असतील शिते तर जमतील भुते

विवेक मराठी    21-May-2018
Total Views |

पैसा ही एक गंमतीची गोष्ट आहे. एखाद्या माणसाकडे जेव्हा पैसा नसतो, तेव्हा लोक त्याला फुकटचे सल्ले देतात, त्याचा सहज पाणउतारा करतात, सहानुभूती दाखवत नाहीत, क्वचित त्याच्या गरिबीची चेष्टाही करतात. पण परिस्थिती पालटून तोच माणूस श्रीमंत झाला, की त्यांच्या वागणुकीत एकदम बदल घडून येतो. मुंग्यांना जसा साखरेचा वास लागतो, तसेच स्वार्थी लोकांना दुसऱ्याकडच्या पैशाचा वास लागतो. या जगात आदर हा व्यक्तीला नसून त्याच्याभोवतीच्या संपत्तीच्या वलयाला असतो, हे शहाण्याने मैत्री करताना किंवा ओळखी जोडताना नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

मी एकदा 'टॅक्सी नंबर 9211' नावाचा एक हिंदी चित्रपट बघत होतो. त्यात एक प्रसंग आहे. जय मित्तल (भूमिका - जॉन अब'ाहम) हा एका उद्योगपतीचा खुशालचेंडू मुलगा वडिलांचे निधन झाल्यावरही घरच्या व्यवसायाकडे गंभीरपणे न बघता मित्र-मैत्रिणींसमवेत पाटर्या आणि ऐशआराम करण्यात रमलेला असतो. पण जेव्हा त्याला वडिलांच्या संपत्तीतील काहीही मिळणार नाही, हे लक्षात येताच सगळे मित्र आणि अगदी जवळची मैत्रीणही त्याला सोडून जातात. त्याक्षणी जयचे डोळे उघडतात. पैसा असेल तोवरच लोक आसपास रुंजी घालतात अन्यथा माणसाची किंमत शून्य असते, हे सत्य त्याला कळून चुकते.

मला हा प्रसंग विशेष लक्षात राहण्याचे कारण म्हणजे तो बघत असताना मला अमीनभाई नावाच्या गृहस्थांची वारंवार आठवण येत होती. अमीनभाई एका संपन्न कुटुंबातील गृहस्थ. लहानपणापासून श्रीमंती उपभोगल्याने त्यांची वृत्ती खर्चाबाबत बेफिकीर होती. श्रीमंतीमुळे मित्रांचे वर्तुळ प्रचंड होते. त्यातून अमीनभाईंचा स्वभाव दिलदार आणि कनवाळू. मित्रांपैकी कुणाला काही पैशाची अडचण असेल, तर यांचा हात पहिल्यांदा खिशात जाणार. मित्रांना स्वत:च्या खर्चाने खाऊ घालणे आणि गप्पांची मैफल रंगवणे, हे अमीनभाईंना मनापासून पसंत.

आपल्याकडे 'सब दिन जात न एकसमान' (सगळेच दिवस सारखे नसतात), अशी एक म्हण आहे. अमीनभाईंनाही याचा पडताळा आला. वडिलांचा मृत्यू होताच अमीनभाईंच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्ती आणि मालमत्तेच्या वाटणीवरून घरात भांडणे झाली. परिणामी भाऊ-भाऊ विभक्त झाले. वडिलोपार्जित मालमत्ता व पैसा हातात आल्यावर अमीनभाईंचा मित्रांसह मेजवान्यांचा आणि गप्पांच्या मैफली रंगवण्याचा जुना सिलसिला जोमाने सुरू झाला. त्यातूनच हळूहळू साठवणीतील पैशाला ओहोटी लागू लागली. तरी अमीनभाईंच्या अंगात संचारलेला दानशूर कर्ण गेला नाही. पैशाची चमक दिसल्यावर मित्रांना बेफाट स्तुती करायला काय जात होते? अखेर अमीनभाईंची मालमत्ता विकली गेली आणि श्रीमंतीतून त्यांचा झोका गरिबीकडे वळला. आता मात्र त्यांच्याकडे मित्रांचे मोठे वर्तुळ उरले नाही.

अमीनभाईंचे सध्या काही बरे चाललेले नाही, ही बातमी कानोकानी पोहोचताच गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे मोठया हुशारीने पसार झाले. जवळचे मित्र म्हणवणाऱ्यांना ही भीती होती, की अमीनभाई भेटलाच तर जुन्या मैत्रीचा वास्ता देऊन काही उधार मागेल. तीही वेळ आलीच. रोजखर्चाच्या विवंचनेत असलेल्या अमीनभाईंना पायाचा कर्करोग झाला. त्यावर उपचार करण्याइतकाही पैसा त्यांच्याकडे नव्हता. लाचार होऊन अखेर त्यांनी सर्व मित्रांपुढे मदतीची याचना केली. त्यातले फार थोडे असे निघाले की ज्यांच्यात खाल्ल्या मिठाला जागण्याची कृतज्ञता होती. त्यांच्याच थोडयाफार मदतीमुळे अमीनभाईंच्या रोगावर उपचार होऊ शकले, परंतु अमीनभाईंना पूर्वीचे वैभवाचे दिवस पुन्हा कधीही प्राप्त झाले नाहीत. म्हणूनच अमीनभाईंची आठवण आल्यावर मन अस्वस्थ झाले. कारण चित्रपटातील जय मित्तलला एक टॅक्सी ड्रायव्हर मोलाचा धडा शिकवून जातो, तसा अमीनभाईंना वेळेवर भानावर आणणारा एखादा तरी सच्चा मित्र मिळायला हवा होता.

माझ्याबाबत एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे आयुष्यात चंगळबाज आणि ऐतखाऊ मित्र वाटयाला आले नाहीत. कामाचाच व्याप इतका होता, की मला असे विरंगुळयाचे आणि ऐशआरामाचे जीवन जगण्याइतकी फुरसतच मिळाली नाही. दुबईला गेल्यापासून तब्बल एक तप मी धंदा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी दिवसाचे सोळा तास दुकानात कष्ट करत होतो. रात्री अंथरुणाला पाठ टेकताच गाढ झोप येई. मित्र जमवणे सोडाच, परंतु मी त्या काळात कधी सहलीलाही गेलो नाही. दुबईत असताना आम्हाला कुणी घरी अगत्याने बोलवायचे नाही. आम्हाला सामाजिक वर्तुळ नव्हतेच. पण नंतर मात्र चमत्कार झाला. मला पहिला पुरस्कार मिळाल्यानंतर आमची कंपनी प्रसिध्दीच्या झोतात आली. दुकानांची साखळी विस्तारू लागली, तसतशी परिस्थिती एकदम बदलू लागली. मला व्यावसायिक वर्तुळातून मेजवान्यांची आमंत्रणे येऊ लागली. लोक एकदम आदराने बोलू लागले. आपणहून ओळख करून घेऊ लागले. फोन करून आणि एसएमएस पाठवून कार्यक'मांना उपस्थित करण्याची आठवण करून देऊ लागले. मला आईने लहानपणी सांगितलेली शुक'वारची कहाणी लक्षात होती. त्यामुळे मी श्रीमंत झाल्यावर कधी माजलो नाही. आपण एका गरीब घरातून पुढे आलो आहे आणि चैनबाजी करणे आपल्या रक्तात नाही, याची जाणीव मला कायम राहिली.

'असतील शिते तर जमतील भुते' या म्हणीचा प्रत्यय आणून देणारा गंमतीचा अनुभव मी कारकिर्दीच्या सुरुवातीलाच शिकलो होतो. एकदा मी दुबईहून मुंबईला विमानाने येत होतो. शेजारच्या सीटवर बसलेल्या माणसाने माझी विचारपूस केली. गप्पांच्या ओघात त्याने सहज विचारले, ''तू भारतात घरच्यांसाठी किंवा मित्रांसाठी काही वस्तू बरोबर नेत नाहीस का?'' मी नाही म्हणताच त्याला फार आश्चर्य वाटले, कारण त्या काळात दुबईहून भारतात येणारा माणूस कधीही रिकाम्या हाताने यायचा नाही. त्या माणसाने मला कारण विचारल्यावर मी स्पष्टपणे सांगितले, ''आम्ही गरीब साध्या कुटुंबातील आहोत. माझ्या घरच्यांना सोने, तलम कपडे, पर्फ्यूम, घडयाळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचे आकर्षण नाही. माझे निवडकच मित्र आहेत, तेही अपेक्षा ठेवणारे नाहीत.'' हे ऐकताच त्या माणसाला खूप कौतुक वाटले. तो सहज उद्गारला, ''मुलाऽ, तू सुखी आहेस, अन्यथा तुझ्यावरही माझ्यासारखी वेळ आली असती.'' मग त्याने स्वत:ची कहाणी सांगितली.

हा माणूस दुबईत नोकरी करत असताना सुरुवातीला वर्षातून एकदा गावी जायचा, तेव्हा सर्वांसाठी आठवणीने काही ना काही वस्तू घेऊन जायचा. हळूहळू गावातील लोकांचा गैरसमज होऊ लागला. हा दुबईत काम करतो म्हणजे याच्याकडे बख्खळ पैसा असणार, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. मग याच्यामागे आणि गावातील त्याच्या कुटुंबाकडे लोकांच्या निरनिराळया मागण्यांचा ससेमिरा सुरू झाला. मित्र आणि शेजारी हक्काने त्याला दुबईतून नवनव्या फॅशनच्या वस्तू आणायला सांगू लागले. गावातल्या सार्वजनिक समारंभासाठी त्याच्या कुटुंबाकडून मोठया वर्गणीची मागणी होऊ लागली. तो गावी येताच त्याच्याच खर्चाने मेजवान्या उकळण्याचा सिलसिला सुरू झाला. या सगळया प्रकाराला हा माणूस इतका कंटाळला की अखेर त्याने सुटका करून घेण्यासाठी एक नाटक रचले. आपली दुबईतील नोकरी गेली असून आता मुंबईत राहूनच मेहनत मजुरी करावी लागत आहे, असे त्याने कुटुबीयांना सर्वांना सांगायला लावले. लोकांना ते खरे वाटावे, म्हणून हा माणूस मुंबईत उतरताच वेषांतर करायचा. अंगावर स्वस्तातले शर्ट-पँट चढवायचा. विमानतळाबाहेर येताच सोबत आणलेल्या वस्तूंचे पॅकिंग फोडून त्यांचे एक बोचके बांधायचा आणि ते जवळ न बाळगता पाठीमागून येणाऱ्या मित्राला घरी आणून द्यायला सांगायचा. स्वत: मात्र दीनवाण्या अवस्थेत जुन्या कपडयांची पिशवी घेऊन गावी जायचा. नोकरी नसल्याची सबब सांगून भेटेल त्याकडे उधारी-उसनवारीसाठी हात पसरायचा. ते बघून लोकांची खात्री पटली, की याच्याकडे खरोखर पूर्वीची श्रीमंती उरलेली नाही. मग मात्र त्यांनी त्याला टाळणे सुरू केले. मित्र-शेजारी-गावकरी यांचा पिच्छा टाळण्यासाठी त्याला ते नाटक दर खेपेस वठवावे लागत होते. म्हणून तो मला सुखी समजत होता.

मित्रांनो! आजच्या परिस्थितीला एक संस्कृत सुभाषित अगदी चपखल लागू पडते.

यस्यार्थस्तस्य मित्राणि, यस्यार्थस्तस्य बांधवा:।

यस्यार्थ: स पुमाँन् लोके, यस्यार्थ: स हि पंडित:॥

(अर्थ - ज्याच्याजवळ पैसा आहे त्याचेच लोक मित्र होतात, त्याला भाऊ मानतात आणि तोच उत्तम पुरुष आणि विद्वान समजला जातो.)

या पार्श्वभूमीवर मला कृष्ण-सुदामा यांच्या मैत्रीची गोष्ट खूप अर्थपूर्ण वाटते. आपला मित्र द्वारकेचा राणा असतानाही त्याच्याकडे याचना न करणारा निःस्पृह सुदामा आणि मित्राने प्रेमाने आणलेल्या मूठभर पोह्यांवरून सुदाम्याची गरिबी अंतर्यामी उमजून न बोलता त्याची विवंचना दूर करणारा थोर श्रीकृष्ण. मैत्री असावी ती अशी. निव्वळ श्रीमंतीवर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर आधारलेली मैत्री काही कामाची नाही. शहाण्याने त्यापासून दूर राहिलेलेच बरे...

***

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिकि'या, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 00971505757887 या व्हॉट्स ऍप क'मांकावर पाठवू शकतात.)