सहभोजनातून सहजीवनाकडे

विवेक मराठी    22-May-2018
Total Views |

समरसता सहभोजनातून प्रश्न मिटतील का? जातभावनेचे प्रकटीकरण आणि त्यातून निर्माण होणारे अन्याय अत्याचार बंद होतील का? या आणि अशा असख्य प्रश्नांची उत्तरे दोन्ही प्रकारे देता येतील. होकार आणि नकार देताना आपली भावस्थिती कशी आहे यावर सर्व अवंलबून आहे. म्हणजेच समरसता ही मानसिकतेवर अवलंबून आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. समरसता सहभोजनाचा उपक्रम हा समरसता मानसिकता प्रबळ करण्यासाठी आहे हे समजून घेतले की अनेक प्रश्न निकाली निघतात. कारण सहभोजनातून सहजीवनाकडे जाण्याचा मार्ग खूप आधीपासून आपल्या देशात अवलंबला जात आहे.

 नुकतेच उत्तर प्रदेशात भाजपाच्या कार्यकत्यानी दलित कुटुंबात जाऊन सहभोजन करण्याची मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान आलेले अनुभव आणि आपली मतमतांतरेही अनेकांनी प्रसार माध्यमातून मांडली. भाजपाच्या कार्यकत्यांनी असा उपक्रम केल्यामुळे विशिष्ट रंगासह हा विषय प्रसारमाध्यमांतून प्रसिध्द झाला. सहभोजनाने दलिताचे प्रश्न सुटणार आहेत का? सहभोजनाला जाणारे लोक आपल्या घरून जेवणाचे डबे आणि ताट-वाटी घेऊन गेले होते का? गरीब दलितांना आर्थिक झळ कशासाठी? असे अनेक प्रश्न विविध संपादकीयांतून आणि लेखांतून विचारले गेले. दलिताना सन्मान, संधी देण्याऐवजी समरसता सहभोजनाचे नाटक कशासाठी? असा सूर बऱ्याच मंडळींनी लावला. समरसता सहभोजनावर चारी बाजूंनी टीका होत असताना सरसंघचालक मोहनजी भागवत यांची या विषयातील भूमिका स्पष्ट करणारी बातमीही प्रकाशित झाली. मोहनजी म्हणतात, ''दलितांच्या घरी जाऊन जेवण करून चालणार नाही, तर त्यांनाही आपल्या घरी बोलावले पाहिजे. दोन्ही बाजूंनी व्यवहार झाला, तरच समरसता मोहीम यशस्वी होईल.'' (म.टा., 3 मे) मोहनजींना म्हणजेच संघाला काय अपेक्षित आहे, हे या बातमीतून स्पष्ट होते आहे. आपल्या सहज व्यवहारातून समाजात असणारा दुरावा कमी होऊ शकतो. परस्पराविषयी संशय आणि भीतीची भावना दूर करायची असेल, तर अशा प्रकारचे उपक्रम सहजपणे करून समाजात एकत्वाची भावना निर्माण होऊ शकते आणि त्यातूनच समाज समरसतेच्या दिशेने जाऊ  शकतो, अशी या सहभोजनामागची भूमिका आहे. पण या मोहिमेमागची भूमिका समजून न घेता त्यावर अनेक मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. त्यामुळे मूळ विषय आणि त्यामागची भावना बाजूला राहिली आणि केवळ टीकाटिप्पणीला ऊत आला, अशी काहीशी स्थिती झाल्याचे आपण अनुभवले आहे. असे का झाले ?

या प्रश्नाचे उत्तर शोधताना महाराष्ट्राचे सामाजिक मानस आपण समजून घ्यावे लागते. मागील 80-90 वर्षांची प्रबोधनाची, सामाजिक सुधारणांची परंपरा समजून घ्यावी लागते. त्या काळातील कर्त्या मंडळींनी जातिभेद आणि विविध जातीय-सामाजिक बंधने तोडण्यासाठी सहभोजनाचाच आधार घेतला होता. या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजेच आपले आजचे सामाजिक मानस आहे. महाराष्ट्र सामाजिक पातळीवर काही बाबतीत तरी अन्य राज्यांपेक्षा खूप प्रगत आहे. त्यामुळे सहभोजनासारखे जातभावना संपवणारे प्रयोग कदाचित आज महाराष्ट्रात करण्याची गरज नाही. याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रात जातभावना संपली आहे. महाराष्ट्रातील जातभावनेचे स्वरूप आणि संघर्षाचे बिंदू इतर राज्यांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनुभवाच्या आधारावर अन्य राज्यांतील समरसता सहभोजन या उपक्रमाचे मूल्यमापन करणे सोईचे होणार नाही. त्यासाठी त्या त्या राज्यातील सामाजिक परिस्थितीचे आकलन करून मगच आपण आपले मत व्यक्त करणे योग्य ठरेल.



समरसता सहभोजनातून प्रश्न मिटतील का? जातभावनेचे प्रकटीकरण आणि त्यातून निर्माण होणारे अन्याय-अत्याचार बंद होतील का? या आणि अशा असख्य प्रश्नांची उत्तरे दोन्ही प्रकारे देता येतील. होकार आणि नकार देताना आपली भावस्थिती कशी आहे यावर सर्व अवंलबून आहे. म्हणजेच समरसता ही मानसिकतेवर अवलंबून आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. समरसता सहभोजनाचा उपक्रम हा समरसता मानसिकता प्रबळ करण्यासाठी आहे हे समजून घेतले की अनेक प्रश्न निकाली निघतात. कारण सहभोजनातून सहजीवनाकडे जाण्याचा मार्ग खूप आधीपासून आपल्या देशात अवलंबला जात आहे.

समरसता सहभोजनातून सन्मान, संधी मिळतील का? असा प्रश्न काही मंडळी उपस्थित करत आहेत. आज दलित समूहाला सहभोजनापेक्षा सन्मानाची आणि संधीची खूप मोठीभूक आहे हे सत्य नाकारता येणार नाही. सामाजिक सन्मान देण्या आणि घेण्यासाठी भौतिक गोष्टीची नव्हे, तर मानवी मनाची तयारी असावी लागते. ज्यांच्या मनात जातभावना कायम वास्तव्य करून आहे ते सामाजिक सन्मानाची केवळ पोपटपंची करतात. त्यांचा व्यवहार कधीही सामाजिक सन्मानाला पूरक नसतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मनात स्वत:च्या जन्म जातीबाबत अहंकार किंवा जातीबाबतचा हीनभाव ठेवून कोणीही सामाजिक सन्मान देऊ-घेऊ शकत नाही. जोपर्यंत मनात सुप्त स्वरूपात का होईना, जातभावना आहे, तोपर्यंत सामाजिक सन्मान ही दुर्मीळ गोष्ट असणार आहे.

दलितांना संधी दिली पाहिजे याबाबत दुमत नाही. कारण अशा प्रकारच्या संधीतूनच समाज समान पातळीवर येईल. समान संधीसाठी आरक्षणासारखे आयुध आपण वापरत असतो. पण त्याशिवायही अनेक व्यक्ती, समुदाय दलित-सवर्ण ही दरी मिटवण्यासाठी प्रयत्न करत असतात. ज्यांना आपल्या समाजाबद्दल आणि देशाबद्दल आस्था आहे, ती मंडळी आपापल्या पातळीवर संधी उपलब्ध करून देऊन दलित समूहाला उन्नत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण या प्रयत्नानंतर खऱ्या अर्थाने ज्यांनी संधीचा लाभ घेतला, ते सामाजिक पातळीवर समानतेचा भाव जपतात का? आरक्षण आणि विविध प्रकारच्या संधी मिळाल्यावर, त्याचा लाभ घेतल्यावर ती व्यक्ती जातभावनामुक्त होते का? या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असे आहे. सन्मान, संधी मिळाल्यावरही सामाजिक पातळीवरची दोन समाजगटांतील अंतर कमी होत नाही, असा आपला अनुभव आहे. असे का होते? याचे उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन ठेवले आहे. बाबासाहेब म्हणतात, ''जात म्हणजे हिंदूंना मुक्तपणे मिसळण्यास अडथळा करणारी, पाडून टाकता येण्यासारखी विटांची भिंत किंवा काटेरी तारेसारखी भौतिक वस्तू नाही. जात ही एक जाणीव आहे, एक मानसिक अवस्था आहे. म्हणूनच जातींचा विध्वंस म्हणजे भौतिक अडथळयांचा विध्वंस नव्हे. जातिविध्वंस म्हणजे जाणिवांमध्ये बदल असा आहे.'' म्हणजेच जाणिवेत बदल झाला, तरच आपल्या देशातील समाजवास्तव बदलेल. जातीचे कोष फोडून भारतीय होणे म्हणजेच समरसता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितले, तेच संघ आणि समरसता विषयात काम करणारे कार्यकर्ते आपल्या व्यवहारातून साकार करत आहेत.

 सामाजिक समसरता हा विषय काही संघाची मक्तेदारी नाही आणि संघाने तसा कधी दावाही केला नाही. सध्याच्या काळात या विषयाचे संघ नेतृत्व करतो आहे हे मान्य करावे लागेल. ज्यांना संघमार्ग मान्य नाही, त्यांना त्यांच्या नव्या मार्गाने आपल्या देशात सामाजिक समरसता प्रस्थापित करायला कोणाची हरकत नसेल. अशा प्रयत्नाचे स्वागतच केले पाहिजे. कारण कोणाच्या का होईना प्रयत्नाने जातभावना लयास जात असेल, तर ते आपल्या समाजाच्या आणि देशाच्या हिताचेच आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील भाजपाने आयोजित केलेल्या समरसता सहभोजनाकडे केवळ राजकीय दृष्टीने न बघता सामाजिक व राष्ट्रीय परिप्रेक्ष्यात त्या गोष्टीकडे पाहिले पाहिजे. दलित समाजाच्या उन्नतीसाठी भौतिक स्वरूपाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्या आपल्या बरोबरच्या पातळीवर आणणे ही काळाची गरज आहेच, पण त्याहीपेक्षा मानसिक पातळीवर एकात्मता निर्माण करणे अतिआवश्यक आहे. आणि म्हणून अनेकांना कालबाह्य वाटणारी सहभोजने जिथे जिथे आवश्यक आहेत तिथे तिथे झालीच पाहिजेत. कारण मनाकडे पोहोचण्याचा मार्ग जेवणाच्या थाळीतून पुढे जातो. सहभोजनातून सहजीवनाची वाट चोखळता येते..

9594961860