मुलुंड पूर्वचे 'संघ शिलेदार'

विवेक मराठी    16-May-2018
Total Views |

1955 ते 1958 या काळात मुलुंड पूर्व भागात संघकामास प्रारंभ झाला. ग.पु. थोरात, वसंत फाटक, बाबा इंदुरकर, दत्तोपंत घाटपांडे, वसंतराव ओक, गोंधळे, मधू जोशी, केशव गोखले, राजाभाऊ गोखले आदी स्वयंसेवक कार्यरत होते. महानगर प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारे स्वयंसेवक मुलुंड पूर्वेच्या उपनगरात कार्यरत होते.

 समाजाप्रती समर्पण भावनेने काम करणाऱ्या संघस्वयंसेवकांच्या कार्यातून पुढील पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने 'देणे कृतज्ञतेचे' या छोटेखानी पुस्तकात हिंदू चेतना संगम मुलुंड पूर्व केशवप्रभात शाखेतील दिवंगत व कार्यरत अशा 25 संघ स्वयंसेवकांच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या आहेत.

संघकाम हे स्थानिक कार्यकर्त्यांच्या जोरावर उभे राहत असते. प्रचारक, विस्तारक किंवा शहराबाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर जसे चालते, तसेच स्थानिक कार्यकर्त्यांमुळे संघकामाला अधिक गती प्राप्त होते. समाजपरिवर्तनाचे काम करण्यासाठी प्रामाणिक व विवेकशील कार्यकर्त्यांची नितांत गरज लागत असते. ही गरज लक्षात घेऊन संघाने अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली आहे. संघशाखांतून होणाऱ्या व्यक्ती-निर्माणाचे काम त्या शाखेतील तरुण स्वयंसेवकच करीत असतात. 1955 ते 1958 या काळात मुलुंड पूर्व भागात संघकामास प्रारंभ झाला. ग.पु. थोरात, वसंत फाटक, बाबा इंदुरकर, दत्तोपंत घाटपांडे, वसंतराव ओक, गोंधळे, मधू जोशी, केशव गोखले, राजाभाऊ गोखले आदी स्वयंसेवक कार्यरत होते. महानगर प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारे स्वयंसेवक मुलुंड पूर्वेच्या उपनगरात कार्यरत होते. हिंदुत्वाचे कैवारी बळवंत नारायण जोग हे मुलुंड पूर्व भागातील पहिल्या फळीतील संघ स्वयंसेवक. जोग यांनी वयाच्या 28व्या वर्षी सा.'विवेक'चे संपादकत्व स्वीकारले. 9 वर्षांच्या संपादकीय कारकिर्दीत त्यांचे अनेक संपादकीय लेख आणि 'प्रहार' हे सदर अतिशय लोकप्रिय झाले.

1963 साली 'आधुनिक भारतापुढील यक्षप्रश्न' हे मुस्लीम समस्येवर आधारित पुस्तक प्रसिध्द करून त्यांनी पुढील लिखाणाचा पाया घातला. डॉ. म.पु. केंदुरकर हे मराठी विषयाचे अध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख व उपप्राचार्य म्हणून कार्यरत असतानाच हिंदू संस्कृतिजीवनाचे द्रष्टे अभ्यासक व विचारवंत, सामाजिक समरसतेचे प्रवक्ते अशीही त्यांची ओळख होतीच. मुलुंड पूर्वचे शिल्पकार म्हणून बाळ धारप यांचा उल्लेख केला जातो. पहिल्या संघबंदीनंतरच्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या कार्यकुशलतेमेुळे त्यांना मुंबई प्रदेश जनसंघाचे उपाध्यक्ष ही जबाबदारी देण्यात आली. 1968 साली जनसंघातर्फे मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदासाठी मुलूंड पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली व ते निवडून आले. अणीबाणीत त्यांनी येरवडा कारागृहात तुरुंगवास भोगला. अशा अनेक महानुभावांच्या कार्याचा परिचय या पुस्तकातून होईल.

एकनिष्ठ ध्येयव्रती भाऊ करंदीकर, कुशल संघटक मधुकर धारप, तपस्वी स्वयंसेवक राजाभाऊ आचार्य, कर्मयोगी स्वयंसेवक दादा काळे, कर्तव्यनिष्ठ संघचालक दादा जोशी, संघविचारी पत्रकार निळूभाऊ देशमुख, ध्येयनिष्ठ कार्यकर्ता सुरेश कुलकर्णी, सेवाभावी कार्यकर्ता बाबा इंदुरकर, शरद सहस्रबुध्दे, दिगंबर कुलकर्णी, नाना शेवडे, प्रफुल्लचंद्र प्रधान, दत्तोपंत घाटपांडे, भास्कर मालशे, डॉ.अरविंद प्रधान, अरुण केळकर, 'कामगार जगत'चे कुणाल-शरद चव्हाण, मजूर संघटक रमेश सुर्वे, बबनराव कुलकर्णीया स्वयंसेवकांचा कामाचा वेध 'देणे कृतज्ञतेचे'मधून घेण्यात आला आहे. या पुस्तकातून चौथ्या पिढीतील संघस्वयंसेकांना प्रेरणा आणि दिशा निश्चित मिळेल.         

 9970452767