पौगंडावस्था बीजारोपण... सकारात्मकतेचं, सुसंवादाचं  

विवेक मराठी    18-May-2018
Total Views |

अनेकदा शरीराची वाढ पालकांकडून स्वीकारली जाते, पण मन, बुध्दी यांच्या विकासाला पालकांकडून गांभीर्याने घेतलं जात नाही. मुलांशी असलेल्या आपल्या वर्तनात, बोलण्यात बदल करण्याची हीच वेळ आहे हे काहीसं लक्षातच येत नाही. यामुळे मुला-मुलींमध्ये या काळात होणारे वर्तन बदल हे पालकांच्या तक्रारी म्हणून पुढे येतात. म्हणूनच या मुलांची स्वप्रतिमा निकोप तयार व्हावी, यासाठी पालकांनी जरूर विचार करावा.

निकिताने वरदला हाक मारली, तसा तो खेळ सोडून धावतच थोडया नाराजीने हॉलमध्ये आला. दोन अनोळखी व्यक्ती कागद टेबलवर पसरून बसलेले पाहून त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. निकिताने अजयकडे हसतच पाहिलं. अजय म्हणाला, ''अरे, आपल्या घराचा प्लॅन आणलाय या काकांनी. म्हणून तुला बोलावलं. ते सांगताहेत बघ. ये, बस माझ्या शेजारी.''

वरदचे डोळे चमकले. आठवीमध्ये शिकणारा, वर्गात अगदी सर्वसामान्य असणारा वरद. आज त्याच्या आईबाबांनी त्याला त्यांच्या शेजारी स्थान दिलं. आपणदेखील आई-बाबांइतकेच मोठे, जबाबदार झालो असं वाटून त्याने मनातल्या मनात कितीदा स्वतःची कॉलर ताठ केली. तो खूप खूश झाला.

या एका प्रसंगानंतर त्याच्या वागण्या-बोलण्यात अनेक बदल झाले. शाळेत निरस वाटणाऱ्या गोष्टी तो लक्षपूर्वक करू लागला.

निकिता आणि अजय दोघांनीही ठरवून त्याला 'तू आता मोठा झालास, जबाबदार झालास' याची जाणीव कृतीतून करून दिली. याचा परिणाम म्हणूनच वरदची स्वप्रतिमा योग्य दिशेने तयार होऊ लागली.

बालपणीचा अल्लडपणा संपून खरं तर अधिक पक्व विचार करण्याची सुरुवात या वयात होते. मुलामुलींच्या स्वप्रतिमेला निश्चित रंगरूप लाभतं ते याच काळात. लहान मुलांच्या हातातील गोष्ट कुणी ओढून घेतली, कुणी एखादा धपाटा घातला तरी तात्पुरती रडारड करून ती मोकळी होतात. पण हीच गोष्ट पौगंडावस्थेतील मुलांबाबत घडली, तर त्यांना तो स्वतःचा अपमान वाटतो. आणि यासाठी त्यांच्याकडून जशा दृश्य स्वरूपात प्रतिक्रिया घडतात, तसं मानसिक पातळीवरही काही घडत असतं.

या मोठं होण्याच्या काळात मुलांची मानसिकता समजून घेणं गरजेचं असतं.

''तू बोलू नकोस मोठयांच्या विषयात... तुला काही कळतं का त्यातलं?'' असं विचारणारे पालक दुसऱ्याच क्षणाला आपल्या मुलांना म्हणतात, ''आता काय लहान आहेस का? इतकंही कळू नये तुला...! तो स्वयम बघ कसा समजूतदारपणे वागतो...''

अशा दुहेरी भूमिकेमुळे मुलांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो - 'मी नक्की लहान आहे की मोठा/मोठी...? आणि मी जे आहे ते मला योग्य प्रकारे निभावता येत नाहीये का?'

असे संभ्रमात टाकणारे विचार जर अंतर्मनापर्यंत जात राहतील, तर मुलांच्या स्वप्रतिमेवर, पर्यायाने आत्मविश्वासावर त्याचा परिणाम होतो. मुलांची स्वप्रतिमा बनण्याच्या प्रक्रियेत पालकांनी कोणती काळजी घ्यावी आणि कसा हातभार लावावा, याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत.

प्रथमतः आपलं मूल वाढीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, त्याच्या विकासातला हा सर्वात crucial period आहे या सत्याला समजून घ्या.

अनेकदा शरीराची वाढ पालकांकडून स्वीकारली जाते, पण मन, बुध्दी यांच्या विकासाला पालकांकडून गांभीर्याने घेतलं जात नाही. मुलांशी असलेल्या आपल्या वर्तनात, बोलण्यात बदल करण्याची हीच वेळ आहे हे काहीसं लक्षातच येत नाही. यामुळे मुला-मुलींमध्ये या काळात होणारे वर्तन बदल हे पालकांच्या तक्रारी म्हणून पुढे येतात. म्हणूनच या मुलांची स्वप्रतिमा निकोप तयार व्हावी, यासाठी पालकांनी खालील गोष्टींचा जरूर विचार करावा.

आपल्या मुलामुलींच्या आयुष्यातील या टप्प्याबाबत पालकांनी (विशेषतः आईवडिलांनी) परस्परांशी बोललं पाहिजे. मुलामध्ये कोणकोणते बदल जाणवतात, त्याला/तिला कोणत्या गोष्टीत मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, हे लक्षात घ्यावं. शक्य असल्यास स्वतः अन्यथा योग्य व्यक्तीकडून ते मिळवून देण्याची व्यवस्था करावी.

मूल जरी मोठं झालं नसलं, तरी मोठेपणाच्या जाणिवा जागृत होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अन्य लोकांसमोर, त्याच्या मित्र-मैत्रिणींसमोर आपण त्याला/तिला कमी लेखत नाही ना, अपमान तर करत नाही ना, याचं भान ठेवावं. त्याचप्रमाणे खोटी स्तुती करणंदेखील टाळावं. या दोन्हीचा परिणाम म्हणून मुलांच्या स्वप्रतिमा अवास्तव बनतात.

अनेकदा पालक मुलांची चेष्टा-मस्करी करतात. मूल लहान असेपर्यंत पालक आणि मुलं दोघांनाही यातून आनंद मिळतो, विरंगुळा वाटतो. पण वयात येणारी मुलं-मुली अतिसंवेदनशील बनू लागतात. त्यामुळे आपल्या मस्करीचा अतिरेक होत नाही ना, किंवा त्यामुळे माझं मूलं दुखावलं जात आहे का, हे लक्षात घ्यावं. रोहन काही शब्द तोतरे बोलतो. लहानपणी घरात, नातेवाइकांमध्ये त्याची खूप थट्टा चालायची. आता जेव्हा त्याचा मामा रोहनला भेटला, तेव्हा तो पूर्वीप्रमाणेच थट्टा उडवू लागला. आपल्या वर्मावर बोट ठेवल्याने दुखावला गेलेल्या रोहनने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं.

आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शेजारी यांना आपल्या मुलाशी, मुलीशी कसंही वागण्याची मुभा आपणच तर देतो. यासाठी आपल्या मुलाचा-मुलीचा सन्मान करा. त्याला/तिला जसं आहे तशा गुणवैशिष्टयांसह स्वीकारा.

मुलामधील खटकणाऱ्या गोष्टींचा पाढा इतरांसमोर अथवा त्याच्यासमोर वाचून मूल कधीच बदलत नाही, हे तथ्य लक्षात घ्या.

स्वतःच्या शरीराबाबत, दिसण्याबाबत तो/ती अधिक जागरूक होत आहेत, त्यांना अधिक आकर्षक दिसावं असं वाटतं तर या गोष्टी स्वाभाविक आहेत, पण त्याच्या सीमारेषा ठरवण्याचा संस्कार मात्र आपल्यालाच करावा लागेल.

मुलांचे कपडे, केशरचना हे आजूबाजूच्या सामाजिक वातावरणानुसार ठरतात. यासाठी मुलांच्या विरोधात उभं न राहता आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे कपडे, केशरचना, मेकअप याचं महत्त्व त्यांना आधीपासून समजावून सांगा, त्याबाबत चर्चा करा.

आपलं मत मुलाला logically सांगा. पण त्याच्यावर/तिच्यावर ते लादू नका. त्याचे छोटे-छोटे निर्णय त्याला घ्यायला लावल्यास त्याचा/तिचा आत्मविश्वास वाढू लागेल.

कुटुंबातल्या छोटया-मोठया गोष्टीत मुलांचा सल्ला घ्या. चर्चा करा. पण 'माझंच ऐकलं पाहिजे' असा हट्ट मात्र नेहमी पुरवू नका.

आपल्या पाल्याला स्वतःकडे पाहायला शिकवणं ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. केवळ वरवरचं रूप, रंग, उंची, सौंदर्य अशा शरीरवैशिष्टयांवर त्याची/तिची स्वप्रतिमा ठरत नाही ना, याची काळजी घ्यावी. बाह्य गोष्टी या बदलणाऱ्या असतात. यामुळे आपलं अंतरंग कसं आहे, ते अधिकाधिक कसं खुलवता येईल याची जाणीव गप्पा-गोष्टीतून, वाचनातून करून द्यावी.

निकिता अन अजय यांनी पौगंडावस्थेत पदार्पण करणाऱ्या आपल्या लेकाचं मनापासून स्वागत केलं. त्याच्या चांगल्या गुणांची त्याला जाणीव करून दिली. त्याला सांगितलं, ''बाळा, या लहानमोठेपणाच्या उंबरठयावर तू उभा आहेस. कधी तुझं मन भिरभिर पाखरू होऊन लहान मुलासारखं अल्लड बनेल, तर कधी तुला 'आपणही आता मोठे झालो' अशी पक्व जाणीव करून देईल. पण दोन्ही वेळी सावध राहा. विचारपूर्वक वागण्याचा प्रयत्न कर...''

खरं तर पालकांनी या वयात मुलांशी मैत्री करणं, मोकळेपणाने संवाद साधणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो अनौपचारिकपणे तरीही सातत्याने घडायला हवा.

मुलाने आपल्याला प्रतिप्रश्न केला, तर न रागावता त्याला उत्तर देता आलं पाहिजे. त्यातली आपली भूमिका त्याला नीट सांगणं हे आपलं कर्तव्यच आहे. नेहाने कॉलेजच्या नाटकात भाग घेतला. तिच्यातील कलागुणांना यातून वाव मिळणार होता. पण तिच्या आई-बाबांनी मात्र तिला परवानगी नाकारली. ''आम्हाला विचारलंस का आधी? नाही म्हटलं ना, मग नाही.'' यामुळे घरातील तणाव वाढला. अबोला सुरू झाला. नेमका विरोध का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला.

मुलांच्या मतामागे, विचारांमागे, निर्णयामागे नेमकं काय logic आहे हे लक्षात घेतलं की आपली मुलं mature झाली आहेत की अजून ती प्रक्रिया सुरू आहे, ते लक्षात येईल.

काही पालकांना वाटतं - इतकं मोकळं राहिलो, तर आपलं मूल आपल्याला 'भाव'च देणार नाही. आपला अधिकारच आपण गमावून बसू. पण आपल्या मुलांना आपण 'सुदृढ प्रौढत्वाचा' वारसा द्यावा, असं आपल्याला वाटतं ना? मग पालकांनी मुलांना बालपणाच्या काल्पनिक जगातून अलगद हात धरून व्यवहार्य जगात आणणं ही नाण्याची एक बाजू असेल, तर आपल्या पालकत्वाच्या चौकटीतून बाहेर पडून मुलासाठी चार पावलं आपण खाली उतरणं, मुलाच्या मनापर्यंत पोहोचणं ही नाण्याची दुसरी बाजू आहे.

म्हणूनच आपल्या पौगंडावस्थेतील मुला/मुलीच्या मनात सकारात्मकतेचं, वास्तविकतेचं, स्वयंस्वीकृतीचं बीज पेरणं ही आपल्याला लाभलेली सुखद संधी आहे. पण केवळ उत्सुकतेपोटी दररोज स्वतः पेरलेल्या बीजावरची माती बाजूला करून कोंब शोधणाऱ्या त्या उतावळया मुलासारखी आपली स्थिती होणार नाही, आपण संयमाने काम करू, याची काळजी मात्र आपल्यालाच घ्यावी लागणार!

suchitarb82@gmail.com

9273609555/9823879216