इस्रायलचा धार्मिक इतिहास

विवेक मराठी    18-May-2018
Total Views |

 

***डॉ. अपर्णा लळिंगकर***

 सध्याच्या इराणमध्ये पर्शियन संस्कृती होती. एकूणच मध्यपूर्वेचा भाग (अरब राष्ट्रे, इराक, इराण, सीरिया, इस्रायल) हा एकेश्वरवादी धर्मांसाठी फारच महत्त्वाचा मानला गेलेला आहे.  या इब्राहिमिक धर्मांची सुरुवातही याच भूप्रदेशांतून झालेली आहे, असे इतिहास सांगतो.

 इतिहासात डोकावल्यास लक्षात येते की 5000 वर्षांपूर्वीदेखील सध्याच्या इस्रायलमध्ये पेगन लोकांचे वास्तव्य आणि संस्कृती होती. भूमध्य समुद्रावरील हा इस्रायलचा भाग मुख्यत: व्यापारी जहाजांच्या मालाच्या देवाणघेवाणीचे केंद्र म्हणून अधिक कार्यरत होता. सध्याच्या अरब राष्ट्रांचा भाग हा मुख्यत: वाळवंट आणि त्यातील विविध टोळया यांनी व्यापलेला होता, तर पूर्वेकडचा इराक, अफगाणिस्तान आणि पुढचा भाग पेगन संस्कृतीने व्यापलेला होता. सध्याच्या इराणमध्ये पर्शियन संस्कृती होती. एकूणच मध्यपूर्वेचा भाग (अरब राष्ट्रे, इराक, इराण, सीरिया, इस्रायल) हा एकेश्वरवादी धर्मांसाठी फारच महत्त्वाचा मानला गेलेला आहे. या इब्राहिमिक धर्मांची सुरुवातही याच भूप्रदेशांतून झालेली आहे, असे इतिहास सांगतो.

ज्यू बायबलमधील संदर्भांनुसार साधारण 3000 ते 4000 वर्षांपूर्वी सध्याच्या इराकमध्ये असलेल्या उर या ठिकाणी राहणाऱ्या इब्राहिम नामक एका टोळीवाल्याला पश्चिमेकडे भूमध्य समुद्राच्या दिशेला एका भूभागात जाण्यासाठी ईश्वराचा साक्षात्कार झाला. त्याला परमेश्वराने सांगितले, ''मी जरी सृष्टी निर्माण केली, मानवाला जन्माला घातले, तरी त्याने त्या सगळयाची माती केली. माणूस अतिशय स्वार्थी झाला आणि चुकीचे वागायला लागलाय. त्यामुळे मी त्या सगळयांमधून तुझी निवड केली आहे. पश्चिमेकडे जी भरपूर दूध, मध उपलब्ध असलेली जमीन आहे ती मी भविष्यात तुझ्या मुलांना देईन. तू तिथे जा आणि मी सांगतो त्या पर्वतावर तुझ्या सगळयात मोठया आणि लाडक्या मुलाचा - इझ्झाकचा (आयझॅकचा) बळी दे.''

ही भूमी म्हणजे सध्याचे इस्रायल. इब्राहिम या भूमीत दाखल झाला. इब्राहिमला इझ्झाक लग्नानंतर अनेक वर्षांनी झाल्यानेच त्याचा तो अत्यंत लाडका होता. पण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे तो आपल्या मुलाला घेऊन मोरिया पर्वतावर (सध्याचे जेरुसलेममधील टेंपल माउंट) घेऊन आला. तो इझ्झाकचा बळी देणार, इतक्यात त्याला दुसरा साक्षात्कार झाला की स्वत:च्या मुलाचा बळी देण्याऐवजी समोर जो छोटा बकरा दिसतो आहे, त्याचा बळी दे. इब्राहिमने तिथे त्या बकऱ्याचा बळी दिला. त्यानंतर हजार वर्षांनंतर ज्यूंचा पहिला राजा डेव्हिड याने त्या मोरिया पर्वताच्या आसपास जेरुसलेम हे शहर वसवले. त्यानंतर त्याचा मुलगा सॉलोमन याने मोरिया पर्वतावर त्या देवाचे पहिले भव्य मंदिर बांधले. तिथेच मंदिराच्या गर्भगृहात एक पायाभूत दगड होता/आहे. ज्यूंसाठी त्या दगडाचे महत्त्व खूप मोठे आहे.

 

सॉलोमनच्या मृत्यूनंतर बॅबेलिऑॅनमधील राजांनी आक्रमण करून ज्यूंचे पहिले मंदिर पाडले. त्यानंतर अनेक वर्षांनी राजा हेरॉद याने त्याच जागी मोरिया पर्वतावर दुसरे मोठे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. दुसऱ्या मंदिराचे बांधकाम चालू असतानाच राजा हेरॉदचा अंत झाला आणि दुसरे मंदिरही अर्धवटच राहिले. पुढे रोमन राजांनी तिथे आक्रमण केले आणि अर्धवट बांधले गेलेले दुसरे मंदिरही तोडून टाकले. पुढे तो सगळा भाग अरब मुसलमान लोकांनी व्यापला आणि दुसऱ्या मंदिराच्या जागी एक मोठी मशीद बांधली. मशिदीमध्ये दिवसातून पाच वेळा प्रार्थना करण्यासाठी त्यांना मोरिया डोंगर चढायला लागत असे. म्हणून त्यांनी मोरियाच्या आजूबाजूलाच कमानी टाकून, तिथेच वस्ती बनवली.

ज्यूंना टेंपल माउंटवर जाण्याची परवानगी नाही. ज्यूंचे म्हणणे आहे की मशिदीच्या इमारतीखाली पहिल्या मंदिराचा पायाभूत दगड अजूनही आहे. ते सिध्द करण्यासाठी इस्रायली सरकारने टेंपल माउंटच्या आजूबाजूला भुयार खणून तिथे पहिल्या आणि दुसऱ्या मंदिराचे अवशेष मिळवले आहेत. पर्यटक आणि श्रध्दाळू जे कोणी टेंपल माउंटच्या तिथे जातात, तिथे त्यांच्यासाठी हा सगळा इतिहस सांगण्यासाठी आभासी सत्य (ऑॅगमेंटेड रिऍलिटी) आणि गाईडेड टूर्स ठेवलेल्या आहेत. त्या भव्य मंदिराचे पायाचे अवशेष आपल्याला सध्याच्या जेरुसलेमच्या टेंपल माउंटच्या बाजूने इस्रायली सरकारने जे उत्खनन केले आहे, तिथे दिसून येतात. ज्यू लोक तिथे खाली जाऊन गर्भगृहातील पायाच्या दगडाच्या दिशेने अजूनही प्रार्थना करताना दिसतात. 

इब्राहिमच्या आयझॅक या मुलाचा मुलगा इस्राएल. त्याला जेकब असेही म्हणतात. इब्राहिमच्या अशा तीन पिढया तिथे राहिल्या. पुढे इस्राएलला बारा मुले झाली. हेच ज्यू धर्मीयांचे मूळ लोक. त्यातील जोसेफ हा बारावा. जोसेफला इजिप्तमधील राजांनी गुलाम म्हणून इजिप्तमध्ये नेले. जोसेफ इजिप्तला एक गुलाम म्हणून गेला आणि नंतर त्याचा राजपरिवाराशी संबंध आल्याने अतिशय शक्तिशाली बनला. तोपर्यंत इस्राएलचा मृत्यू झाल्याने नंतर त्याने आपल्या उर्वरित अकरा भावांना इजिप्तला बोलावून घेतले. कालांतराने ते सगळे इजिप्तमध्ये पुन्हा गुलाम बनले. ते जवळजवळ 500 वर्षे इजिप्तमध्ये राहिले. गुलाम असले, तरी त्यांची संख्या वाढतच होती. त्यामुळे इजिप्तच्या राजाने आदेश दिला की ज्यूंमधील प्रत्येक घरातील मोठया मुलाची हत्या करायची.

त्यातीलच एका ज्यू बाईने आपल्या मोठया मुलाला एका टोपलीत ठेवून जिथे इजिप्तची राजकन्या आंघोळ करते त्या नदीत ती टोपली सोडून दिली. अपेक्षेप्रमाणे राजकन्येच्या दृष्टीस ती टोपली पडली. टोपलीत पहुडलेल्या बालकाला तिने राजवाडयात आणले आणि स्वत:चा मुलगा म्हणून वाढवले. याच मुलाचे नाव मोझेस. पुढे मोठा झाल्यावर मोझेसने सगळया ज्यू धर्मीयांना एकत्र करून पुन्हा इस्रायलमध्ये आणले. याचीच अत्यंत रोचक कथा 'जेरिकोचा इतिहास' या पुढील लेखात वाचायला मिळेल.

9742045785

aparnalalingkar@gmail.com