण/ओळ पुढे नमूद करीत आहे -

1) अहंभाव ज्या मानसी विरेना। तया ज्ञान हे अन्त पोटी जिरेना॥

2) नको रे मना सीकऊ पुढिलांसि। अहंभाव जो राहिला तुजपासी॥

3) अहंतागुणे नीति सांडी विवेकी॥

4) ----। अहंता अकस्मात येऊनि लागे। ----॥

5) ----। अहंतागुणे यातना ते फुकाची। ---- ॥

6) ----। अहंतागुणे ब्रह्मराक्षेस जाले। ---- ॥

7) ----। दीसेंदीस अभ्यांतरी गर्व साचे। ----॥

8) ---- । विवेके अहंभाव हा पालटावा। ----॥

अहंता, अहंकार, मीपणा, गर्व, ताठा हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. अहंकार ही परमार्थात सर्वात मोठी धोंड (अडथळा) आहे असे समर्थांनी जसे म्हटले आहे, तसेच संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम या संतांनीही त्यांच्या वाङ्मयात म्हटलेले आढळते. संत ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतील पुढील दोन ओव्या पाहा -

1) नवल अहंकाराची गोठी। विशेषे न लगे अज्ञानापाठी।

    सज्ञानाचे झोंबे कंठी। नाना संकटी नाचवी॥ (१३.८२)

2) तैसा चित्ती अहंते ठावो। आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो।

    ऐसेनि कोडी एक जन्म जावे। परी न पाविजे माते॥ (१५.३९६)

वरील ओव्यांमध्ये संत ज्ञानदेव म्हणतात - अहंकार ही गोष्ट अशी आहे की ती अज्ञानी-अडाणी माणसापेक्षा ज्ञानी माणसाजवळ अधिक दिसते. म्हणजे अज्ञानी माणसापेक्षा सज्ञानी - ज्ञानी माणसांचा अहंकार फार मोठा असतो व तो त्याला अनेक संकटात टाकतो (संकटापुढे नाचवतो). तसेच अहंकारी माणूस कितीही शास्त्रसंपन्न व्यासंगी विद्वान असला, तरी जोपर्यंत अहंता - मीपणा आहे, तोवर त्याला ईश्वरप्राप्ती घडणे शक्य नाही. 

संत ज्ञानदेवांचे संतसांगाती, संतशिरोमणी नामदेव महाराज आपल्या ‘आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।’ या पसायदानवजा एका अभंगात म्हणतात - ‘अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजसा। (ना.गा. ८७)’

संत तुकाराम महाराजांनीही ‘अहंकार’ हा दुःखास कारण कसा असतो हे सांगून अहंकार गळून पडताच सुखाचा सुकाळ होतो, असे एका अभंगात म्हटले आहे. तुकोबा म्हणतात - ‘एक देशी होतो अहंकारे आथिला। त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा।’ स्वतः रामदास स्वामी यांनीही मनाच्या श्लोकांशिवाय दासबोधामध्ये व अभंग गाथेमध्ये अहंकार या दोषाबद्दल अनेक वेळा लिहिले आहे व रघुनाथाकडे ‘अहंभाव घेवुनि टाकी दीनाचा’ अशी प्रार्थना करीत, ‘अहंभाव छेदुनिया उद्धरावे’ अशी विनवणी केलेली आहे. (संदर्भ - अनंतदास रामदासींचा ‘श्री समर्थ गाथा’)

महाभारत कथेमध्ये हनुमंत भीम व अर्जुन यांच्या अहंकाराचा कशा प्रकारे कुशलपणे उच्छेद करतात, त्या बोधकथा चिंतन करण्यासारख्या आहेत. हनुमंत एका रस्त्याकडेला झाडाखाली वृद्ध वानराचे रूप घेऊन बसलेले आहेत व त्यांचे लांब शेपूट रस्त्यात आडवे पसरलेले आहे. त्या रस्त्याने महाबली भीम आला व हनुमंताला रस्त्यातील शेपूट दूर घेऊन रस्ता सोडण्याची आज्ञा केली. तेव्हा हनुमंतराय म्हणतात – “मी वृद्ध आहे, अशक्त आहे, तरी आपणच माझे शेपूट उचलून रस्त्यातून बाजूला करावे.” भीमाला आपल्या शक्तीचा अहंकार-गर्व होता. तो तुच्छतेने हनुमंताकडे पाहत एका हाताने शेपूट दूर करू लागला, पण शेपूट जागचे हलले नाही. मग भीमाने दोन्ही हातांनी शेपूट उचलून दूर करण्याचा प्रयत्न केला, पण शेपूट जागचे तसूभर हलले नाही. मग आपल्या शक्तीचा गर्व खोटा असल्याचे भीमाच्या लक्षात आले व तो हनुमंतास हात जोडून शरण गेला आणि मग हनुमंताने भीमाला आपले सत्य रूप दाखवून शक्तीचा वृथा अहंकार न करता लीनतेने राहण्याचा उपदेश केला. अशाच एका प्रसंगात हनुमंतांनी शूर धनुर्धर अर्जुनाच्या अहंकाराची फटफजिता केली व त्यालाही आपल्या विद्येचा गर्व-अहंकार न करता नम्रतेने, विनयाने विद्यावहन करण्याचा उपदेश केला.

अगदी अलीकडचा समाज पाहिला तरी अहंकारी माणसाला फारसे मित्र मिळत नाहीत, मिळाले तर टिकत नाहीत. घरातही अहंकारी व्यक्तीपासून इतर कुटुंबीय दूर-दूर राहतात - अबोल राहतात. आणि हा स्वजन-मित्राचा दुरावा हेच माणसाच्या एकाकीपणाला कारण ठरतो व एकाकी माणूस सतत दुःखातच राहतो. म्हणून समर्थ म्हणतात - ‘अहंतागुणे सर्वही दुःख होते।’

जय श्रीराम।

 (पुढील लेखात - मनाच्या श्लोकातील मृत्युविचार) 

 विद्याधर ताठे

९८८१९०९७७५