बाभळी - बाभूळझाड !

विवेक मराठी    15-May-2018
Total Views |

दोन स्वतंत्र पण युगल कविता

मराठी कवितेतली एक सुंदर जुगलबंदी!

एका साध्यासुध्या, काटेरी, दुर्लक्षित झाडाकडे मराठीतल्या दोन दिग्गज कवींचं लक्ष गेलं. दोघांनी त्या झाडावर कविता लिहिल्या. एक वसंत बापटांनी, तर दुसरी इंदिरा संतांनी. त्याने लिहिताना झाडाला 'तो' म्हणून पाहिलं, तर तिने झाडात 'ती' पाहिली! एकच झाड. दृष्टीकोन किती निराळे! एकात त्याचं रांगडं, टणक, झुंजार रूप तर दुसरीत तिचं लोभस, मायाळू, वत्सल रूप ! इंदिरा संतांना ते झाड नाजूकसाजूक 'गांव की गोरी' वाटतं, तर वसंत बापटांना त्यात गावाकडचा ताठ, रांगडा मर्दगडी दिसतो. प्रियवस्तू तीच, फक्त इकडून 'ती' दिसते, तिकडून 'तो'! जणू अर्धनारीनटेश्वराचंच चित्रण दोन्ही बाजूंनी! एक ती अन् एक तो. शिव नि शक्ती. दोन्ही स्वतंत्रपणे सामर्थ्यवान,  सुंदर, पण एकत्र आले तर एकमेकांना अणखीनच पूर्ण करणारे.

 तर ही इंदिराबाईंची बाभळी... 'ती' कशीय? नाजूक पण रसरशीत. एखाद्या वनकन्येसारखी. काळीशार पण तुकतुकीत, तेजस्वी कांतीची! लवलवत काम करणारी. कष्टांचे काटेच काटे तिच्या आयुष्यभर पसरलेत. पण ती त्या काटयातूनही सुखाची पालवी फुलवणारी. आपले साध्या छोटया आनंदाच्या क्षणांचे लोलक मिरवणारी.

लवलव हिरवीगार पालवी - काटयांची वर  मोहक जाळी

घमघम करती लोलक पिवळे - फांदी तर काळोखी काळी

 - आणि वसंत बापटांचा 'तो' बाभूळ वृक्ष, ते बाभूळझाड! त्यातून दिसत राहतो एक 'तो'. दिवसभर राबणारा, घाम गाळून काम करणारा, वाऱ्यापावसाची पर्वा न करता बेदरकारपणे हिंडणारा मर्द मराठा गडी! कष्ट करून कमावलेलं मजबूत हाडपेर.'मोडून पडलं घरटं परि मोडला नाही कणा'सारखा ताठ कणा. मराठी बाणा. तो संकटांकडे पाठ नाही फिरवत. छाती काढून उभा राहतो.

अस्सल लाकू ड भक्कम गाठ

ताठर कणा टणक पाठ

वारा खात गारा खात

बाभूळझाड उभेच आहे

 ...'ती' अशी गुलजार नार! केसांच्या मोहक बटा नि कमनीय शेलाटया बांध्याची! पण स्वत:त रमणारी नव्हे केवळ. बाहेरच्या जगाचे विलोभनीय रंगही तिच्या व्यक्तित्वात आहेत. तिलाही खुणावणारं आभाळ आहे. तुकडयातुकडयात का असेना, ते तिला गोळा करायचंय.

झिरमिळ करती शेंगा नाजूक - वेलांटीची वळणे वळणे ,

या साऱ्यातुनि झिरमिर झरती - रंग नभाचे लोभसवाणे

 -'तो' राब राब राबतोच आहे. अंगावरची कोवळीक राठ झालीय. मातीत हात खुपसतो असं वाटतं, खरं तर तो खुपसत असतो आशा-आकांक्षांच्या आभाळात त्याच्या प्रयत्नांची दाही बोटं! आता एकटयाने रुजणं एवढंच कर्तव्य नाही त्याचं. जबाबदाऱ्या वाढताहेत. अपेक्षा वाढताहेत.

देहा फुटले बारा फाटे

अंगावरचे पिकले काटे

आभाळात खुपसुन बोटे

बाभूळझाड उभेच आहे

 ...'ती' कन्या ग्रामीण. साधीसुधी. तिला फार रीतभात ठाऊक नाही. जरा संकोची आहे. पुढे पुढे करून स्वत:चं महत्त्व वाढवणं तिला साधत नाही. जिथे असेल तिथे मुक्याने आपलं काम करत ती रमलीय.

कुसर कलाकृति अशी बाभळी - तिला न  ठावी नागर रीती

दूर कु ठेतरी बांधावरती - झुकून जराशी उभी एकटी

 - 'तो' आता काही कोवळा राहिला नाही. अंगाला हळद लागली असेल. काही हळुवार क्षण वाटयाला आले असतील. पण ते सारं जगण्याच्या लढाईत केव्हाच हरवलं. आयुष्याशी झगडून त्याच्याकडून आपलं चिमूटभर सुख हिसकावून घेण्यासाठी त्याचं धावणं सुरूच आहे. छाती फुटेतो.

अंगावरची लवलव मिटली

माथ्यावरची हळद विटली

छाताडाची ढलपी फुटली

बाभूळझाड उभेच आहे

 ...'ती' आता आत्ममग्न युवती नाही राहिली. अंगाखांद्यावर नवं जीवन खेळवतेय. जबाबदार, लेकुरवाळी झालीय. त्यांच्या बालपणाला राखतीय आता ती जीव लावून. त्यांच्या हुंदडण्यात आपलं दूर राहिलेलं बालपण शोधतेय.

अंगावरती खेळवि राघू - लागट शेळया पायाजवळी

बाळ गुराखी होऊनिया मन - रमते तेथे सांज सकाळी

 -'तो' जगण्याचा गाडा ओढतोच आहे. कुणीच नाही त्याचा भार हलका करणारं. कुठे अंगावर एखादा गाणारा पक्षी बसावा, त्याच्या असण्याने जगणं जरा सुसह्य व्हावं, इतकं साधं सुखही त्याच्या नशिबी नाही. अंगावर घर केलं तेही सुतारपक्षाने. त्याचा बुंधा पोखरतोय तो. तरीही तो त्याला सांभाळतोय. आपल्या पोटातली माया त्याला देतोय. खचला नाही. उन्मळला नाहीये तो. सगळा बहर झडला तरीही तो ताठ उभाच आहे.

 

जगले आहे जगते आहे

काकुळतीने बघते आहे

खांद्यावरती सुतारांचे

घरटे घेऊ न उभेच आहे

 ...पण तिला याचं उत्तर सापडलंय जणू. तीही तर सारे ऋ तू पाहते, पचवते. कधी पिवळया सोन्याने शृंगार करते. कधी नि:संग निव्वळ काटयांचा संग असतो तिच्या नशिबी. पण तिच्यात आहे एक अद्भुत सर्जनाची शक्ती! ती हिरवेपण निर्माण करू शकते. ती पुन्हा पुन्हा जन्मते. हिरवा शालू , पिवळी हळद लावून नवं आयुष्य जगायला घेते. दर वेळच्या पानझडीच्या फेऱ्यानंतर, 'फिरुनी नवी जन्मेन मी' म्हणत पुन्हा पुन्हा उमेदीने उभी राहते. तिच्यातली आई जगण्याला हिरवंगार बनवते, तर तिच्यातली प्रेमिका जगणं सुगंधी करते.

 येते परतुन नवेच होऊ न - लेवुन हिरवे नाजूक लेणे

अंगावरती माखुन अवघ्या - धुंद सुवासिक पिवळे उटणे !

***

असं हे बाभूळ बाभळीचं जगणं. एकाच झाडाची दोन्ही रूपं, किती अस्सल. किती खरी! एकमेकांना पूरक ठरणारी. एकमेकांच्या  अभावांना भरून काढणारी. दोन्ही मिळून पाहिलं तर एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व.

टणक, कर्तव्यकठोर असणं, पाय रोवून उभं राहता येणं ही जगण्यासाठीच्या व्यवहारातली मूलभूत गरज. पण त्यावर फु टणारी नात्यांची पालवी, भावभावनांचे काटे, छोटयाछोटया आनंदक्षणांचे लोलक, गोळा केलेल्या अनुभवांची बीजं असलेल्या शेंगा, यामुळे जगणं सजतं! संसारासाठी हे दोन्ही लागतं. जिथे या दोन्ही भूमिका करणाऱ्याचं एकत्व असतं, तिथे साध्यासुध्या जगण्यातही वैभव असतं. बाभुळझाडात लौकिक सौंदर्य फारसं नाही. त्याची फुलं-पानं-फळं-गंध काहीच अलौकिक म्हणावं असं नाही. पण तरीही ते सुंदर दिसतं. उजाड बोडक्या माळाला शोभा देतं. नजरेला सुख, मनाला प्रसन्नता-उभारी देतं. बाभूळझाड आपल्याला आहे त्या परिस्थितीत आनंदानं जगायला शिकवतं.

या दोन्ही कवींनी त्यांच्या त्यांच्या स्वभावाला अनुसरून वा त्यांच्या नजरेतून बाभळीला एक व्यक्तिमत्व दिलं. आपलं भाग्य हे की, आपल्याला या दोन्हीचं मिळून एक सुंदर संपूर्ण रूपक मिळालं. वारा खात गारा खात जगतानासुध्दा, अंगावर लवलवती पालवी नि घमघमणारे लोलक मिरवणारी साधी सामान्य माणसं आजूबाजूला दिसतात. रस्त्याकडेच्या झोपडीबाहेर लेकराला खेळवणाऱ्या एखाद्या आईच्या चेहऱ्यावरचं निर्मळ हसणं किंवा पाठीवर ओझी वाहणाऱ्या हमालाचं उमदं वागणं पाहिलं की बाभळीच्या पिवळया उटण्याचं तेज दिसतं..गंध जाणवतो. सावलीत वाढणाऱ्या बोन्सायच्या झाडांसारख्या आपल्या सुशिक्षित जगात हा गंध कुठून येणार? त्यासाठी त्यांच्यासारखं कधीतरी सगळया चौकटी मोडून जगण्याला छातीवर झेलायला हवं. कधीतरी बाभूळझाड व्हायला हवं!

9890928411