विजय आणि पराजय

विवेक मराठी    17-May-2018
Total Views |

***रमेश पतंगे***

राज्य विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर माध्यमातून त्याच्या चर्चा चालू होतात. सामान्यतः चर्चेत तेच तेच विषय असतात. उदा., भाजपाच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्त्वाची आहे, तेवढीच ती राहुल गांधीच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाची आहे... या निवडणूक निकालाचे परिणाम 2019च्या लोकसभा निवडणुकीवर होतील... इत्यादी इत्यादी. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या चर्चा जर आपण वाचल्या आणि ऐकल्या असतील, तर यापेक्षा त्या चर्चेत काही वेगळे आढळणार नाही. काही वेगळेपणा जर असेल, तर तो 'कर्नाटक हे दक्षिणेचे राज्य आहे आणि हे राज्य जर भाजपाने जिंकले तर दक्षिणेचे प्रवेशद्वार भाजपासाठी उघडले जाईल' एवढाच नवीन विषय होता.

सगळे मतदानाचे अंदाज खूपशा प्रमाणात खोटे ठरवत भाजपा सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष झालेला आहे. भाजपाला 104 जागा मिळाल्या आहेत. भाजपाच्या या यशावर चर्चा होणे स्वाभाविक आहे. तशीच काँग्रेसच्या पराभवावर चर्चा होणे अगदी स्वाभाविक आहे. कर्नाटकाची निवडणूक, गुजरातच्या निवडणुकीप्रमाणे 'नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी' अशी रंगविण्यात आली. राहुल गांधींचा पराभव झालेला आहे, ही गोष्ट काँग्रेस मान्य करणार नाही. ज्यांनी दूरदर्शनवर रत्नाकर महाजन यांचे भाष्य ऐकले असेल, त्यांना ही गोष्ट पटेल. 'आकडयात आमचा पराभव झाला असला तरी आमचा नैतिक विजय झालेला आहे' अशा प्रकारची वक्तव्ये जर ऐकण्यात आली तर त्याचे आश्चर्य वाटू नये.

कर्नाटकाचा विजय नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह यांचा आहे, असेही विश्लेषण चालू असते, ते चूक आहे असे म्हणता येणार नाही. परंतु हा व्यक्तीचा विजय नाही. हा विजय विचारधारेचा आणि संघटनेचा आहे. कर्नाटक विजयाच्या विश्लेषणात संघाचे नाव कुणी फारसे घेतलेले नाही. परंतु हा विजय संघविचारधारेचा आणि संघ संघटनशास्त्राचा आहे. ज्यांचा संघविचारधारेचा गहन अभ्यास नाही आणि संघ संघटनशास्त्राचा त्याहून नाही, त्यांना हे समजणे अतिशय अवघड आहे. त्यांचे संघज्ञान पुस्तकी असते आणि त्यांनी ठरविलेल्या प्रमेयांभोवती ते घोटाळत असते. उदा., संघ सांप्रदायिक संघटना आहे, संघ पुराणमतवादी आहे, संघाला सर्वसमावेशकता नको, संघाला बहुविधता नको, संघाला मुसलमान आणि ख्रिश्चनांचे बळजबरीने धर्मांतर करायचे आहे, वगैरे वगैरे आणि संघटनशास्त्राविषयी म्हणाल, तर या सर्व लोकांनी संघाचे संघटन हिटलर आणि मुसोलिनीच्या संघटनेसारखे आहे, असे गृहीतच धरलेले आहे. अज्ञानात आनंद असतो असे म्हणतात. तेव्हा या लोकांना अज्ञानात जगू द्यावे, त्यांचा आनंद त्यांनी उपभोगावा.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह, एवढेच काय, भाजपाची सगळी नेतेमंडळी आणि भाजपाचे सर्व केडर संघविचारधारेतून आलेले आहे. भाजपाचे संघटनदेखील संघ संघटनशास्त्राच्या सिध्दान्तावर बांधले गेलेले आहे. या संघ संघटनशास्त्राची पायाभरणी ज्या थोर संघमंडळींनी केली, त्यात डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस, यादवराव जोशी, एकनाथजी रानडे इत्यादी मंडळींची नावे घ्यावी लागतात. यापैकी एकनाथजी रानडे, बाळासाहेब देवरस आणि यादवराव जोशी यांनी संघटनशास्त्राच्या बाबतीत काय सांगितले आणि त्याचा संदर्भात भाजपाच्या विजयाशी कसा येतो, एवढेच फक्त आपल्याला जाणून घ्यायचे आहे.

एकनाथजी रानडे संघाचे सरकार्यवाह होते. त्यांनी सर्व देशाची विभागणी 'मंडल' या रचनेत केली. 15-20 गावांचे एक मंडल आणि मंडलाची संघाची कार्यकारणी आणि मंडलस्थानी शाखा हे सूत्र त्यांनी ठेवले. बाळासाहेब देवरसांनी 25000ची एक वस्ती, त्या वस्तीत दोन शाखा आणि दोन शाखांची सरासरी पन्नास अशी वस्ती योजना ठेवली. यादवराव जोशींनी शाखा तेथे सेवा कार्य ही संकल्पना मांडली. या संकल्पना वाचून शब्दांपलीकडे काही समजणार नाही, परंतु त्याचा खोलवरचा अर्थ असा होतो की, सर्व समाजाशी जातपातविरहित संपर्क ठेवायचा असेल, तर छोटया छोटया भागांमध्ये संघटनेची रचना केली पाहिजे आणि शाखेच्या माध्यमातून, सेवा कार्यांच्या माध्यमातून समाजाशी नित्य, जिवंत संपर्क ठेवला पाहिजे. ही रचना कुठल्या एका प्रांतात करून चालणार नाही, ती अखिल भारतीय असली पाहिजे आणि तिच्यात सारखेपणा असला पाहिजे. हे संघटन बांधण्यासाठी, माझ्या माहितीप्रमाणे संघाची नव्वद वर्षे खर्च झालेली आहेत. ही नव्वद वर्षांची तपश्चर्या आहे. संघटन एके संघटन हा मंत्र जपत तीन-चार पिढया संघात संपल्या.

भाजपाने बूथप्रमाणे संघटन बांधले, अधिकाधिक मतदारांशी संपर्काची रचना उभी केली, त्याला मतदान केंद्रावर आणले, इत्यादी गोष्टी राजकीय विश्लेषक सांगतात. हे खरे असते, पण अमितभाई शाह कितीही कर्तृत्ववान असले, योजक असले, तरी एकटे काही अशी किमया करू शकत नाहीत. त्यांना जो वारसा मिळालेला आहे, तो वारसा या वेळी कामाला येतो. रज्जूभय्या एक गोष्ट सांगत असत की, वानरसेना खूप मोठी आहे, तेवढयाने विजय मिळत नाही. त्याचे नेतृत्व करण्यासाठी राम लागतो. ते असे म्हणत असत की, आज सर्व देशभर आपली संख्यात्मक ताकद खूप आहे. तिचे राजकीय नेतृत्तव करणारी व्यक्ती आपल्यातूनच उभी राहील, त्यामुळे राजकीय यश मिळेल. ते जे सांगत असत, त्याचा थोडक्यात भावार्थ असा - नव्वदच्या दशकात अटलबिहारी यांनी असे नेतृत्व दिले आणि आता मोदी देत आहेत. त्यांची विचारधारा संघाचीच. तिचे वर्णन दोन वाक्यात करायचे तर थ्मराष्ट्र प्रथम, मी नंतर' आणि 'समृध्द, बलशाली राष्ट्र, विश्व कल्याणासाठी'. नरेंद्र मोदी ही दोन्ही कामे आपली सर्व शक्ती पणाला लावून आज करीत आहेत. सर्वसामान्य लोकांना हे समजतेच असे नाही, परंतु त्यांना हे दिसत की, ही माणसे प्रामाणिक आहेत, देशाचा विचार करणारी आहेत, जाती-जातीत भांडण लावणारी नाहीत, हिंदू समाज तोडणारी नाहीत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आहेत. शेवटी, तुम्ही कोणते कार्यक्रम करता, यातूनच लोकांना विचार समजतो.

दिवसेंदिवस काँगे्रस दुर्बळ बनत चाललेली आहे. पक्षीय राजकारणाचा विचार केला तर ती चांगली गोष्ट आहे. राष्ट्रकारणाचा विचार केला तर ही चिंताजनक गोष्ट आहे. आपला देश अतिशय विशाल आहे. जगात कुठे नसेल एवढी विविधता आपल्या देशात आहे. संस्कृतीने तो घट्ट बांधला गेलेला आहे. राजकीयदृष्टया तो घट्ट बांधलेला असणे आवश्यक आहे. आपल्या देशातील लोकांना संस्कृतीचे विषय चटकन समजतात, राजकीय ऐक्याचे विषय समजायला वेळ लागतो. उदा., आम्ही राजकीयदृष्टया जेव्हा जेव्हा विभाजित झालो, केंद्रसत्ता दुर्बळ केली, तेव्हा तेव्हा आम्ही लढाया हरलो आणि पारतंत्र्यात गेलो. म्हणून राजकीय ऐक्य राहणे ही नितांत आवश्यक गोष्ट आहे.

हे राजकीय ऐक्य राखण्याचे काम देशव्यापी संघटनाच करू शकतात. कोणत्याही प्रादेशिक पक्षाचे हे काम नव्हे. स्वातत्र्यपूर्व काळात भारतातील सर्व लोकांनी आपले प्रमुख राजकीय संघटन म्हणून काँग्रेसला मान्यता दिली होती. तेव्हाचे सगळे काँग्रेस नेते समग्र राष्ट्राचा विचार करणारे नेते होते. ते जातिगत राजकारणाचा किंवा सांप्रदायिक राजकारणाचा विचार करीत नसत. घराणेशाहीच्या राजकारणाचा तर अजिबात विचार करीत नसत. त्यांच्या डोळयापुढे विशाल भारत, विशाल भारतातील विशाल जनसमूह, या जनसमूहाचे वेगवेगळे प्रश्न, अस्पृश्यतेचा प्रश्न, सांप्रदायिक सौहार्दाचा प्रश्न, गरिबी निमूर्लनाचा प्रश्न असे सर्वव्यापी प्रश्न असत. या सर्व मंडळीनीच देशाची विविधता जपणारे आणि देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रश्नांना उत्तरे शोधणारे संविधान आपल्याला दिले. हे संविधानदेखील आपल्या परीने देशाचे राजकीय ऐक्य टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करते.

या राजकीय ऐक्याच्या समर्थनासाठी राजकीय क्षेत्रात केवळ भाजपा पुरेसा नाही. आपण संसदीय पध्दतीची लोकशाही स्वीकारली आहे. ही संसदीय पध्दती काही गृहीतांवर अवलंबून आहे. तिचे पहिले गृहीत असे की, ऐक्य लोकांच्या राजकीय इच्छा, आकांक्षा व्यक्त करणारे दोन प्रमुख राजकीय पक्ष हवेत. दुसरे गृहीत असे की, देशाचे राजकीय मजबूत ठेवण्यासाठी केवळ बहुमतावर नाही, तर सहमतीच्या आधारे राज्य चालविले जावे. तिसरे गृहीत असे की, काही संकेत आणि काही रूढी निर्माण कराव्यात आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करावे. चौथे गृहीत असे की, वेगळे मत मांडणारे जे असतील, त्यांच्या मताला किंमत द्यावी आणि त्यातील काय स्वीकारता येईल याचा सत्ताधारी पक्षांनी विचार करावा. या गृहीतातील पहिला विषय दोन देशव्यापी राजकीय पक्षांचा आहे. काँग्रेस पक्ष राजकीयदृष्टया जर संपला, तर देशाच्या राजकारणावर त्याचे अतिशय वाईट परिणाम होतील. काँग्रेस पक्ष संपल्यामुळे जी पोकळी निर्माण होईल, ती जातवादी, धर्मवादी, राजकीय गट भरून काढण्याचा प्रयत्न करतील. असले गट अत्यंत संकुचित राजकारण करतात. देशापेक्षा त्यांना आपली जात किंवा पंथ महत्त्वाचा वाटतो. काँग्रेस नाहीशी झाल्यामुळे होणारी पोकळी भाजपा पूर्णपणे भरून काढेल, याची शक्यता नाही. कारण राजकीय आणि आर्थिक कार्यक्रमांविषयी देशात सर्वांचे एकमत होणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. आर्थिक आणि राजकीय कार्यक्रम हीच राजकीय पक्षांची संजिवनी असते.

काँग्रेस पक्षाला एक इतिहास आहे. स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस आणि आताची काँग्रेस जरी एक नसली, तरी  नावाचा वारसा आहे, तो लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या मुळाकडे गेले पाहिजे. राष्ट्रीय दृष्टीकोन ठेवून राजकारण केले पाहिजे. महात्मा गांधीजींनी सेवा कार्याच्या माध्यमातून गावपातळीपर्यंत संघटन बांधले. आधुनिक काळात असे संघटन काँग्रेसला बांधता आले पाहिजे. घराणेशाहीपासून काँग्रेसला मुक्त व्हायला पाहिजे. राहुल गांधी घराण्याचे आहेत म्हणून त्यांना विरोध जसा करता कामा नये, तसा ते घराण्याचे आहेत म्हणून समीक्षेच्या पलीकडचे आहेत असे मानणे ही सगळयात वाईट गुलामी आहे. काँग्रेसच्या मंडळींनी - विशेषतः नेत्यांनी राष्ट्राचा विचार करून आपल्यात दूरगामी आणि मूलगामी बदल करायला पाहिजे. केवळ सत्ता एके सत्ता हाच विचार काँग्रेसचा मूलमंत्र होता कामा नये. महात्मा गांधी आणि काँग्रेस हे अद्वैताचे नाते आहे. गांधीजींनी सत्ताकारण कधी केले नाही. त्यांचे स्थान इतके मोठे झाले की, देशाचे राष्ट्रपतिपदही त्यांच्यापुढे लहान झाले, हा काँग्रेस या नावाचा राष्ट्रीय वारसा आहे.

एकामागून एक होणारे पराभव या वारशाची आठवण करून देत आहे. ती आठवण त्यांनी जागृत करावी. एक बलशाली पक्ष उभा करावा. ती देशाची आणि लोकशाहीची गरज आहे.

vivekedit@gmail.com