नीळकंठ फॅब्रिक्सचा 'विकास'

विवेक मराठी    02-May-2018
Total Views |

2002 पासून या व्यवसायात आहेत. त्यामुळे आता ते नीळकंठ फॅब्रिक्सचा चेहरा झाले आहेत. व्यवसायात नीळकंठ फॅब्रिक प्रा.लि. कंपनीची विश्वासार्हता आधीच होती, आता ती अधिकच वाढली आहे. त्याचा फायदा त्यांच्या व्यवसायाला खूप चांगल्या पध्दतीने होत आहे.

नीळकंठ फॅब्रिक्स प्रा.लि. आज टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये नावाजलेली कंपनी आहे. 1987 साली शिवकुमार खेतान यांनी त्यांच्या मोठया भावाच्या मदतीने हा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि सर्वांनी घेतलेल्या अथक परिश्रमाने व्यवसायाचा विस्तार होत गेला.

आता शिवकुमार खेतान यांचा मुलगा विकास खेतान व्यवसायाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. विकास खेतान हे व्यवसायात 2002पासून सक्रिय झाले. व्यवसाय म्हटले की चढ-उतार आलेच. ''हे चढउतार लहानपणापासून पाहूनही तुम्हाला व्यवसायात यावे, असे का वाटले?'' या प्रश्नावर विकास खेतान म्हणाले, ''व्यवसायातील चढउतारांची मला लहानपणापासूनच कल्पना होती. किंबहुना मी असे म्हणेन की, त्याचे बाळकडू मला लहानपणीच मिळाले आणि म्हणूनच मी आमचा व्यवसाय समर्थपणे पेलू शकतो. शिवाय माझ्या वडिलांनी सर्वस्व पणाला लावून या व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे माझीही जबाबदारी आहे की, हा व्यवसाय यशस्वीरित्या पुढे न्यावा. तसेच टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये संधीची अनेक दारे खुली असल्यामुळेही मी व्यवसायात यायचे ठरविले.''

विकास खेतान हे व्यवसायात सक्रिय झाले, तेव्हा निर्यातदारांना कच्चा माल पुरविण्याचा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. परंतु राजस्थान येथील भीलवाडा येथून या व्यवसायात खूप स्पर्धा चालू झाल्याने त्यात नुकसान होऊ लागले. तेव्हा 2009मध्ये ते काम बंद करून स्थानिक स्तरावर कच्चा माल देण्याच्या व्यवसायाकडे वळले आणि दर वर्षी व्यवसायात त्यांना फायदाच होत असल्याचे लक्षात येऊ लागले. म्हणून हाच व्यवसाय पुढेही चालू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

''टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये माझे वडील शिवकुमार खेतान यांचा इतका नावलैकिक आहे की, त्याचा मला व्यवसाय करताना किंवा बँकेचे व्यवहार करताना नक्कीच फायदा होतो. तसेच प्रत्येक वेळी मला वडिलांचे अमूल्य मार्गदर्शन मिळत असते. म्हणूनच मी या इंडस्ट्रीमध्ये आज नुसता टिकूनच नाही, तर भक्कमपणे उभा आहे. माझ्या वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद हेच माझे शक्तिस्थळ आहे'' अशा शब्दांत विकास खेतान यांनी आपल्या वडिलांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. ''व्यवसायिकांचे कुटुंब असल्याने, व्यवसायातील चढउताराची घरच्या मंडळींनाही जाणीव असते, त्यामुळे त्यांची अशा प्रसंगी मोलाची साथ मिळते. म्हणूनच ही तारेवरची कसरत शक्य होते'', असेही त्यांनी घरातल्या अन्य सदस्यांविषयी बोलताना सांगितले.

नीळकंठ फॅब्रिक्स अंधेरी आणि तारापूर या दोन ठिकाणी आहे. तारापूरला उत्पादन कारखाना आहे, तर अंधेरी मित्तल इंडस्ट्री येथे प्रशासकीय कार्यालय आहे. त्यांचा व्यवसाय हा जेन्टस् सूटिंग आणि शर्टिंगचा आहे. आज घडीला तारापूर येथे 50 कर्मचारी तर अंधेरी येथे आठ कर्मचारी कार्यरत आहेत. विकास खेतान हे आठवडयातून दोन वेळा तारापूरला जात असतात. ते दैनंदिन कामकाज पाहत असल्यामुळे त्यांचे कर्मचाऱ्यांशी स्नेहाचे संबंध निर्माण झाले आहेत.

'गेल्या आठ-दहा वर्षांत पुरुषांच्याही कपडयांचा ट्रेंड बदलत चालला आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल केलेत का?'' असे विचारले असता, विकास खेतान म्हणाले, ''नक्कीच, गेल्या आठ-दहा वर्षात पुरुषांच्या कपडयांच्या आवडीनिवडीत जे बदल झाले आहेत, त्याप्रमाणे आम्ही आमच्या उत्पादनात लिनन फॅब्रिक, लायक्रा फॅब्रिक याचा समावेश केला आहे. हे फॅब्रिक उच्च दर्जाचे मानले जाते. आमचा स्वतःचा असा काही ब्रँड नाही. आम्ही दुसऱ्यांच्या बँ्रडसाठी कच्चा माल पुरवतो. ऑर्डर घेऊन माल बनवून देतो. आमचा स्वतःचा बँ्रड नसला तरी आमच्या कच्च्या मालाचा इंडस्ट्रीत नावलौकिक आहे.''

विकास खेतान 2002पासून या व्यवसायात आहेत.   त्यामुळे आता ते नीळकंठ फॅब्रिक्सचा चेहरा झाले आहेत.  व्यवसायात नीळकंठ फॅब्रिक प्रा.लि. कंपनीची विश्वासार्हता आधीच होती, आता ती अधिकच वाढली आहे. त्याचा फायदा त्यांच्या व्यवसायाला खूप चांगल्या पध्दतीने होत आहे.

विकास खेतान हे बालपणापासून संघस्वयंसेवक आहेत. आता व्यवसायामुळे त्यांना संघाच्या दैनंदिन शाखेत जाता येत नसले, तरी वर्षभरात संघाच्या होणाऱ्या कार्यक्रमांना मात्र ते आवर्जून जातात. व्यवसाय करताना 'बिझनेस मांइड' असावे लागते असे म्हणतात. परंतु विकास खेतान हे संघस्वयंसेवक असल्याने त्यांच्यावर संघाचे संस्कार आहेत. संघसंस्कार असल्याकारणानेच ते त्यांचा व्यवसायही समर्थपणे करीत आहेत आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांशी, समाजाशी बांधिलकीने व्यवहार करीत आहेत. व्यवसाय सांभाळत असताना संघसंस्काराचा खूप उपयोग होतो, असे विकास खेतान यांनी आवर्जून नमूद केले.

वस्त्रोद्योगात गुंतवणुकीची मोठी संधी असून उद्योजकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द आहे. नुकताच वांद्रा-कुर्ला संकुलात झालेल्या मेक इन इंडिया सेंटरमध्ये 'महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग - आर्थिक वृध्दीसाठी सुवर्णसंधी' असा कार्यक्रम झाला. राज्यात वस्त्रोद्योगाला चांगले भवितव्य आहे. कापूस आणि रेशीम उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनची निर्यात 40% तर भारताची निर्यात 5% आहे. ही दरी भरून काढण्यासाठी महाराष्ट्रात 12 टेक्स्टाइल पार्क सुरू करण्यात येत आहेत. तसेच मेक इन इंडिया निमित्ताने अनेक देशांनी महाराष्ट्र राज्यात यासाठी गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे. ''टेक्स्टाइल इंडस्ट्रीला लाभदायक अशा सर्व धोरणांचा आपल्याला काही उपयोग झाला आहे का? शिवाय सरकारकडून काही अन्य अपेक्षा आहेत का?'' या प्रश्नावर विकास खेतान म्हणाले, ''सध्या महाराष्ट्र सरकार टेक्सटाइल इंडस्ट्रीला विजेसाठी अनुदान देत आहे. त्याची व्यवसायात नक्कीच मदत होत आहे. परंतु मजुरांच्या बाबतीत सरकारचे जे धोरण आहे, उदा., भविष्य निर्वाह निधी (PF) आणि राज्य आरोग्य विमा (ESIC)  हे मजुरांच्या हिताचेच आहे, पण ते मजुरांना पटत नाही आणि त्याचा ताण व्यवसायिकांना होत आहे. त्यासाठी सरकारने काही ठोस योजना केल्या तर उपयोग होईल. त्यासाठी आम्ही असोसिएशनतर्फे सरकारकडे वारंवार निवेदन देत असतो. परंतु अद्याप सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आमची सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की, योजना राबवाव्यात परंतु त्याचा पाठपुरावाही नियमितपणे केला जावा, जेणेकरून व्यवसायात अडथळे निर्माण न होता तो सुरळीत चालू राहील.''

नीळकंठ फॅब्रिक्स प्रा. लि. कंपनीला विकास खेतान यांच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच व्यवसायात होत असलेले नुकसान त्यांनी वेळीच ओळखले आणि व्यावसायाचे स्वरूप बदलून त्याची चांगली भरभराट केली. यशस्वी व्यावसायिकाच्या अंगात उद्यमशीलता, संपर्क, सहयोग, संस्कार, सेवासमर्पण ही पंचसूत्री असायला हवी आणि विकास खेतान या पंचसूत्रीचा अवलंब करीत असल्यामुळेच ते त्यांचा व्यवसाय समर्थपणे आणि दूरदृष्टीने पुढे नेत आहेत.  

- पूनम पवार

9594961859