व्यावसायिकासाठी विमा संरक्षण अनिवार्य

विवेक मराठी    16-May-2018
Total Views |

व्यवसाय लहानसा असेल, तर मालकाला फारशी काळजी करण्याचे कारण नसते. परंतु व्यवसायाचा व्याप वाढल्यानंतर मात्र प्रत्येक गोष्टीत दक्ष राहावे लागते. स्वत:ची, कर्मचाऱ्यांची, ग्राहकांची आणि आस्थापनेची काळजी घ्यावी लागते. अशा वेळी आयुर्विमा, सर्वसाधारण विमा, अपघात विमा आणि आरोग्य विमा यांची चिलखते असणे खूपच फायदेशीर ठरते, हे मी अनुभवांतून शिकलो आहे. माझ्यावर आणि व्यवसायावर ज्या वेळी नुकसानीची संकटे आली, तेव्हा विम्याचा भक्कम आधार होता म्हणूनच 'जिवावरचे शेपटावर निभावले' म्हणत मी त्यातून बाहेर पडलो.

 मी तरुण आणि व्यवसायात नवशिका असताना संरक्षण किंवा सुरक्षितता या शब्दांचा फारसा विचार केलेला नव्हता. दुबईतील एका जिममध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षकाने मला ते महत्त्व पटवून दिले. आक्रमणापेक्षा आत्मसंरक्षण करणे नेहमीच फायद्याचे असते, हे मी त्या वेळी शिकलो. शारीरिक आत्मसंरक्षणासाठी मी ज्युदोच्या विद्येत प्रावीण्य मिळवले, तर व्यवसायाच्या संरक्षणासाठी मी कायद्याचे काटेकोर पालन, कागदपत्रांची शिस्त आणि विमाकवच या व्यूहरचनेचा आधार घेतला.

यापैकी विम्याचे महत्त्व सर्वप्रथम माझ्या बाबांनी मला लक्षात आणून दिले. त्यांनी व्यवसाय माझ्या ताब्यात सोपवला, तेव्हा माझ्या ताब्यात किरकोळ विक्रीची दोन दुकाने व दोन गोडाउन्स होती. बाबा निवृत्त होऊन भारतात जाणार असल्याने सर्व जबाबदारी मलाच सांभाळायची होती आणि निर्णयही मला घ्यायचे होते. जाण्यापूर्वी अनुभवाचे कानमंत्र देताना बाबा मला म्हणाले, ''दादा, मी कष्टाने आणि डोळयात तेल घालून हा व्यवसाय येथवर आणून ठेवला आहे. तू त्यात भर घाल. मार्गदर्शनासाठी मी जवळ असणार नाही, म्हणून आताच सांगून ठेवतो. व्यावसायिकाला सर्व प्रकारच्या विम्याचे कवच अत्यंत गरजेचे असते. स्वत:च्या आणि कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी आयुर्विमा, अपघात विमा व आरोग्य विमा घ्यावा, तर दुकान, गोडाउन, घर, माल आणि मौल्यवान वस्तूंच्या संरक्षणार्थ सर्वसाधारण विमा (जनरल इन्शुरन्स) घ्यावा. संकट कधीही सांगून येत नाही. आपण बेसावध न राहणे कधीही श्रेयस्कर.'' बाबांच्या सांगण्यानुसार मी लगेच सर्व प्रकारचे विमाकवच घेतले. त्याचे महत्त्व पटवणारा प्रसंग अगदी वर्षभरातच आला.

वर्ष 1996-97मध्ये मी, माझी पत्नी व मुलगा हृषीकेश (तो तेव्हा एक-दीड वर्षाचा होता) आम्ही नात्यातील एका विवाह समारंभासाठी मुंबईहून कराडला गेलो होतो. मी सहा महिन्यांपूर्वीच नवी गाडी घेतली होती आणि चालकही उत्साही होता. परतीच्या प्रवासात साताऱ्याच्या पुढे शिरवळजवळ एका मालवाहू ट्रकने अकस्मात आमच्या कारला धडक दिली. त्या अपघातात आम्ही जखमी झालो, पण सुदैवाने मरता मरता वाचलो. मात्र घर्षणामुळे पेटून कारचे खूपच नुकसान झाले. ती ओढत आणून पुण्यातील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी टाकावी लागली. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे नव्या गाडीचा खरेदीच्या वेळीच विमा उतरवला असल्याने, तसेच आमचाही अपघात विमा असल्याने खर्चाची अगदी पूर्ण नाही तरी बऱ्यापैकी भरपाई मिळाली. मला राहून राहून बाबांचा सल्ला आठवत राहिला.

त्यानंतर दोन-तीनच वर्षांत पुन्हा एकदा मला अक्षरश: अग्निदिव्यातून जाण्याची वेळ आली. दुबईत एव्हाना माझी पाच गोडाउन्स झाली होती. त्यातील चार एकत्र व पाचवे शेजारच्या कंपाउंडमध्ये होते. त्यापलीकडे आणखी काही व्यापाऱ्यांची गोडाउन्स होती. या व्यापाऱ्यांपैकी एकाने फटाक्यांचा मोठा साठा मागवला होता. तो उतरवून घेताना त्यावर ठिणगी पडून अचानक जबरदस्त स्फोट झाला आणि नंतर आग लागून स्फोटांची मालिकाच सुरु झाली. मी त्या वेळी माझ्या गोडाउनमध्येच कर्मचाऱ्यांसमवेत मालसाठयाचा आढावा घेत होतो. मोठा आवाज होऊन हादरे बसल्याने मी धावत बाहेर आलो, तर आजूबाजूची सर्व गोडाउन्स पेटलेली होती. माझ्या गोडाउन्समधील मालसाठा जळताना मी सुन्न होऊन बघत होतो. ती आग पसरत माझ्या दिशेने येत होती. माझ्या पायातील त्राणच गेले होते. ती आग मलाही गिळणार होती, पण तेवढयात माझ्याकडे काम करणारा रतन नावाचा बांगला देशी कामगार धावत आला आणि त्याने मला ढकलतच आगीतून बाहेर काढून रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीत नेऊन कोंबले. माझा जीव वाचला, पण गोडाउन्सचे मात्र मोठे नुकसान झाले.

मी गोडाउन्सचा व मालाचा विमा उतरवला असल्याने मला भरपाई मिळाली, पण त्यातही एक कान टोचणारी घटना अशी घडली, की मी चार गोडाउन्सचा विमा एका कंपनीकडून, तर पाचव्या गोडाउनचा विमा दुसऱ्या कंपनीकडून काढून घेतला होता. पहिल्या कंपनीने मला सर्व भरपाई दिली, पण दुसऱ्या कंपनीने मात्र बराच मनस्ताप दिला. विमा पॉलिसीवरील बारीक अक्षरात लिहिलेले नियम दाखवून त्याआधारे त्यांनी भरपाईची रक्कम बरीच कमी केली. चूक माझी होती. मी विमा घेण्यापूर्वी हे नियम नीट वाचून आणि समजून घ्यायला हवे होते. त्या प्रसंगातून मी योग्य धडा घेतला. नंतर कोणताही विमा काढताना मी एजंटकडून सर्व बारीक-सारीक तपशील विचारून घेऊ  लागलो आणि विचारपूर्वक विमा कंपनीची निवड करू लागलो.

एक आश्चर्याची किंवा योगायोगाची गोष्ट मला येथे नमूद करावीशी वाटते. मी एखादा विमा खरेदी केल्यानंतर वर्ष-दोन वर्षांतच अशी एखादी घटना घटली आहे, ज्यामुळे त्या विम्याचे मला साह्य झाले आहे. कामाच्या अतिआसक्तीमुळे, तसेच आहाराच्या व झोपेच्या वेळापत्रकाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मी तीव्र पित्तप्रकोपाचा बळी ठरलो. त्यातूनच पुढे पाठदुखी, पोटदुखी, निद्रानाश, औदासीन्य, नैराश्य असे दुष्टचक्र माझ्या मागे लागले. त्या दुखण्यातून वाचण्यासाठी मी किती डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटलच्या वाऱ्या केल्या, हे माझे मलाच ठाऊक. माझ्यावर नऊ वेळा एंडोस्कोपी झाली. मी सगळया उपचार पध्दती वापरून पाहिल्या. पैसा पाण्यासारखा खर्च होत होता. पण त्यातही समाधानाची बाब म्हणजे माझा आरोग्य विमा उतरवलेला होता. त्यामुळे डॉक्टरांच्या तपासण्यांच्या, रुग्णालयातील चाचण्यांच्या, शस्त्रक्रियांच्या व औषधांच्या खर्चाचा भार माझ्यावर पडला नाही.

मी माझ्या कर्मचाऱ्यांचा अपघात व आरोग्य विमा उतरवला, त्याचा त्यांना फायदा झाला. आमच्या मुंबईच्या कार्यालयातील अकाउंटंट रात्री कामावरून घरी जात असताना त्याच्या मोटारसायकलला जवळून वेगात जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. तो मोटारसायकलसकट फरपटत गेला. डोक्यावर हेल्मेट असल्याने मेंदूला गंभीर दुखापत होण्यापासून वाचला, परंतु शरीराच्या अन्य भागाला इजा झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. मी तातडीने त्याला रुग्णालयात भेटायला गेलो, तेव्हा त्याने खुणेने मला सांगितले, की 'हेल्मेट घातल्याने माझा जीव वाचला.' मी या दक्षतेबद्दल त्याचे कौतुक केले आणि धीर दिला, की 'तू स्वस्थचित्त राहून लवकर बरा हो. विमा संरक्षण असल्याने तुला रुग्णालयीन खर्चाची काळजी करण्याची गरज नाही आणि कोणत्याही खर्चाची काळजी आपली कंपनी घेईल.' तो सुखरूप बरा होऊन कामावर परतला, तेव्हा त्याने पहिली गोष्ट काय केली असेल, तर आपल्या कुटुंबासाठी आणि मालमत्तेसाठी व्यापक (कॉम्प्रिहेन्सिव्ह) विम्याच्या पॉलिसी घेतल्या.

मित्रांनो! पूर्वीच्या काळात मोजक्याच विमा कंपन्या असल्याने ग्राहकांना मर्यादित पर्याय उपलब्ध होते. परंतु विमा क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले झाल्यानंतर विम्याचे अधिकाधिक आकर्षक व बहुसंरक्षक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील स्पर्धेमुळे विमेदारांना अधिकाधिक फायदेशीर पर्याय प्राप्त होत आहेत. वाहने आधुनिक झाली आणि रस्तेही रुंद झाले, तरी अपघात व्हायचे थांबत नाहीत. रुग्णालये आधुनिक झाली आणि औषधेही प्रभावी निघाली, तरी रोगांचा प्रादुर्भाव व्हायचा थांबत नाही. विज्ञान प्रगत झाले, तरी आग, वादळ, भूकंप, पूर अशा गोष्टी आजही आपल्या नियंत्रणात नाहीत. म्हणूनच संभाव्य धोक्यांपासून वाचण्यासाठी आपण संरक्षणाचे शक्य तितके उपाय योजावेत. एका संस्कृत सुभाषितात म्हटलेच आहे -

उद्योगे नास्ति दारिद्रय जपतो नास्ति पातकम्।

मौने च कलहो नास्ति, नास्ति जागरतो भयम्॥

(उद्योग-व्यवसाय केल्याने दारिम्य उरत नाही, जप केल्याने पाप उरत नाही, मौन बाळगल्यास भांडण उरत नाही आणि जागरूक राहिल्यास भीती उरत नाही.)

जीवनात आपली लढाई आपल्यालाच लढावी लागते आणि संरक्षणाची तजवीजही स्वत:च करावी लागते. त्यामुळे सदैव जागरूक राहणे सर्वांत उत्तम. यासाठीच व्यावसायिकाकडे अनेक विम्यांचे कवच असावे.

 (या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 00971505757887 या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवू शकतात.)